In May 2014, people of India ushered in a New Normal. People spoke in one voice to entrust my Govt with a mandate for change: PM
Every day at work, my ‘to do list’ is guided by the constant drive to reform & transform India: PM
The multi-polarity of the world, and an increasingly multi-polar Asia, is a dominant fact today: PM
The prosperity of Indians, both at home and abroad, and security of our citizens are of paramount importance: PM
For me, Sabka Saath, Sabka Vikas is not just a vision for India. It is a belief for the whole world: PM
In the last two and half years, we have partnered with almost all our neighbours to bring the region together: PM
Pakistan must walk away from terror if it wants to walk towards dialogue with India: PM

 

उपस्थित मान्यवर, प्रतिष्ठित पाहुणे, प्रतिष्ठित स्त्री-पुरुषहो,

आजचा दिवस बहुतेक भाषणांचा दिवस असावा असे दिसत आहे. काही वेळापूर्वीच आपण राष्ट्राध्यक्ष शी आणि पंतप्रधान मे यांना ऐकले. आता मी सुद्धा माझ्या भाषणासाठी आलो आहे. कदाचित काही जणांना या भाषणांची अतिमात्रा झाल्यासारखे वाटेल किंवा अनेक 24/7 चालणा-या वृत्तवाहिन्यांसाठी ती समस्या वाटू शकेल.

दुस-या रायसीना संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात तुमच्याशी बोलण्याची संधी मिळणे हा मोठा बहुमान आहे. महामहीम करजाई, पंतप्रधान हार्पर, पंतप्रधान केविन रुड, तुम्हा सर्वांना दिल्लीत उपस्थित असलेले पाहून मला अतिशय आनंद होत आहे. त्याचबरोबर सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. पुढील दोन दिवसात तुम्ही आपल्या सभोवतालच्या जगासंदर्भात विविध प्रकारच्या चर्चा करणार आहात. त्याची शाश्वती आणि प्रचलित प्रवाह, त्याचे संघर्ष आणि जोखीम, त्यांचे यश आणि संधी, त्यांचे पूर्वीचे वर्तन आणि संभाव्य रोगनिदान आणि त्याचे अनपेक्षित परिणाम आणि नव्याने निर्माण होणारी स्थिती यासंदर्भात विचारमंथन होईल.

मित्रांनो,

मे 2014 मध्ये, भारतीय जनतेनेही एका नव्या पर्वामध्ये प्रवेश केला. माझ्या देशबांधवांनी एका सुरात बदलाची हाक देत माझ्या सरकारवर जबाबदारी सोपवली. हा बदल केवळ वृत्तीमध्ये नव्हे तर मानसिकतेमधील होता. दोलायमान स्थितीमधून उद्देशपूर्ण कृतींच्या दिशेने हा बदल होता. धाडसी निर्णय घेण्यासाठी बदल होता. एक असा कौल ज्यामध्ये आमची अर्थव्यवस्था आणि समाजामध्ये परिवर्तन होईपर्यंत सुधारणा पुरेशा ठरत नाहीत. भारताच्या युवा पिढीच्या आशा-आकांक्षा आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि लक्षावधी जनतेची अमर्याद उर्जा यांच्याशी जोडले गेलेले असे हे परिवर्तन आहे. दरदिवशी काम करताना माझ्या दैनंदिन कामाच्या यादीवर सर्व भारतीयांच्या समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी, भारताच्या परिवर्तनाच्या आणि रुपांतरणाच्या मोहीमांचा प्रभाव असतो.

मित्रांनो, भारताच्या परिवर्तनाची प्रक्रिया त्याच्या बाह्य वातावरणापासून वेगळी करता येणार नाही याची मला जाणीव आहे. आमची आर्थिक प्रगती, आमच्या शेतक-यांचे कल्याण, आमच्या युवकांना रोजगारांच्या संधी, भांडवल, तंत्रज्ञान बाजारपेठा आणि संसाधने यांची उपलब्धता आणि आमच्या देशाची सुरक्षितता या सर्वच बाबींवर जगातील घडामोडींचा सखोल परिणाम झाला आहे. पण या प्रक्रियेचा उलट अर्थ घेतला तर तोही खरा आहे. जितकी भारताला जगाची गरज आहे तितकीच भारताच्या शाश्वत प्रगतीची जगाला गरज आहे. आमच्या देशाला बदलण्याच्या आमच्या आकांक्षेचा संबंध बाह्य जगाशी आहे. म्हणूनच भारताच्या स्थानिक पातळीवरील निवडी आणि आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमाच्या आमच्या बाबी एका एकसंध परिवर्तन प्रक्रियेचा भाग बनल्या आहेत. भारताच्या परिवर्तनाच्या लक्ष्याशी अतिशय घट्ट जोडल्या गेल्या आहेत.

मित्रांनो, एका अस्थिर कालखंडात भारत आपल्या परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी झटत आहे. मानवाच्या प्रगतीचा आणि त्याचवेळी हिंसक उलथापालथींचा हा कालखंड आहे. अनेक कारणांमुळे आणि अनेक पातळ्यांवर जगामध्ये विविध बदल होत आहेत. जागतिक पातळीवर जोडले गेलेले समाज, डिजिटल संधी, तंत्रज्ञानातील बदल, ज्ञानाची वाढ आणि नवनिर्मिती यांनी मानवतेच्या वाटचालीचे नेतृत्व केले आहे. मात्र, धीम्या गतीने होणारी विकास प्रक्रिया आणि आर्थिक चढउतार या देखील चिंताजनक बाबी आहेत. बिट्स आणि बाइट्सच्या या युगात भौतिक सीमा कमी महत्त्वाच्या ठरू शकतात. मात्र, देशांतर्गत वाद, व्यापार आणि स्थलांतरितांविरोधातील भावना आणि जगभरात संकुचित आणि संरक्षणवादी वृत्तींचा उदय या देखील चिंताजनक बाबी आहेत. परिणामी जागतिकीकरणातून मिळणा-या लाभांना धोका उत्पन्न झाला आहे आणि आर्थिक लाभ सहजतेने मिळणे अवघड झाले आहे. अस्थिर वातावरण, हिंसाचार, कट्टरवाद, बहिष्कार आणि आंतरराष्ट्रीय संकटे याचा प्रसार अतिशय धोकादायक दिशांनी वाढत चालला आहे. विविध प्रकारच्या कट्टरवादी संघटनांचे अशा प्रकारच्या आव्हानांच्या प्रसारामध्ये प्रमुख योगदान आहे. एका वेगळ्या जगाने एका वेगळ्या जगासाठी निर्माण केलेल्या संस्था आणि स्थापत्य कालबाह्य झाले आहे. यामुळे एका प्रभावी बहुराष्ट्रवादाला धोका निर्माण झाला आहे. शीतयुद्धाच्या कालखंडाच्या सावटातून बाहेर आल्यानंतर जग पाव शतकापासून स्वतःला सावरून आपली घडी नीटनेटकी करण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र त्या कालखंडात निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन अद्याप पूर्णपणे झालेले नाही. मात्र, दोन गोष्टी स्पष्ट आहेत. राजकीय आणि लष्करी सामर्थ्याची ताकद कमी झाली आहे आणि त्यामुळे जगातील बहुध्रुवीयतेचे वितरण झाले आहे आणि बहुध्रुवीय असलेला आशिया ही आज वर्चस्वकारक वस्तुस्थिती बनली आहे आणि आम्ही तिचे स्वागत करत आहोत. कारण त्यातून अनेक देशांच्या उदयाचे वास्तव टिपले जात आहे. काही मूठभर लोकांच्या दृष्टिकोनामुळे जागतिक जाहिरनामा साकारला न जाता या वस्तुस्थितीने अनेकांचा आवाज ऐकला आहे आणि त्यांचा आदर केला आहे. म्हणूनच आपण बहिष्कृत करण्याची जी वृती निर्माण होत आहे विशेष करून आशियामध्ये निर्माण होत असलेल्या या वृत्तीकडे आपण झुकू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. बहुराष्ट्रवाद आणि बहुध्रुवीयता यावर या परिषदेचा असलेला हा भर या काळासाठी अतिशय सुसंगत आहे.

मित्रांनो, आपण एका गुंतागुंतीच्या पर्यावरणामध्ये अधिवास करत आहोत. अतिशय व्यापक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर बदलत चाललेले जग ही नेहमीच नवी स्थिती असण्याचे कारण नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सातत्याने आणि अतिशय वेगाने बदलणा-या संदर्भांच्या स्थितीमध्ये विविध देश कशा प्रकारे परिस्थितीला तोंड देणार आहेत? आपले पर्याय आणि आपली कृती आपल्या राष्ट्रीय सामर्थ्यावर आधारित आहे.

आपल्या नागरी मूल्यांच्या आधारे आपल्या एकात्मिक वृत्तीची जडणघडण झालेली आहे.

· यथार्थवाद,

· सह-अस्तित्व

· सहयोग, आणि

· भागीदारी

आपल्या राष्ट्रीय हितांची स्पष्ट आणि जबाबदार घोषणा करण्यासाठी या मूल्यांचा उपयोग होतो. भारतीयांची देशांतर्गत आणि परदेशात या दोन्ही ठिकाणी भरभराट आणि आमच्या नागरिकांची सुरक्षा या सर्वाधिक महत्त्वाच्या बाबी आहेत. मात्र, केवळ स्वतःच्या हिताची जपणूक करण्याची आमची कधीही संस्कृती नव्हती किंवा ती आमची वृत्ती नाही. आमच्या कृती आणि आकांक्षा, क्षमता आणि मानवी भांडवल, लोकशाही आणि लोक सांख्यिकी आणि ताकद आणि यश हे सर्व प्रादेशिक आणि जागतिक प्रगतीचाच आधार बनून राहील. आमची आर्थिक आणि राजकीय प्रगती अतिशय महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक संधींचे प्रतिनिधित्व करते. हे एक शांततेचे सामर्थ्य आहे, स्थैर्याचा पैलू आणि प्रादेशिक आणि जागतिक समृद्धीचे इंजिन आहे.

माझ्या सरकारसाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये स्वतःला सहभागी करण्याचा मार्ग म्हणजे

परस्परांशी संपर्क पुनःप्रस्थापित करणे, भारताला त्याच्या लगत असलेल्या भौगोलिक क्षेत्रांशी जोडणे आणि त्यांच्यात सेतू निर्माण करणे

भारताच्या प्राधान्यक्रमाच्या आर्थिक बाबींशी निगडित जाळ्याच्या माध्यमातून संबंध निर्माण करणे

आमच्या गुणवान तरुणांना जागतिक गरजा आणि संधी यांची पूर्तता करण्यामध्ये सहभागी करून भारताला आपली स्वतःची ओळख असलेली मानव संसाधन ताकद बनवणे

हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरातील बेटांपासून कॅरिबिअन बेटांपर्यंत आणि आफ्रिकेच्या विशाल खंडापासून अमेरिका खंडापर्यंत विस्तारलेली सतत विकसित होणारी भागीदारी उभारणे. जागतिक समस्यांवर भारतीय उपाययोजना निर्माण करणे

जागतिक संघटना आणि संस्था यांची पुनर्बांधणी करणे आणि त्यांना नवचैतन्य देणे, त्यांची नवीन रचना करणे. जागतिक पद्धती म्हणून योग आणि आयुर्वेद यांच्यासारख्या प्राचीन भारतीय नागरी वारशाचा प्रसार करणे. त्यामुळेच परिवर्तनाचा भर केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नाही. त्याने संपूर्ण जगाच्या जाहिरनाम्यालाच व्यापून टाकले आहे.

माझ्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ हा दृष्टिकोन केवळ भारतापुरता मर्यादित नाही. हा संपूर्ण जगासाठी बाळगलेला दृष्टिकोन आहे आणि त्याअंतर्गत विविध स्तर, विविध संकल्पना आणि विविध भागांचाही समावेश आहे.

आता मी त्यांच्याकडे वळतो जे भौगोलिक क्षेत्र आणि सामायिक हितसंबंध यांच्या माध्यमातून आमच्या सर्वाधिक जवळचे आहेत. “शेजा-यांना प्रथम प्राधान्य” या दृष्टिकोनामुळे आमच्या शेजारी राष्ट्रांबाबतच्या धोरणात मोठा बदल झाला आहे. दक्षिण आशियातील जनता परस्परांशी रक्ताचे नातेसंबंध, सामायिक इतिहास, संस्कृती आणि आकांक्षा यांच्या बंधांनी जोडली गेली आहे. या भागातील युवकांचा सकारात्मक दृष्टिकोन बदल, संधी, प्रगती आणि समृद्धी यांच्या प्रतिक्षेत आहे. एका उत्साही, नेहमीच संपर्कात असलेल्या आणि एकात्मिक शेजाराचे माझे स्वप्न आहे. गेल्या अडीच वर्षात आम्ही आमच्या बहुतेक शेजा-यांशी भागीदारी केली आहे आणि या प्रदेशाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या या भागाच्या प्रगतिशील भविष्यासाठी आम्ही इतिहासातील गोष्टींचे ओझे बाजूला सारले आहे. आमच्या प्रयत्नांचे फळ समोर दिसत आहे.

अफगाणिस्तानमध्ये दूर अंतर आणि एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी येणा-या अनेक अडचणी असूनही आम्ही तिथे विविध प्रकारच्या संस्था आणि इतर सोयीसुविधा उभारून देत या देशाच्या पुनर्बांधणीसाठी त्यांच्याशी भागीदारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आमची संरक्षणविषयक भागीदारी आणखी दृढ झाली आहे. अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत आणि “भारत-अफगाणिस्तान मैत्री धरण” ही आमच्या विकासकारी भागीदारीला बळकटी देण्यासाठी असलेल्या आमच्या समर्पित वृत्तीची दोन ठळक उदाहरणे आहेत.

बांगलादेशसोबत आम्ही संपर्कव्यवस्था आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारचा समन्वय आणि राजकीय समज निर्माण केली आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीसंदर्भातील आणि सागरी सीमांबाबतच्या वादांबाबत समाधानकारक तोडगे काढले.

नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदीव्जमध्ये पायाभूत सुविधा, दळणवळण, उर्जा आणि विकास प्रकल्प यांच्यामध्ये आमचा एकंदर सहभाग या प्रदेशातील प्रगती आणि स्थैर्याचा स्रोत बनला आहे. आमच्या शेजाऱ्यांबाबतचा माझा दृष्टिकोन दक्षिण आशियातील शांततामय आणि एकात्मताकारक संबंधासाठी फायदेशीर आहे. या दृष्टीकोनामुळेच माझ्या शपथविधीसाठी मी पाकिस्तानसह सार्क देशांच्या सर्व नेत्यांना आमंत्रित केले होते. हाच दृष्टिकोन घेऊन मी लाहोरलाही गेलो होतो. पण शांततेच्या मार्गावर भारत एकाकी वाटचाल करू शकत नाही. पाकिस्तानलाही या मार्गावर वाटचाल करावीच लागेल. पाकिस्तानला जर भारताशी चर्चा करायची इच्छा असेल तर त्यांना दहशतवादापासून दूर राहावे लागेल.

सभ्य स्त्री-पुरुषहो,

त्यापुढे पश्चिमेकडेही अनिश्चितता आणि संघर्ष सुरू असूनही अगदी कमी कालावधीत आम्ही आखाती देश आणि सौदी अरेबिया, यू.ए.ई., कतार आणि इराण यांच्यासह पश्चिम आशियासोबतची आमची भागीदारी नव्याने बळकट केली आहे. पुढील आठवड्यात अबू धाबीचे महामहीम राजपुत्र यांना भारताच्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करायला मला अतिशय आनंद होत आहे. आम्ही केवळ आमच्या दृष्टिकोनातच बदल केलेला नाही. आम्ही आमच्या संबंधांच्या वास्तविकतेमध्येही बदल केला आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांची जोपासना करायला आणि त्यांना प्रोत्साहित करायला मदत झाली आहे. भक्कम आर्थिक आणि उर्जा विषयक संबंध निर्माण झाले आहेत आणि सुमारे ऐंशी लाख भारतीयांच्या भौतिक आणि सामाजिक कल्याणाच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे. मध्य आशियामध्येही आम्ही सामाईक इतिहास आणि संस्कृती यांच्या आधारावर आमचे संबंध निर्माण केले आहेत आणि समृद्धीकारक भागीदारीची नवी दालने खुली केली आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनमधील आमच्या सदस्यत्वामुळे मध्य आशियायी देशांशी आमचे भक्कम संस्थात्मक संबंध प्रस्थापित झाले आहेत. आमच्या मध्य आशियायी बंधू आणि भगिनींच्या सर्व प्रकारच्या समृद्धीसाठी गुंतवणूक केली आहे. या भागात आमच्या प्रदीर्घ काळापासून असलेल्या संबंधांना यशस्वीरित्या पुनःप्रस्थापित केले आहे. आमच्या पूर्वेकडे आमची आग्नेय आशियायी देशांशी असलेली भागीदारी आमच्या पूर्वाभिमुख धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. पूर्व आशिया परिषदेसारख्या संस्थात्मक संरचनांबरोबर दृढ संबंध निर्माण केले आहेत. असियान आणि तिच्या सदस्य देशांबरोबर असलेल्या आमच्या भागीदारीमुळे व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, विकास आणि सुरक्षाविषयक भागीदारी अधिक वृद्धिंगत झाली आहे. त्यामुळे या भागातील आमचे व्यापक सामूहिक हितसंबंध आणि स्थैर्य यांत वाढ झाली आहे. चीनबरोबर असलेल्या आमच्या संबंधांमध्ये राष्ट्राध्यक्ष शी आणि मी वाणिज्य आणि व्यापारविषयक संधींचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. भारत आणि चीन यांचा होणारा विकास म्हणजे आमच्या दोन्ही देशांसाठी आणि संपूर्ण जगासाठी अभूतपूर्व संधी असल्याचे मला वाटत आहे. त्याचवेळी एकमेकांच्या शेजारी असलेल्या दोन देशांमध्ये काही प्रमाणात मतभेद असणे अनैसर्गिकही नाही. आमच्या संबंधांचे व्यवस्थापन करताना आणि या प्रदेशातील शांतता व प्रगतीसाठी आम्हा दोन्ही देशांनी संवेदनशीलता दाखवणे आणि एकमेकांच्या प्रमुख चिंतांजनक बाबींचा आणि हितसंबंधांचा आदर करणे अतिशय आवश्यक आहे.

मित्रांनो,

सध्या विचारवंतामध्ये व्यक्त होणारा सूर आपल्याला हे सांगत आहे की, हे शतक आशिया खंडाचे आहे. सर्वात वेगवान बदल आशियामध्ये होत आहेत. या प्रदेशाच्या सर्व भागांमध्ये प्रगतीचे आणि समृद्धीचे अखंड सचेतन असे साठे आहेत. पण वाढणा-या महत्त्वाकांक्षा आणि चढाओढ यांच्यामुळे तणाव वाढत चालला आहे. आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांच्या लष्करी सामर्थ्यामध्ये, संसाधनांमध्ये आणि संपत्तीमध्ये नियमित होत असलेली वाढ यामुळे या भागातील सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच या भागाच्या सुरक्षिततेचा आराखडा खुला, पारदर्शक, संतुलित आणि समावेशक असलाच पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय निकषांना अनुसरून इतरांना अपेक्षित वर्तन आणि सार्वभौमत्वाचा आदर यांच्या बरोबरीने परस्पर संवादावर भर असला पाहिजे.

मित्रांनो,

गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही अमेरिका, रशिया, जपान आणि इतर प्रमुख जागतिक महासत्तांबरोबरील संबंधांना मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे.

त्यांच्यासोबत केवळ सहकार्याने काम करण्याचीच आमची इच्छा नसून आमच्या समोर असलेल्या संधी आणि आव्हाने यांच्या संदर्भातही आमचा दृष्टिकोन समान आहे. भारताच्या आर्थिक, संरक्षणविषयक आणि सुरक्षाविषयक प्राधान्यक्रमाच्या बाबींसाठी या भागीदा-या अतिशय चांगल्या आहेत. आम्ही उचललेल्या पावलांमुळे अमेरिकेसोबतच्या एकंदर भागीदारीला गती, कार्यक्रम आणि ताकद प्राप्त झाली आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून निर्वाचित झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझी चर्चा झाली आणि आम्ही या धोरणात्मक भागीदारीतून मिळणारे फायदे अधिक वाढवत राहण्यावर भर देण्याबाबत सहमती व्यक्त केली.

रशिया एक अतिशय जवळचा मित्र आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि माझ्यात अनेक वेळा सध्याच्या काळात जगाला भेडसावणा-या समस्यांवर प्रदीर्घ काळ चर्चा झाल्या आहेत. आमची विश्वासाची आणि धोरणात्मक भागीदारी विशेषकरून संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट झाली आहे. आमच्या संबंधांमध्ये उर्जा, व्यापार आणि इतर क्षेत्रांतील भागीदारीवर दिलेला भर चांगले परिणाम दाखवत आहे. जपानबरोबर देखील आमची धोरणात्मक भागीदारी अतिशय उत्तम सिद्ध होत असून आर्थिक घडामोडींच्या सर्व क्षेत्रांमध्ये या भागीदारीचा विस्तार होत आहे. जपानचे पंतप्रधान ऍबे आणि माझी चर्चा झाली असून यापुढील काळात आमच्यातील सहकार्य आणखी बळकट करण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केला. युरोपशी केलेल्या भागीदारीमध्ये आम्ही भारताच्या विकासासंदर्भातील दृष्टिकोन ठेवला आहे विशेषतः ज्ञान उद्योग आणि स्मार्ट शहरीकरण यावर भर दिला जात आहे.

मित्रांनो, भारत अनेक दशकांपासून आपल्या क्षमता आणि सामर्थ्य यांचा फायदा इतर विकसनशील देशांना करून देत आहे. आफ्रिकेत आमचे बंधु आणि भगिनी आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांत आमचे संबंध आणखी बळकट केले आहेत. अनेक दशकांपासून असलेली पारंपरिक मैत्री आणि ऐतिहासिक संबंध यांच्या आधारावर आम्ही अर्थपूर्ण विकासात्मक भागीदारी केली आहे. आमच्या विकासात्मक भागीदारीचे ठसे संपूर्ण जगभर विस्तारत चालले आहेत.

स्त्री-पुरुषहो,

एक सागरी देश असा भारताचा अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे. सर्व दिशांनी आमचे सागरी हितसंबंध संरक्षणविषयक आणि महत्वाचे आहेत. हिंदी महासागराची कमान त्याच्या वास्तविक सीमेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात विस्तारलेली आहे. सागर म्हणजे “सिक्युरिटी ऍन्ड ग्रोथ फॉर ऑल द रिजन” हा उपक्रम केवळ आमची मुख्यभूमी आणि बेटे यांचे रक्षण करण्यापुरता मर्यादित नाही. आमच्या सागरी संबंधांमध्ये आर्थिक आणि संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांचे निदर्शक असलेला हा उपक्रम आहे. आमच्या सागरी क्षेत्रामध्ये अभिसरण, सहकार्य आणि एकत्रित कृती यांमुळे आर्थिक घडामोडी आणि शांततेला चालना मिळणार आहे. तसेच आम्हाला असेही वाटते हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता यांची प्राथमिक जबाबदारी त्या क्षेत्रामध्ये जे राहात आहेत त्यांची आहे.आमचा दृष्टिकोन बहिष्कृत नाही आणि आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर या आधारावर देशांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सागरी संचाराच्या स्वातंत्र्याचा आदर आणि आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रातील एकमेकांशी जुळलेल्या भौगोलिक क्षेत्रांच्या आर्थिक विकासासाठी आणि शांततेसाठी अतिशय गरजेचे आहे.

मित्रांनो, शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रादेशिक संपर्काच्या तर्कसंगतीचे आम्ही स्वागत करतो. आमच्या निवडीनुसार आणि आमच्या कृतीनुसार आम्ही पश्चिम आणि मध्य आशिया आणि पूर्वेकडे आशिया-प्रशांत क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व अडथळे ओलांडून जाण्याचा आमचा निर्धार आहे. याची दोन स्पष्ट आणि यशस्वी उदाहरणे म्हणजे इराण , अफगाणिस्तान आणि चबाहार यांच्यासोबत झालेला त्रिपक्षीय करार आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण मालवाहतूक मार्गिका याबाबतची बांधिलकी.

मात्र, केवळ संपर्कव्यवस्थाच एकटी पुरेशी नसून इतर देशांच्या सार्वभौमत्वालाही कमी लेखणे योग्य ठरणार नाही. यामध्ये असलेल्या देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करून या मार्गिकेतील प्रादेशिक संपर्कप्रणालीने त्यांच्या आश्वासनाची पूर्तता होईल आणि मतभेद आणि नाराजी टाळता येईल.

