कारगिल विजय दिवसाला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.
भारताच्या शौर्य आणि समर्पणाची गाथा असलेल्या कारगिल युद्धातील प्रेरणादायी पराक्रमाचे आज संपूर्ण देश स्मरण करत आहे. कारगिलचे संरक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशाप्रती आपले कर्तव्य बजावणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. 20 वर्षांपूर्वी मिळवलेल्या या अतुलनीय पराक्रमाची गाथा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
कारगिल विजय हा भारताच्या वीर सुपुत्र आणि सुपुत्रींच्या पराक्रमाचा विजय आहे, भारताचा निश्चय, भारताची क्षमता आणि धैर्याचा विजय आहे. भारताची प्रतिष्ठा आणि शिस्त, भारताच्या आशा आणि प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्यभावनेचा हा विजय आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
युध्द हे केवळ सरकार किंवा सेनाच लढत नसते, तर संपूर्ण देश ते युध्द लढत असतो, असे मोदी म्हणाले. पुढच्या पिढ्यांसाठी सैनिक आपले सर्वस्व पणाला लावतात, बलिदान देतात. ह्या सैनिकांचा पराक्रम आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
2014 मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर काहीच दिवसांनी आपण कारगिलला भेट दिली होती. त्याआधी,सुमारे 20 वर्षांपूर्वी, ते कारगिलच्या शिखरावर गेले होते, अशी आठवणही पंतप्रधानांनी सांगितली. कारगिल मध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण करतांनाच संपूर्ण देश त्यावेळी या जवानांसोबत खंबीरपणे उभा होता, असे पंतप्रधान म्हणाले.अनेक युवकांनी सैनिकांसाठी रक्तदान केले, तर लहान मुलांनीही आपले साठवलेले पैसेही जवानांच्या मदतीसाठी पाठवले होते, याचे स्मरण त्यांनी केले.
जर आपण आपल्या जवानांची काळजी घेतली नाही, तर भारतमातेचे पुत्र म्हणून आपण आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडू, असे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हंटले होते, अशी आठवण त्यांनी केली. ह्याच विचारातून त्यांच्या सरकारने सैनिकांसाठी, “एक श्रेणी-एक निवृत्तीवेतन” लागू केली, शहीद जवानांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ आणि राष्ट्रीय स्मारकाची बांधणी अशी कामे केली आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
पाकिस्तानने कायमच जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला असला तरी 1999 साली आपण त्यांना रोखून धरले, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा दृढनिश्चय होता, आणि त्यावर पाकिस्तान कडे काहीही उत्तर नव्हते, असेही मोदी यांनी सांगितले. त्याआधी सामंजस्याची भूमिका घेत भारताने पाकिस्तानसमोर शांततेचा प्रस्ताव स्वीकारला होता, त्यामुळे जागतिक पटलावर भारताची शांततेची भूमिका मांडण्यात वाजपेयी यशस्वी झाले होते, असेही मोदी यांनी सांगितले.
भारताच्या आजवरच्या इतिहासात, आपण कधीही कोणावर आक्रमण केले नाही. भारतीय सेना या कायमच शांतता आणि मानवतेच्या रक्षक म्हणून जगभरात मानल्या जातात, असे पंतप्रधानांनी सांगितले.
इस्त्रायलमधील हैफा मुक्तीच्या लढाईत भारतीय जवानांनी गाजवलेले शौर्य, पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्रांसमध्ये उभारण्यात आलेले स्मृतीस्थळ याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. महायुद्धामध्ये लढताना भारताचे एक लाखपेक्षा जास्त जवान शहीद झाले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अनेक शांतता मोहिमांमध्येही भारतीय जवानांनीच सर्वोच्च त्याग केला, याची आठवण पंतप्रधानांनी केली. नैसर्गिक संकटांच्या वेळी भारतीय लष्कर समर्पण आणि सेवाभावाने करत असलेल्या कार्याचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
दहशतवाद आणि छद्म युध्द हे आज संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. जे मैदानावरच्या युद्धात पराभूत झाले, त्यांनी आता ह्या छुप्या युद्धाचा आधार घेतला असून आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ते दहशतवादाला पाठींबा देत आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांचा समाचार घेतला. ज्यांचा मानवतेवर विश्वास आणि त्या सर्वांनी सैन्यदलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.दहशतवादाचा प्रभावीपाने सामना करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आता या संकटांनी नवे रुप घेतले असून हे युध्द अवकाश आणि सायबर विश्वात पोहोचले आहे, त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी सैन्यदले देखील अत्याधुनिक व्हायला हवी, असे मोदी म्हणाले. जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तिथे भारत कधीही कोणापुढेच झुकणार नाही, कोणाकडेही कसली याचना करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याच संदर्भात,अरिहंतच्या माध्यमातून भारताने तिन्ही क्षेत्रात विकसित केलेली अण्वस्त्र क्षमता तसेच A-SAT ह्यां उपग्रह विरोधी चाचणीचा त्यांनी उल्लेख केला. भारतीय लष्करी दलांचे आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे, असं सांगत, संरक्षण क्षेत्रात‘मेक इन इंडीया’च्या माध्यमातून खाजगी क्षेत्रांचा सहभाग वाढवला जात आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या सीमावर्ती भागात, पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. सीमाक्षेत्राच्या विकासासाठी, तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
भाषणाच्या शेवटी, पंतप्रधान म्हणाले की 1947 साली संपूर्ण देश स्वतंत्र झाला. 1950 साली संपूर्ण देशासाठी लिहिलेली राज्यघटना स्वीकारण्यात आली. तसेच, कारगिल युद्धात संपूर्ण देशासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी 500 जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
या सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.