भारताच्या सामाजिक जीवनामध्ये शिस्तीची भावना जागृत करण्यासाठी एनसीसीची भूमिका महत्वपूर्ण - पंतप्रधान
संरक्षण सामुग्रीची बाजारपेठ बनण्याऐवजी भारत एक प्रमुख उत्पादक देश म्हणून उदयास येईल - पंतप्रधान
सीमावर्ती आणि किनारपट्टीच्या क्षेत्रासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्यावतीने एक लाख छात्रांना प्रशिक्षण; त्यामध्ये एक तृतियांश कन्या छात्रांचा समावेश - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी म्हणजेच राष्टीय छात्र सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तीनही सशस्त्र सेवांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी एनसीसीच्या पथकांच्या संचलनाचे निरीक्षण केले. या पथकांनी पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली. याप्रसंगी छात्रांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, सामाजिक जीवनामध्ये उत्तम शिस्त असेल तर त्या राष्ट्राची सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय चांगली प्रगती होत असते. भारताच्या सामाजिक जीवनामध्ये शिस्तीची भावना जागृत करण्यासाठी एनसीसीची अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेची भूमिका महत्वपूर्ण आहे. गणवेशातली सर्वात मोठी युवा संघटना म्हणून एनसीसी दिवसेंदिवस मोठी होत आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, आज ज्या ठिकाणी एनसीसीचे छात्र आहेत आणि त्या त्या ठिकाणी भारतीयांचे शौर्य आणि परंपरा वृद्धिंगत होत आहे. भारतीय घटनेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम असो किंवा पर्यावरण, जलसंवर्धन यासारखे कार्य असो, अशा कामामध्ये एनसीसीचा सहभाग असतो. कोरोनासारख्या संकटकाळामध्ये एनसीसीने दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.

आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेली कर्तव्ये पार पाडण्याचे कार्य सर्व नागरिकांवरच अवलंबून असते. ज्या ज्या वेळी नागरिक आणि समाज या कर्तव्यांचे पालन करतात त्याचवेळी अनेक आव्हानांवर मात करून यशस्वी होता येते, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘आपल्या देशाच्या बहुतांश भागामध्ये पसरलेल्या नक्षलवादाचा आणि माओवादाचा कणा मोडून काढणा-या सुरक्षा दलाचे कार्य, त्यांचे शौर्य आणि त्यांच्यामध्ये असलेली कठोर कर्तव्य पालनाची भावनाच कामी आली. आता आपल्या देशात अगदी मर्यादित भागामध्ये नक्षलवादाचा धोका शिल्लक राहिला आहे. इतकेच नाही तर, नक्षलग्रस्त भागातील युवक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत आहेत, त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून दिला आहे.’’

पंतप्रधान म्हणाले, कोरोना काळ अतिशय आव्हानात्मक होता, परंतु याच काळात देशाला अनेक संधी प्राप्त झाल्या. देशाला आपल्या क्षमतांमध्ये सुधारणा करता आली. सर्वसामान्यांनी आपल्यातले उत्कृष्ट देऊन देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी मार्ग निवडले. या सर्व गोष्टींमध्ये युवावर्गाची भूमिका अतिशय महत्वाची ठरली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

एनसीसीचा सीमेवर आणि किनारपट्टीवरील क्षेत्रामध्ये विस्तार करण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणाचे स्मरण करून दिले. त्यावेळी सीमेवरील 175 जिल्ह्यांमध्ये एनसीसीच्या नव्या विस्तारलेल्या भूमिकेची माहिती जाहीर केली होती. लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यावतीने सुमारे एक लाख छात्रांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. यामध्ये एक तृतियांश कन्या छात्र असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीसीच्या प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. याआधी केवळ एकच गोळीबार मैदान असे आता 98 गोळीबार मैदानांची स्थापना करण्यात येत आहे. मायक्रो फ्लाइट मैदानांची संख्या पाचवरून 44 पर्यंत नेण्यात आली आहे. तर रोइंग सुविधा केंद्रांची संख्या आता 11 वरून 60 करण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

आज ज्या मैदानावर कार्यक्रम होत आहे, ज्यांचे नाव या मैदानाला दिले आहे, त्या फील्ड मार्शल करिअप्पा यांची आज जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. सशस्त्र दलामध्ये कन्या छात्रांना नवीन संधी मिळत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून अलिकडच्या काळामध्ये एनसीसीत मुलींच्या संख्येत 35 टक्के वाढ झाल्याचे सांगितले. 1971 मध्ये झालेल्या बांग्लादेश युद्धातल्या विजयाला 50 वर्षे झाली, त्यानिमित्त पंतप्रधानांनी या युद्धातल्या हुतात्म्यांना श्रद्धाजंली अर्पण केली. सर्व छात्रांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आर्वजुन भेट देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. तसेच शौय पुरस्कार पोर्टलला भेट देऊन माहिती घेण्यास सांगितले. कोणत्याही नवीन कल्पना सर्वात वेगाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त एनसीसी डिजिटल व्यासपीठाचाही त्यांनी उल्लेख केला.

यंदा भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन आहे, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, नेताजींच्या गौरवपूर्ण कारकिर्दीतून सर्वांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. आता आगामी 25-26 वर्षानंतर भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करण्याची वेळ येणार आहे, अशावेळी तुमच्यासारख्या युवकांनी अधिक जागरूक, दक्ष राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

देशाच्या सीमेचे रक्षण असो कि एखाद्या विषाणू विरोधातली लढाई चे आव्हान परतवून लावण्यासाठी देश सक्षम आहे, असे सांगून पंतप्रधानांनी देशाकडे जगातले सर्वोत्तम युद्ध तंत्रज्ञान असल्याची माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि ग्रीस यांच्या मदतीने नवीन राफेल लढाऊ विमानांसाठी हवेमध्ये इंधन भरण्याचे कार्य करण्यात येत आहे, अशा व्यवहारांमुळे आखाती देशांबरोबर आपले संबंध दृढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर भारताने संरक्षण सामुग्रीपैकी 100 पेक्षा जास्त उपकरणे देशांतर्गत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. वायुदलाच्या 80 तेजस लढाऊ विमानांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. यापुढे भारताची ओळख ही संरक्षण सामुग्रीची बाजारपेठ म्हणून नाही तर त्याऐवजी संरक्षण उपकरणांचा प्रमुख उत्पादक देश अशी झाली पाहिजे, या दृष्टीने आम्ही विचार केला आहे.

एनसीसीच्या छात्रांनी ‘व्होकल फॉर लोकल’ यावर भर द्यावा असा आग्रह पंतप्रधानांनी यावेळी केला. युवकांनी आता खादीच्या नव्या रूपाकडे लक्ष द्यावे आणि फॅशन, विवाहासारखे समारंभ, उत्सण, सण आणि इतरवेळीही खादीचा वापर करावा. स्थानिक गोष्टींच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. स्वावलंबी भारतासाठी तरूणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे महत्वाचे आहे. यासाठी सरकार तंदुरूस्ती, शिक्षण आणि कौशल्य विकसन या क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहे. अटल टिंकरिंग लॅब, कुशल भारतासाठी आधुनिक शिक्षण संस्था आणि मुद्रा योजना यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने कार्य होत आहे. एनसीसीमध्ये इतरही विशेष कार्यक्रमाबरोबरच फिट-इंडिया आणि खेलो इंडियाची चळवळ वाढीस लागली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आवश्यकता, गरज आणि आवड यांच्यानुसार विषय निवडीसाठी लवचिकता आणण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्रीत होत आहे. या सुधारणांचा आणि नवीन संधींचा युवकांनी लाभ घेतला तर देशाची वेगाने प्रगती होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi