भारताच्या जी-20 अध्यक्षपदाशी संबंधित पैलूंवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.
भारताचे जी-20 अध्यक्षपद संपूर्ण देशाचे आहे आणि देशाचे सामर्थ्य दाखवण्याची ही एक अनोखी संधी आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले.
पंतप्रधानांनी सांघिक कार्याच्या महत्त्वावर भर दिला आणि विविध जी-20 कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सहकार्य करण्यास सांगितले. जी-20 चे अध्यक्षपद नेहमीच्या मोठ्या महानगरांच्या पलीकडे जाऊन भारतातील अन्य भाग प्रदर्शित करण्यासाठी मदत करेल , अशाप्रकारे आपल्या देशाच्या प्रत्येक भागाचे वेगळेपण समोर आणेल, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात भारतात मोठ्या संख्येने येणारे अभ्यागत आणि विविध कार्यक्रमांवरील आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष केंद्रित असेल यावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या संधीचा उपयोग करून आकर्षक व्यवसाय, गुंतवणूक आणि पर्यटन स्थळे म्हणून नवी ओळख निर्माण कारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संपूर्ण-सरकार आणि संपूर्ण-समाज दृष्टिकोनाद्वारे जी-20 कार्यक्रमांमध्ये लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांनी या बैठकीत आपले विचार मांडले आणि जी-20 बैठकांचे योग्यरित्या आयोजन करण्यासाठी राज्यांनी केलेल्या तयारीवर भर दिला.
या बैठकीला परराष्ट्र मंत्र्यांनीही संबोधित केले आणि भारताच्या जी-20 शेर्पा यांनी सादरीकरण केले.