“मन की बात” 25 डिसेंबर 2016

Published By : Admin | December 25, 2016 | 19:40 IST
#MannKiBaat: Prime Minister Modi extends Christmas greetings to the nation
PM Narendra Modi pays tribute to Pt. Madan Mohan Malviya on his Jayanti #MannKiBaat
PM Narendra Modi extends birthday greetings to Bharat Ratna Atal Bihari Vajpayee on his birthday during #MannKiBaat
Country cannot forget Atal ji’s contributions. Under his leadership India conducted nuclear tests: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat: Shri Narendra Modi highlights ‘Lucky Grahak’ & ‘Digi Dhan’ Yojana to promote cashless transactions
Awareness towards online payments and using technology for economic transactions is increasing: PM during #MannKiBaat
Glad to note that there has been 200 to 300 per cent spurt in cashless transactions: PM Modi #MannKiBaat
We should be at the forefront of using digital means to make payments and transactions: PM during #MannKiBaat
PM Modi cautions those spreading lies & misleading honest people on demonetisation during #MannKiBaat
Support of people is like blessings of the Almighty: PM Modi during #MannKiBaat
Government is taking regular feedback from people and it is alright to make changes according to it: PM during #MannKiBaat
We have formulated a very strict law on ‘Benaami’ property: PM during #MannKiBaat
India is the fastest growing large economy today: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat: Because of the constant efforts of our countrymen, India is growing on various economic parameters, says PM
An important bill for ‘Divyang’ people was passed. We are committed to uplifting our ‘Divyang’ citizens: PM #MannKiBaat
Our sportspersons have made the country proud: PM Modi during #MannKiBaat
PM Narendra Modi extends New Year greetings to people across the country during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो,

नमस्कार. आपणा सर्वांना नाताळच्या अनेक शुभेच्छा. आजचा दिवस सेवा, त्याग आणि करूणेला आपल्या आयुष्यात महत्व देण्याचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, गरीबांना आमचे उपकार नको तर आमचा स्वीकार हवा आहे. सेंट ल्यूक याने गाँस्पेलमध्ये लिहिले आहे, येशूने केवळ गरीबांची सेवा केली नाही तर गरीबांनी केलेल्या सेवेचे कौतुकही केले आहे आणि खऱ्या अर्थाने हेच सक्षमीकरण आहे. याच्याशी संबंधित एक कथा चांगलीच प्रचलित आहे. त्या कथेत म्हटले आहे की येशू एका मंदिराच्या खजिन्याजवळ उभे होते. अनेक श्रीमंत लोक आले आणि त्यांनी भरपूर दानधर्म केला. त्यानंतर एक गरीब विधवा आली आणि तिने त्यात दोन तांब्याची नाणी ठेवली. आता तसे पाहायला गेले तर दोन तांब्याच्या नाण्यांचे मोल ते काय? तेथे उभ्या भक्तांच्या मनात आश्चर्य दाटून आले. तेव्हा येशूने सांगितले की त्या विधवा महिलेने सर्वात जास्त दान केले आहे. इतरांनी बरेच काही दिले हे खरे, पण या महिलेने तर आपल्याकडे असलेले सर्व काही दान केले.

आज 25 डिसेंबर, महामहिम मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. भारतीय जनमानसात संकल्प आणि आत्मविश्वास जागविणाऱ्या मालवीयजींनी आधुनिक शिक्षणाला एक नवी दिशा दिली आहे. त्यांनाही जयंतीदिनी भावपूर्ण श्रध्दांजली. नुकतेच दोन दिवसांपूर्वी मालवीयजींची तपोभूमी असणाऱ्या वाराणसीमध्ये मला अनेक विकास कामांच्या शुभारंभाची संधी लाभली. मी वाराणसीमध्ये भू(BHU)येथे महामहिम मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राची पायाभरणी केली. या संपूर्ण क्षेत्रात हे एक कर्करोग केंद्र तयार होते आहे. हे केंद्र पूर्व उत्तर प्रदेशसह झारखंड-बिहारमधील जनतेसाठीही वरदान ठरेल.

