प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. केंद्रिय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, किरेन रिजीजू आणि रेणुका सरूता या समारंभास उपस्थित होत्या.
या समारंभप्रसंगी बोलताना, पंतप्रधान म्हणाले की, आदिवासी अभ्यागतांचा, कलाकार, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी कॅडेट्स) यांचा सहभाग हा प्रत्येक नागरिकामध्ये उत्साह निर्माण करेल. देशाच्या समृद्ध विविधतेचे प्रदर्शन प्रत्येकाला अभिमान वाटणारे असेल. पंतप्रधान म्हणाले की, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे भारताच्या महान सामाजिक – सांस्कृतिक वारशाला आणि जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला जीवन देणाऱ्या घटनेला अर्पण करणारे आहे.
पंतप्रधानांनी लक्ष वेधले की, भारत यंदा 75 वा स्वातंत्र्य दिन आणि गुरु तेग बहादूर जी यांचे 400 वे प्रकाशपर्व साजरे करीत आहे. शिवाय, या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष पराक्रम दिवस म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घटनांनी आपल्याला आपल्या देशासाठी समर्पण करण्याची प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या तरूण पाहुण्यांना सांगितले की, भारत आपल्या देशवासीयांच्या आकांक्षाच्या सामूहिक सामर्थ्याचे मूर्तिमंत रूप आहे. ते म्हणाले भारत म्हणजे, अनेक राज्ये – एक राष्ट्र, अनेक समुदाय – एक राष्ट्र, अनेक मार्ग – एक ध्येय, अनेक पद्धती – एक मूल्य, अनेक भाषा – एक भावना, आणि अनेक रंग – एक तिरंगा आणि याचे एक समायिक स्थान म्हणजे `एक भारत - श्रेष्ठ भारत`. त्यांनी देशभराच्या सर्व भागातील युवा पाहुण्यांना आवाहन केले की, आपल्या प्रत्येकाच्या संस्कृती, खान-पान पद्धती, परंपरा, भाषा आणि कला यांबद्दलची जनजागृती निर्माण करण्याचे काम करा. पंतप्रधान म्हणाले, `एक भारत श्रेष्ठ भारत` या संकल्पेमुळे `व्होकल फॉर लोकल`ला बळकटी मिळेल. जेव्हा एका प्रांतातील उत्पादनाबद्दल दुसऱ्या एखाद्या प्रांताताला अभिमान वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्थानिक उत्पादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचता येईल. `व्होकल फॉर लोकल` आणि आत्मनिर्भय मोहिमेचे यश आपल्या युवकांवर अवलंबून आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देशातील युवकांमध्ये योग्य कौशल्य तयार होण्याची गरज आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कौशल्य या मुद्द्याला अधोरेखित करताना त्यांनी माहिती दिली की, कौशल्य मंत्रालय 2014 मध्ये अस्तित्त्वात आले आणि 5.5 कोटी तरुणांना वेगवेगळी कौशल्ये दिली गेली आणि त्यांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी मदत केली.
हे कौशल्य लक्ष्य नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्पष्ट होते. जिथे ज्ञानाच्या वापरावर भर देण्यात आला आहे. एखाद्याच्या आवडीचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असणे हा या धोरणाचा मुख्य मुद्दा आहे. या धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पहिला महत्त्वाचा प्रयत्न केला गेला आहे. विद्यार्थ्यांना सहाव्या इयत्तेपासून पुढे, त्यांच्या आवडीचे, स्थानिक गरजेनुसार आणि व्यवसायानुसार क्षेत्र अभ्यासक्रमासाठी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर देखील मध्यम स्तरावर शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांचे एकत्रीकरण प्रस्तावित आहे.
पंतप्रधानांनी एनसीसी आणि एनएसएसच्या देशभरातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, विशेषतः कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. महामारी विरोधात सुरू असलेल्या लढ्याच्या पुढच्या टप्प्यात देखील हे काम पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भागात, समाजाच्या प्रत्येक भागात लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी त्यांना पोहोचण्याचे आवाहन केले. ``लस तयार करून आपल्या शास्त्रज्ञांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे. आता आपली वेळ आहे. खोटेपणा आणि अफवा पसरविण्याच्या प्रत्येक प्रयत्नांचा आपण पराभव केला पाहिजे,`` पंतप्रधान म्हणाले.