पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आठव्या आंतरराष्ट्रीय सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक समाज परिषदेला संबोधित केले. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथे यंदा ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.
अनिवासी भारतीय विशेषत: सौराष्ट्र पटेल समाजाच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की, अनिवासी भारतीयांनी नेहमीच भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय पासपोर्टचा प्रत्येक ठिकाणी आदर केला जातो, असे ते म्हणाले. स्वच्छ भारत सारख्या सरकारच्या विविध योजनांमुळे देशातल्या पर्यटनाला चालना मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अनिवासी भारतीय समुदायाला दरवर्षी किमान पाच परदेशी कुटुंबांना भारताला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. यामुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानाचा हेतू साध्य करण्याचा मार्ग सुकर होईल आणि पर्यायाने भारताच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल. महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अनिवासी भारतीय कशा प्रकारे योगदान देऊ शकतात, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
2 ऑक्टोबरपासून भारतात महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी केली जाणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने भव्य एकतेचा पुतळा नर्मदा नदीकाठी बांधण्यात येत असून 31 ऑक्टोबर 2018 रोजी त्याचे काम पूर्ण होईल, असे पंतप्रधान म्हणाले. जगातील हा सर्वात उंच पुतळा असेल.
उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारताकडे जगातील चमकता तारा म्हणून पाहिले जात आहे. आज भारताची वेगवान, आर्थिक विकास आणि प्रामाणिक, पारदर्शक शासन अशी ओळख आहे. जीएसटीसारखे उपक्रम आणि भ्रष्टाचारविरोधात कठोर कारवाईमुळे लोक प्रामाणिकपणे व्यवसाय करायला लागले आहेत. या उपक्रमांमुळे गेल्या चार वर्षात व्यवसाय सुलभतेच्या मानांकनात भारताने 42 स्थानांनी झेप घेतली आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी अनिवासी भारतीय समुदायाला नवीन भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.