गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री बहन आनंदीबेन, मुख्यमंत्री विजय रूपाणी जी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल जी आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर सद्गृहस्थ !

काहीजणांचे चेहरे 12-15 वर्षांनी आज पाहतो आहे. ज्या लोकांनी आपलं सगळं तारूण्य, आयुष्यातली उमेदीची वर्ष गुजरातसाठी वेचली, असे काही चेहरेही आज मला इथं दिसत आहेत. अनेक सेवानिवृत्त अधिकारी दिसताहेत. या अधिकारी वर्गाने आपल्या कार्यकाळात गुजरातसाठी खूप काही केलं आहे. त्यामुळेच तर आज गुजरातचा दिवा इतरेजनांनाही प्रकाशमान करत आहे.

गुजरात सरकारचे मी विशेष आभार मानतो. भवनाच्या उद्घाटनाचं काम म्हणजे फीत कापण्याचं काम तर कोणीही करू शकलं असतं. परंतु तुम्हा लोकांना भेटण्याची संधी आज मला यानिमित्तानं मिळाली आहे.

सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. भगवान गणेशाची कृपा देशवासियांवर कायम रहावी. राष्ट्र निर्माणाचा प्रत्येक संकल्प सिद्ध व्हावा. अशी प्रार्थना गणेश चतुर्थीच्या पावन उत्सवादिनी करतो आणि आपल्या सर्वांना तसेच देशवासियांनाही खास करून आज गुजरातचा कार्यक्रम आहे म्हणून गुजरातच्या लोकांसाठी अनेकानेक मंगलकामना करतो.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी एक महत्वाचे कार्य आपण करत असतो. जैन परंपरेमधला हा एक अतिशय उत्तम संस्कार आहे, तो म्हणजे ‘मिच्छामी दुकडम’! म्हणजे जर कोणाला आपण मनानं, वचनानं-वाणीनं, कर्मानं, कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर दुःख पोहोचवले असेल तर त्याबद्दल क्षमा याचना मागण्याचा हा काळ म्हणजे ‘‘मिच्छामी दुकडम’ मानला जातो. माझ्यावतीनेही गुजरातच्या लोकांना, देशातल्या लोकांना आणि आता तर संपूर्ण दुनियेतल्या लोकांना ‘मिच्छामी दुकडम’!

 

भगवान सिद्धी विनायकाच्या उत्सवाच्या काळातच आणखी एका सिद्धीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथं एकत्र जमलो आहोत, याचा मला आनंद होत आहे. गरवी गुजरात सदन म्हणजे गुजरातच्या करोडो जनतेच्या भावना, परंपरा आणि संस्कृती यांना अनुकूल असे सर्व सेवा देणारे भवन तयार झाले आहे. यासाठी आपणा सर्व गुजरातवासियांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

आत्ताच आपण गुजरात भवनाविषयीचा एक लघूपट पाहिला. परंतु मी तर तिथं जावून आलो आहे. काही वेळापूर्वीच गुजरातच्या संस्कृतीची अनुपम झलक मला इथं पहायला मिळाली. इतक्या कमीत कमी वेळेमध्ये सर्व कलाकारांनी कमी जागेमध्ये खूप चांगले सादरीकरण केले.

मित्रांनो, गुजरात भवनानंतर आता गरवी गुजरात सदन तयार झाल्यामुळे अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या इमारतीच्या निर्माण कार्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो. त्यांनी नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत इतकी देखणी, भव्य इमारत निर्माण केली, हे कौतुकास्पद आहे.

दोन वर्षांपूर्वी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या इमारतीचा शिलान्यास केला होता. आणि आज सप्टेंबरच्या प्रारंभीच या नवीन भवनाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आहे. निश्चित वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची सवय आता सरकारी संस्थामध्ये, सरकारी एजन्सींमध्ये विकसित होत आहे, याचा मला आनंद होत आहे.

ज्यावेळी मी गुजरातमध्ये होतो, त्यावेळी अगदी ढोल पिटून सांगत असे की, ज्या प्रकल्पाचा मी शिलान्यास करतो, त्याचं उद्घाटनही मीच करणार. माझ्या या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता. तर ती एक सार्वजनिकपणे बांधिलकी मानून वचनबद्धता होती. आणि या कारणामुळे माझे सर्व सहकारी त्या कामाच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत रहायचे. मला त्यांच्या कामाचा चांगला परिणामही मिळत होता. अशा कार्यसंस्कृतीची परंपरा आपण लोकांनी कायम राखली आहे. मात्र आता अशी कार्यसंस्कृती अधिकाधिक विस्तारण्याची खूप आवश्यकता आहे.

मित्रांनो, हे भवन भलेही ‘लघुरूपातल्या गुजरात’चे मॉडल आहे. परंतु हे नव भारताच्या विचारांचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. यामध्ये स्वतःला आपल्या सांस्कृतिक वारसा, आपल्या परंपरा यांना आधुनिक काळाबरोबर जोडून त्या पुढे नेण्याचे कार्य करतात. आपली नाळ आपल्या मुळांशी चांगली जोडली पाहिजे, त्याचबरोबर उंच आकाशालाही गवसणी घालण्याचीही आपली इच्छा आहे.

या भवनाची उभारणी करताना पर्यावरण स्नेही, जल पुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर यासारख्या आधुनिक प्रणालींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. त्याचबरोबर दुसरीकडे ‘रानी की वाव’चेही चित्रण आहे. यामध्ये जिथं सौर ऊर्जा निर्मितीची व्यवस्था आहे त्याच बरोबर मोढेराच्या सूर्य मंदिरालाही स्थान मिळाले आहे. घन कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्याच जोडीला कच्छमधील लिपण कलेचे दर्शनही इथं होत आहे. यामध्ये पशूंच्या अपशिष्टाचा वापर करून त्याचे कलेमध्ये रूपांतर केलं आहे.

बंधू आणि भगिनींनो, हे सदन म्हणजे गुजरातच्या कला आणि हस्तशिल्प यांचा विचार केला तर ‘वारसा पर्यटनाला’ चांगले प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकणार आहे. देशाच्या राजधानीच्या ठिकाणी जगभरातून लोक येतात. त्यामध्ये व्यापारी, व्यावसायिक यांचे जाणे-येणे सुरूच असते. त्यामुळे अशा राजधानीमध्ये या प्रकारची सुविधा देणारं भवन उपयुक्त ठरणार आहे.

गुजरातच्या संस्कृतीवर आधारित प्रदर्शन तयार करण्यासाठी भवनाच्या मधवर्ती भागाचा चांगला उपयोग करण्यात आला, ही गोष्ट अभिनंदनीय आहे.

मुख्यमंत्र्यांचा माझा आग्रह आहे की, आता इथं गुजरात पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवस्था जी आहे, ती अधिक सशक्त बनवण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून त्या माध्यमातून दिल्लीच्या आणि देशभराच्या पर्यटकांना गुजरातबरोबर जोडता येवू शकते.

एकेकाळी गुजरातचे खास भोजन उत्तर भारतातल्या लोकांना जास्त पसंद पडत नव्हतं. हे जेवण तर फार गोड आहे, अरेच्या तुम्ही लोक तर कारल्यामध्ये गुळ-साखर असं गोड घालता का? असं ते विचारायचे. परंतु अलिकडच्या काळात मला जाणवतं की, लोक विचारतात, गुजरातचं चांगलं जेवण कुठं मिळेल? गुजराती इथं कुठं चांगली मिळेल? आणि गुजरातच्या लोकांचं एक वैशिष्ट आहे. ते गुजरातमध्ये असतात, त्यावेळी शनिवार, रविवार संध्याकाळी घरामध्ये स्वयंपाक बनवतच नाहीत. ते बाहेर जेवायला-खायला जातात. गुजरातमध्ये असताना ही मंडळी इटालियन पदार्थ कुठं चांगले मिळतील, मेक्सिकन पदार्थ, दक्षिण भारतीय पदार्थ कुठं चांगले मिळतील, हे शोधत असतात. मात्र हे लोक गुजरातच्या बाहेर जातात, त्यावेळी मात्र ते गुजराती पदार्थ शोधत असतात. इथं तर खमणलाही ढोकळा म्हणतात तसंच हांडव्यालाही ढोकळाच म्हणतात. वास्तविक, हे दोन्ही पदार्थ एकाच कुलातले आहेत. आता जर गुजरातच्या लोकानी याचे चांगले ‘ब्रँडिंग’ केले तर या गोष्टींची सर्व लोकांना माहिती होवू शकणार आहे. खमण वेगळे, ढोकळा वेगळा आणि हांडवोही वेगळा असतो.

या नवीन भवनामध्ये गुजरातमध्ये गुंतवकूणदारांना आकर्षित करण्यासाठी, गुजरातमधल्या उद्योगांसाठी एक प्रमुख केंद्र बनावे यासाठी नवीन व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे गुजरातमध्ये गुंतवकूण करू इच्छित असलेल्या भारतीय आणि परदेशी गुंतवणुकदारांना आणखी जास्त सुविधा मिळेल, असा माझा विश्वास आहे.

मित्रांनो, या सदनामध्ये आधुनिक डायनिंग हॉलमध्ये लोक बसतील तेव्हा त्यांना ढोकळा, फाफडा, खांडवी, पुदिना मुठिया असो,किंवा मोहनथाळ, ठेपला, शेव तसेच टोमॅटोचे चाट अशा अनेक गुजराती पदार्थांची उपलब्धता असावी. हे सांगताना मला एक आठवण इथं नमूद करावीशी वाटते. मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना एकदा एका पत्रकाराने मला मुलाखतीसाठी वेळ मागितली होती. त्या पत्रकाराची सवय होती की, नाष्टा करण्याची वेळ ते मुलाखतीसाठी मागत होते. नाष्टा करत-करत ते मुलाखत घेत होते. वास्तविक त्यावेळी मुलाखत तर खूपच चांगली झाली. मुलाखतीमध्ये काय बोलायचं, काय नाही बोलायचं, त्यातही नेमकं काय जास्त बोलायचं नाही, हेही माहिती होतं. एकूणच आमचं बोलणं खूप चांगलं झालं. परंतु नंतर त्या पत्रकारानं जे काही छापलं होतं, त्यामध्ये लिहिलं होतं – गुजरात भवनमध्ये गेलो होतो. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. परंतु दुःखी आहे. कारण त्यांनी गुजराती नाष्टा खायला दिली नाही तर दक्षिण भारतीय पदार्थ खायला दिले. मला वाटतं की, आता कुणावरही अशी वेळ पुन्हा येवू नये. गुजरात भवनामध्ये त्याची विशिष्ट ओळख जपण्याची गरज आहे. लोकांनी गुजराती पदार्थांचा शोध घेत इथं आलं पाहिजे.

गुजरातने विकासाला, उद्योगाला, परिश्रमाला नेहमीच महत्व दिलं आहे. विकासासाठी गुजरात किती आसुसलेला आहे हे जवळपास दीड दशक मुख्यमंत्री या नात्यानं मी खूप जवळून पाहिलं, अनुभवलं आहे. गेल्या पाच वर्षात तर गुजरातने आपल्या विकासाचा प्रवास अधिक गतीनं सुरू ठेवला आहे, हे मी पहात आलो आहे. आधी आनंदीबेन पटेल यांनी विकासाच्या गतीला नवीन ऊर्जा दिली. नवीन सामथ्र्य दिले आणि त्यानंतर आता रूपाणीजींनी विकासाचे नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. अलिकडच्या वर्षांमध्ये गुजरातचा विकास दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

मित्रांनो, केंद्र आणि राज्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर आणि दोन्ही सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गुजरातच्या विकासामध्ये येत असलेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. अशीच एक अडचण नर्मदा धरणाची होती. आणि आता विजयजी त्याचे खूप काही वर्णनही केले. या समस्येवर तोडगा काढल्यामुळे नर्मदेचे पाणी गुजरातमधल्या अनेक गावांची तहान भागवत आहे, शेतकरी बांधवांना लाभ होत आहे, याचा आज आम्ही अनुभव घेत आहोत.

मित्रांनो, सोनी योजना असो किंवा सुजलाम-सुफलाम योजना असो, या दोन्ही योजनांनी जो वेग घेतला आहे, त्यामुळे आज गुजरातमधल्या लाखों परिवारांना सुविधा मिळत आहेत. गुजरातमध्ये पाण्याची उपलब्धता चांगली होत आहे.

जल संचयन असो, किंवा गावां-गावांमध्ये पाणी पोहोचण्याचे अभियान असो, गुजरतने यामध्ये आपले एक कौशल्य विकसित केले आहे. योजना यशस्वी करण्यासाठी योजनाबद्धतेने सिद्धी प्राप्त केली आहे, याचा मला खूप आनंद वाटतो. योजनेमध्ये नागरिकांना सहभागी केल्यामुळे ती यशस्वी होते, जनतेची भागीदारी इथं महत्वाची आहे. हे काम जन-भागीदारीतून झाले आहे. अशाच प्रयत्न करून आम्हाला आता 2024 पर्यंत प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवायचे आहे. मी इथं संपूर्ण देशाची गोष्ट करतोय… यामध्येही आम्ही यशस्वी होवू.

मित्रांनो, सिंचनाव्यतिरिक्त पायाभूत सुविधांच्या इतर क्षेत्रातही गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम वेगानं सुरू आहे. अहमदाबाद मेट्रोसहित आधुनिक पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्पांचे काम वेगानं पूर्ण होत आहेत. बडोदा, राजकोट, सूरत आणि अहमदाबाद इथल्या विमानतळांचे आधुनिकीकरण केले आहे. याशिवाय धोलेरा विमानतळ आणि द्रूतगती मार्ग बनवला आहे. व्दारकेमध्ये सेतू निर्माणाचे काम सुरू आहे. रेल्वे विद्यापीठ, नाविक संग्रहालय, नाविक पोलीस अकादमी, गांधी संग्रहालय अशी अनेक कामे गेल्या पाच वर्षात गुजरातमध्ये केली आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने संपूर्ण दुनियेच्या पर्यटन नकाशावर सन्मानाचे स्थान मिळवले आहे. विश्वभरामधल्या प्रसिद्ध नियतकालिकांव्दारे, विशेषतः पर्यटन विषयाला, क्षेत्राला वाहिलेल्या मासिकांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची चर्चा अवश्य केली जात आहे. अलिकडेच याविषयी मी काही माहिती वाचली आणि आनंदीत झालो. जन्माष्टमीच्या दिवशी 34 हजार लोकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिले, सरदार साहेबांचे दर्शन करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथं पोहोचले होते. एका दिवसात 34 हजार लोकांनी सरदार स्मारकाला भेट देणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

मित्रांनो, सामान्य जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य उत्तम रहावे यासाठीही गुजरातमध्ये खूप चांगले, कौतुकास्पद काम झाले आहे. गेल्या 5-6 वर्षांमध्ये गुजरातमध्ये वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा वेगानं निर्माण झाल्या आहेत. अहमदाबादसहित राज्याच्या अनेक भागात आधुनिक रूग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे निर्माण होत आहे. यामुळे युवकांना गुजरातमध्येच वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

आरोग्य सेवेबरोबरच उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजना लागू करण्यातही गुजरात खूप आघाडीवर आहे. गुजरातच्या जनतेचे जीवनस्तर चांगला व्हावा, त्यांना दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण निर्माण होवू नये यासाठी आता आपल्याला ‘ईज ऑफ लिव्हिंग’ला वेग देण्याची गरज आहे.

मित्रांनो, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांची सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक ताकदच त्यांना महान बनवत असते. म्हणूनच देशाच्या प्रत्येक भागाची, प्रत्येक राज्याची ताकद नेमकी कशात आहे, शक्तीस्थानं काय आहेत, हे ओळखून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. त्यांना राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर संधी कशी मिळेल ते आपण पहायचं आहे. अशा संयुक्त ताकदीमुळेच आगामी पाच वर्षांसाठी निश्चित केलेले सर्व संकल्प आपण सिद्धीस नेवू शकणार आहोत.

दिल्लीमध्ये जवळपास सर्वच राज्यांची भवन किंवा सदन आहेत. हे भवन फक्त ‘अतिथी गृह’ इतक्या मर्यादीत स्वरूपामध्ये राहू नये, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. देशाच्या राजधानीत असलेले हे राज्याचे भवन ख-या अर्थाने राज्याचा ब्रँड आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणारे हे सदन आहे. देश आणि दुनिया यांच्या संवाद साधण्याचे काम इथून होणार आहे, आणि त्यादृष्टीने इथं काम होणे अपेक्षित आहे. हे भवन पर्यटन आणि व्यापाराचे केंद्र बनावे, या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे.

मित्रांनो, देशाच्या अनेक राज्यांमध्ये संपर्क यंत्रणा कमकुवत आहे. कारण हे भाग दुर्गम आहेत. देश-विदेशातल्या व्यावसायिकांना अशा दुर्गम क्षेत्रामध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागतो. ज्यावेळी त्यांच्याकडे वेळ कमी असतो, त्यावेळी राजधानीतल्या त्या राज्याच्या व्यावसायिक केंद्राशी संपर्क साधणे शक्य असते. अशावेळी त्या राज्यातली कला, संस्कृती, शिल्पकला यांची माहिती देणारे ‘शो केस’ तयार असेल तर खूप उपयुक्त माहिती सर्वांना मिळू शकणार आहे.

जम्मू, काश्मीर आणि लेह-लड्डाखपासून ते ईशान्येपर्यंत, विंध्याच्या आदिवासी भागापासून ते दक्षिणेतल्या समुद्री किना-यापर्यंत खूप काही गोष्टी आहेत. त्या आपण जगाशी ‘शेअर’ करू शकतो. म्हणून या सर्व गोष्टींचे चांगले ‘प्रमोशन’ करण्याची गरज आहे. यासाठी राजधानीतल्या अशा राज्यांच्या भवनांमध्ये विशेष व्यवस्था असली पाहिजे. या भवनामध्ये पर्यटनापासून ते राज्यातल्या गुंतवणुकीच्या संधीपर्यंत सर्व माहिती उपलब्ध करून देवून, कोणत्याही प्रश्नावर उत्तर मिळवणे शक्य झाले पाहिजे.

पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे ‘गरवी गुजरात’साठी खूप-खूप अभिनंदन करतो. आणि आशा करतो की, गुजरातच्या खाद्यपदार्थांचा आनंद-स्वाद घेता-घेता आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे की, देशाला एकदा वापराच्या प्लास्टिकपासून मुक्त करायचे आहे. या मोहिमेत गरवी गुजरात भवन एक आदर्श निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.

पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या नवीन भवनासाठी शुभेच्छा देवून सद्भावना व्यक्त करतो. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सहभागी झालेले लोक आज इथं उपस्थित राहिलेले पाहून मला खूप छान वाटलं. अशाच पद्धतीने अनेक क्षेत्रातल्या लोकांना गुजरात भवनामध्ये आमंत्रित करण्यात यावे, म्हणजे आपोआपच व्यवसायामध्ये वृद्धी होत राहील. त्यासाठीच लोकांना निमंत्रित केले पाहिजे.

खूप-खूप धन्यवाद आणि खूप- खूप शुभेच्छा !!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi