पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.
पुरस्कार विजेत्यांनी कोरोनाच्या कठीण काळात हे पुरस्कार मिळवल्याने यावर्षीचे पुरस्कार विशेष आहेत असे पंतप्रधान म्हणाले. संवादादरम्यान पंतप्रधानांनी, वागणुकीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या स्वच्छता अभियानासारख्या मोहिमेतील मुलांच्या भूमिकेचे कौतुक केले. कोरोना काळात जेव्हा मुलं हात धुण्यासारख्या मोहिमांमध्ये सामील झाली तेव्हा याचा सकारात्मक परिणाम लोकांवर झाला आणि या मोहिमेला यश मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी ज्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत त्यातील विविधताही पंतप्रधानांनी नमूद केली.
जेव्हा एखाद्या लहान कल्पनेला योग्य कृतीचा पाठिंबा मिळतो तेव्हा त्याचे परिणाम प्रभावशाली असतात असे पंतप्रधानांनी सांगितले. कल्पना आणि कृती या परस्परक्रिया असल्याने त्यांनी मुलांना कृतीवर विश्वास ठेवण्यास सांगितले. पंतप्रधानांनी मुलांना या गौरवानंतर स्वस्थ न बसता पुढील आयुष्यात चांगल्या परिणामांसाठी धडपडत राहावे असा सल्ला दिला.
पंतप्रधानांनी मुलांना तीन गोष्टी, तीन प्रतिज्ञा त्यांच्या मनावर कोरण्यास सांगितले. प्रथम, सातत्याची प्रतिज्ञा. एखादे काम करताना त्यामध्ये आळस करू नका. दुसरी प्रतिज्ञा देशासाठी घ्या. जर आपण देशासाठी काम केले आणि त्या प्रत्येक कामाला राष्ट्र कार्य समजलो तर ते काम स्वत: पेक्षा मोठे होईल. आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना देशासाठी काय काय करावे, याचा विचार करण्यासही पंतप्रधानांनी मुलांना सांगितले. तिसरी प्रतिज्ञा, मानवतेची. प्रत्येक यशाने आपल्याला अधिक नम्र होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे कारण आपल्या नम्रतेमुळेच इतर व्यक्ती आपल्याबरोबर आपले यश साजरे करू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.
Tभारत सरकारच्या वतीने नवोन्मेश, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या क्षेत्रात असाधारण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत बाल शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणी अंतर्गत देशभरातून 32 जणांची पीएमआरबीपी-2021 साठी निवड झाली आहे.