21 व्या शतकात जन्मलेले देशाच्या विकासाची गती वाढविण्यात सक्रीय भूमिका बजावतीलः पंतप्रधान मोदी
तरुणांमध्ये कायमच पुरेपूर ऊर्जा आणि गतिशीलता असते, त्यामुळेच ते मोठे बदल घडवू शकतात, असे स्वामी विवेकानंद म्हणत असतः पंतप्रधान
विवेकानंद शीला स्मारक प्रत्येकाला गरीबांसाठी काम करण्याची प्रेरणा देतेः पंतप्रधान मोदी
सन 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्थानिक उत्पादने खरेदी करण्याची आपण प्रतिज्ञा करूयाःपंतप्रधान मोदी
हिमायत कार्यक्रमाच्या माध्यमातून, गेल्या 2 वर्षात 18,000 युवकांना विविध प्रकारच्या 77 व्यावसायिक शाखांचे प्रशिक्षण देण्यात आलेःपंतप्रधान मोदी
खगोलशास्त्रातील भारताचे उपक्रम वेगळ्या वाटेने जाणारेःपंतप्रधान मोदी
17 व्या लोकसभेचे गेले सहा महिने अत्यंत यशस्वी ठरले आहेतः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. 2019 चे शेवटचे काही दिवस आपल्या समोर आहेत. तीन दिवसांमध्ये 2019 हे वर्ष संपेल आणि आपण केवळ 2020 मध्ये प्रवेश करणार नाही तर नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत, नवीन दशकात प्रवेश करू, 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार आहोत. मी, सर्व देशवासियांना 2020 साठी हार्दिक शुभेच्छा देतो. या दशकात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे, यात 21 व्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यास सक्रिय भूमिका बजावतील- जे या शतकातील महत्त्वाच्या प्रश्नांना समजून मोठे होत आहेत. अशा तरूणांना, आज वेगवेगळ्या शब्दांनी ओळखले जातात. कोणी त्यांना मिलेनियल म्हणून ओळखतात, कोणी त्यांना जनरेशन झेड किंवा जेन झेड असे म्हणतात. आणि लोकांच्या डोक्यात एक गोष्ट तर अगदी पक्की बसली आहे की ही सोशल मिडिया पिढी आहे. ही पिढी खूप प्रतिभावान आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतो. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचे, वेगळे करण्याचे स्वप्न बघतात. त्यांची स्वतःची मत देखील आहेत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, आणि विशेषतः मी भारताविषयी हे सांगू इच्छितो की, आज जर आपण युवकांना पाहिलंत तर त्यांना आजची व्यवस्था आवडत आहे. एवढेच नाहीतर व्यवस्थेचे अनुसरण करायला देखील आवडते. आणि कधी कुठे एखादी व्यवस्था योग्य रीतीने काम करत नसेल तर ते अस्वस्थ देखील होतात आणि धैर्याने व्यवस्थेला जाब देखील विचारतात. मला हे चांगले वाटते. एक गोष्ट अगदी निश्चित आहे की आपल्या देशातील तरुणांच्या मनात अराजकतेविषयी राग आहे. अनागोंदी कारभार, अस्थिरता यासगळ्या बद्दल त्यांना खूप चीड आहे. त्यांना घराणेशाही, जातिवाद, आपले-परके, स्त्री-पुरुष हे भेदभाव आवडत नाही. कधीकधी आपण पाहतो की विमानतळावर किंवा अगदी सिनेमागृहात, जर कोणी रांगेत उभे असेल आणि कोणीतरी रांगेत मध्येच घुसत असेल तर त्याला सर्वात आधी विरोध करणारे तरुणच असतात. आणि आपण पाहिले आहे की अशी कोणतीही घटना घडत असेल तर दुसरा एखादा तरुण लगेच आपला मोबाइल फोन काढून त्याचा व्हिडिओ बनवतात आणि हा व्हिडिओ लगेच व्हायरल देखील होतो. आणि ज्याची चूक आहे त्याला कळते की काय झाले आहे! तर, एक नवीन प्रकारची प्रणाली, नवीन प्रकारचे युग, नवीन प्रकारचे विचार हे आपल्या तरुण पिढीला प्रतिबिंबित करतात. भारताला आज या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. या तरुणांना देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते – “My Faith is in the Younger Generation, the Modern Generation, out of them, will come my workers”. ते म्हणाले होते – ‘मला तरुण पिढीवर, या आधुनिक पिढीवर विश्वास आहे आणि त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की, यातूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील’. तरूणांविषयी बोलताना ते म्हणाले – “तारुण्याचे मोल कोणी लावू शकत नाही आणि याचे वर्णनही करता येत नाही.” हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान काळ आहे. तुम्ही आपल्या तारुण्याचा उपयोग कशाप्रकारे करता यावर तुमचे भविष्य आणि तुमचे जीवन अवलंबून आहे. विवेकानंद यांच्या म्हणण्यानुसार, जो उर्जेने आणि गतीशिलतेने भरलेला आहे आणि ज्यात बदलण्याची शक्ती आहे तो खरा युवक. मला विश्वास आहे की, भारतात हे दशक, हे दशक केवळ तरुणांच्या विकासासाठीच नव्हे तर तरूणांच्या क्षमतेने देशाचा विकास साध्य करण्याचे देखील सिद्ध होईल आणि ही पिढी भारताच्या आधुनिकतेत खूप मोठी भूमिका बजावणार आहे, हे मला स्पष्टपणे जाणवत आहे. येत्या 12 जानेवारीला विवेकानंद जयंती दिनी, जेव्हा देश युवा दिन साजरा करेल, तेव्हा या दशकातील प्रत्येक तरुणाने आपल्या या जबाबदारीवर चिंतन केले पाहिजे आणि या दशकासाठी एखादा संकल्प देखील केला पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कन्याकुमारी मध्ये ज्या खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती, तिथे जे विवेकानंद यांचे स्मारक आहे, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पाच दशकांत हे स्थान भारताचे गौरवस्थान राहिले आहे. कन्याकुमारी, देश आणि जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या कोणाला देशभक्तीने भारावलेल्या आध्यात्मिक चेतनेचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांचासाठी हे तीर्थस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. स्वामीजींच्या या स्मारकामुळे प्रत्येक पंथातील, प्रत्येक वयोगटातील लोकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली आहे.’गरीब नारायणांची सेवा’ हा मंत्र जगण्याचा मार्ग दाखविला आहे. जो कोणी तिथे गेला, त्याच्यात शक्तीचा संचार होणे, सकारात्मकता जागृत होणे, देशासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत होणे – हे अगदी स्वाभाविक आहे.

आमच्या माननीय राष्ट्रपतींनीही या पन्नास वर्ष जुन्या रॉक स्मारकाला भेट दिली आहे आणि मला आनंद आहे की आमचे उपराष्ट्रपतीही गुजरातमधील कच्छ मध्ये आयोजित झालेल्या महत्वपूर्ण अशा रणमहोत्सवाचे उद्‌घाटन करण्यासाठी गेले होते. जेव्हा आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती देखील भारतात अशा महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांना भेट देतात, तेव्हा देशवासियांना यातून नक्कीच प्रेरणा मिळते – तुम्हीही नक्की जा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये शिकतो हे खरं, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा एक अतिशय आनंददायी क्षण असतो आणि माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात सर्व तरुण एकत्र येवून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात, आयुष्य 10 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे मागे जाते. परंतु, कधीकधी माजी विद्यार्थ्यांचा असा मेळावा विशेष आकर्षणाचे कारण बनतो, त्याकडे लक्ष दिले जाते आणि देशवासीयांचे लक्ष देखील तिथे जाणे फार महत्वाचे आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, खरं म्हणजे, जुन्या मित्रांना भेटणे, आठवणींना उजाळा देणे, या सगळ्याचा स्वतःचा एक वेगळा आनंद असतो आणि या सगळ्या सोबत काही खास सामायिक उद्देश असेल, एखादा संकल्प असेल, काही भावना जोडलेल्या असतील, मग तर ते अगदी इंद्रधनुष्यासारखे होते. आपण पाहिले असेलच की कधी कधी हे माजी विद्यार्थी त्यांच्या शाळांसाठी काहीतरी योगदान देतात. काही संगणकीकृत करण्यासाठी व्यवस्था स्थापित करतात, काही चांगले वाचनालय उभारतात, काही पिण्याच्या पाण्याची सोय करतात तर काही नवीन खोल्या बांधण्यासाठी तर काही क्रीडा संकुलासाठी योगदान देतात. काही नं काही तरी करतातच. ज्या ठिकाणी आपले आयुष्य घडले त्यासाठी आयुष्यात काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि असे वाटले देखील पाहिजे आणि यासाठी लोकं पुढाकार देखील घेतात. परंतु, आज मी तुमच्यासमोर एक खास प्रसंग सांगू इच्छित आहे. अलीकडेच प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील भैरवगंज आरोग्य केंद्राची कथा मी ऐकली तेव्हा मला खूप चांगले वाटले आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मी राहू शकत नाही. या भैरवगंज आरोग्य केंद्रात, विनामूल्य आरोग्य तपासणीसाठी जवळपासच्या गावातील हजारो लोकांनी गर्दी केली. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. तुम्हाला वाटत असेल यात काय नवीन आहे? आली असतील लोकं! तर असे नाही! यात बरेच नवीन आहे. हा कार्यक्रम सरकारी नव्हता, किंवा सरकारचा उपक्रम देखील नव्हता. हे तिथल्या के.आर.हायस्कूल, हा त्याच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, ज्यांतर्गत त्यांनी हे पाऊल उचलले होते आणि त्याला नाव दिले होते ‘संकल्प 95’. ‘संकल्प 95’ चा अर्थ आहे – त्या उच्च माध्यमिक शाळेच्या 1995 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा संकल्प! या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. यात माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्य जनजागृतीची जबाबदारी स्वीकारली. ‘संकल्प 95’च्या या मोहिमेमध्ये बेतियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बरीच रुग्णालयेही सहभागी झाली. त्यानंतर, सार्वजनिक आरोग्याबाबत एक मोहीमच सुरू झाली. विनामूल्य तपसणी असो, मोफत औषध देणे असो किंवा जनजागृती करणे असो, ‘संकल्प 95’ हा सर्वांसाठी एक उदाहरण बनला आहे. आपण बऱ्याचदा असे म्हणतो की जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा हा देश 130 कोटी पावले पुढे जातो. जेव्हा अशा गोष्टी समाजात प्रत्यक्षात दिसतात तेव्हा प्रत्येकाला आनंद, समाधान मिळते आणि आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देखील मिळते. एकीकडे बिहारच्या बेतीयात माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने आरोग्य सेवा करण्याचा विडा उचलला तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामधील फुलपूरमधील काही महिलांनी आपल्या उपजीविकेद्वारे संपूर्ण प्रदेशाला प्रेरित केले. जर सगळ्यांनी एकत्र येवून एखादा संकल्प केला तर परिस्थिती बदलण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही हे या महिलांनी सिद्ध केले आहे. काही काळापूर्वी पर्यंत फुलपूरच्या या स्त्रिया आर्थिक अडचणी आणि दारिद्रयामुळे त्रस्त होत्या, परंतु, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांचात हिंमत होती. या महिला, कादीपूरच्या बचत गटात सहभागी होऊन चप्पल बनवण्याचे कौशल्य शिकल्या, यामुळे त्यांनी केवळ त्यांच्या पायाला टोचलेले हतबलतेचे काटेच काढून टाकले नाहीत तर परंतु स्वावलंबी बनून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण देखील केले. ग्रामीण उपजीविका मिशनच्या मदतीने आता येथे एक चप्पल बनवण्याचा कारखाना देखील उभारण्यात आला आहे, जिथे आधुनिक मशीनद्वारे चप्पल बनवल्या जात आहेत. मी विशेषत: स्थानिक पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, त्यांनी स्वत:साठी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता या महिलांनी बनवलेल्या चप्पल खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आज या महिलांच्या संकल्पामुळे त्यांच्या केवळ त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बळकट झाली नाही तर जीवनस्तरही सुधारला आहे. जेव्हा मी फुलपूरमधील पोलिस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा ऐकतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना एका गोष्टीची विनंती केली होती आणि मी सांगितले की आपण सर्व देशवासीयांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली पाहिजे. आज पुन्हा एकदा मी सुचवितो, आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकतो? आपण आपल्या खरेदीमध्ये त्यांना प्राधान्य देऊ शकतो? स्थानिक उत्पादनांना आम्ही आमची प्रतिष्ठा आणि अभिमाना सोबत जोडू शकतो? या भावनेने आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचे माध्यम बनू शकतो का? मित्रांनो, कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात प्रकाश देणारा दीपक या भावनेने महात्मा गांधी स्वदेशीकडे पाहत होते. गोरगरीबांच्या जीवनात समृद्धी आणतो. शंभर वर्षांपूर्वी गांधीजींनी एक मोठे जनआंदोलन सुरू केले होते. भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे लक्ष्य होते. गांधीजींनी, स्वावलंबी होण्याचा हा मार्ग दाखविला होता. 2022 मध्ये आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू. ज्या स्वतंत्र भारतात आपण श्वास घेत आहोत, त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लक्ष्यावधी पुत्रांनी, माता-भगिनींनी, अनेक अत्याचार सहन केले आहेत, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. लाखो लोकांचा त्याग, तपश्चर्या, बलिदान यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ज्या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत, आपण स्वतंत्र आयुष्य जगत आहोत आणि देशासाठी मरणारे, देशासाठी प्राण पणाला लावणारे, ज्ञात-अज्ञात, असंख्य लोक, आपल्याला फारच थोड्या लोकांची नावे माहित असतील-पण त्यांनी त्याग केला आहे – स्वतंत्र भारताचे स्वप्न बघत – समृद्ध, सुखी, संपन्न, स्वतंत्र भारतासाठी!

माझ्या प्रिय देशवासियांनो, 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत, कमीतकमी या दोन-तीन वर्षांत आपण स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा आग्रह करू शकतो का? भारतात तयार झालेल्या, आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेल्या, ज्याला आपल्या देशवासियांच्या घामाचा सुंगंध येत आहे, आपण अशा वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरू शकतो का? मी फार जास्त कालावधीसाठी हे म्हणत नाही, स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत, केवळ 2022 पर्यंत मी हे बोलत आहे. आणि हे काम सरकारी नसावे, ठिकठिकाणी तरुणांनी पुढे यावे, लहान लहान संघटना तयार कराव्यात, लोकांना प्रोत्साहन द्यावे, समजावून सांगा आणि निर्णय घ्या – चला, आपण स्थानिक उत्पादनांची खरेदी करू, स्थानिक उत्पादनांवर भर देऊ, ज्यात देशवासीयांच्या घामाचा सुगंध आहे – तोच माझ्या स्वतंत्र भारताचा आनंदी क्षण आहे, चला हे स्वप्न बघत आपण पुढे जाऊया.

माझ्या प्रिय देशवासियांनो, देशातील नागरिकांनी स्वावलंबी बनून सन्मानाने आपले जीवन जगावे हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचे आहे. अशा एका उपक्रमाबद्दल मी चर्चा करू इच्छितो ज्याने माझे लक्ष वेधून घेतले आणि तो उपक्रम म्हणजे जम्मू-काश्मीर आणि लडाखचा ‘हिमायत कार्यक्रम’. हिमायत प्रत्यक्षात कौशल्य विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित आहे. यात, 15 ते 35 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरूण सहभागी होतात. हे जम्मू-काश्मीरचे ते लोकं आहेत ज्यांचे काही कारणास्तव शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही, ज्यांना अर्ध्यावर शाळा आणि महाविद्यालय सोडावे लागले.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल की मागील दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत अठरा हजार युवकांना वेगवेगळ्या 77 व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी सुमारे पाच हजार लोक कुठेतरी नोकरी करत आहेत आणि बऱ्याच जणांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. हिमायत कार्यक्रमाद्वारे आपले जीवन बदलून टाकणाऱ्या या लोकांच्या कथा खरोखर माझ्या मनाला भिडणाऱ्या आहेत.

परवीन फातिमा – तमिळनाडूच्या तिरुपुरात गारमेंट युनिटमध्ये पदोन्नतीनंतर सुपरवायझर-कम-कोऑर्डिनेटर बनली आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत ती कारगिलच्या एका छोट्याशा गावात राहत होती. आज तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे, तिला आत्मविश्वास आला आहे – ती स्वावलंबी झाली आहे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी देखील तिने आर्थिक विकासाची संधी आणली आहे. परवीन फातिमा प्रमाणेच, हिमायत कार्यक्रमामुळे, लेह-लडाख भागातील अन्य मुलींचे, रहिवाशांचे नशीब बदलले आहे आणि ते सर्व आज तामिळनाडूमध्ये एकाच कंपनीत काम करत आहेत. त्याचप्रमाणे डोडाच्या फियाज अहमदसाठी हिमायत वरदान ठरले. फियाजने 2012 मध्ये 12 वीची परीक्षा दिली, परंतु आजारपणामुळे तो त्याचे शिक्षण पुढे पूर्ण करू शकला नाही. फियाज, दोन वर्षांपासून हृदयरोगाशी झुंज देत होता. दरम्यान, त्याचा एक भाऊ आणि एक बहिणीचाही मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर एक प्रकारे संकटांचा डोंगर कोसळला. अखेरीस त्यांना हिमायतकडून मदत मिळाली. त्यांनी हिमायतमार्फत आयटीईएस म्हणजेच माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा यामध्ये प्रशिक्षण घेतले आणि आज तो पंजाबमध्ये नोकरी करत आहे.

फियाज अहमद यांनी पदवीचे शिक्षण त्यांनी सुरु ठेवले होते, ते ही आता पूर्ण होईल. अलीकडेच हिमायातच्या एका कार्यक्रमात त्यांना आपला अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आपली गोष्ट सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचप्रमाणे अनंतनागचा रकीब-उल-रहमान आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही. एके दिवशी, रकीबला त्याच्या विभागातील मोबिलायझेशन शिबिरातून हिमायत कार्यक्रमाची माहिती मिळाली. रकीबने लगेच रिटेल टीम लीडर कोर्समध्ये प्रवेश घेतला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आज तो एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये नोकरी करत आहेत. ‘हिमायत मिशन’ च्या लाभ प्राप्त झालेले, प्रतिभावान युवकांची अशी अनेक उदाहरणे आहेत जे जम्मू-काश्मीरच्या परिवर्तनाचे प्रतिक बनले आहेत. हिमायत कार्यक्रम सरकार, प्रशिक्षण भागीदार, नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि जम्मू-काश्मीरमधील लोक यांच्यात असलेल्या ताळमेळाचे एक आदर्श उदाहरण आहे. या कार्यक्रमामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास जागृत झाला आहे आणि प्रगतीचा पुढील मार्गही प्रशस्त झाला आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 तारखेला आपण या दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहिले. कदाचित या सूर्यग्रहणामुळेच, रिपुनने Mygov वर एक अतिशय रोचक प्रतिक्रिया लिहिली आहे. तो लिहितो … ‘नमस्कार सर, माझे नाव रिपुन आहे. मी ईशान्य भारतातील आहे पण सध्या मी दक्षिणेत काम करतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला आठवतंय की आमच्याकडे आभाळ स्वच्छ असल्यामुळे आम्ही तासन् तास आकाशातील ताऱ्यांकडे पहात रहायचो. ताऱ्यांकडे टक लावून बघायला मला खूप आवडायचे. आता मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या दैनंदिन कामांमुळे, मी या गोष्टींसाठी आता वेळ देऊ शकत नाही … आपण या विषयाबद्दल थोडेसे बोलू शकता का? विशेषतः तरुणांमध्ये खगोलशास्त्र कसे लोकप्रिय होऊ शकते? ‘

माझ्या प्रिय देशवासियांनो, मला बऱ्याच सूचना येत असतात, परंतु या प्रकारची सूचना कदाचित प्रथमच माझ्याकडे आली आहे असे मी म्हणू शकतो. तसे पहिले तर, विज्ञानावर, बऱ्याच बाबींवर बोलण्याची मला संधी मिळाली आहे. विशेषत: तरुण पिढीच्या विनंती वरून मला बोलण्याची संधी मिळाली आहे. परंतु या विषयावर कधी बोलणेच झाले नाही आणि आता 26 तारखेलाच सूर्यग्रहण झाले आहे, त्यामुळे कदाचित आपल्यालाही या विषयामध्ये रस असेल असे वाटते. सर्व देशवासीयांप्रमाणे, विशेषत: माझ्या तरुण मित्रांप्रमाणे, मी देखील 26 तारखेला, सूर्यग्रहण होते, तेव्हा देशवासियांप्रमाणेच मला देखील आणि माझ्या तरुण पिढीच्या मनातील उत्साहाप्रमाणे माझ्या मनात देखील उत्साह होता आणि मलासुद्धा सूर्यग्रहण पहायचे होते, पण दुर्दैवाने त्या दिवशी दिल्लीत आकाश ढगाळ होते आणि मला त्याचा आनंद घेता आला नाही, परंतु, टीव्हीवर कोझिकोड आणि भारताच्या इतर भागात दिसणारी सूर्यग्रहणाची सुंदर छायाचित्रे बघायला मिळाली. सूर्य एका चमकणाऱ्या अंगठीच्या आकाराचा दिसत होता. आणि त्या दिवशी मला या विषयातील काही तज्ञांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली आणि ते सांगत होते की चंद्र पृथ्वीपासून फारच दूर आहे म्हणून हे घडते आणि म्हणूनच त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे व्यापत नाही. अशाप्रकारे, एका अंगठीचा आकार तयार होतो. हे सूर्यग्रहण, एक वार्षिक सूर्यग्रहण ज्याला खंडग्रास ग्रहण देखील म्हणतात. ग्रहण आपल्याला आपण पृथ्वीवर राहत असून अंतराळात फिरत असल्याची आठवण करून देते. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांसारखेच अवकाशात अनेक ग्रह फिरत असतात. चंद्राच्या सावलीमुळेच आपल्याला ग्रहणांचे विविध प्रकार दिसतात. मित्रांनो, भारताला खगोलशास्त्राचा खूप प्राचीन आणि गौरवशाली इतिहास आहे. आकाशातील चमकणाऱ्या ताऱ्यांशी आपला संबंध आपल्या संस्कृतीइतकाच जूना आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित असेल की भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय भव्य जंतर-मंतर आहेत, जे पाहण्यासारखे आहेत. आणि, या जंतर-मंतरचा खगोलशास्त्राशी थेट संबंध आहे. आर्यभट्टांच्या महान प्रतिभेबद्दल कोणाला माहिती नाही! आपल्या कारर्किदित त्यांनी सूर्यग्रहणासह चंद्रग्रहणाची सविस्तर व्याख्या दिली आहे. तात्विक आणि गणितीय दोन्ही दृष्टीकोनातून ही व्याख्या केली आहे. पृथ्वीच्या सावलीच्या आकाराची गणना कशी करावी हे त्यांनी गणिताच्या आधारे स्पष्ट केले. त्यांनी ग्रहण कालावधी आणि त्याची गणना करण्यासाठी अचूक माहिती दिली. भास्कर यांच्यासारख्या त्यांच्या शिष्यांनी ही प्रेरणा आणि हे ज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुढे, चौदाव्या – पंधराव्या शतकात, केरळमधील, संगम गावचे माधव, यांनी ब्रह्मांडात अस्तित्वात असणाऱ्या ग्रहांची स्थिती मोजण्यासाठी कॅल्क्युलसचा वापर केला. रात्रीचे आकाश हा केवळ कुतूहलाचा विषय नव्हता तर तो गणिताच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आणि शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाचा स्त्रोत होता. काही वर्षांपूर्वी मी ‘प्री-मॉडर्न कच्छी नॅव्हिगेशन टेक्निक अँड वॉयजेस’ या पुस्तकाचे अनावरण केले होते. हे पुस्तक एक प्रकारे ‘मालमची डायरी’ आहे. मालम याने खलाशी म्हणून त्याने अनुभवलेल्या प्रसंगांची आपल्या शब्दात डायरीत नोंद करून ठेवली आहे. आधुनिक युगात, त्याच मालमच्या पोथींचा संग्रह आणि तो देखील गुजराती हस्तलिखित संग्रह आहे, ज्यामध्ये पुरातन नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे वर्णन केले आहे आणि आकाश, तारे, ताऱ्यांच्या हालचालींचे वर्णन ‘मालम नि पोथी’ मध्ये केले आहे;आणि हे स्पष्टपणे सांगितले आहे की समुद्रात प्रवास करताना, ताऱ्यांच्या मदतीने दिशा निश्चित केली जाते. तारे इच्छितस्थळी पोहोचण्याचा मार्ग दाखवतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारत खूपच पुढे आहे आणि आपले उपक्रम, पथप्रवर्तक देखील आहेत. आपल्याकडे पुण्याजवळ एक विशालकाय मीटरवेव्ह दुर्बीण आहे. एवढेच नव्हे तर कोडाईकनाल, उदगमंडलम, गुरु शिखर आणि हणले लडाख इथेही शक्तिशाली दुर्बिणी आहेत. 2016 मध्ये बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान आणि मी नैनितालमध्ये 6.6 मीटर देवस्थल ऑप्टिकल दुर्बिणीचे उद्‌घाटन केले होते. ही आशियातील सर्वात मोठी दुर्बीण आहे. इस्रोकडे एस्ट्रोसॅट नावाचा एक खगोलशास्त्रीय उपग्रह आहे. सूर्याबद्दल संशोधन करण्यासाठी इस्रो ‘आदित्य’ या नावाने आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. खगोलशास्त्राविषयी, आपले प्राचीन ज्ञान असो की आधुनिक यश, आपण त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. आज, आपल्या तरुण शास्त्रज्ञांमध्ये, केवळ त्यांचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याची तीव्र इच्छा नाही, तर त्यांच्यात खगोलशास्त्राच्या भविष्याबद्दल देखील एक दृढ इच्छाशक्ती आहे.

आपल्या देशातील तारामंडळ रात्रीचे आकाश समजावून घेण्याबरोबरच स्टार गेझिंगला देखील छंद म्हणून विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. बरेच लोक छत किंवा बाल्कनीमध्ये दुर्बिणी छंद म्हणून ठेवतात. स्टार गेझिंगमुळे/ताऱ्यांचे निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे ग्रामीण शिबिरे आणि ग्रामीण सहलीला देखील चालना मिळू शकते. आणि अशी अनेक शाळा-महाविद्यालये आहेत जी खगोलशास्त्र क्लब स्थापन करतात आणि हा प्रयोग पुढे सुरु ठेवला पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या संसदेला आपण लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखतो. आज मला एक गोष्ट अभिमानाने सांगायची आहे की आपण ज्या प्रतिनिधींची निवड करुन त्यांना संसदेत पाठविले आहे, त्या प्रतिनिधींनी गेल्या 60 वर्षातील सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या सहा महिन्यांत 17 व्या लोकसभेत दोन्ही अधिवेशने खूपच यशस्वी ठरली. लोकसभेने 114 टक्के काम केले, तर राज्यसभेने 94 टक्के काम केले आणि त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळपास 135 टक्के काम झाले होते. रात्री उशिरापर्यंत संसदेचे काम सुरु होते. मी हे यासाठी सांगत आहे कारण यासाठी सर्व खासदार अभिनंदनास पात्र आहेत. आपण ज्या लोकप्रतिनिधींना संसदेत पाठविले त्यांनी साठ वर्षांचे सर्व विक्रम मोडले आहेत. इतके काम होणे हे भारतीय लोकशाहीची ताकद आणि लोकशाहीप्रती असलेला विश्वास दाखवणारा आहे. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदारांच्या सक्रिय सहभागाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सूर्य, पृथ्वी, चंद्राची गती फक्त ग्रहण निश्चित करत नाही तर बऱ्याच गोष्टी देखील याच्याशी निगडीत आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की जानेवारीच्या मध्यावर, सूर्याच्या गतीवर अवलंबून असणारे वेगवेगळे सण भारतभर साजरे केले जातील. पंजाब ते तामिळनाडू आणि गुजरात ते आसामपर्यंत लोक अनेक सण साजरे करतील. जानेवारीत मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत आणि उत्तरायण साजरे केले जातात. त्यांना उर्जेचे प्रतीक देखील मानले जाते. याचदरम्यान, पंजाबमध्ये लोहड़ी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आणि आसाममध्ये माघ-बिहू हे सण साजरे केले जातील. या सणांचं शेतकरी आणि शेतीशी खूप जवळच नातं आहे. हे सण आपल्याला भारताचे ऐक्य आणि विविधता याची आठवण करून देतात. पोंगलच्या शेवटच्या दिवशी आपल्याला तिरूवल्लुवर जयंती साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. हा दिवस महान लेखक-विचारवंत संत तिरुवल्लुवर यांच्या जीवनासाठी समर्पित आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 2019 ची ही शेवटची ‘मन की बात’ आहे. 2020 मध्ये आपण पुन्हा भेटू. नवीन वर्ष, नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह – चला पुढे जाऊया. संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती एकत्र करूया. खूप दूरवर जायचे आहे, बरेच काही करायचे आहे, देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे. 130 कोटी देशवासीयांच्या प्रयत्नांवर, त्यांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या संकल्पावर, विश्वास ठेवून मार्गक्रमण करूया. मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप – खूप शुभेच्छा !!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.