पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन रुग्णालयांची पायाभरणी केली आणि आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते यांच्यासाठी ‘आसाम माला’ हा कार्यक्रम सुरू केला. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली, आसाम सरकारचे मंत्री आणि बोडोभूमी प्रादेशिक प्रांताचे प्रमुख प्रमोद बोरो उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आसामच्या लोकांनी त्यांच्याबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आसाममधील सेवा आणि वेगवान प्रगतीसाठी, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि मंत्री हेमंता बिस्वास, बोडोभूमी प्रादेशिक प्रांताचे प्रमुख प्रमोद बोरो आणि राज्य सरकारचे कौतुक केले. स्वातंत्र्य लढ्यात 1942 मध्ये या भूमीने दिलेल्या बलिदानाचे त्यांनी यावेळी स्मरण केले.
हिंसाचार, वंचितपणा, तणाव, भेदभाव आणि संघर्षाचा वारसा मागे ठेवून आज संपूर्ण ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर प्रगती करत आहे आणि यात आसाम महत्वाची भूमिका निभावत आहे असे पंतप्रधान म्हणाले. ऐतिहासिक बोडो करारानंतर, बोडोभूमी प्रादेशिक परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी या प्रदेशात विकास आणि विश्वासाचा एक नवीन अध्याय लिहिला आहे असेही मोदींनी यावेळी नमूद केले. “हा दिवस आसामच्या भविष्यकाळातील महत्त्वपूर्ण बदलांची साक्ष देत आहे कारण आसाममध्ये बिस्वनाथ आणि चरैदेव येथे दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होत आहेत आणि ‘आसाम मालाच्या माध्यमातून आधुनिक पायाभूत सुविधांची पायाभरणी केली जात आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
भूतकाळातील राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांची दयनीय अवस्थेबाबत पंतप्रधान म्हणाले की, आसाममध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2016 पर्यंत केवळ 6 वैद्यकीय महाविद्यालये होती, परंतु मागील केवळ 5 वर्षांमध्ये 6 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली. बिस्वनाथ आणि चरैदेव येथील महाविद्यालयांचा लाभ उत्तर आणि आसामच्या वरच्या पट्ट्यातील विद्यार्थ्यांना होईल. त्याचप्रमाणे राज्यात असलेल्या केवळ 725 वैद्यकीय जागांच्या पार्श्वभूमीवर ही नवीन वैद्यकीय महाविद्यालये कार्यान्वित झाल्यावर दर वर्षी 1600 नवीन डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करतील. यामुळे राज्याच्या दुर्गम भागात वैद्यकीय सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. गुवाहाटी एम्सचे काम वेगाने सुरू असून संस्थेत पहिली तुकडी रुजू झाली असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. पुढील दीड-दोन वर्षात एम्सचे काम पूर्ण होईल. मागील सरकारने आसामच्या समस्या सोडविण्यात दाखविलेल्या औदासिन्याचा दाखला देत पंतप्रधानांनी असे प्रतिपादन केले की, सध्याचे सरकार आसामच्या जनतेसाठी पूर्ण समर्पण भावनेने काम करत आहे.
पंतप्रधानांनी आसाममधील लोकांच्या वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची रुपरेषा सांगितली. आसाममधील सुमारे 1.25 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेचा फायदा होत असून या योजनेत 350 हून अधिक रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे असे ते म्हणाले. आसाममधील सुमारे 1.50 लाख गरीबांना आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार मिळाले आहेत. राज्यातील जवळपास 55 लाख लोकांनी आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य उपचाराचा लाभ घेतला आहे. जनऔषधि केंद्रे, अटल अमृत योजना आणि पंतप्रधान डायलिसिस कार्यक्रम सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
मोदींनी यावेळी आसामच्या प्रगतीमधील चहा बागांचे महत्व अधोरेखित केले. धन पुरस्कार मेळा योजनेंतर्गत चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या 7.5 लाख कामगारांच्या खात्यात काल कोट्यवधी रुपये हस्तांतरित केल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष योजनेद्वारे गर्भवती महिलांना मदत केली जात आहे. कामगारांची काळजी घेण्यासाठी बागेत खास वैद्यकीय युनिट्स पाठविली जात आहेत. मोफत औषधेही दिली जातात. या वर्षाच्या अर्थसंकल्पात चहा कामगारांच्या कल्याणासाठी 1000 कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे.
भारतीय चहाची प्रतिमा खराब करण्याचे षडयंत्र रचले जात आहे अशी माहिती देखील पंतप्रधानांनी यावेळी दिली. काही परदेशी शक्ती भारतासोबतच, चहाची असेलेली प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र रचत आहेत असे काही दस्तावेज समोर आले आहेत असे ते म्हणाले. आसामच्या भूभागातून पंतप्रधानांनी जाहीर केले की, हे षडयंत्र कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि हे षडयंत्र रचणारे आणि याला सहाय्य करणाऱ्यांना जनता नक्कीच जाब विचारेल. “आमचा चहा कामगार हा लढा नक्कीच जिंकतील. भारतीय चहावरील या हल्ल्यामध्ये आमच्या चहा बाग कामगारांच्या कठोर मेहनतीला तोंड देण्याची ताकद नाही, ”असे पंतप्रधान म्हणाले.
आसामची क्षमता वाढविण्यात आधुनिक रस्ते आणि पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे असे पंतप्रधान म्हणले. हेच लक्षात घेऊन ‘भारत माला प्रकल्प’ च्या अनुषंगाने ‘आसाम माला’ कार्यकम सुरू केला आहे. गेल्या काही वर्षात राज्यात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते आणि अनेक पूल बांधले आहेत असे मोदी म्हणाले. ‘आसाम माला प्रकल्प सर्व गावे व आधुनिक शहरे यासाठी व्यापक रस्ते व कनेक्टिव्हिटीचे जाळे करण्याचे आसामचे स्वप्ने पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. “या कामांना आगामी काळात नवीन गती मिळेल, कारण या अर्थसंकल्पात वेगवान विकास आणि प्रगतीसाठी पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व भर देण्यात आला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.