
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ इथल्या कृषी कुंभ मेळाव्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. शेतकऱ्यांच्या या मेळाव्यामुळे कृषी क्षेत्रात उत्तम संधी आणि नव तंत्रज्ञान बिंबवण्याचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
धान्य खरेदीत वृद्धी करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाची त्यांनी प्रशंसा केली. देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या घटकांपैकी शेतकरी हा एक घटक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. या दिशेने उत्पादन खर्च कमी करुन नफा वाढवण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात सौर पंप बसवण्यात येतील. विज्ञानाचे लाभ कृषी क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने आपले सरकार काम करत आहे. वाराणसीमध्ये उभारण्यात येत असलेले तांदूळ संशोधन केंद्र म्हणजे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे पंतप्रधान म्हणाले.
कृषी क्षेत्रातल्या मूल्यवर्धनाचे महत्व पंतप्रधानांनी विशद केले. अन्नधान्य प्रक्रिया क्षेत्रात आखण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. हरितक्रांतीनंतर आता दूध उत्पादन, मध उत्पादन, कुक्कुट पालन आणि मत्स्य पालनावर भर देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
जल संसाधनांचा सुयोग्य वापर, साठवणुकीसाठी उत्तम तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या विषयांवर या कृषी कुंभमध्ये चर्चा व्हावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. शेतकऱ्यांना पराली जाळाव्या लागू नयेत यासाठीचे मार्ग आणि नवीन तंत्रज्ञान शोधण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला .