पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारताचा इतिहास म्हणजे केवळ वसाहतवादी शक्तींनी आणि वसाहतवादी मानसिकता असलेल्यांनी लिहीलेला इतिहास नव्हे. भारताचा इतिहास म्हणजे जनतेने लोकसाहित्यातून जोपासलेला आणि पिढ्यांनपिढ्या पुढे चालत राहिलेला आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, योग्य ते महत्व दिले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान लाल किल्ला ते अंदमान निकोबार पर्यंत, स्टँचू ऑफ युनिटीद्वारे सरदार पटेल आणि पंच तीर्थ द्वारे बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ठळकपणे जनतेसमोर मांडण्यात येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अशी असंख्य व्यक्तित्वे आहेत ज्यांना अनेक कारणांमुळे मान आणि ओळख दिली गेली नाही. चौरी चौरा वीरांसमवेत जे झाले ते आपण विसरू शकतो का असा सवाल पंतप्रधानांनी केला.
भारतीयत्वाच्या रक्षणासाठी महाराजा सुहेलदेव यांचे योगदानही असेच उपेक्षित राहिले. इतिहासाच्या पुस्तकात महाराजा सुहेलदेव यांचे कार्य दुर्लक्षित असले तरी अवध, तराई आणि पूर्वांचल मधल्या लोकसाहित्याने जनतेच्या मनात महाराजा सुहेलदेव यांच्या कार्याचे स्मरण ठेवण्याचे काम केल्याचे पंतप्रधान म्हणाले. संवेदनशील आणि विकासाभिमुख शासक म्हणून त्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजा सुहेलदेव यांचे स्मारक, भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारामुळे या आकांक्षी जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरातल्या जनतेचे जीवन सुलभ होईल. दोन वर्षापूर्वी पंतप्रधानांनी महाराजा सुहेलदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केले होते.
वसंतपंचमीनिमित्त जनतेला शुभेच्छा देत, महामारीचे नैराश्य मागे टाकत भारतासाठी हा वसंत नवी आशा घेऊन आल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताचे ज्ञान आणि विज्ञानसमृध्द करत संशोधन आणि नवोन्मेश याद्वारे राष्ट्र उभारणीचे कार्य करणाऱ्या प्रत्येक देशवासियाला सरस्वती मातेचा आशीर्वाद लाभावा अशी प्रार्थना त्यांनी केली.
गेल्या काही वर्षात इतिहास, श्रद्धा, अध्यात्म यांच्याशी संबंधित स्मारकांचा उद्देश, पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा आहे. उत्तर प्रदेशही पर्यटन आणि तीर्थ स्थळे यांनी समृद्ध असून इथे अपार संधीही असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू राम, श्रीकृष्ण, बुद्ध यांच्या जीवनाशी निगडीत अयोध्या, चित्रकुट, मथुरा, वृंदावन, गोवर्धन, कुशीनगर, श्रावस्ती यासरख्या स्थळी, रामायण मंडल, आध्यात्मिक मंडल, बुद्ध मंडल यांचा विकास करून उत्तर प्रदेशात पर्यटन विकसित करण्यात येत आहे. या प्रयत्नांची फलश्रुती दिसून येत असून इतर राज्यातून जास्तीत जास्त पर्यटक इथे येतात. विदेशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, देशातल्या पहिल्या तीन राज्यातही उत्तर प्रदेशाचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पर्यटकांसाठी लागणाऱ्या सुविधांबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये आधुनिक कनेक्टीव्हिटीचाही विस्तार करण्यात येत आहे. भविष्यात अयोध्या आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यटकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात लहान - मोठ्या अशा डझनभर विमानतळांचे काम सुरु असून त्यातले अनेक पूर्वांचल मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, गंगा द्रुतगती मार्ग, गोरखपूर जोड द्रुतगती मार्ग, बलिया जोड द्रुतगती मार्ग असे आधुनिक आणि विस्तृत रस्ते उत्तर प्रदेशात बांधण्यात येत आहेत. आधुनिक उत्तर प्रदेशाच्या आधुनिक पायाभूत सुविधांची ही सुरवात आहे. दोन मोठ्या समर्पित मालवाहू मार्गीकेंचे उत्तरप्रदेश हे जंक्शन आहे. उत्तर प्रदेशात आधुनिक पायाभूत ढाचा निर्मितीमुळे
या राज्यात उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या बरोबरच उद्योग आणि युवा या दोन्हींसाठी उत्तम संधी निर्माण करण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने कोरोना स्थिती योग्य हाताळल्याची प्रशंसा त्यांनी केली. राज्यात माघारी परतलेल्या मजुरांना रोजगार पुरवल्या बद्दलही त्यांनी उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा केली. कोरोना विरोधातल्या लढ्यात गेल्या 3-4 वर्षातले उत्तर प्रदेश सरकारच्या कार्याचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे पुर्वांचल मध्ये मेनेंजायटीसचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. गेल्या सहा वर्षात उत्तर प्रदेशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांचे 14 वरून 24 झाले आहे. गोरखपूर आणि बरेलीमध्ये एम्स उभारण्याचे काम सुरु आहे. याशिवाय 22 नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. वाराणसी मधल्या आधुनिक कर्करोग रुग्णालयाच्या सुविधेप्रमाणे पूर्वांचललाही सुविधा पुरवण्यात येत आहे. उत्तर प्रदेश जल जीवन अभियान म्हणजेच प्रत्येक घराला पाणी पुरवण्याचे कार्य प्रशंसनीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. घरोघरी शुध्द पाणी पुरवल्याने अनेक रोगांची शक्यता कमी होत असल्याचे ते म्हणाले.
वीज, पाणी, रस्ते,आणि आरोग्य सुविधामधल्या सुधारणांमुळे, उत्तरप्रदेशातल्या खेड्यांना, गरीब, शेतकरीवर्गाला थेट लाभ झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान किसान सन्मान निधी द्वारे उत्तर प्रदेशातल्या सुमारे 2.5 कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहेत, एकेकाळी या शेतकऱ्यांना खताची एक गोणी घेण्यासाठीही इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असे. इथल्या शेतकऱ्याला, विजेचा वापर करत शेताला पाणी देण्यासाठी रात्र-रात्र जगावे लागत असे मात्र आपल्या सरकारने वीज पुरवठ्यात सुधारणा करत ही समस्या दूर केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
प्रती शेतकरी लागवड क्षेत्र आकसत चालल्याची दखल घेण्यासाठी कृषी उत्पादक संस्था (एफपीओ) ची स्थापना अतिशय महत्वाची आहे. 1 ते 2 बिघा जमीन असलेली 500 शेतकरी कुटुंबे एकत्र येतील तेव्हा त्यांचे सामर्थ्य 500 – 1000 बिघा जमीन असलेल्या शेतकऱ्यापेक्षाही जास्त असेल. त्याचप्रमाणे भाज्या, फळे, दूध, मासे आणि यासारखे अनेक व्यवसाय किसान रेल द्वारे मोठ्या बाजारपेठाशी जोडले जात आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या कृषी सुधारणामुळे अल्प आणि मध्यम शेतकऱ्याचा फायदा होणार असून कृषी कायद्याबाबत देशभरातून सकारात्मक प्रतिसादाचा वर्षाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आले. देशात परदेशी कंपन्यांना आमंत्रण देण्यासाठी कायदा करणारे आता भारतीय कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. हा अपप्रचार आणि करण्यात आलेली दिशाभूल आता उघड झाली आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ खरेदी दुप्पट झाली आहे. योगी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याआधीच 1 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे चुकते करावेत यासाठी केंद्र सरकारनेही राज्य सरकारांना हजारो कोटी रुपये दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेवर दिले जावेत यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न जारी आहेत.
गाव आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वामित्व योजनेमुळे, गावात अवैधरीत्या घर बळकवण्याच्या शक्यतेपासून मुक्ती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या योजने अंतर्गत उत्तर प्रदेशातल्या 50 जिल्ह्यात ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरु आहे. 12 हजार गावात हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, 2 लाख कुटुंबाना मालमत्ता कार्ड मिळाले आहे.
अशा परीस्थितीत कृषी सुधारणा कायद्याखाली शेतकऱ्याची जमीन बळकावली जाणार असल्याचा अपप्रचार कोणी केल्यास त्यावर कोण कसा विश्वास ठेवेल असा प्रश्न त्यांनी केला. प्रत्येक नागरिक सबल करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देश आत्म निर्भर करण्याचा आमचा प्रण आहे आणि यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मनामध्ये भगवान राम यांचे नाम जपत हाती घेतलेले कार्य यशस्वी होणारच या अर्थाच्या गोस्वामी तुलसीदास यांच्या राम चरितमानस मधल्या चौपाईने पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.