पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या माधव दास पार्क येथे आयोजित दसरा सोहळ्याला उपस्थित राहिले.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, 2022 साली देश जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प करायला हवा.
“‘भारतीय सण हे केवळ साजरे करण्यासाठी नाहीत, तर समाजाला शिक्षित करण्याचे माध्यम देखील आहे. हे सण आपल्याला समाजातील मूल्यांप्रति जागरुक करतात, तसेच एक समाज म्हणून एकत्र राहण्याची शिकवण देतात.'
पंतप्रधान म्हणाले की, हे सण आपल्या एकत्रित सामर्थ्याचे, सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचे आणि समृध्द सांस्कृतिक परंपरांचे प्रतिबिंब आहे. याशिवाय, ते शेती, नद्या, पर्वत, निसर्ग आदींशी जोडलेले आहेत.
या कार्यक्रमादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या प्रतिमांच्या दहनप्रसंगी पंतप्रधान उपस्थित होते.
नवी दिल्लीत माधव दास पार्क इथे दसऱ्यानिमित्त पंतप्रधानांनी केलेले संबोधन:
विजयादशमीच्या पवित्र समयी आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा.
आपल्या देशात, उत्सव एका अर्थाने सामाजिक शिक्षणाचे माध्यम आहेत.
Eआपल्या प्रत्येक उत्सवात समाजाची, समूहाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवणे, समाजाप्रती संवेदनशील बनवणे, मूल्ये कायम स्मरणात ठेवणे, वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी अखंड प्रयत्न करत राहणे याचे जणू शिक्षणच देणे ही आपल्या उत्सवांची परंपरा राहिली आहे.
आपले उत्सव शेतीशी जोडले गेले आहेत,नदी-डोंगराशी जोडले गेले आहेत, इतिहासाशी जोडले गेले आहेत, सांस्कृतिक परंपरांशी जोडले गेले आहेत.
हजारो वर्षांनंतरही प्रभू राम, प्रभू कृष्ण यांची जीवन गाथा आजही समाजाला प्रेरणा देत राहते. नवरात्रीच्या पवित्र उत्सवानंतर विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याच्या दहनाची परंपरा आहे. रावण दहन हा या परंपरेचा भाग आहे. मात्र एक नागरिक या नात्याने रावणाच्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी समाजाने अखंड सजग प्रयत्न करायला हवेत.
अशा उत्सवातून केवळ मनोरंजन नव्हे तर एखादे उद्दिष्ट ठेवायला हवे. अशा उत्सवातून काही करण्याचा, घडवण्याचा संकल्प करायला हवा. अयोध्येतून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर निघालेले प्रभू राम, संपूर्ण वाटचालीत संघटन कौशल्याचे असे दर्शन घडवतात की श्रीलंका विजयात समाजाच्या प्रत्येक थरातली व्यक्ती जोडली गेली होती. मनुष्य, वानर आणि निसर्गानेही त्यांना साथ दिली. लोक समूहाची किती मोठी अद्भुत शक्ती असेल, प्रभू रामचंद्रांनी एवढ्या सामर्थ्याने आपल्यासमवेत ही शक्ती जोडली.विजय प्राप्त केल्यानंतरही त्याच नम्रतेने जन-समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले.
आज विजयादशमीच्या पवित्र पर्वात आपणही संकल्प करूया की 2022 मध्ये भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असेल त्यासाठी आपणही काही उद्दिष्ट ठेवू या, ते साध्य करण्यासाठी मार्ग निश्चित करू आणि 2022 पर्यंत, एक नागरिक म्हणून देशासाठी सकारात्मक योगदान देऊ. आपल्या नेत्यांनी जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्याचा लढा दिला, त्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी प्रभू रामचंद्रांप्रमाणे आपणही संकल्प करून वाटचाल करावी. माझ्या अनेक शुभेच्छा. आपणा सर्वाना विजयादशमीच्या पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा.