गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित महिला सक्षमीकरण या विषयावरील जी-20 मंत्रीस्तरीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले.
उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी महात्मा गांधीजींच्या नावावरून नामकरण करण्यात आलेल्या गांधीनगर या शहराच्या स्थापना दिनानिमित्त मान्यवरांचे या शहरात स्वागत केले. या कार्यक्रमानिमित्त गांधीनगर येथे आलेल्या पाहुण्यांना अहमदाबाद मधील गांधी आश्रमाला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यांसारख्या समस्यांवर तातडीने आणि शाश्वत स्वरूपाच्या उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की गांधी आश्रमात आपल्याला गांधीजींच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि शाश्वतता, स्वावलंबन आणि समानतेविषयीच्या त्यांच्या दूरदर्शी संकल्पना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी मिळते. मान्यवरांना हे सर्व प्रेरणादायी वाटेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या मान्यवरांना दांडी कुटीर संग्रहालयाला भेट देता येईल असे देखील त्यांनी नमूद केले. गांधीजींचा सुप्रसिध्द चरखा जवळच्या गावात राहणाऱ्या गंगाबेन नावाच्या महिलेने तयार केला होता आणि तेव्हापासून गांधीजींनी खादीचा वापर सुरु केला आणि पुढील काळात जो स्वावलंबन आणि शाश्वतता यांचे प्रतीक बनला अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
“जेव्हा महिला समृध्द होतात तेव्हा जग समृध्द होते,” असे पंतप्रधान म्हणाले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यातून जागतिक प्रगतीला चालना मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, महिलांच्या नेतृत्वाखाली समावेशकतेची जोपासना होते आणि त्यांची मते सकारात्मक बदलांना प्रेरणा देतात. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासात्मक दृष्टीकोन स्वीकारणे हा महिलांना सक्षम करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे आणि या दिशेने भारत मोठी भरारी घेत आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतःच एक प्रेरणादायी उदाहरण आहेत यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. राष्ट्रपती मुर्मू या आदिवासी पार्श्वभूमीतून आलेल्या असल्या तरी त्या आता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही चे नेतृत्व करत आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या संरक्षण दलांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या संरक्षण दलाच्या कमांडर-इन चीफ आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान म्हणाले की भारतीय राज्यघटनेने अगदी सुरुवातीपासूनच महिलांसह सर्वच नागरिकांना ‘मतदानाचा अधिकार’ दिला तसेच निवडणूक लढवण्याचा अधिकार देखील अशाच समानतेच्या आधारावर देण्यात आला. निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी आर्थिक, पर्यावरणीय तसेच सामाजिक बदलासाठी कारणीभूत महत्त्वाचे घटक असतात याची नोंद घेऊन भारतातील 1.4 दशलक्ष ग्रामीण स्थानिक संस्थांमध्ये 46% निर्वाचित प्रतिनिधी महिला आहेत अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यामातून महिलांनी केलेले कार्य देखील या बदलामागील समर्थ शक्ती ठरली आहे ही गोष्ट अधोरेखित करून त्यांनी महामारीच्या काळात बचत गट आणि निर्वाचित महिला प्रतिनिधी हे मोठे आधारस्तंभ ठरले असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या सर्वांच्या यशस्वी कामगिरीची उदाहरणे दिली आणि मास्क तसेच सॅनिटायझर यांचे उत्पादन आणि संसर्गाला प्रतिबंध करण्याबाबत त्यांनी निर्माण केलेला जागरुकतेचा उल्लेख केला. भारतातील 80% हून अधिक परिचारिका आणि सुईणी महिलाच आहेत. महामारीच्या काळात त्या आपल्या संरक्षणाची पहिली फळी होत्या. आणि त्यांच्या कामगिरीबद्दल आम्हांला अभिमान आहे,” ते पुढे म्हणाले.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे हे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म-स्तरीय संस्थांना मदत करण्यासाठी देण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या कर्जांपैकी 70%कर्जे महिला लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, स्टँड अप इंडिया योजनेतील 80% लाभार्थी महिला असून त्यांना ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी बँकांकडून कर्जे देण्यात आली आहेत. स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन पर्यावरणावर थेट प्रभाव टाकते आणि महिलांच्या आरोग्यात सुधारणा करते याचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा ठळक उल्लेख केला. देशातील ग्रामीण महिलांना सुमारे 100 दशलक्ष स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
2014 पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तांत्रिक शिक्षण घेणार्या महिलांची संख्या दुप्पट झाली आहे, भारतातील STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) पदवीधरांपैकी सुमारे 43 टक्के महिला आहेत तर अंतराळ वैज्ञानिकांपैकी सुमारे एक चतुर्थांश महिला आहेत. "चांद्रयान, गगनयान आणि मिशन मंगळ सारख्या आपल्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांच्या यशात महिला वैज्ञानिकांची गुणवत्ता आणि कठोर परिश्रम यांचा मोठा वाटा आहे" असे ते म्हणाले.
