पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील कोविड लसीकरण मोहिमेच्या लाभार्थी आणि लस देणाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
पंतप्रधानांनी वाराणसीच्या जनतेला तसेच या कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निम-वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयांमधील स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना लसीशी संबंधित प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या. कोविडमुळे या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली. ते म्हणाले की आज जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात सुरु आहे. पहिल्या दोन टप्प्यात 30 कोटी देशवासियांना लस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की आज देशाकडे स्वतःची लस बनवण्याची इच्छाशक्ती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जलद गतीने लस पोहोचण्यासाठी आज प्रयत्न केले जात आहेत. आज भारत जगाच्या या सर्वात मोठ्या गरजेबाबत पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि भारत अनेक देशांना मदत देखील करत आहे.
पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात वाराणसी व आजूबाजूच्या परिसरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील बदलाची दखल घेतली ज्यामुळे कोरोना काळामध्ये संपूर्ण पूर्वांचलला मदत झाली. आता वाराणसी, लसीकरणाबाबतही तीच गती दाखवत आहे. वाराणसीमध्ये 20 हजाराहून अधिक आरोग्य व्यावसायिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी 15 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या व्यवस्थेबद्दल कौतुकही केले.
ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेची व्यवस्था व त्याबाबत काही समस्या असल्यास त्या जाणून घेणे हा आजच्या संवादाचा उद्देश होता. लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या लोकांशी ते बोलले. वाराणसीकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे इतरत्र देखील परिस्थिती समजून घेण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी मॅट्रॉन, एएनएम कामगार, डॉक्टर आणि लॅब तंत्रज्ञांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्याप्रति देशाची कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे भिक्षूसमान समर्पणाबद्दल कौतुकही केले. स्वच्छतेची संस्कृती रुजवणाऱ्या स्वच्छता अभियानात केलेल्या उपाययोजनामुळे साथीच्या रोगाचा सामना करण्यास देश अधिक सज्ज झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. महामारी आणि लसीकरणाच्या विश्वासार्ह संप्रेषणाबद्दल पंतप्रधानांनी कोरोना योद्ध्यांची प्रशंसा केली.