पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे नवे मुख्यालय “धरोहर भवन” चे उद्घाटन झाले. टिळक मार्गावर ही इमारत बांधण्यात आली आहे.
गेल्या 150 वर्षांच्या काळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अत्यंत महत्वाचे काम केले असल्याचे पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले.
भारताचा इतिहास आणि समृद्ध पुरातत्व परंपरांचा आपल्याला अभिमान असणे अत्यंत आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लोकांनी आपापल्या शहरांचा, गावांचा आणि प्रदेशांचा इतिहास आणि पुरातत्व परंपरा जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पुरातत्व इतिहासाचा समावेश शालेय अभ्यासक्रमातही केला जावा याच संदर्भात स्थानिक इतिहास आणि परंपरांची माहिती असणारे प्रशिक्षित टुरिस्ट गाईड असणे पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले.
पुरातत्व खात्याने अत्यंत मेहनत घेऊन केलेल्या प्रत्येक सर्वेक्षणातून त्या-त्या काळाची एक नवी कथा आपल्याला समजते असे पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात एक घटना सांगताना त्यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या फ्रान्सच्या अध्यक्षांनी भारत-फ्रेंच पुरातत्व विभागाने चंदिगढ येथे केलेल्या संयुक्त सर्वेक्षणाच्या स्थानाला स्वत: भेट दिल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.
भारतीयांनी आपली उच्च परंपरा अत्यंत अभिमान आणि आत्मविश्वासाने जगाला सांगायला हवी असे पंतप्रधान म्हणाले.
या इमारतीत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात ऊर्जा कार्यक्षम वीजव्यवस्था आणि रेनवॉटर हार्वेस्टींग यांचाही समावेश आहे. या मुख्यालयात केंद्रीय पुरातत्व विषयक वाचनालय असेल ज्यात १५ लाखांहून अधिक पुस्तके आणि मासिकांचा समावेश आहे.