पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील इंडियन ऑईलच्या बोंगईगांव तेलशुद्धीकरण कारखान्यातील इंडमैक्स (INDMAX) विभागाचे, दिब्रुगढच्या मधुबन येथील ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या दुय्यम टँक फार्मचे आणि तिनसुखियाच्या माकूम येथील हेबेडा गावातल्या गॅस कॉम्प्रेसर केंद्राचे, धेमाजी येथून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून लोकार्पण झाले. तसेच धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले आणि सुआलकुची इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल प्रा जगदीश मुखी, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली उपस्थित होते.

यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की ईशान्येकडील राज्ये भारताच्या विकासाचे नवे इंजिन ठरणार असून, आसामच्या लोकांकडूनच त्यांना अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. ब्रह्मपुत्रेच्या उत्तर काठावर सुमारे आठ दशकांपूर्वी ‘ज्योयमोती’ या चित्रपटापासून आसामी सिनेमाची सुरुवात झाल्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. या प्रदेशात अनेक महनीय व्यक्तिमत्वे घडली असून त्यांनी आसामच्या सांस्कृतिक वैभवात महत्वाची भर घातली असेही पंतप्रधान म्हणाले. आसामच्या समतोल विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करत असून त्यात राज्यात पायाभूत सुविधा वाढवण्यावर विशेष भर आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विरोधकांवर टीका करतांना पंतप्रधान म्हणाले की ब्रह्मपुत्रेच्या उत्तर काठावरच्या प्रदेशात एवढी प्रचंड क्षमता असूनही याआधीच्या सरकारांनी या प्रदेशाला सापत्न वागणूक दिली आणि दळणवळण, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या मंत्रानुसार सरकार काम करत असून आधी झालेला भेदभाव दूर करुन समान विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने आसाममध्ये सुरु केलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

 

|

आज, या प्रदेशात, सुमारे 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ऊर्जा आणी शैक्षणिक प्रकल्प सुरु झाले असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे शिक्षण ऊर्जेचे केंद्र म्हणून आसामची ओळख अधिक ठळक होईल तसेच आसामचे प्रतीक म्हणून या प्रकल्पांकडे बघितले जाईल, असे ते म्हणाले.

भारताला आज आत्मनिर्भर बनण्याची अत्यंत गरज असून आपल्याकडे त्या क्षमताही आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात भारताची तेलशुद्धीकरण क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे, विशेषतः बोंगईगाव तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

आज सुरु करण्यात आलेल्या गॅस युनिट प्लांटमुळे एलपीजी गॅसचे उत्पादन वाढेल आणि आसाम तसेच ईशान्येकडील लोकांच्या आयुष्यातील थोडे कष्ट कमी होतील. या प्रकल्पांमुळे युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून, गॅस सिलेंडरचा पुरवठा करत, सरकारने गरीब माता-भगिनींची चुलीच्या धुरापासून सुटका केली, असे पंतप्रधान म्हणाले. आज आसाममध्ये जवळपास 100 टक्के घरांपर्यंत गॅसजोडण्या पूर्ण झाल्या आहेत. केंद्र सरकारने, यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब महिलांपर्यंत मोफत एलपीजी जोडणी पोहोचवण्यासाठीही एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गॅस जोडणी, वीजपुरवठा आणि खतांची उपलब्धता नसली तर गरीब शेतकरी कुटुंबांना त्याचा बराच त्रास सहन करावा लागतो, असे मोदी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याला सात दशके पूर्ण झाल्यानंतरही 18,000 गावांमध्ये वीज नव्हती आणि त्यातील बहुतांश गावे आसाममधील तसेच ईशान्येकडील राज्यांमधील होती, त्यामुळे केंद्र सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी विशेष काम केले, असे पंतप्रधान म्हणाले.

या भागातील विविध खतनिर्मिती कारखाने एकत्र बंद पडले होते किंवा गॅसची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे आजारी अवस्थेत होते. याचा गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय लोकांवर विपरीत परिणाम होत होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत पूर्व भारताला जगातील सर्वात मोठ्या गैस पाईपलाईन प्रकल्पांशी जोडले जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.

आपले वैज्ञानिक, अभियंते आणि तंत्रज्ञ यांचे आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्वाचे योगदान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात, आम्ही देशात असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे युवक स्वतःच स्टार्ट अप च्या माध्यमातून स्वतःच्या प्रश्नांवर तोडगा शोधू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले. आज संपूर्ण जगात भारताच्या अभियंत्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. आसामच्या युवकांमध्येही विलक्षण क्षमता आहेत. या क्षमता अधिक वाढवण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत आहे. आसाम सरकारच्या प्रयत्नांमुळेच, राज्यात आज 20 पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये निर्माण झाली आहेत. आज धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उदघाटनामुळे आणि सुआलकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पायाभरणीमुळे आसामच्या शैक्षणिक सामर्थ्यात मोठी वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. आणखी तीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. नवे शैक्षणिक धोरण लवकरात लवकर अमलात आणण्यासाठी आसाम सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. या धोरणाचा आसामच्या लोकांना, विशेषतः चहाच्या मळ्यातील कामगारांच्या मुलांना, अनुसूचित जमातीच्या मुलांना विशेष लाभ होईल कारण शिक्षणाचे माध्यम स्थानिक भाषा असेल.

आसाम, जगभरात इथल्या चहासाठी, हातमागाच्या वस्त्रांसाठी आणि पर्यटनासाठी ओळखले जाते, असे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भरतेमुळे आसामच्या लोकांची शक्ती आणि क्षमतांमध्ये वाढ होईल. चहा उत्पादनही वाढेल आणि त्यातून आत्मनिर्भर आसामच्या संकल्पनेला बळ मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. अशा परिस्थितीत, जेव्हा इथले युवक हे कौशल्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकतील, तेव्हा त्यांना व्यवसायात त्याचा लाभ मिळेल. यंदाच्या अर्थसंकल्पात, देशभरात 100 एकलव्य महाविद्यालये सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असून त्याचाही आसामला लाभ मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काम करत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.मत्स्योपादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपयांची नवी योजना सुरु करण्यात आली असून आसामला त्याचा लाभ मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. आसामच्या शेतकऱ्यांचा माल जागतिक बाजारपेठेत पोचायला हवा, असे ते म्हणाले. नॉर्थ बँक टी गार्डन्स चाही आसामच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.

छोट्या चहा मळेवाल्यांना जमीन भाडेपट्टीवर देण्याच्या आसाम सरकारच्या मोहिमेचे त्यांनी कौतुक केले. आसामच्या जनतेने विकास आणि प्रगतीच्या दुहेरी इंजिनाला अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Rs 54,000 crore defence boost: DAC fast-tracks tanks, torpedoes & AEW&C, slashes red tape

Media Coverage

Rs 54,000 crore defence boost: DAC fast-tracks tanks, torpedoes & AEW&C, slashes red tape
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 मार्च 2025
March 20, 2025

Citizen Appreciate PM Modi's Governance: Catalyzing Economic and Social Change