#MannKiBaat: PM Modi extends Diwali greetings to people across the country
#MannKiBaat: Diwali gives us the message to move from darkness to light, says PM Modi
#MannKiBaat: Diwali has now become a global festival. It is being celebrated across several countries, says PM
#MannKiBaat: PM Narendra Modi lauds courage of our jawans #Sandesh2Soldiers
#MannKiBaat –Our jawans display courage not only at borders but whenever there are natural calamities or even law and order crisis: PM
Aspirations of the poor must be kept in mind while formulating policies: PM Modi during #MannKiBaat
Discrimination between sons and daughters must be ended in society: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat: PM Modi recalls contribution of Sardar Patel towards unity of the country, pays tribute to former PM Indira Gandhi
SardarPatel gave us ‘Ek Bharat’, let us make it ‘Shreshtha Bharat’, says Prime Minister Modi during #MannKiBaat
PM Modi pays tribute to Guru Nanak Dev during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो,

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारत एक असा देश आहे, जेथे वर्षातील 365 दिवस देशात कुठे ना कुठे, कोणता ना कोणता सण साजरा केला जातो.  उत्सव हेच भारतीयांच्या आयुष्याचे दुसरे नाव आहे, असे दुरुन पाहणाऱ्या कोणालाही वाटेल आणि ते स्वाभाविक आहे. वेद काळापासून आजपर्यंत भारतातील उत्सवांची परंपरा ही काळानुरुप बदलत गेली आहे. कालबाहय उत्सवांची परंपरा संपविण्याची धमक आम्ही दाखविली आहे.  काळ आणि समाजाच्या मागण्यानुसार उत्सवांमध्ये होणारे बदलही आम्ही सहजपणे स्वीकारले आहेत. मात्र या सर्व प्रवासात एक गोष्ट लक्षात येते की, भारतात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचा हा संपूर्ण प्रवास, त्याची व्याप्ती, त्याची सखोलता, जनमानसावरील त्याचा प्रभाव “स्व ला समष्टीपर्यंत  घेऊन जाणे” या एका मूलमंत्राने जोडला गेला आहे.  व्यक्ती आणि व्यक्तीमत्वाचा विस्तार व्हावा, आपल्या मर्यादित विचारांच्या परिघाला समाजापासून ब्रम्हांडांपर्यंत विस्तारण्याचा प्रयास व्हावा आणि उत्सवाच्या माध्यमातून हे सर्व साध्य करावे  हा या मागचा मूळ उद्देश आहे.  भारतात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांमध्ये समाविष्ट आहार विचारात घेतला तर त्यातही  हवामान कसे आहे, कोणत्या हवामानात कसा आहार घेतला पाहिजे, शेतकरी कोणते पिक घेतात, ते पिक घेण्याचे दिवस उत्सवांमध्ये कशाप्रकारे सामावून घेतले जातील, आरोग्याच्या दृष्टीने कशाप्रकारचे संस्कार असावेत, या सर्व बाबी आमच्या पूर्वजांनी वैज्ञानिक पध्दतीने उत्सवांमध्ये समाविष्ट केल्या आहेत.  आज संपूर्ण जग पर्यावरणाबद्दल चर्चा करते आहे. निसर्गाचा विनाश ही काळजीची बाब बनली आहे. भारतातील उत्सवाची परंपरा मात्र निसर्गाप्रती प्रेमभावना वाढवणारी, लहान बालकांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाला संस्कार  देणारी आहे.  वृक्ष असो, रोपटी असो, नदी असो, पशु असो, पर्वत असो अथवा पक्षी असो, प्रत्येकाच्या प्रती दायित्वाची भावना  निर्माण करणारे उत्सव आपण साजरे करतो.  हल्ली आपण रविवारी सुट्टी घेतो, मात्र जुन्या पिढीतील मजूरी करणारा वर्ग,  कोळी बांधव हे सर्व अमावस्या आणि पोर्णिमेच्या दिवशी सुट्टी घेत असत. पौर्णिमा आणि अमावस्येला समुद्रातील पाण्यात कशाप्रकारे बदल घडून येतात आणि निसर्गावर कोणकोणत्या बाबींचा प्रभाव होतो हे आज विज्ञानाने सिध्द केले आहे. मानवी मनावरही तसाच प्रभाव दिसून येतो. म्हणजेच आपल्या पूर्वजांनी सुट्टीचे दिवससुध्दा ब्रम्हांड आणि विज्ञानाशी संबंधित घडामोडी लक्षात घेऊन निर्धारित केले होते हे लक्षात येते. आज आपण दिवाळीचा उत्सव साजरा करतो आहोत.  आपला प्रत्येक उत्सव शिकवण देणारा असतो, बोधदायक असतो, दिवाळीचा हा सण “तमसो मा ज्योतिर्गमय” अर्थात अंधकारापासून प्रकाशाच्या दिशेला जाण्याचा एक संदेश देतो. हा अंधार म्हणजे प्रकाशाच्या अभावाने येणारा अंधार नाही, तर तो अंधश्रध्देचाही अंध:कार आहे.  अशिक्षित असण्याचा अंध:कार आहे, दारिद्रयाचा ही अंध:कार  आहे, समाजातील  दृष्ट प्रवृत्तींचा अंध:कार आहे. दिपावलीनिमित्त दिवे उजळून समाजातील दोषरुपी अंध:कार, व्यक्तींतील दोषरुपी अंध:कार दूर करण्याचा आणि त्याच विचाराने दिपावलीनिमित्त दिवे उजळून सकारात्मकतेचा प्रकाश सर्वदूर पोहोचवण्याचा हा प्रयास आहे.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की दिवाळीच्या दिवसांमध्ये भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात श्रीमंताच्या हवेलीत किंवा गरीबाच्या झोपडीत प्रत्येक घरात स्वच्छतेची मोहिम राबविली जाते.  घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता केली जाते. गरीबांच्या घरी मातीची भांडी असली, तरी ती सुध्दा दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छ घासलेली, चमकलेली दिसतात. त्यादृष्टीने दिवाळीसुध्दा एक स्वच्छतेची मोहिम आहे.  मात्र केवळ घरातच नाही तर संपूर्ण परिसरातील स्वच्छता, गल्ल्यांमधील स्वच्छता, संपूर्ण गावाची स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.  त्या अनुषंगाने आपण स्वच्छतेची ही पंरपरा विस्तारली पाहिजे. दिवाळीचा हा उत्सव आता केवळ भारताच्या सीमांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. जगातील सर्व देशांमध्ये दिवाळीचा सण वेगवेगळया प्रकारे साजरा केला जातो. जगभरातील अनेक सरकारे, तेथील संसदा आणि प्रशासक दिवाळीच्या उत्सवात सहभागी होऊ इच्छितात.  पूर्वेकडचे देश असो वा पश्चिमेकडचे, विकसित देश असो वा विकसनशील देश असो, आफ्रिका असो वा आयलंड. सगळीकडेच दिवाळीचा उत्साह दिसून येतो. अमेरिकेच्या टपाल सेवेने यावर्षी दिपावलीनिमित्त टपाल तिकीट जारी केले, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. कॅनडाच्या पंतप्रधानांनीही  दिवाळीच्या निमित्त दिवे उजळतांनाचे आपले छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. 

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लंडनमध्ये  दिवाळीनिमित्त सर्व समाजांना एकत्र करणारा एक शानदार कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात ते स्वत:ही सहभागी झाले. मोठया उत्साहाने  दिवाळी साजरी केली जात नसेल, असे एकही शहर ब्रिटनमध्ये नाही. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी  इन्स्टाग्रामवर जे छायाचित्र ठेवले आहे आणि संपूर्ण जगासोबत अभिमानाने  शेअर केले आहे, त्या छायाचित्रात काय आहे ? तर सिंगापूर संसदेच्या 16 महिला खासदार भारतीय साडया नेसून संसदेच्या बाहेर उभ्या आहेत. हे छायाचित्र चांगलेच प्रसिध्द झाले आहे आणि दिवाळीनिमित्त हे उपक्रम राबविण्यात आले आहे.  सिंगापूरमध्ये तर प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे.  ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला दिपावलीच्या शुभकामना देतानाच ऑस्ट्रेलियाच्या विविध शहरांमध्ये सर्व समाजांनी दिवाळीचा उत्सव साजरा करावा असे आवाहनही केले आहे. न्यूझिलंडचे पंतप्रधान नुकतेच येथे आले होते, आपल्याला दिवाळीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी न्यूझिलंडला लवकर परत जायचे आहे, असे त्यांनी मला सांगितले. दिपावलीचा हा प्रकाशाचा उत्सव, जागतिक समुदायालाही अंध:कारापासून प्रकाशाकडे नेणारा एक प्रेरणेचा उत्सव होत आहे, असे मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

दिवाळीच्या उत्सवात नवे कपडे आणि विविध चवीच्या खाद्य पदार्थांबरोबरच फटाकेसुध्दा मोठया आवडीने वाजवले जातात. लहान मुले आणि युवकांना फटाके उडविणे मनापासून आवडते. लहान मुले मात्र कधी-कधी उत्साहाच्या भरात नको ते धाडस करुन जातात, अनेक फटाके एकत्र करुन एकाच वेळी मोठा आवाज करण्याचा प्रयत्न करुन ते अनेकदा मोठया संकटाला  आमंत्रण देतात. आपल्या आजूबाजुला कोणत्या गोष्टी आहेत, आग लागण्याची शक्यता आहे का, हे अनेकदा लक्षात येत नाही. दिवाळीच्या दिवसांमध्ये अशाप्रकारच्या अपघातांच्या बातम्या, आगीच्या बातम्या, अपमृत्यूच्या बातम्या हा काळजीचा विषय आहे.  दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक डॉक्टरसुध्दा आपल्या कुटुंबांसह दिवाळी साजरी करण्यात मश्गुल असतात. त्यामुळे डॉक्टरांचा अभाव ही आणखी एक  समस्या निर्माण होते. आई-वडिलांना, पालकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की, मुले फटाके वाजवत असतांना, तुम्ही त्यांच्यासोबत राहा, कोणतीही चूक होऊ नये आणि अपघात होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घ्या. आपल्या देशात दिवाळीचा उत्सव दीर्घ काळ चालतो. हा सण एका दिवसाचा नसतो. गोवर्धन पूजा, भाऊबीज, लाभपंचमी आणि कार्तिक पौर्णिमा अर्थात तुलसी विवाहापर्यंत दीर्घ काळ  हा उत्सव साजरा केला जातो. दिपावलीचा उत्सव साजरा करतांना आपण छठपूजेचीही तयारी करतो. भारताच्या पूर्व भागात छठपूजेचा उत्सव फार मोठा सण असतो,  महाउत्सव मानला जाणारा हा सण चार दिवस चालतो. हा उत्सवसुध्दा समाजाला एक फार मोठा अर्थपूर्ण संदेश देतो. सुर्यदेवता आपल्याला जे काही देते त्यापासूनच आपल्याला सर्व काही प्राप्त होते. प्रत्यक्ष आणि परोक्ष सुर्यदेवतेपासून आपल्याला जे प्राप्त होते त्याचा हिशोब करणे कठीण आहे.  छठ पूजा हा सुर्याच्या उपासनेचा उत्सव आहे.  जगात लोक उगवत्या सुर्याची पूजा करतात, अशी म्हण आहे. मात्र छठपूजा हा असा उत्सव आहे, ज्यात मावळत्या सुर्याचीही पूजा केली जाते.  त्या माध्यमातूनही एक मोठा सामाजिक संदेश दिला जातो.

सण दिवाळीचा असो, छठपूजेचा असो, आजचा प्रसंग आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देण्याचा आहे. मात्र त्याचबरोबर माझ्यासाठी देशवासियांचे आभार मानण्याचा हा प्रसंग आहे.  गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत आणि आपल्या सुखासाठी आपल्या सैन्यातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे, ते आपण सर्वच जाणतो. माझ्या भावविश्वात सैन्यातील जवानांचा सुरक्षा बलातील जवानांचा हा त्याग, तपस्या आणि परिश्रम याबद्दल कायम कृतज्ञतेची भावना असते आणि त्याच भावनेतून माझ्या मनात आले की यंदाची दिवाळी या सुरक्षा बलांना समर्पित असावी.  मी देशवासियांना संदेश टू सोल्जर्स या मोहिमेसाठी निमंत्रित केले. देशाच्या जवांनाप्रती अतीव प्रेम, गौरव आणि आदराची भावना नसेल, अशी व्यक्ती भारतात सापडणार नाही, असे मी आज नतमस्तक होऊन सांगू इच्छितो. ज्याप्रकारे ही भावना अभिव्यक्त झाली आहे,  त्यामुळे प्रत्येक नागरिकाला एका वेगळया शक्तीचा प्रत्यय आला आहे.  आपल्या सर्वांच्या संदेशांच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा बलाच्या जवानांना नवे धैर्य, नवी उभारी मिळाली आहे. आपल्या देशाच्या जवानांसाठी दिवा लावला नसेल, संदेश दिला नसेल, असे कोणीच नसेल, शाळा असो, महाविद्यालय असो, विद्यार्थी असो, गाव असो, गरीब असो, व्यापारी असो, दुकानदार असो, राजकीय नेता असो, खेळाडू असो, अभिनेता असो, या सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसार माध्यमांनीसुध्दा या दिपोत्सवाला सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी मानले आहे. बीएसएफ असो, सीआरपीएफ असो, भारत तिबेटीयन पोलिस असो, आसाम रायफल असो, नौसेना असो, लष्कर असो, वायूसेना असो, तटरक्षक दल असो, असे अनेक सैनिक आहेत, सैन्यदले आहेत ज्यांचा सर्वांचा उल्लेखही  मी केला नाही.  त्या बलांमध्ये आमचे जवान कर्तव्य बजावतांना  कष्ट सोसत आहे.  आज आम्ही दिवाळी साजरी करतो त्याचवेळी कोणी जवान  वाळवंटात  उभा आहे, कोणी हिमालयाच्या शिखरांवर आहे, कोणी उद्योगांचे रक्षण करीत आहे तर कोणी विमानतळाची  सुरक्षा पाहत आहे. हे सर्व जवान असंख्य जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.  उत्सव साजरे करण्याच्या मन:स्थितीत आपण या सर्वांचे स्मरण केले तर त्या स्मरणाला एक नवी ताकत लाभते, एका संदेशातून फार मोठे सामर्थ्य व्यक्त होते आणि हे काम संपूर्ण देशाने शक्य करुन दाखवले आहे. मी खरोखर मनापासून देशवासियांचे आभार मानतो.  अनेकांनी आपल्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून, काहींनी चित्रांच्या माध्यमातून, काहींनी रांगोळीच्या माध्यमातून, काहींनी कार्टूनच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.  सरस्वतीची कृपा असणाऱ्यांनी कविता केल्या. तर काहींनी खूप चांगली घोषवाक्ये तयार केली.  माझे नरेंद्र मोदी ॲप असो, किंवा माय गव्ह असो, या मंचांवर शब्दांच्या रुपात, रंगाच्या रुपात, लेखणीच्या रुपात, विविध प्रकारच्या भावनांचा महासागर उसळतो आहे, असे मला वाटू लागले आहे.  माझ्या देशातील जवानांसाठी हा किती अभिमानाचा क्षण असेल, याची मी कल्पना करु शकतो. “संदेश टू सोल्जर्स” या हॅशटॅगवर प्रतिकात्मक स्वरुपात असंख्य भावना व्यक्त झाल्या आहेत.

अश्विनीकुमार चौहान यांनी एक कविता पाठविली आहे, ती मला यावेळी वाचून दाखवाविशी  वाटते.

अश्विनीजी म्हणतात

“मैं त्योहार मनाता हूँ, ख़ुश होता हूँ, मुस्कुराता हूँ,

मैं त्योहार मनाता हूँ, ख़ुश होता हूँ, मुस्कुराता हूँ,

ये सब है, क्योंकि, तुम हो, ये तुमको आज बताता हूँ |

मेरी आज़ादी का कारण तुम, ख़ुशियों की सौगात हो,

मैं चैन से सोता हूँ, क्योंकि,

मैं चैन से सोता हूँ, क्योंकि तुम सरहद पर तैनात हो,

शीश झुकाएँ पर्वत अम्बर और भारत का चमन तुम्हें,

शीश झुकाएँ पर्वत अम्बर और भारत का चमन तुम्हें,

उसी तरह सेनानी मेरा भी है शत-शत नमन तुम्हें,

उसी तरह सेनानी मेरा भी है शत-शत नमन तुम्हें ||”

माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यांच्या माहेरी आणि सासरच्या कुटुंबांत जवानांचा भरणा आहे, अशा शिवानी नावाच्या एका बहिणीने मला एक दूरध्वनी संदेश पाठविला आहे.  जवानांचे हे कुटुंब म्हणते,  

“नमस्कार, पंतप्रधान महोदय. मी शिवानी मोहन बोलते आहे. या दिवाळीनिमित्त आपण सुरु केलेल्या “संदेश टू सोल्जर्स”  या मोहिमेने आमच्या फौजी बांधवांना मोठे प्रोत्साहन मिळते आहे. माझे कुटुंब एक लष्करी कुटुंब आहे. माझे पती सैन्यात अधिकारी आहेत. माझे वडिल आणि सासरे दोघेही सैन्यात अधिकारी होते. आमचे संपूर्ण कुटुंबच सैन्यातील जवानांनी भरलेले आहे.  देशाच्या सीमेवर आर्मी सर्कलमध्ये आमचे अनेक अधिकारी आहेत, ज्यांना खूप चांगले संदेश मिळत आहेत आणि त्याद्वारे त्यांना मोठे प्रोत्साहन मिळते आहे.  सैन्यातील अधिकारी आणि जवानांच्या बरोबरीने त्यांचे संपूर्ण कुटुंब, त्यांच्या पत्नीही खूप मोठा त्याग करतात, हे मला आवर्जुन सांगावेसे वाटते. आपल्या संदेशांच्या माध्यमातून संपूर्ण सैन्य समुदायाला खूप चांगला संदेश मिळत आहे आणि मी तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद.”

माझ्या प्रिय देशवासियांनो, सैन्यातील जवान केवळ सीमेवरच नाही तर आयुष्यात प्रत्येक आघाडीवर सज्ज असल्याचे दिसून येते.  नैसर्गिक आपत्ती असो, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात निर्माण झालेल्या समस्या असो, शत्रूशी दोन हात करायचे असो  किंवा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या युवकांना परत आणण्यासाठीच्या धाडसी कारवाया असो – आमचे जवान आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन कार्यरत राहतात.

एका घटनेबद्दल मला सांगण्यात आले, ती मी तुम्हालाही सांगू इच्छितो. यश साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी प्रेरणा देऊ शकतात, हे मला याद्वारे सांगावेसे वाटते. हिमाचल प्रदेश हे राज्य उघडयावरील शौचमुक्त झाले आहे. सर्वप्रथम सिक्कीम उघडयावरील शौचमुक्त झाले, त्यानंतर हिमाचल आणि आता 1 नोव्हेंबर रोजी केरळसुध्दा उघडयावरील शौचमुक्त राज्य होत आहे.  या यशामागचे कारण काय ? मी सांगतो. सुरक्षा बलांमध्ये आमचा एक आयटीबीपीचा जवान आहे, विकास ठाकूर.  तो हिमाचलच्या सिरमौर जिल्हयातील एका छोटयाशा गावचा रहिवासी आहे. त्याच्या गावाचे नाव बधाना असे आहे. आमचा हा आयटीबीपीचा जवान सुट्टीमध्ये आपल्या गावी गेला होता. तो गावात असतांना त्याचवेळी गावात ग्रामसभा होणार होती, त्या सभेत तो पोहोचला. या ग्रामसभेत शौचालये बांधण्याबाबत चर्चा सुरु होती.  काही कुटुंबे  पैशाअभावी  शौचालये बांधू शकत नाहीत, असे यावेळी स्पष्ट झाले.  देशभक्तीने भारलेला विकास ठाकूर हा आमचा आयटीबीपीचा जवान हे ऐकून अस्वस्थ झाला. आपल्या गावावरचा हा कलंक दूर झाला पाहिजे, असे त्याला मनापासून वाटले. त्याची देशभक्ती पहा, केवळ शत्रूवर गोळीबार करण्यापुरतीच त्याची देशभक्ती मर्यादित राहिली नाही.  त्याने धनादेश बाहेर काढला, त्यावर 57,000 रुपयांची रक्कम नोंदवली आणि हा धनादेश गावातील पंचायत प्रधानाकडे सोपवला. गावातील ज्या 57 घरांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधणे शक्य नाही, त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये दया, 57 शौचालये बांधून घ्या आणि आपल्या बंधाना गावाला उघडयावरील शौचमुक्त करुन दाखवा, असे त्यांनी सांगितले.  विकास ठाकूरने हे उपयुक्त पाऊल उचलले. 57  कुटुंबांना आपल्या खिशातून प्रत्येकी 1,000 रुपये देऊन स्वच्छता अभियानाला एक नवी ताकद दिली. त्याचमुळे हिमाचल प्रदेश खऱ्या अर्थाने उघडयावरील शौचमुक्त राज्य ठरु शकले. केरळमध्ये सुध्दा तरुणांनी अशाच प्रकारे काम केले. या तरुणांचेही मी मनापासून आभार मानू इच्छितो.  केरळमध्ये दुर्गम भागात इडमालाकुडी नावाची पंचायत आहे, जिथे पोहोचण्यासाठी कोणताही रस्ता नाही. संपूर्ण दिवसभर पायपीट केल्यानंतर मोठया मुश्किलिने त्या गावी पोहचता येते. फार कमी लोक त्या गावी जातात. या ठिकाणी शौचालय नसल्याचे त्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या शहरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. एनसीसीचे छात्र, एनएसएसचे सदस्य आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या गावात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. शौचालय बांधण्यासाठी लागणारे सर्व सामान, विटा, सिमेंट आणि इतर सर्व आवश्यक बाबी या युवकांनी आपल्या खांद्यावर वाहून, संपूर्ण दिवस पायपीट करुन त्या गावापर्यंत नेल्या. स्वत: परिश्रम करुन त्या गावात शौचालय बांधले आणि या युवकांनी जंगलातल्या दुर्गम भागातील एक छोटेसे गाव उघडयावरील शौचमुक्त करुन दाखवले. त्याचमुळे केरळसुध्दा लवकरच उघडयावरील शौचमुक्त राज्य ठरणार आहे. गुजरातने सुध्दा सर्व नगरपालिका-महानगरपालिका, बहुतेक 150 पेक्षा जास्त ठिकाणे  उघडयावरील शौचमुक्त असल्याचे घोषित केले आहे.  10 जिल्हे उघडयावरील शौचमुक्त करण्यात आले आहेत.  हरियाणामधून सुध्दा आनंदाची बातमी येत आहे. 1 नोव्हेंबर रोजी हरियाणा आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे आणि त्यांनी काही महिन्यातच आपले राज्य उघडयावरील शौचमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  आतापर्यंत तेथील 7 जिल्हे उघडयावरील शौचमुक्त झाले आहेत.  सर्वच राज्यांमध्ये वेगाने काम सुरु आहे. मी केवळ काही राज्यांचाच उल्लेख केला आहे. या सर्व राज्यांमध्ये नागरिकांनी या अभियानात सहभागी झाल्याबद्दल आणि देशातील  अस्वच्छतेच्या रुपातील अंध:कार दूर करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सरकारच्या अनेक योजना असतात. पहिल्या योजनेनंतर त्याला अनुरुप अशी दुसरी योजना सादर केल्यानंतर पहिली योजना थांबवावी लागते. मात्र सर्वसाधारणपणे या गोष्टींकडे फार कोणाचे लक्ष जात नाही.  जुनी योजना सुरु राहाते, नवी योजनाही सुरु राहाते, येणाऱ्या योजनेची प्रतिक्षा केली जाते आणि असे सतत चालत राहाते.  आमच्या देशात ज्या घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो, ज्या घरांमध्ये वीज असते, त्या घरांना केरोसिनची गरज नसते. मात्र  अशा घरांना केरोसिनसुध्दा दिले जाते, गॅससुध्दा दिला जातो, वीजसुध्दा मिळत राहाते आणि मध्यस्थांना, दलालांना आयते चराऊ कुरण उपलब्ध होते.  या संदर्भात हरियाणा प्रदेशचे मी मनापासून अभिनंदन करु इच्छितो.  त्यांनी  हरियाणा प्रदेशला केरोसिन मुक्त करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.  ज्या कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो,  वीज आहे, ती आधार क्रमाकांच्या आधारे पडताळण्यात आली  आणि माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 जिल्हे  केरोसिनमुक्त करण्यात आले.  ज्याप्रकारे त्यांनी हे काम हाती घेतले आहे,  ते पाहता हरियाणा लवकरच केरोसिन मुक्त होईल असा विश्वास मला वाटतो.  चोरी ही थांबेल, पर्यावरणाचे रक्षणही होईल, परकीय विनिमयाची बचत होईल आणि लोकांना सुविधाही मिळेल. हे चांगले परिणाम निश्चितच घडून येतील.  फक्त मध्यस्थांना आणि दलालांना याचा फटका बसेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, महात्मा गांधींजी आपल्या सर्वांसाठीच कायम मार्गदर्शक राहिले आहेत. देशभरात कुठे गेले पाहिजे, कशाप्रकारे गेले पाहिजे, यासाठीचे सर्व मापदंड त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून दिसून येतात. गांधीजी म्हणत. आपण जेव्हा एखादी योजना तयार कराल, तेव्हा सर्वप्रथम गरीब आणि दुर्बलांचा चेहरा आठवा आणि आपण जे करु इच्छिता. त्यामुळे त्या गरीबाला  लाभ होणार किंवा नाही याचा विचार करा. त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. या मापदंडाच्या आधारे आपण आपले निर्णय घ्या.  देशातील गरीबांच्या मनात ज्या महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या आहेत त्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. संकंटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकामागून एक  पाऊल उचलावेच लागेल. आपली जुनी विचारसरणी काहीही असली तरी समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव नष्ट झालाच पाहिजे. शाळांमध्ये सुध्दा आता मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहे आहेत. आमच्या मुलींना भेदभावमुक्त भारताचा अनुभव देण्याची हीच संधी आहे.

केंद्र सरकारतर्फे लसीकरण केले जाते, मात्र तरीसुध्दा लाखो मुले लसीकरणापासून वंचित राहतात. आजारांना बळी पडतात. “मिशन इंद्रधनुष” या अभियानाच्या माध्यमातून अशा वंचित बालकांना शोधून गंभीर आजारांना बळी पडण्यापासून वाचविण्यासाठी  प्रयत्न केले जातात. एकविसावे शतक उजाडल्यानंतरसुध्दा गावात अंधारच पसरलेला असावा, हे  योग्य नाही. अशा गावांना लवकरात लवकर अंधारमुक्त करण्यासाठी तिथे वीज पोहचविण्यासाठीची मोहिम यशस्वीपणे राबविली जात आहे.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेली अनेक वर्षे गरीब आई, चुलीवर जेवण करुन शरीरात 400 सिगरेट जाळल्यानंतर होईल, इतका धूर शरीरात शोषून घेत असेल, तर तिच्या आरोग्याचे काय होईल ?  अशा पाच कोटी कुटुंबांना धूरमुक्त आयुष्य देण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरु आहेत.

लहान व्यापारी, उद्योजक, भाजी विकणारा, दूध विकणारा, न्हाव्याचे दुकान चालवणारा असे सर्व लोक सावकारी व्याजाच्या दुष्ट चक्रात अडकून पडलेले असत. मुद्रा योजना, स्टॅण्ड अप योजना, जनधन खाते या मोहिमांद्वारे  व्याजखोरीच्या या दुष्ट चक्रातून अनेकांना मुक्ती मिळाली आहे.  आधारच्या माध्यमातून बँकांमध्ये थेट पैसे जमा केले जातात, त्यामुळे खऱ्या लाभार्थीपर्यंत ते थेट पोहचतात. मध्यस्थ आणि दलालांपासून सर्वसामान्य माणसांचे आयुष्य मुक्त करण्याची ही एक संधी आहे. ज्यात सुधारणा आणि परिवर्तनाबरोबरच समस्येचे पूर्णपणे निराकरण करता येईल, असे अभियान राबवायचे आहे आणि  त्या दिशेने सफल प्रयत्न सुरु आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या 31 ऑक्टोबर आहे. ज्यांनी भारताच्या एकात्मतेसाठी  आपले जीवन समर्पित केले असे या देशाचे महापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची उद्या जयंती आहे. 31 ऑक्टोबर, एकीकडे एकतेचे प्रतिक असणाऱ्या सरदार पटेल यांची जयंती आहे, तर दुसरीकडे श्रीमती गांधी यांची पुण्यतिथी सुध्दा आहे. महापुरुषांचे पुण्य स्मरण आपण करतो आणि केले पाहिजे. मात्र पंजाबच्या एका सद्‌गृहस्थांचा  मला फोन आला आणि त्यांची वेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली –

“पंतप्रधानजी नमस्कार. सर, मी पंजाबमधून जसदीप बोलतो आहे. 31 तारखेला सरदार पटेल यांची जयंती आहे, हे आपणांस ठाऊक असेल.  सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला जोडण्यासाठी वाहून घेतले आणि ते आपल्या  मोहिमेत यशस्वी सुध्दा झाले, त्यांनी सर्वांनाच एकत्र आणले. त्याचवेळी दुर्देव असे की, त्याच दिवशी इंदिरा गांधींजी यांची हत्यासुध्दा झाली. त्यांच्या हत्येनंतर देशात ज्या घटना घडल्या, त्या आपण सर्वच जाणतो. सर, मला असे विचारावेसे वाटते की, अशा दुर्देवी घटना रोखण्यासाठी काय करता येईल ?”

माझ्या प्रिय देशवासियांनो, हे केवळ एका व्यक्तीचे दु:ख नाही. चाणक्यानंतर देशाला एक करण्याचे भगिरथ प्रयत्नांचे मोठे कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, याची साक्ष इतिहास देतो आहे. स्वतंत्र भारताला एकाच ध्वजाखाली आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या त्या महापुरुषाला शतश: वंदन. मात्र सरदार साहेबांनी ज्या एकतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, एकतेसाठी लढा दिला, एकतेला प्राधान्य दिल्याबद्दल अनेकांचा रोष ओढावून घेतला, पण एकतेचा मार्ग सोडला नाही, त्याच सरदारांच्या जयंती दिनी हजारो सरदारांना, हजारो सरदारांच्या कुटुंबांना श्रीमती गांधींजी यांच्या हत्येनंतर यमसदनी धाडण्यात आले. एकतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या त्या महापुरुषाच्या जन्मदिनीच, सरदारजींच्या  जन्मदिनीच सरदारांवर झालेला हा अन्याय, इतिहासातले हे काळेकुट्ट पान आपल्या सर्वांसाठीच वेदनादायक आहे.

मात्र ही सर्व संकटे लक्षात घेऊ.न एकतेचा मंत्र जपत आपल्याला पुढे जायचे आहे.  विविधतेतील एकता, हीच देशाची ताकत आहे. अनेक भाषा असोत, अनेक जाती असोत, अनेक पेहराव असोत, अनेक प्रकारचे आहार असोत, मात्र विविधतेतील एकता हीच भारताची ताकत आहे, भारताचे वैशिष्टय आहे, प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एकता प्रस्थापित करण्याच्या संधी शोधणे  आणि एकता प्रस्थापित करणे ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे.  फुटीरता पसरवणाऱ्या विचारांपासून, प्रवृत्तीपासून  आपण वाचावे आणि देशालाही वाचवावे हे महत्त्वाचे आहे. सरदार साहेबांनी आपल्याला एक भारत दिला आहे, त्याला श्रेष्ठ भारत बनवणे ही आपली जबाबदारी आहे. एकतेचा मूलमंत्रच  श्रेष्ठ भारताची मजबूत पायाभरणी करतो.

शेतकऱ्यांचा संघर्ष पाहत  सरदार साहेबांच्या आयुष्याला सुरुवात झाली होती. ते शेतकऱ्यांचे अपत्य होते.  शेतकऱ्यांपर्यंत स्वातंत्र्य लढा पोहोचविण्यात  सरदार साहेबांची भूमिका महत्त्वाची होती.  गावात स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाला  ताकत देण्याचे काम सरदार साहेबांनी यशस्वीरित्या केले. उत्तम संघटन आणि कौशल्याचा तो परिणाम होता.  मात्र सरदार साहेबांनी केवळ संघर्षासाठीच नाही तर रचनात्मक कार्यासाठीही पुढाकार घेतला.  अनेकदा आपण “अमूल”चे नाव ऐकतो, अमूलची अनेक उत्पादने आज भारतात आणि भारताच्या बाहेरही सुपरिचित आहे.  मात्र सहकारी दूध उत्पादकांच्या संघटनेची संकल्पना सरदार पटेलांची होती, हे फार कमी लोकांना माहिती असेल. 1942 साली केरा जिल्हा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेडा जिल्हयात सरदार साहेबांनी हे विचार रुजवले आणि अमूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखसमृध्दी प्रदान करणाऱ्या रचनात्मक विचारांचे  जिवंत उदाहरण आज आपल्याला दिसते आहे. मी सरदार साहेबांना आदरपूर्वक श्रध्दांजली अर्पण करतो आणि या एकता दिनी 31 ऑक्टोबर रोजी आपण जिथे असू तिथे त्यांचे स्मरण करावे, एकतेचा संकल्प करावा, असे आवाहन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो,  दिवाळीच्या या शृंखलेमध्ये कार्तिक पौर्णिमा हा प्रकाशाचा उत्सव आहे.  गुरु नानक देव आणि त्यांची शिकवण-दिक्षा संपूर्ण मानवजातीसाठी, केवळ भारतातीलच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. सेवा, खरेपणा आणि “सरबत दा भला”, हा गुरुनानक देव यांचा संदेश होता. शांती एकता आणि सद्‌भावना हा त्यांचा मूलमंत्र होता.  गुरुनानक देव यांच्या प्रत्येक शिकवणीमधून भेदभाव, अंधविश्वास आणि कुप्रथांपासून समाजाला  मुक्त करण्याची  मोहिम राबवली गेली. ज्यावेळी आपल्याकडे स्पृश्य-अस्पृश्य, जाती प्रथा, उच्च-नीच अशा विकृती  चरम सीमेला पोहचल्या होत्या, त्यावेळी  गुरुनानक देव यांनी  भाई लालो यांना आपले सहकारी म्हणून निवडले.  या, आपण सुध्दा गुरुनानक देवजींप्रमाणेच ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आणि भेदभाव सोडण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, भेदभावाविरोधात कार्य करण्याचे आदेश देणाऱ्या “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला सोबत घेऊन  पुढे जाऊ या. या कामी गुरुनानक देवच आपल्यासाठी खरे मार्गदर्शक ठरतील. या प्रकाश उत्सवात गुरुनानक देव यांना सुध्दा मी अंत:करणापासून अभिवादन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा देशातील जवानांच्या नावे समर्पित या दिवाळीनिमित्त आपणा सर्वांना  खूप-खूप शुभेच्छा.  आपली स्वप्ने, आपले संकल्प पूर्णत्वास जावोत, आपले आयुष्य आनंदात, सुखा-समाधानात व्यतीत व्हावे, याच माझ्या आपणा सर्वांना शुभेच्छा. मन:पूर्वक आभार.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.