जम्मू आणि काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूला भेट दिली. राज्यात पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. पंतप्रधान आज लेह, जम्मू आणि श्रीनगरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.
जम्मू दौऱ्यात पंतप्रधानांनी सांबामधील विजयपूर येथील एम्सची पायाभरणी केली. एम्सच्या स्थापनेमुळे लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल आणि या भागातील आरोग्य व्यावसायिकांची कमतरता दूर होईल, असे मोदी म्हणाले. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लवकरच आणखी 500 जागा उपलब्ध केल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली. कथुआ येथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे उद्घाटन करतांना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, जम्मूमधील युवकांना आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी आरक्षित 10 टक्के कोट्याचा लाभ मिळेल.
जम्मूमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या उत्तर प्रांतीय केंद्र संकुलाची पायाभरणी त्यांनी केली. टीएमएटी जम्मू संकुलाची स्थापना शैक्षणिक वर्ष 2012-13 मध्ये करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते एका तात्पुरत्या इमारतीतून काम करत आहेत.
जम्मूमधील किश्तवाड येथे 624 मेगावॅट किरू जलविद्युत प्रकल्प आणि 850 मेगावॅट रॅटल जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले की, या नवीन ऊर्जा प्रकल्पामुळे या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. सौभाग्य योजनेअंतर्गत जम्मू आणि काश्मीरमधल्या कुटुंबांना 100 टक्के विद्युतीकरणाची घोषणा पंतप्रधानांनी केली.
काश्मीर खोऱ्यातील काश्मीरी स्थलांतरीत कामगारांसाठी तात्पुरत्या निवास व्यवस्थेच्या बांधकामाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले की, विस्थापित काश्मीरी कामगारांना 3000 पदांवर नियुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. भारत कदापि ही परिस्थिती विसरणार नाही जेव्हा काश्मीर पंडितांना त्यांची घरे सोडून जावे लागले होते. शेजारील देशांमध्ये त्रास सहन कराव्या लागत असलेल्यांच्या पाठिशी देशाने खंबीरपणे उभे राहावे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत देविका आणि तावी नदीमधील प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. मार्च 2021 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी सीमेलगत 14 हजार बंकर्स बांधण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. यापूर्वीच्या सरकारने 500 कोटी रुपये अनुदान देऊन समान पद समान निवृत्तीवेतन राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही 35 हजार कोटी रुपये यासाठी वितरित केले आहेत. यापूर्वीचे सत्ताधारी सक्रीय असते तर आज कर्तारपूर भारताचा भाग असता असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या जम्मू दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सचवाल येथे चिनाब नदीवर 1640 मीटर लांबीच्या दुपदरी पुलाची पायाभरणी हे आहे. यामुळे सचवाल आणि इंद्रीपट्टीयाँमधील लोकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. या दोन भागामधील प्रवासाचे अंतर 47 कि.मी.वरुन 5 कि.मी.पर्यंत होईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी 40 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.