आज भारतात उच्च शिक्षणासाठी पुरुषांपेक्षा मोठ्या संख्येने महिला प्रवेश घेत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला वैमानिकांची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या देशांपैकी भारत एक आहे, भारतीय हवाई दलातील महिला वैमानिक देखील लढाऊ विमानांचे सारथ्य करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या सर्व सशस्त्र दलांमध्ये परिचालन कार्यात तसेच लढाऊ मंचावर महिला अधिकारी तैनात केल्या जात असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
ग्रामीण कृषी कुटुंबांचा कणा आणि छोटे व्यापारी तसेच दुकानदार म्हणून महिला बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. निसर्गाशी असलेले महिलांचे दृढ नाते अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, हवामान बदलाच्या समस्येवरील अभिनव उपाय महिलांकडे आहे. 18 व्या शतकात अमृता देवी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील बिश्नोई समुदायाने अनियंत्रित वृक्षतोड रोखण्यासाठी 'चिपको आंदोलन' सुरू करून भारतात सर्वप्रथम प्रमुख हवामान कृतीचे नेतृत्व केल्याची आठवण त्यांनी करून दिली.
त्यांनी इतर अनेक गावकऱ्यांसोबत निसर्गासाठी आपले बलिदान दिले अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “भारतातील महिला ‘मिशन लाइफ- पर्यावरणासाठी जीवनशैली" च्या राजदूत देखील आहेत” असे पंतप्रधान म्हणाले. कमी वस्तूंचा वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि पुनर्उद्देश चे पारंपारिक ज्ञान महिलांना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विविध उपक्रमांतर्गत, महिला सौर पॅनेल आणि दिवे बनविण्याचे सक्रियपणे प्रशिक्षण घेत आहेत असे पंतप्रधान पुढे म्हणाले. ग्लोबल साउथमधील भागीदार देशांसोबत सहकार्य करण्यात यशस्वी ठरलेल्या ‘सोलर ममाज’ उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला.
“जागतिक अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे" असे सांगत पंतप्रधानांनी भारतातील महिला उद्योजकांच्या भूमिकेवर भर दिला. अनेक दशकांपूर्वी, 1959 मध्ये मुंबईतील सात गुजराती महिलांनी एकत्र येऊन श्री महिला गृह उद्योग ही ऐतिहासिक सहकार चळवळ उभारली, जिने लाखो महिला आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन बदलले असे ते म्हणाले. मोदींनी लिज्जत पापड या त्यांच्या सर्वात प्रसिद्ध उत्पादनाचा उल्लेख केला आणि सांगितले की ते गुजरातमधील बहुतेक खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये असेल! त्यांनी दुग्धव्यवसाय क्षेत्राचेही उदाहरण दिले आणि एकट्या गुजरातमध्ये या क्षेत्रात 3.6 दशलक्ष महिलांचा सहभाग आहे अशी माहिती दिली. भारतात, सुमारे 15% युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संस्थापक आहे आणि या महिलांच्या नेतृत्वाखालील युनिकॉर्नचे एकत्रित मूल्य 40 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्तृत्ववान महिला आदर्श बनतील असे समान व्यासपीठ तयार करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. बाजारातील प्रवेश, जागतिक मूल्य साखळी आणि परवडणारा वित्तपुरवठा यातील अडथळे दूर करण्याच्या दिशेने काम करण्यावर आणि त्याचबरोबर काळजी आणि घरातील कामांचा भार योग्यरित्या हाताळला जाईल हे सुनिश्चित करण्याबर त्यांनी भर दिला.
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी महिला उद्योजकता, नेतृत्व आणि शिक्षण या विषयावर मंत्रिस्तरीय परिषदेचा भर असल्याबद्दल कौतुक केले आणि महिलांमध्ये डिजिटल आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी ‘टेक-इक्विटी प्लॅटफॉर्म’ सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारताच्या G20 अध्यक्षतेखाली, 'महिला सक्षमीकरण' वर एक नवीन कार्यगट स्थापन करण्यात येत आहे असेही त्यांनी नमूद केले. गांधीनगरमधील अथक प्रयत्नांमुळे जगभरातील महिलांना प्रचंड आशा आणि आत्मविश्वास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.