राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला.
मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधानांनी वीरभूमी राजस्थानचे राज्याला पहिली वंदे भारत रेल्वेगाडी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.वंदे भारतमुळे जयपूर दिल्ली या स्थानका दरम्यानचा प्रवास सुलभ होईल,त्यासोबतच तीर्थराज पुष्कर आणि अजमेर शरीफ सारख्या श्रद्धास्थानांपर्यंत सुलभ पोहोचण्यास ती साहाय्यभूत ठरणारी असल्याने राजस्थानच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल.
गेल्या दोन महिन्यांत दिल्ली-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेससह देशातील सहा वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याची संधी मिळाल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस, सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस आणि चेन्नई कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसचा उल्लेख त्यांनी केला.वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 60 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “वंदे भारताचा वेग हे त्याचे मुख्य वैशिष्ठ्य असून त्यामुळे लोकांच्या वेळेची बचत होते”,असे पंतप्रधान म्हणाले. एका अभ्यासानुसार देशभरात जे लोक वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करतात ते प्रत्येक प्रवासावर 2,500 तास बचत करतात असे त्यांनी सांगितले.
उत्पादन कौशल्ये, सुरक्षितता, वेगवान गती आणि सुंदर रचना लक्षात घेऊन वंदे भारत एक्स्प्रेस विकसित केली असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारतात विकसित झालेली पहिली अर्ध स्वयंचलित ट्रेन तर जगातील पहिल्या कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम ट्रेनपैकी एक आहे, असे पंतप्रधानांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले आहे याचा पुनरुच्चार करून सांगितले. "वंदे भारत ही स्वदेशी सुरक्षा कवच प्रणालीशी सुसंगत असलेली पहिली ट्रेन आहे", असे मोदी म्हणाले. अतिरिक्त इंजिनाशिवाय सह्याद्री घाटाची चढण चढू शकणारी ही पहिली ट्रेन असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “वंदे भारत एक्सप्रेसने ‘इंडिया फर्स्ट ऑलवेज फर्स्ट’ या भावनेची जाणीव करून दिली आहे,” असे ते म्हणाले. वंदे भारत एक्सप्रेस ही विकास, आधुनिकता, स्थिरता आणि ‘आत्मनिर्भरता’ यांचा समानार्थी रुप बनल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
नागरिकांच्या रेल्वेसारख्या महत्त्वाच्या आणि मूलभूत गरजांचे राजकारणाच्या आखाड्यात रुपांतर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या वेळी भारताला रेल्वेचे मोठे जाळे वारशाच्या रुपात मिळाले होते, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये आधुनिकीकरणाच्या गरजेवर राजकीय स्वार्थाचे वर्चस्व असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे मंत्रिपदाची निवड, रेल्वे गाड्यांच्या घोषणा आणि नोकरभरतीतही राजकारण दिसून येत होते. रेल्वेच्या नोकऱ्यांच्या खोट्या बहाण्याने भूसंपादन करण्यात आले आणि अनेक मानवरहित रेल्वे क्रॉसिंग खूप काळ चालू राहिल्या तर स्वच्छता आणि सुरक्षितता यात रेल्वे मागे पडली होती, असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये लोकांनी पूर्ण बहुमताने स्थिर सरकार निवडले त्या नंतर परिस्थितीने चांगले वळण घेतले, "जेव्हा राजकीय देवाण - घेवाणीचा दबाव कमी झाला, तेव्हा रेल्वेने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि नवीन उंची गाठली" असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्रातील सरकार राजस्थानला नव्या संधींची भूमी बनवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पर्यटन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या राजस्थानसारख्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने अभूतपूर्व काम केले आहे, असे ते म्हणाले. मोदींनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या दिल्ली दौसा लालसोट विभागाच्या लोकार्पणाचा उल्लेख केला. या उपक्रमाचा दौसा, अलवर, भरतपूर, सवाई माधोपूर, टोंक, बुंदी आणि कोटा जिल्ह्यांना फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार राजस्थानमधील सीमावर्ती भागात सुमारे 1400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर काम करत असून राज्यात 1000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते प्रस्तावित असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
राजस्थानमधील संपर्क सुविधेला दिले जाणारे प्राधान्य अधोरेखित करताना पंतप्रधानांनी तारंगा टेकडी ते अंबाजी या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याचा उल्लेख केला. शतकानुशतके प्रलंबित असलेली या मार्गाची मागणी आता पूर्ण होत आहे, असे ते म्हणाले.
उदयपूर-अहमदाबाद मार्गाचे ब्रॉडगेजिंग पूर्ण झाले आहे आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे दळणवळण सुविधेचे विद्युतीकरण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राजस्थानसाठी रेल्वे अर्थसंकल्पीय तरतूद 2014 पासून 14 वेळा वाढवण्यात आली असून, 2014 मधील 700 कोटींवरून ती यावर्षी 9500 कोटींपेक्षा पुढे गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाच्या कामालाही दुप्पट वेग देण्यात आला आहे.
डुंगरपूर, उदयपूर, चित्तोडगड, पाली आणि सिरोही या आदिवासी भागांना, रेल्वे मार्गांच्या गेज मधील बदल आणि दुपदरीकरणाचा फायदा झाला आहे. अमृत भारत रेल्वे योजने अंतर्गत डझनभर स्थानकांची श्रेणी सुधारणा केली जात आहे, असेही ते म्हणाले.
पर्यटकांची सोय लक्षात घेऊन सरकार विविध प्रकारच्या सर्किट ट्रेनही चालवत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, आणि त्यांनी भारत गौरव सर्किट ट्रेनचे उदाहरण दिले, जिने आतापर्यंत 70 पेक्षा जास्त फेऱ्या केल्या असून, 15 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे. “अयोध्या-काशी असो, दक्षिण दर्शन असो, द्वारका दर्शन असो, शीख तीर्थक्षेत्र असो, अशा अनेक ठिकाणी भारत गौरव सर्किट गाड्या धावल्या आहेत”, पंतप्रधान म्हणाले. समाज माध्यमांवरील प्रवाशांच्या सकारात्मक प्रतिसादाची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की या गाड्या एक भारत - श्रेष्ठ भारत या भावनेला सतत बळ देत आहेत.
वन स्टेशन वन प्रोडक्ट (एक स्थानक एक उत्पादन) मोहिमेचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, भारतीय रेल्वेने राजस्थानची स्थानिक उत्पादने देशभर पोहोचवण्यासाठी गेल्या काही वर्षांत आणखी प्रयत्न केले आहेत. त्यांनी निदर्शनास आणले की, भारतीय रेल्वेने राजस्थानसह देशभरातल्या 70 रेल्वे स्थानकांवर वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स उभारले असून या ठिकाणी जयपुरी रजया, संगानेरी ब्लॉक प्रिंटच्या चादरी, गुलाबाची उत्पादने आणि इतर हस्तकला साहित्याची विक्री केली जात आहे. राजस्थानमधील छोटे शेतकरी, कारागीर आणि हस्तकलाकार यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी हे नवीन माध्यम मिळाल्याचे नमूद करून, विकासामधील प्रत्येकाच्या सहभागाचे हे एक उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले. “रेल्वेसारख्या दळणवळणाच्या साधनाच्या पायाभूत सुविधा जेव्हा मजबूत असतात, तेव्हा तो देशही मजबूत असतो. याचा फायदा देशातील सामान्य नागरिकाला होतो, देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना याचा फायदा होतो”, अशा शब्दांत आपल्या भाषणाचा समारोप करत, आधुनिक वंदे भारत ट्रेन राजस्थानच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
पार्श्वभूमी
उद्घाटन करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन जयपूर आणि दिल्ली कॅन्टोनमेंट या स्थानकांदरम्यान धावेल. या वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा 13 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असून, ही गाडी अजमेर आणि दिल्ली कॅन्टोनमेंट या स्थानकांदरम्यान धावेल, आणि जयपूर, अलवर आणि गुरगाव या स्थानकांवर गाडीचे थांबे असतील.
नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाडी दिल्ली कॅन्टोनमेंट आणि अजमेर दरम्यानचे अंतर 5 तास 15 मिनिटांमध्ये गाठेल. याच मार्गावरील सध्याची सर्वात जलद गाडी असलेली शताब्दी एक्स्प्रेस, दिल्ली कॅन्टोनमेंट ते अजमेर हे अंतर 6 तास 15 मिनिटांमध्ये गाठते. अशा प्रकारे याच मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाडीच्या तुलनेत नवीन वंदे भारत एक्सप्रेस 60 मिनिटे अधिक वेगवान असेल.
अजमेर-दिल्ली कॅन्टोनमेंट वंदे भारत एक्सप्रेस ही हाय राइज ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) क्षेत्रावरील जगातील पहिली सेमी हायस्पीड प्रवासी रेल्वे गाडी असेल. या गाडीमुळे पुष्कर, अजमेर शरीफ दर्गा इत्यादींसह राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरचे दळणवळण सुधारेल. दळणवळण सुधारल्यामुळे या प्रदेशातल्या सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळेल.