लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटनीयो कोस्टा यांनी संयुक्तपणे भेट दिली.
शॅम्पलीमोद फाऊंडेशन हे खाजगी जैव वैद्यक संशोधन फाऊंडेशन आहे.कर्करोगावर अत्याधुनिक उपचार विकसित करण्याबरोबरच अद्ययावत संशोधनाला इथे प्रोत्साहन दिले जाते.वैद्यक विषयक काळजी घेण्यासाठी इथे,नवा समग्र दृष्टिकोन बाळगून, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या हरित वातावरणात, संशोधन आणि उपचार यांची सांगड घातली जाते. नदी,समुद्र यांचा देखावा, बाग आणि मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या या केंद्राची रचना भारतातले नावाजलेले वास्तू रचनाकार चार्ल्स कोरेआ यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या समग्र आरोग्याच्या तत्वावर भर देतात, ते तत्व बाळगून कर्करोग संशोधन आणि उपचाराला वाहून घेतलेली ही संस्था आहे. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या वातावरणाबरोबरच रुग्णावर केमोथेरपीसह अद्ययावत उपचार केले जातात.
नेत्रविषयक संशोधनातल्या योगदानासाठी 2007 मध्ये अँटिनियो शॅम्पलीमोद पारितोषिक सुरु करण्यात आले. अरविंद आय केअर सिस्टीम या भारतीय संघटनेने पहिल्या पारितोषिकाचे मानकरी ठरण्याचा मान मिळवला. 42 देशातल्या 300 संशोधकांपैकी 3 संशोधक भारताचे प्रतिनिधित्व करतात.
शॅम्पलीमोद फाऊंडेशन आणि हैदराबाद इथली प्रसाद इन्स्टिट्यूट यांच्यात परस्पर सामंजस्य असून,शॅम्पलीमोद फाउंडेशन मध्ये येणाऱ्या परदेशी रुग्णांमध्ये भारतातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
पंतप्रधानांनी फाऊंडेशनला भेट देऊन भारतीय संशोधकांसमवेत संवाद साधला.