आज भारतरत्न आणि माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. आपला देश अटलजींनी केलेले योगदान कधीही विसरु शकणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अणु ऊर्जेच्या क्षेत्रातही देशाची मान अभिमानाने उंचावली. पक्ष नेता असो, संसद सदस्य असो, मंत्री असो किंवा पंतप्रधान, अटलजींनी प्रत्येक भूमिकेत एक आदर्श निर्माण केला. अटलजींच्या जन्मदिनी मी त्यांना वंदन करतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक कार्यकर्ता या नात्याने मला अटलजींसोबत काम करण्याचे भाग्य लाभले. अनेक आठवणी आज माझ्या डोळयांसमोर जाग्या होतात. आज सकाळी जेव्हा मी ट्विट केले तेव्हा एक जुनी चित्रफितही मी त्यावर शेअर केली. एका लहान कार्यकर्त्याच्या रुपात अटलजींचा स्नेह कशाप्रकारे लाभत असे हे ती चित्रफीत पाहून निश्चितच समजेल.

आज नाताळच्या दिवशी भेट म्हणून देशातील नागरिकांना दोन योजनांचा लाभ मिळणार आहे. एका अर्थाने दोन नवीनतम योजनांचा शुभारंभ होत आहे. संपूर्ण देशात, गाव असो वा शहरात, साक्षर असो वा निरक्षर, सर्वांनाच रोखरहित म्हणजे काय, रोखरहित व्यवहार कसे चालू शकतात, रोख पैशाशिवाय खरेदी कशी करता येईल असे प्रश्न पडले आहेत. सगळीकडे उत्कंठेचे वातावरण आहे. प्रत्येकाला परस्परांकडून शिकायचे आहे, समजून घ्यायचे आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रक्रियेला मोबाईल बँकींगची ताकद मिळावी यासाठी, ई-पेमेंटची सवय व्हावी यासाठी ग्राहकांसाठीच्या आणि लहान व्यापाऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रोत्साहक योजनेला आजपासून शुभारंभ होत आहे. “भाग्यवान ग्राहक योजना” ही ग्राहकांना प्रोत्साहन देणारी योजना आहे तर “डिजी धन व्यापार योजना” ही व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे.

आज 25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी भेट म्हणून 15,000 लोकांना सोडतीद्वारे बक्षिस मिळणार आहे. 15,000 नागरिकांना, प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी 1,000 रुपयांचे बक्षिस जमा केले जाईल. हे केवळ आजच्याच दिवसासाठी नाही. ही योजना आजपासून सुरु होईल आणि पुढचे 100 दिवस सुरु राहिल. प्रत्येक दिवशी 15,000 लोकांना प्रत्येकी 1,000 रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. 100 दिवसांत लाखो कुटुंबांना कोट्यवधी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. मात्र जेव्हा आपण मोबाईल बँकींग, ई-बँकींग, रुपे कार्ड, यूपीआय, यूएसएसडी अशा डिजिटल माध्यमांचा वापर करुन रक्कम प्रदान कराल, तेव्हा त्या व्यवहारांच्या आधारे बक्षिसांसाठी सोडत काढली जाईल आणि विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर अशा ग्राहकांसाठी आठवडयातून एक दिवस मोठी सोडत असेल, ज्यात लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातील. तीन महिन्यांनंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यादिवशी एक महासोडत असेल ज्यात कोट्यवधी रुपयांची बक्षिसे दिली जातील. “डिजी धन व्यापारी योजना” ही प्रामुख्याने व्यापाऱ्यांसाठी आहे. व्यापाऱ्यांनी स्वत: या योजनेत सहभागी व्हावे आणि आपले व्यवहार रोखरहित करण्यासाठी ग्राहकांनाही त्यात समाविष्ट करावे. अशा व्यापाऱ्यांसाठीही स्वतंत्र बक्षिसे दिली जातील आणि ही बक्षिसेही हजारोंच्या संख्येत असतील. व्यापाऱ्यांचा स्वत:चा व्यापारही चालत राहील आणि त्याचबरोबर त्यांना बक्षिस जिंकण्याची संधीही मिळेल. 50 रुपयांपेक्षा जास्त आणि 3,000 रुपयांपेक्षा कमी रकमेची खरेदी करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. समाजातील सर्व वर्गांना, विशेषत: गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. 3,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांना या बक्षिसांचा लाभ मिळणार नाही. गरीबातील गरीब नागरिकही यूएसएसडीचा वापर करुन फिचर फोन किंवा साधारण फोनच्या माध्यमातून सामानाची खरेदीही करु शकतात, सामानाची विक्रीही करु शकतात, पैसेही प्रदान करु शकतात आणि ते सर्व या बक्षिस योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. ग्रामीण क्षेत्रातही एईपीएसच्या माध्यमातून खरेदी-विक्री करु शकतात आणि बक्षिसेही जिंकू शकतात. अनेकांना आश्चर्य वाटेल की भारतात आज सुमारे 30 कोटी रुपे कार्ड आहेत ज्यापैकी 20 कोटी कार्ड जन धन योजनेंतर्गंत खाते उघडणाऱ्या गरीब लोकांकडे आहेत. 30 कोटी नागरिक लगेचच या बक्षिस योजनेत सहभागी होऊ शकतात. देशातील सर्व नागरिकांना या योजनेत स्वारस्य वाटेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या अवतीभवती जे युवा आहेत त्यांना निश्चितच या बाबींबद्दल माहिती असेल, आपण त्यांना विचारले तर ते नक्कीच सांगतील. आपल्या कुटुंबातही 10वी-12वीत शिकणारी मुले असतील तर ती सुध्दा आपल्याला या गोष्टी सहज शिकवतील. हे फारच सोपे आहे, आपण व्हॉटसॲपवरुन जितक्या सहजतेने संदेश पाठवता तितकेच हे सोपे आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, ई-पेमेंट कसे करावे, ऑनलाईन पेमेंट कसे करावे, याबाबतची जागरुकता वेगाने वाढते आहे हे पाहून मला मनापासून आनंद होतो. गेल्या काही दिवसात रोखरहित व्यवहार 200 ते 300 टक्क्यांनी वाढले आहेत. याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक फार मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती मोठा आहे याचा अंदाज व्यापाऱ्यांना निश्चितच करता येईल. जे व्यापारी डिजिटल मार्गांने देवाणघेवाण करतील, आपल्या कारभारात रोख रकमेऐवजी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देतील, अशा व्यापाऱ्यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे.

मी देशातील सर्व राज्यांचेही अभिंनदन करतो. सर्व केंद्रशासित प्रदेशांचेही अभिनंदन करतो. सर्वांनी आपापल्या परीने हे अभियान पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री श्री. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती यासाठीच्या अनेक योजनांवर विचार करते आहे. त्याचबरोबर मी पाहिले आहे की, राज्य सरकारांनीसुध्दा आपापल्या परीने अनेक योजना सुरु केल्या आहेत, त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. कोणीतरी मला सांगितले की, आसाम सरकारने मालमत्ता कर आणि व्यापार अनुज्ञपती शुल्काचा भरणा डिजिटल माध्यमातून केल्यास 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण बँकांच्या ज्या शाखा आपल्या 75 टक्के ग्राहकांद्वारे जानेवारी ते मार्च या अवधीत किमान दोन डिजिटल व्यवहार करुन घेतील, त्यांना सरकारतर्फे 50,000 रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. 31 मार्च 2017 पर्यंत 100 टक्के डिजिटल व्यवहार करणाऱ्या गावांना सरकारतर्फे “डिजी व्यवहारांसाठी उत्तम पंचायत” अंतर्गंत पाच लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. आसाम सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषक शिरोमणी योजनेंतर्गंत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी पूर्णपणे डिजिटल माध्यमातून भरणा करणाऱ्या पहिल्या दहा शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. मी आसाम सरकारचे अभिंनदन करतो आणि अशाप्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या सर्वच सरकाराचे अभिनंदन करतो.

