चान्सलर शोल्ज,
मित्रहो, गुटेन टाग नमस्कार!
सर्वात प्रथम, माझे आणि आमच्या प्रतिनिधी मंडळाचे अतिशय उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी चान्सलर शोल्ज यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. यंदाच्या वर्षीचा माझा पहिला परदेश दौरा जर्मनीमध्ये होत आहे, याचा मला आनंद वाटतोय. या वर्षीच्या प्रारंभी ज्या विदेशी नेत्याबरोबर माझे पहिले दूरध्वनी संभाषण, ते माझे मित्र चान्सलर शोल्ज यांच्याबरोबर झाले होते. चान्सलर शोल्ज यांच्यासाठीही आजची भारत आणि जर्मनी ‘आयजीसी’ ही या वर्षामधली पहिली आयजीसी आहे. अशा विविध गोष्टी पहिल्यांदा होत आहेत, यावरून भारत आणि जर्मनी हे दोन्ही देश या महत्वपूर्ण भागीदारीला किती प्राधान्य देत आहेत, हेच दिसून येते. लोकशाहीवादी देश म्हणूनही भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये अनेक मूल्ये सामाईक आहेत. या मूल्यांच्या आणि सामाईक हितांच्या आधारे गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांच्या व्दिपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
आपली याआधीची आयजीसी वर्ष 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर जगामध्ये खूप महत्वपूर्ण परिवर्तन घडून आले. कोविड -19 महामारीने वैश्विक अर्थव्यवस्थेवर विनाशकारी प्रभाव टाकला आहे. मात्र सध्याच्या ‘भौगोलिक राजकीय’ घटनांनीही दाखवून दिले की, जागतिक शांतता आणि स्थिरता किती नाजूक अवस्थेत आहे आणि सर्व देश परस्परांशी किती जोडले गेले आहेत. युक्रेन संकटाच्या प्रारंभीच आम्ही लगेचच युद्धविरामाचे आवाहन केले आणि हा वाद सोडवण्यासाठी चर्चा करणे- संवाद साधणे हा एकमेव उपाय आहे, या गोष्टीवर भर दिला होता. आमचे म्हणणे असे आहे की, युद्धामध्ये कोणताही पक्ष विजयी होणार नाही, आणि नुकसान मात्र सर्वांचे होईल. म्हणूनच आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. युक्रेन संघर्षामुळे उलथापालथ होत असल्यामुळे तेलाच्या किंमती गगनाला जावून भिडत आहेत. जगामध्ये खाद्यान्न आणि खते यांची कमतरता भासू लागली आहे. त्याचा जगातल्या प्रत्येक कुटुंबावर भार पडत आहे.परंतु विकसनशील आणि गरीब देशांवर त्याचा अधिक गंभीर परिणाम होईल. या संघर्षाच्या मानवतावाद विषयक परिणामांबाबत भारत अधिक चिंतेत आहे. आम्ही युक्रेनला मानवतावादी दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. आम्ही इतर मित्र देशांनाही अन्नधान्य निर्यात, तेलाची पूर्तता आणि आर्थिक मदतीच्या माध्यमातून सहाय्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आज सहाव्या आयजीसीमुळे भारत -जर्मनी यांच्या भागीदारीला एक नवीन दिशा मिळाली आहे. या आयजीसीने ऊर्जा आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांमध्ये आमच्या सहकार्याला महत्वपूर्ण मार्गदर्शन दिले आहे. मला विश्वास आहे की, आज घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आपल्या क्षेत्राच्या आणि विश्वाच्या भविष्यावर सकारात्मक प्रभाव पडेल. आज आम्ही ‘हरित आणि शाश्वत विकासासाठी इंडो-जर्मनी भागीदारी’ सुरू करीत आहोत. भारताने ग्लासगोमध्ये आपल्या हवामानविषयक महत्वाकांक्षांमध्ये अधिक वृद्धी करून संपूर्ण विश्वाला दाखवून दिले आहे की, आमच्यासाठी हरित आणि शाश्वत विकास-वृद्धी एक ‘आर्टिकल ऑफ फेथ’ आहे. या नवीन भागीदारीनुसार जर्मनीने वर्ष 2030 पर्यंत 10 अब्ज यूरो अतिरिक्त विकास मदतीतून भारताच्या हरित वृद्धी नियोजनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जर्मनी आणि चान्सलर शोल्ज यांना धन्यवाद देतो.
आमच्याकडे असलेल्या पूरक शक्ती-क्षमता लक्षात घेवून आम्ही ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये ग्रीन हायड्रोजन पायाभूत सुविधा वाढीसाठी हे खूप उपयोगी ठरणार आहे. भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांना इतर देशांच्या विकासामध्ये सहकार्य करण्याचा खूप मोठा अनुभव आहे. आज आपण आपल्या अनुभवांना जोडून त्रिपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून तिस-या देशांमध्ये संयुक्त प्रकल्पांवर काम करण्याचाही निर्णय घेतला आहे. आपला हा सहयोग विकसनशील विश्वासाठी पारदर्शी आणि शाश्वत विकास योजनांचा पर्याय उपलब्ध करून देईल.
मित्रांनो,
कोविड-पश्चात काळामध्ये इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत अधिक वेगाने विकास साधत आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारत या विश्वाचा एक महत्वपूर्ण आधारस्तंभ बनेल, असा आम्हाला विश्वास आहे. अलिकडेच आम्ही अतिशय कमी कालावधीमध्ये यूएई तसेच ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर व्यापारविषयक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या. युरोपियन महासंघासमवेतही आम्ही ‘एफटीए’ चर्चेमध्ये वेगाने प्रगती करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारतातले कुशल कामगार आणि व्यावसायिक यांच्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना लाभ मिळाला आहे. मला विश्वास आहे की, भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान होत असलेल्या काँप्रिहेन्सिव्ह मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप अॅग्रिमेंट’ यामुळे दोन्ही देशांदरम्यान ये-जा अधिक सुलभ होवू शकेल.
आपण वेळ दिल्याबद्दल आणि आपण घेतलेल्या पुढाकाराबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला खूप -खूप धन्यवाद देतो.