मुंबईतील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
“आज एकाचवेळी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरु झाल्यामुळे, रेल्वे आणि महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेसाठी हा महत्वाचा दिवस”
“या वंदे भारत गाड्या आर्थिक केंद्रांना धार्मिक केंद्रांशी जोडतील”
“वंदे भारत रेल्वेगाड्या म्हणजे, आधुनिक भारताचे शानदार चित्र”
“वंदे भारत गाड्या भारताचा वेग आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब”
“यंदाच्या अर्थसंकल्पातून देशाच्या मध्यमवर्गाला पाठबळ”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. मुंबई-सोलापूर वंदे भारत आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत अशा या दोन गाड्या आहेत. तसेच, मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा दोन प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या दोन रस्ते प्रकल्पांमुळे मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 18 वर आल्यानंतर पंतप्रधानांनी मुंबई-साईनगर वंदे भारत रेल्वेगाडीचे अवलोकन केले. तसेच, गाडीतील कर्मचारी वर्ग आणि मुलांशीही त्यांनी संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय रेल्वेसाठी, विशेषत: महाराष्ट्रातील प्रगत दळणवळण व्यवस्थेसाठी हा एक मोठा दिवस आहे कारण एकाच दिवशी दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वंदे भारत रेल्वेगाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडणार आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे, कॉलेजला येणारे, नोकरी आणि व्यवसायासाठी येणारे लोक, शेतकरी आणि भाविक सर्वांना यामुळे सुविधा मिळणार आहेत असे पंतप्रधान म्हणाले. शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी सारख्या तीर्थक्षेत्रांना जाणे यामुळे सोयीचे होणार आहे. ह्या गाड्या पर्यटन आणि तीर्थयात्रा दोन्हीला चालना देतील असे त्यांनी सांगितले. “मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्री जाणे आता खूप सुलभ होणार आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक होत असलेल्या भारताचे अत्यंत शानदार चित्र आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “ह्या गाड्या भारताची गती आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब आहे.” वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या वेगाविषयी ते म्हणाले,  की आतापर्यंत अशा 10 गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत. देशातल्या 17 राज्यांत 108 जिल्ह्यांमधून ह्या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमुळे सर्वसामान्य व्यक्तींचे आयुष्य सुखकर होईल, याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडली जातील, असे सांगत कुरार बोगदाही वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

21व्या शतकातील भारतासाठी नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुलभ करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील सुधारणांच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आधुनिक गाड्या, मेट्रोचा विस्तार तसेच नवीन विमानतळ आणि बंदरे सुरू करण्यामागे हीच विचारसरणी आहे, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीला अर्थसंकल्पाने बळ दिले आहे कारण पहिल्यांदाच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वेचा वाटा 2.5 लाख कोटी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  महाराष्ट्राच्या रेल्वे अर्थसंकल्पातही अभूतपूर्व वाढ केली आहे आणि दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा वेगाने पुढे जाईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला बळकटी मिळाली आहे, पगारदार आणि  व्यावसायिक या दोघांच्याही गरजा या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. 2014 पूर्वी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांवर कर आकारला जात होता, परंतु सध्याच्या सरकारनेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात करआकारणीसाठी सुरुवातीला 5 लाख रुपये आणि आता 7 लाख रुपये अशी उत्पन्न मर्यादा केली आहे.  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ज्यांनी 20% कर भरला ते आज शून्य कर भरतात, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. नवीन नोकऱ्या असलेल्यांना आता अधिक बचत करण्याची संधी आहे, असे त्यांनी सांगितले.

‘सबका विकास सबका प्रयास’ या भावनेला चालना देणारा हा अर्थसंकल्प प्रत्येक कुटुंबाला बळ देईल आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि कपिल मोरेश्वर पाटील आणि राज्य सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत गाडी या दोन रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे हिरवा झेंडा दाखवला. नवीन भारतासाठी उत्तम, अधिक कार्यक्षम आणि प्रवासी-अनुकूल वाहतुकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.

मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी ही देशातील 9 वी वंदे भारत रेल्वे गाडी आहे. या नवीन जागतिक दर्जाच्या रेल्वे गाडीमुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यानची वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांसाठी जाणा-या भाविकांचा प्रवासही सुकर होईल.

मुंबई-साईनगर-शिर्डी वंदे भारत गाडी ही देशातील 10 वी वंदे भारत रेल्वे गाडी असून या गाडीमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी आणि शनी शिंगणापूर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांबरोबरचा संपर्क सुधारेल.

मुंबईमधील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) आणि कुरार भुयारी मार्ग या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी लोकार्पण केले. कुर्ला ते वाकोला आणि बीकेसी मधील एमटीएनएल जंक्शन   ते कुर्ला येथील एलबीएस फ्लायओव्हरपर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या उन्नत मार्गीकांमुळे शहरातील पूर्व-पश्चिम संपर्क आणखी सुधारेल. हे दोन मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गशी जोडतात, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक सक्षम पणे जोडली जात आहेत. कुरार भुयारी मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाच्या मालाड आणि कुरार या दोन टोकांना जोडतो. यामुळे नागरिकांना रस्ता सहज ओलांडता येतो आणि वाहनांना देखील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गर्दी टाळून सहज प्रवास करता येतो.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage