पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआरने आयोजित केलेल्या कार्याक्रमात सहभागी शिष्ट मंडळांना संबोधित केले.
आयसीसीआरने नवी दिल्लीतल्या अनिवासी भारतीय केंद्रात आज या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या 188 देशातल्या प्रतिनिधींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी उपस्थित 188 प्रतिनिधी सोबत ऐतिहासिक छायाचित्रही काढले.
प्रयागराज इथल्या कुंभ मेळ्यातून नुकत्याच परत आलेल्या प्रतिनिधींना भेटून आनंद होत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
जोवर एखादी व्यक्ती कुंभमेळ्याला भेट देत नाही, तोवर हा केवढा महान वारसा आहे याचा पूर्ण प्रत्यय येत नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेली हजारो वर्ष ही परंपरा अखंड सुरु आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
कुंभ हा जेवढा अध्यात्मिकतेशी जोडला आहे तेवढाच सामाजिक सुधारणांशीही जोडलेला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आध्यात्मिक नेते आणि समाज सुधारक यांच्यात चर्चा करण्याचे, भविष्यासाठी योजना आखण्याचे आणि विकासावर लक्ष ठेवण्याचे कुंभ हे व्यासपीठ आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
कुंभ मेळ्यात आता आधुनिकता आणि तंत्रज्ञान यांचा विश्वास, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळ घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. संपूर्ण जग भारताची आधुनिकता आणि समृद्ध वारशाचा सन्मान करत आहे असे ते म्हणाले. संपूर्ण जगातून आलेल्या शिष्टमंडळांचा सहभाग हा कुंभ मेळाच्या सफलतेचा महत्त्वपूर्ण हिस्सा राहिला आहे, असे सांगून पंतप्रधानांनी या शिष्टमंडळांना धन्यवाद दिले.
भारतातील लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचा कुंभमेळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कुंभमेळ्याप्रमाणेच भारतीय लोकसभा निवडणुका आपल्या विशाल आणि संपूर्ण नि:पक्षपातीपणासह संपूर्ण जगासाठी प्रेरणेचे स्रोत बनले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
जगभरातल्या लोकांनी भारतात येऊन इथल्या लोकसभा निवडणुकांची कार्यप्रणाली पाहिली पाहिजे, असेही ते म्हणाले.