पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.
या समारंभ प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ``हे प्रकल्प म्हणजे नाविन्य आणि स्वदेशी विकासाचे प्रतीक आहेत. पुढे जाऊन हे प्रकल्प तामिळनाडूचा विकास ठरणार आहेत. `` ते म्हणाले, आज पायाभरणी करण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा 636 किलोमीटर लांबीच्या प्रचंड मोठ्या अनीकट कालवा पद्धतीमुळे तंजावूर आणि पुदुक्कोट्टी यांना विशेष लाभ होणार आहे. याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. यामुळे 2.27 लाख एकर जागेवरील सिंचन सुविधेत सुधारणा होणार आहे. अन्नधान्य उत्पादन आणि जलसंपत्तीचा चांगला वापर केल्याबद्दल मोदी यांनी तामिळनाडूमधील शेतकऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ``द ग्रँड अनिकट हा आपल्या गौरवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. शिवाय हा आपल्या देशाच्या ``आत्मनिर्भर भारत`` ध्येयासाठी प्रेरणा आहे.`` तमिळ कवी अव्वियार यांचा दाखला देत, पाणी बचत हा केवळ राष्ट्रीय प्रश्न नसून तो आता जागतिक विषय आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. पर ड्रॉप मोअर क्रॉप (थेंबागणिक पीक अधिक) हा मंत्र सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
नऊ किलोमीटर लांब असलेल्या चेन्नई मेट्रो रेल फेज वनचे उद्घाटनही आज करण्यात आले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, देशभर सर्वत्र महामारीचा काळ असताना देखील नियोजित वेळेनुसार हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे कारण, यासाठी रेल्वे गाड्या स्थानिक पातळीवरून खरेदी करण्यात आल्या आहेत आणि भारतीय कंत्राटदारांनी याची बांधकामे केली आहेत. मोदींनी नमूद केले की, या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या 119 किलोमीटरच्या अंतरासाठी 63 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या शहरात एकाच वेळी मंजुरी मिळालेला हा एक सर्वात मोठा प्रकल्प आहे. शहरी वाहतुकीवर भर दिल्यास येथील नागरिकांच्या `जगण्याच्या सुलभतेला` (इज ऑफ लिव्हिंग) चालना मिळेल, याकडे मोदींनी लक्ष वेधले.
पंतप्रधान म्हणाले की, दळणवळणाच्या विकासामुळे सहाजिकच सुलभता आणि सोय येते. आर्थिकतेला देखील त्यामुळे पाठबळ मिळते. चेन्नईचा समुद्र किनारा, सुवर्ण चतुर्भुजचा एन्नोर अट्टिपट्टू हिस्सा हे रहदारीचे सर्वाधिक गर्दीचे मार्ग आहेत. ते म्हणाले की, चेन्नई बंदर आणि कामराजर बंदर दरम्यान जलवाहतुकीच्या मार्गाचा वेग वाढविणे सुनिश्चित करणे गरजेचे आहे, आणि यासाठी चेन्नई किनारा आणि अट्टिपट्टु यांच्या दरम्यान असलेल्या चौथ्या मार्गाची निश्चित मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी असेही नमूद केले की, विल्लुपुरम तंजावूर थिरूवरूर प्रकल्पाचे विद्युतीकरण हे या त्रिभुज प्रदेश असलेल्या जिल्ह्यांसाठी एक विलक्षण वरदान ठरणार आहे.
पुलवामा हल्ल्यातील शहीदांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधानांनी आज श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, ``त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. त्यांच्या शौर्यामुळे आमच्या पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा मिळत राहील``
पंतप्रधान म्हणाले, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने खूप मोठे प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले, महाकवी सुब्रमण्य भारती यांनी जगातील सर्वात प्राचीन भाषा असलेल्या तमिळमध्ये लिहिले आहे, त्यातून याची प्रेरणा मिळाली. त्यांनी म्हटले आहे, चला शस्त्रे बनवूया, चला कागद बनवू या. चला उद्योग उभारूया, चला शाळा तयार करूया. धावू शकतील आणि उडू शकतील अशी वाहने बनवूया. जगाला हादरवून टाकतील अशी जहाजे बनवूया. मोदी म्हणाले, संरक्षणाच्या दोन कॉरिडोरपैकी एक तामिळनाडूमध्ये आहे. या कॉरिडोरला यापूर्वीच 8100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आश्वासने मिळाली आहेत.
पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडू हे भारतातील वाहन उत्पादन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आघाडीवरचे ठिकाण आहे. तसेच भारतातील रणगाडा उत्पादनात देखील तामिळनाडू हे आघाडीवर आहे. एमबीटी अर्जुन मार्क 1 ए, बद्दल पंतप्रधान म्हणाले की, ``स्वदेशी पद्धतीने रचना केलेले आणि उत्पादन असलेले ``मेन बॅटल टँक अर्जुन मार्क 1 ए`` सुपूर्त करताना मला अभिमान वाटत आहे. शिवाय हे स्वदेशी आयुध आहे. तामिळनाडू येथे तयार झालेला हा रणगाडा उत्तरेतील सीमेवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यातून भारताचा एकात्म भाव – एकतेचे दर्शन घडते.``
पंतप्रधान म्हणाले की, संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर बनविण्यावर वेगाने भर देण्यात येत आहे.
आमची सशस्त्र सेना भारताचे धैर्य दर्शविते. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत, हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. शांतत राखण्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे, आणि ते देखील त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. तथापि, भारत आमच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किमतीवर रक्षण करेल, असे पंतप्रधान म्हणाले.
आयआयटी मद्रासच्या संशोधन संस्थेचा 2 लाख चौरस मीटर पायाभूत सुविधा असणाऱ्या या जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्रांमध्ये भारतभरातील सर्वोत्तम प्रतिभा येथे आकारास येईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, यावर्षी अर्थसंकल्पात पुन्हा एकदा सरकारच्या सुधारणेप्रतिच्या बांधिलकीचे प्रदर्शन केले गेले आहे. अर्थसंकल्पाने भारताच्या किनारपट्टीच्या भागांच्या विकासाला विशेष महत्त्व दिले आहे. मच्छिमार समुदायासाठी अतिरिक्त पत पद्धती, आधुनिक मासेमारी बंदरे, चेन्नईसह पाच केंद्रांवर मासेमारीशी संबंधित पायाभूत सुविधांचे उन्नयन तसेच शेवाळांची शेती यामुळे किनारपट्टीतील समुदायाचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, तामिळनाडूमध्ये समुद्री शैवाल लागवड, बहुउद्देशीय समुद्री तण उद्यान देखील तयार होऊ शकेल.
पंतप्रधानांनी जाहीर केले की, देवेंद्रकुला वेललर समुदायाला त्यांच्या पारंपरिक नावाने ओळखले जावे, ही देवेंद्रकुला वेललर समुदायाची दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी केंद्र सरकारने आता मान्य केली आहे आणि घटनेमध्ये नमूद केलेली सहा ते सात नावे आता वापरली जाणार नाहीत. घटनेत सुधारणा करण्यासाठी राजपत्रातील मसुद्याला केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे. आगामी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेत सादर केले जाणार आहे. या मागणीसंदर्भात सविस्तर आणि सखोल अभ्यास केल्याबाबत त्यांनी तामिळनाडू सरकारचे आभार मानले. मोदी म्हणाले, नावात बदल करण्यापेक्षा हा निर्णय अधिक मोठा होता. हा न्याय, सन्मान आणि संधी याबद्दलचा आहे. ``तामिळनाडूची संस्कृती आपण जतन करण्याप्रति आणि ती साजरी करण्याप्रति काम करणे हा आपला सन्मान आहे. तामिळनाडूची संस्कृती ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.``
श्रीलंकेतील आपल्या तामिळ बंधू आणि भगिनींच्या कल्याणाची आणि त्यांच्या आकांक्षांची सरकारने नेहमीच दखल घेतली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. जाफना येथे भेट देणारे मोदी हे एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत. या सरकारने तामिळ लोकांना पुरविलेली संसाधने, सुविधा ही पूर्वच्या तुलनेत बरीच होती. प्रकल्पांमध्ये – पूर्व श्रीलंकेतील विस्थापित तामिळ लोकांसाठी पन्नास हजार घरे आहेत. लागवड क्षेत्रात चार हजार घरे आहेत. आरोग्याच्या बाबतीत, आम्ही मोफत रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली आहे, जी तामिळ समाजाकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. डिकोया येथे रुग्णालय देखील उभारण्यात आले आहे. दळणवळणाला प्रोत्साहन देण्यासाठी, जाफना आणि मन्नार येथे रेल्वेमार्गांचे जाळे पुन्हा बांधण्यात येणार आहे. चेन्नई ते जाफना दरम्यान विमानवाहतूक सेवेला प्रारंभ झालेलाच आहे. भारताने जाफना सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे, ज्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. ``तामिळींच्या हक्कांचा मुद्दा देखील आम्ही श्रीलंकेच्या नेत्यांकडे सातत्याने उचलून धरला आहे. त्यांना नेहमी समानता, न्याय, शांतता आणि प्रतिष्ठा देणे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत,`` असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी असेही आश्वासन दिले की, सरकार नेहमीच मच्छिमारांच्या हक्काचे रक्षण करेल आणि जेव्हा जेव्हा श्रीलंकेत मच्छिमार पकडले जातात, तेव्हा त्यांना नेहमीच लवकरात लवकर सोडवले जाते. सध्याच्या सरकारने सोळाशे पेक्षा अधिक मासेमाऱ्यांना मुक्त केले आहे आणि आजच्या तारखेला श्रीलंकेमध्ये एकही भारतीय मासेमार अडकलेला नाही. तसेच, 333 बोटींची मुक्तता देखील करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी चेन्नई मेट्रोच्या पहिल्या वाढीव टप्प्याचे उद्घाटन, चेन्नई बीच आणि अट्टिपट्टू दरम्यान रेल्वेमार्गाचे उद्घाटन, विल्लुपुरम – माइलादुथुराई – तंजावूर आणि माइलादुथुराई – थिरूवरूर दरम्यान रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आयआयटी मद्रासच्या कॅम्पसचे आणि ग्रँड अनिकट कालवा पद्धतीच्या संशोधन केंद्राचे विस्तारीकरण, नूतनीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाच्या कामासाठी पंतप्रधानांनी पायाभरणी केली.
तामिळनाडूचे राज्यपाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तामिळनाडू विधानसभेचे सभापती, तामिळनाडूचे उद्योगमंत्री या समारंभास उपस्थित होते.