मित्रांनो, आमच्या परंपरांना अनुसरून आम्ही आमच्या बांधिलकीचा आंतरराष्ट्रीय भार आमच्या खांद्यावर घेतला आहे. आपत्तींच्या काळात आम्ही मदतकार्य करण्यामध्ये आणि पुनर्वसन सामग्री पाठवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. नेपाळच्या भूकंपाच्या वेळी सर्वात पहिल्यांदा विश्वासार्ह मदतकार्य करणारे आम्ही होतो, येमेनमधील नागरिकांची सुरक्षित मुक्तता आणि मालदीव आणि फिजीमधील मानवताकारी कार्यातही आम्ही पुढे होतो. आंतराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवण्याची जबाबदारी खांद्यावर घेतानाही आम्ही मागेपुढे पाहिले नाही. आम्ही सागरी टेहळणीकार्यामध्ये, व्हाइट शिपिंग माहिती देण्यामध्ये आणि चाचेगिरी, तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यांसारख्या नव्याने निर्माण झालेल्या धोक्यांचा सामना करण्यामध्ये सहकार्य वाढवले आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही नवे पर्यायही शोधले आहेत. धर्माला दहशतवादापासून वेगळे करणे आणि चांगला आणि वाईट दहशतवाद असा भेदभाव नाकारणे आवश्यक असल्याची आमची ठाम भावना आहे आणि तिची चर्चा आता जागतिक पातळीवर सुरू झाली आहे. आमच्या शेजारी असलेले जे हिंसाचाराला पाठबळ देत आहेत, द्वेषाला खतपाणी घालत आहेत आणि दहशतवादाची निर्यात करत आहेत ते आता एकटे पडले आहेत आणि त्यांना दुर्लक्षित केले जात आहे.

दुसरीकडे जागतिक तापमानवाढीच्या आव्हानाबाबत आम्ही आघाडीची भूमिका स्वीकारली आहे. अपारंपरिक उर्जास्रोतांपासून 175 गिगावॉट उर्जानिर्मितीचा आमचा आव्हानात्मक जाहीरनामा आणि तितकेच आक्रमक उद्दिष्ट आहे. आम्ही आधीपासूनच चांगली सुरुवात केली आहे. आम्ही निसर्गासोबत एकात्मता साधून राहण्याच्या आमच्या नागरी परंपरांची माहिती इतरांना दिली आहे. एक सौर आघाडी तयार करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणले आहे. मानवी विकासाला चालना देण्यासाठी सुर्याच्या उर्जेचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारताच्या नागरीकरणाच्या प्रवाहामधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीमध्ये जगाची रुची निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना मिळालेले यश ही सर्वात मोठी बाब म्हणावी लागेल. आज बौद्ध तत्वज्ञान, योगविद्या आणि आयुर्वेद म्हणजे मानवतेचा अमूल्य वारसा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या सामाईक वारशाचा जयघोष भारताकडून प्रत्येक पावलावर केला जाईल. विविध देश आणि प्रदेशांच्या दरम्यान भारताकडून मैत्रीचे सेतू बांधले जात आहेत आणि त्यांच्या एकंदर समृद्धीला चालना दिली जात आहे.

स्त्री-पुरुषहो, या भाषणाचा समारोप करताना मी एक गोष्ट सांगेन संपूर्ण जगाशी संबंध प्रस्थापित करताना आमच्या प्राचीन ग्रंथांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे.

ऋग्वेद म्हणतो

आ नो भद्रो : क्रत्वो यन्तु विश्वतः म्हणजे सर्व दिशांनी मनात चांगले विचार येऊ देत.

एक समाज म्हणून एकाची गरज भागवण्याऐवजी अनेकांच्या गरजा पूर्ण करण्यावर आणि ध्रुवीकरणाऐवजी भागीदारीला प्राधान्य देण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. एकाच्या यशामुळे दुस-याच्या विकासाला चालना मिळते असा आमचा ठाम विश्वास आहे. आमची कामगिरी आणि आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. परिवर्तनाचा हा प्रवास आमच्या घरापासूनच सुरू झाला आहे आणि आमच्या जगभरातील देशांशी रचनात्मक आणि सहकार्यकारक भागीदारीने त्याला पाठबळ मिळाले आहे. स्वगृही निर्धारपूर्वक पावले टाकत आणि विश्वासार्ह परदेशी मित्रांचे जाळे तयार करत आम्ही त्या भविष्याला गवसणी घालणार आहोत ज्याची हमी आम्ही अब्जावधी भारतीयांना दिली आहे आणि या प्रयत्नात माझ्या मित्रांनो भारतामध्ये तुम्हाला शांततेचे आणि प्रगतीचे, स्थैर्याचे आणि यशाचे आणि उपलब्धता आणि अधिवासाचे प्रतीक दिसेल.

धन्यवाद,

खूप खूप धन्यवाद

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.