अनेक संघटनांनीसुध्दा गावांमधील गरीब शेतकऱ्यांमध्ये डिजिटल देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. मला कोणीतरी सांगितले की गुजरात नर्मदा खोरे, खते आणि रसायन मर्यादित या खतनिर्मितीशी संबंधित कंपनीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ज्याठिकाणी खतांची विक्री केली जाते त्याठिकाणी POS मशिन लावले आहेत. अगदी थोडया दिवसांमध्ये तब्बल 35,000 शेतकऱ्यांनी खताच्या पाच लाख गोण्या डिजिटल मार्गाने भरणा करुन खरेदी केल्या आणि हे सगळे केवळ दोन आठवडयात झाले. गंमतीची गोष्ट अशी की, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कंपनीच्या खत विक्रीत 27 टक्के वाढ झाली आहे.

बंधू आणि भगिनींनो, आपल्या अर्थव्यवस्थेत, आपल्या जीवन व्यवस्थेत अनौपचारिक क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे आणि बहुतेकदा या लोकांना मजूरीचे पैसे, कामाचे पैसे किंवा वेतन रोखीने दिले जाते, रोख पगार दिला जातो आणि त्यामुळे मजूरांचे शोषण होत राहते, हे आपल्याला माहिती आहे. जिथे 100 रुपये मिळाले पाहिजेत, तिथे 80 रुपये मिळतात. 80 रुपये मिळाले पाहिजेत, तिथे 50 रुपये मिळतात आणि आरोग्याच्या दृष्टीने विम्यासारख्या इतर अनेक सुविधांपासूनही हे मजूर वंचित राहतात. आता रोखरहित वेतन दिले जात आहे. मजूरांचे पैसेही थेट बँकेत जमा होत आहेत. एका अर्थाने अनौपचारिक क्षेत्राचे औपचारिक परिवर्तन होत आहे, शोषण थांबते आहे. हिस्सा द्यावा लागत असे तोही बंद होत आहे. मजूरांना, कारागिरांना, गरीबांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणे आता शक्य होते आहे. त्याचबरोबर जे इतर लाभ असतात, त्या लाभांचेही ते अधिकारी होत आहेत.

आपला देश सर्वात जास्त युवा शक्ती असणारा देश आहे. तंत्रज्ञान आम्हाला सहज साध्य आहे. भारतासारख्या देशाने तर या क्षेत्रात सर्वात पुढे असले पाहिजे. आमच्या युवकांनी स्टार्ट अपच्या क्षेत्रातही खूप प्रगती केली आहे. डिजिटल चळवळीतील हे सोनेरी दिवस आहेत. आमचे युवा नव्या कल्पनांसह, नव्या तंत्रज्ञानासह, नव्या पध्दतींसह या क्षेत्राला सर्वतोपरी सक्षम करु शकतात, त्यांनी हे केले पाहिजे. त्याचबरोबर देशाला काळया पैशापासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याच्या मोहिमेतही आपण सर्वांनी पूर्ण ताकतीनिशी सहभागी झाले पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी प्रत्येक महिन्यात “मन की बात” पूर्वी लोकांना त्यांचे सल्ले देण्याचे, त्यांचे विचार सांगण्याचे आवाहन करतो. यावेळी माय गव्ह आणि नरेंद्र मोदी ॲपवर जे सल्ले आले आहेत त्यातील 80 ते 90 टक्के सल्ले भ्रष्टाचार आणि काळया पैशाच्या विरोधातील लढ्यासंदर्भात आहेत, नोटबंदी संदर्भात आहेत. हे सर्व जेव्हा मी पाहिले तेव्हा ढोबळ मनाने तीन भागात मी त्यांची विभागणी केली. काही लोकांनी मला जे सल्ले दिले आहेत, त्यात नागरिकांना कशाप्रकारच्या अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो, याबाबत सविस्तर लिहिले आहे. देशाच्या कल्याणासाठी इतके चांगले काम, इतके पवित्र काम सुरु असतानांही, कोणकोणत्या ठिकाणी गैरव्यवहार होत आहे, फसवणूकीचे नवे मार्ग कशाप्रकारे शोधले जात आहेत, हे दुसऱ्या प्रकारातील लोकांनी लिहिले आहे. जे झाले त्याचे समर्थन करीत ही लढाई पुढे सुरुच राहावी असे तिसऱ्या प्रकारातील लोकांनी आवर्जुन लिहिले आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास कठोर पावलेही उचलली जावीत असे आग्रहाने सांगणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे.

मला अशाप्रकारे भरपूर पत्रे पाठवून मदत करणाऱ्या सर्व देशवासियांचे मी आभार मानतो. काळया पैशांचे व्यवहार पूर्णपणे थांबविण्यासाठी उचलेले हे पाऊल कौतुकास पात्र आहे असे श्री.गुरुमणी केवल यांनी माय गव्हवर नमूद केले आहे. आम्हा नागरिकांना त्रास होतो आहे. मात्र आपण सगळेच भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहोत आणि या लढयात आम्हांला जे सहकार्य देणे शक्य आहे ते देण्यात आम्हाला आनंदच वाटतो आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा या विरोधात आम्ही लष्करी बलांप्रमाणेच लढा देतो आहोत. गुरुमणी केवल यांनी व्यक्त केलेल्या या भावना देशातील कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या भावनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. आपण सगळेच याचा अनुभव घेतो आहोत. जेव्हा जनतेला त्रास होतो, कष्ट होतात, तेव्हा प्रत्येकालाच दु:ख होते हे खरे. जेवढा त्रास आपणा सर्वांना होतो, तेवढेच दु:ख मलाही होते. मात्र जेव्हा एका उदात्त ध्येयासाठी, एका उच्च विचारासह निर्धार पूर्ण करण्यासाठी स्वच्छ मनाने काम केले जाते, तेव्हा दु:ख असतानाही, त्रास होत असतानाही, देशातील सर्व नागरिक ठामपणे उभे राहतात. हेच लोक खऱ्या अर्थाने “बदलाचे दूत” आहेत. मी आणखी एका कारणासाठी सर्वांचे आभार मानतो. या नागरिकांनी केवळ त्रास सहन केला नाही तर जनतेला चुकीच्या मार्गावर नेऊ इच्छिणाऱ्या निवडक लोकांनाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या काळात अनेक अफवा पसरल्या. भ्रष्टाचार आणि काळया पैशाविरुध्दच्या लढयाला सांप्रदायिकतेचे रंग देण्याचेही अनेकांनी प्रयत्न केले. नोटांवर लिहिलेले शब्द चुकीचे आहेत, मिठाचे दर वाढले आहेत, दोन हजारांची नोटही रद्द होणार आहे, 500 आणि 100 रुपयांची नोटसुध्दा रद्द होणार आहे, अशा अनेक अफवा अनेकांनी पसरवल्या. मात्र या सगळया अफवा ऐकून या देशातील नागरिकांचे मन ठाम राहिले. इतकेच नाही तर अनेक लोक मैदानात उतरले, त्यांनी आपल्या कुशलतेने, बुध्दीचा वापर करुन अफवा पसरवणाऱ्या लोकांचा खरा चेहरा समोर आणला, अफवा चुकीच्या असल्याचे सिध्द केले आणि सत्य सर्वांसमोर आणले. जनतेच्या या सामर्थ्यालाही माझे शतश: प्रणाम.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी अनुभवतो आहे की, जेव्हा सव्वाशे कोटी देशवासी आपल्या सोबत उभे असतील तेव्हा काहीच अशक्य नसते. जनता जर्नादन हे ईश्वराचेच रुप असते आणि जनतेचे आशिर्वाद हे ईश्वराचेच आशिर्वाद असतात. भ्रष्टाचार आणि काळया पैशाविरुध्दच्या या महायज्ञात देशातील नागरिकांनी संपूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला, याबद्दल मी देशातील जनतेचे आभार मानतो. भ्रष्टाचार आणि काळया धनाविरुध्द जी लढाई सुरु आहे, यासंदर्भात सदनात व्यापक चर्चा व्हावी, असे मला वाटत होते. सदनाचे कामकाज झाले असते तर नक्कीच चांगली चर्चा झाली असती. राजकीय पक्षांना सर्व प्रकारच्या सवलती असल्याच्या अफवा काही लोक पसरवत आहे, त्या पूर्ण चुकीच्या आहेत. कायदा सर्वांसाठी सारखा असतो. व्यक्ती असो, संघटना असो किंवा राजकीय पक्ष असो, प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे आणि प्रत्येकाला ते करावेच लागते. जे लोक उघडपणे भ्रष्टाचार आणि काळया पैशाचे समर्थन करु शकत नाहीत ते सरकारच्या त्रुटी शोधण्यात वेळ घालवतात.

वारंवार नियम का बदलावेत, असाही एक प्रश्न उपस्थित होतो. हे सरकार जनतेसाठी आहे. सरकार जनतेच्या अभिप्रायाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, कोणते नियम त्रासदायक ठरत आहेत, त्याचे समाधान कशाप्रकारे करता येईल याचा सरकार विचार करते. संवेदनशील असणारे हे सरकार प्रत्येक क्षणी जनतेच्या सोयी लक्षात घेत नियमांमध्ये शक्य ते बदल करते. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी हे बदल करावे लागतात. मी पहिल्याच दिवशी 8 तारखेला सांगितले होते की, हा लढा असामान्य आहे. 70 वर्षांपासून बेईमानी आणि भ्रष्टाचाराच्या या काळया व्यवहारात कोणत्या शक्ती सहभागी आहे, त्यांची ताकद किती असेल ? जेव्हा अशा लोकांशी लढा देण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा त्यांनीसुध्दा सरकारला पराभूत करण्यासाठी रोज नवे प्रयत्न सुरु केले. जेव्हा त्यांनी नवे मार्ग शोधले तेव्हा त्यांचा नायनाट करण्यासाठी आम्हालाही नवे मार्ग शोधावे लागले. भ्रष्टाचार करणाऱ्यांना, गैर व्यवहार करणाऱ्यांना आणि काळया पैशाला संपविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.

त्याचवेळी दुसरीकडे अनेक नागरिकांनी सुरु असलेल्या गैर व्यवहारांबाबत तसेच वेगवेगळया पळवाटांबाबत चर्चा करणारी पत्रेही लिहिली आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आणखी एका गोष्टीबद्दल मला आपले सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करावेसे वाटते. आपण दूरचित्रवाणीवर, वर्तमान पत्रांमध्ये पाहात असाल. रोज नवनवीन लोकांना पकडले जात आहे. नोटा जप्त केल्या जात आहेत, छापे टाकले जात आहेत. भलेभले लोक पकडले जात आहेत. हे कसे शक्य झाले ? मी गुपित सांगतो. यामागचे गुपित असे की, मला लोकांकडूनच याबाबतची माहिती मिळते आहे. सरकारी व्यवस्थेतून येणाऱ्या माहितीपेक्षा कितीतरी जास्त पट माहिती सर्वसामान्य नागरिक देत आहे. आम्हाला मिळणारे यश सर्वसामान्य नागरिकांच्‍या जागरुकतेमुळे मिळते आहे. माझ्या देशाचा जागरुक नागरिक अशा तत्वांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी फार मोठा धोका पत्करतो आहे आणि मला मिळणारी बहुतेक माहिती अधिकाधिक यश मिळवून देणारी आहे. अशा प्रकारची माहिती देण्यासाठी सरकारने एक ई-मेल पत्ता तयार केला आहे. त्यावर ही माहिती पाठवता येते. माय गव्हवर सुध्दा अशी माहिती देता येते. अशाप्रकारच्या सर्व दुष्ट शक्तींविरोधात लढा देण्याप्रती सरकार वचनबध्द आहे आणि आपले सहकार्य असल्यामुळे हा लढा सोपा झाला आहे.

तिसऱ्या प्रकारातील पत्र लेखकांचा गट फार मोठा आहे. ते म्हणतात, मोदींजी थकू नकात, थांबू नकात, आवश्यक ती सर्व कठोर पावले उचला, मात्र आता ज्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे त्याचे ध्येय गाठायचेच आहे. अशी पत्र लिहिणाऱ्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. त्यांच्या पत्रांमध्ये विश्वास आहे आणि आशिर्वाद सुध्दा आहे. हा पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे. हा लढा जिंकायचा. थकण्याचा प्रश्नच नाही, थांबण्याचाही प्रश्न नाही आणि ज्या कामासाठी सव्वाशे कोटी नागरिकांचा आशिर्वाद लाभतो त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. आपल्या देशात “बेनामी संपत्ती” संदर्भात एक कायदा आहे, हे आपल्याला माहिती असेलच. 1988 साली हा कायदा तयार झाला होता. तेव्हापासून त्याचे नियमही तयार झाले नव्हते आणि तो अधिसूचितही झाला नव्हता. तो बासनात गुंडाळून ठेवला होता. आम्ही त्याला बाहेर काढले आणि प्रभावी “बेनामी संपत्ती” कायदा अंमलात आणला. येत्या काही दिवसात हा कायदा आपला प्रभाव दाखवू लागेल. देशहितासाठी, जनहितासाठी जे करावे लागेल ते करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्यावेळी मन की बात मध्ये मी सांगितले होते की, अनेक समस्या असतानांही आपल्या शेतकऱ्यांनी अथक श्रम करुन पेरणीचे गेल्या वर्षाचे विक्रम मोडले. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हे शुभसंकेत आहेत. या देशाचा मजूर असो, या देशाचा शेतकरी असो किंवा या देशाचा नागरिक असो, या सर्वांच्या कष्टांचे आज सार्थक होते आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जगाच्या वित्तीय मंचावर भारताने अनेक क्षेत्रांमध्ये आपले नाव अभिमानाने उंचावले आहे. विविध निर्देशांकांच्या माध्यमातून भारताच्या जागतिक क्रमवारीत होणारी सुधारणा, हा आमच्या देशातील नागरिकांच्या निरंतर प्रयत्नांचा परिणाम आहे. जागतिक बँकेच्या उद्योग करण्यासंदर्भातील अहवालात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारताला उद्योग करण्यासंदर्भात जगातील सर्वोत्तम स्थान बनविण्याच्या दृष्टीने वेगाने प्रयत्न करीत आहोत आणि त्यात यशही मिळते आहे. यू.एन.सी.टी.ए.डी.च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार “2016-18 साठी सर्वोच्च उज्ज्वल अर्थव्यवस्थां”साठीच्या सूचित भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मकता अहवालात भारताने 32 स्थानांची झेप घेतली आहे. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2016 मध्ये आपण 16 स्थानांची झेप घेतली आहे आणि जागतिक बँकेच्या देशांतर्गंत कामगिरी निर्देशांकांत 2016 मध्ये 19 स्थानांची झेप घेतली आहे. अनेक अहवालांचे मूल्यमापन अशा प्रकारचे दिशानिर्देश करत आहे की भारत वेगाने पुढे जात आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी संसदेच्या अधिवेशनाने देशातील नागरिक नाराज झाले. सगळीकडून संसदेच्या कामकाजाच्या अनुषंगाने रोषाची भावना व्यक्त झाली. राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतींनीही उघडपणे त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र अशा परिस्थितीतही काही वेळा काही चांगल्या गोष्टी होतात आणि मनाला समाधान लाभते. संसदेत सुरु असलेल्या गदारोळातच एक चांगले काम झाले, मात्र त्याकडे देशाचे लक्ष गेले नाही. बंधू भगिनींनो, दिव्यांगांसाठी जी मोहिम घेऊन माझे सरकार पुढे चालले आहे, त्याच्याशी संबंधित एक विधेयक संसदेत संमत झाले आहे, हे सांगताना मला अभिमान आणि आनंद वाटतो आहे. त्यासाठी मी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांचे आभार मानतो, देशातील कोट्यवधी दिव्यांगांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. दिव्यांगांप्रतीही आमचे सरकार वचनबध्द आहे. मी व्यक्तिश: सुध्दा या मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचा योग्य तो सन्मान मिळावा अशी माझी इच्छा होती. पॅरालिम्पिकमध्ये चार पदके जिंकून आमच्या दिव्यांग बंधू भगिनींनी, आमचे प्रयत्न आणि विश्वासाला नवी उभारी दिली. आपल्या विजयामुळे त्यांनी देशाची मान उंचावली आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेने जनतेला चकीतही केले. आमचे दिव्यांग बंधू भगिनींसुध्दा देशातील प्रत्येक नागरिकांप्रमाणेच एक अनमोल वारसा आहेत, शक्ती आहेत. दिव्यांगांच्या हितासाठी हे विधेयक संमत झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या जास्त संधी प्राप्त होतील, त्यामुळे मला आनंद झाला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा वाढवून 4 टक्के करण्यात आली आहे. या कायद्याच्या माध्यमातून दिव्यांगांचे शिक्षण, सुविधा आणि तक्रारींसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत दिव्यांगांसाठी 4,350 शिबिरांचे आयोजन केले, यावरुन हे सरकार दिव्यांगांप्रती किती संवेदनशील आहे, याची कल्पना करता येईल. 352 कोटी रुपये खर्च करुन 5,80,000 दिव्यांग बंधू भगिनींना उपकरणांचे वितरण केले. सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचारानुरुप नवा कायदा संमत केला आहे. यापूर्वी दिव्यांगांच्या सात प्रकारच्या श्रेणी होत्या, मात्र आता कायद्यान्वये या श्रेणींमध्ये 21 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात 14 श्रेणींची भर घालण्यात आली आहे. अनेक श्रेणींचा पहिल्यांदाच दिव्यांग म्हणून समावेश करण्यात आला आहे. थॅलेसेमिया, पार्किंसन्स तसेच खुजेपणालाही या श्रेणींमध्ये समाविष्ट केले आहे.

माझ्या युवा सहकाऱ्यांनो, गेल्या काही आठवडयांमध्ये खेळाच्या मैदानांवरही आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी घडली आहे. भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या विरुध्द सुरु असलेली मालिका 4-0 अशी जिंकली. यात काही युवा खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. करुण नायर या आमच्या युवा खेळाडूने त्रिशतक केले तर के.एल. राहूलने 199 धावांची खेळी केली. कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगली फलंदाजी करतानाच संघाचे चांगले नेतृत्वही केले. भारतीय क्रिकेट संघांचा ऑफ स्पिनर गोलंदाज आर. अश्विनला आयसीसीने 2016 वर्षातील “क्रिकेटर ऑफ द इअर” आणि “सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू” म्हणून घोषित केले. या सर्वांचे माझ्याकडून मन:पूर्वक अभिनंदन. हॉकीच्या क्षेत्रातही तब्बल 15 वर्षांनंतर एक चांगली बातमी आली आहे, उत्तम बातमी आली आहे. ज्युनिअर हॉकी संघाने विश्वचषक जिंकला आहे. तब्बल 15 वर्षानंतर ज्युनिअर हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल युवा खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन. ही कामगिरी भारतीय हॉकी संघाच्या भविष्याच्या दृष्टीने शुभसंकेत आहे. गेल्या महिन्यात आमच्या महिला खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. भारतीय महिलांच्या हॉकी संघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि अलिकडेच काही दिवसांपूर्वी 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिलांच्या संघांने कांस्य पदकाची कमाई केली. मी क्रिकेट आणि हॉकी संघातील सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, येणारे 2017 हे वर्ष नव्या आनंद आणि उत्साहाचे वर्ष असावे, आपले सर्व संकल्प पूर्ण व्हावे आणि विकासाची नवी शिखरे आपण गाठावी. हे नवे वर्ष गरिबातील गरीबालाही सुखाचे आयुष्य जगण्याची संधी देणारे असावे. 2017 या वर्षासाठी माझ्याकडून सर्व देशवासियांना अनेकानेक शुभेच्छा. खूप-खूप आभार

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government