पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये 3,350 कोटी रुपयांच्या विकास कामांचे अनावरण केले. आरोग्य, स्वच्छता, स्मार्ट सिटी, ऊर्जा, गृहनिर्माण या क्षेत्राशी संबंधित हे प्रकल्प आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वाराणसीच्या रमेश यादव यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.
वाराणसी लगतच्या आऊरे गावात त्यांनी एका सभेला संबोधित केले.
विकासाला चालना देण्यासाठी सरकार दोन आघाड्यांवर काम करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकार एकीकडे, महामार्ग, रेल्वे यासाख्या पायाभूत सुविधा उभारत आहे तर दुसरीकडे विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचतील याची काळजी सरकार घेत आहे, असे ते म्हणाले. यादृष्टीने अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
वाराणसीला नवभारतातील महत्त्वाचे केंद्र करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी आज अनावरण केलेल्या विकास कामांबाबत सांगितले. भारतीय रेल्वेच्या प्रगतीसाठी गेल्या साडेचार वर्षात विविध पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली-वाराणसी मार्गावरील, भारतातील पहिली सेमी वेगवान रेल्वेगाडी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ हे त्यादृष्टीने एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे वाहतूक सुगम होण्याबरोबरच वाराणसी, पूर्वांचल आणि लगतच्या क्षेत्रात नवे उद्योग उभे राहतील, असे ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठाच्या शतकपूर्ती निमित्त स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधानांनी केले.
उत्तर प्रदेशात सुमारे 38 हजार लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. योजनेतून उत्तर प्रदेशातल्या सुमारे 1 कोटी 20 लाख कुटुंबांना लाभ मिळेल, असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ उत्तर प्रदेशातल्या 2 कोटी 25 लाख गरीब शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे महत्त्वही पंतप्रधानांनी सांगितले.
वाराणसीमध्ये पायाभरणी झालेले प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्यक्तींना मदत आणि सहायक उपकरणांचे वाटप पंतप्रधानांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले.