पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्यासमवेत 20 मे 2023 रोजी द्विपक्षीय बैठक घेतली.
पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यावर्षी मार्च महिन्यात भारतात येऊन गेल्यामुळे दोन्ही नेत्यांची 2023 मधील ही दुसरी बैठक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2023 मध्ये भेट दिलेले बोधीचे रोपटे हिरोशिमा येथे लावल्याबद्दल पंतप्रधानांनी जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांचे आभार मानले.
भारताच्या संसदेत दरवर्षी हिरोशिमा दिनाचे स्मरण केले जाते आणि जपानचे राजदूत याप्रसंगी नेहमीच उपस्थित असतात, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांच्या जी 20 आणि जी 7 अध्यक्षतांखाली होणाऱ्या प्रयत्नांचा योग्य समन्वय साधण्याविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथच्या समोरील मुद्दे आणि प्राधान्यक्रम अधोरेखित करण्याच्या गरजेवर भर दिला.
दोन्ही नेत्यांनी समकालीन प्रादेशिक घडामोडींवर देखील विचारविनिमय केला. हिंद- प्रशांत क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी देखील त्यांच्यात चर्चा झाली.
द्विपक्षीय विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन, पर्यावरणपूरक जीवनशैली ( लाईफ ), हरित हायड्रोजन, उच्च तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, इत्यादी क्षेत्रांवर बैठकीत चर्चा झाली. दहशतवादाचा मुकाबला आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
Had an excellent meeting with PM @kishida230 this morning. We reviewed the full range of India-Japan relations and also discussed the focus areas of India’s G-20 Presidency and Japan’s G-7 Presidency towards making our planet better. pic.twitter.com/2vFF2WQst5
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2023
本日朝、岸田首相と会談を行い素晴らしい結果を得ました。会談では、これまでの印日関係を振り返り、よりよい地球環境の構築に向け、G20議長国、G7議長国として注力すべき分野について協議を行いました。@kishida230 pic.twitter.com/c5doYimw9T
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2023