पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत या जगातल्या सर्वाधिक मोठ्या आरोग्य विमा योजनेसाठी नवीन मोबाईल ॲपचा प्रारंभ केला. या ॲपद्वारे देशभरातल्या 10.70 कोटी गरीब कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाईल.
पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत झालेल्या आरोग्य मंथन या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी होते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री-जन आरोग्य योजना PM-JAY या योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
गेल्या एक वर्षातील PM-JAY योजनेचा प्रवास दर्शवणाऱ्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली.
पंतप्रधानांनी ‘आयुष्मान भारत स्टार्ट अप ग्रॅण्ड चॅलेंज’चा प्रारंभही केला तसेच या निमित्त काढलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशनही केले.
आयुष्मान भारतचे पहिले वर्ष निर्णय, समर्पण आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणारे होते, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आमच्या दृढनिश्चयामुळे आम्ही भारतात जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना राबवत आहोत, असे ते म्हणाले.
देशातल्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक गरीबाला वैद्यकीय सुविधा सहजगत्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
या यशामागे समर्पणाची भावना असून देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ते दिसून येते, असेही ते म्हणाले.
आजारापासून आपली मुक्तता होऊ शकते अशी आशा देशातल्या लाखो गरीब लोकांमध्ये निर्माण करणे हे मोठे यश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या एका वर्षात कोणत्याही व्यक्तीची जमीन, घर, दागिने किंवा इतर वस्तू आरोग्य, वैद्यकीय तपासासाठी गहाण टाकण्यापासून वाचवता आल्या तर ते आयुष्मान भारतचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले.
गेल्या एक वर्षात या योजनेअंतर्गत 50 हजार गरीबांना त्यांचा जिल्हा तसेच राज्याबाहेर अधिक चांगल्या सुविधांचा लाभ मिळाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
नव भारतासाठी आयुष्मान भारत हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यात ही योजना महत्वाची भूमिका बजावते म्हणूनच नाही तर ही योजना देशातल्या 130 कोटी लोकांचे समर्पण आणि शक्ती यांचे प्रतीक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण भारतासाठी आयुष्मान भारत हा केवळ सामुदायिकच नव्हे तर आरोग्यदायी भारतासाठी सर्वंकष उपाय आहे. आयुष्मान भारत म्हणजे सरकार भारतापुढील प्रश्न आणि आव्हानं यांचा एकत्रितपणे विचार करत असलेल्या प्रक्रियेचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्मान भारतमुळे देशातल्या कुठल्याही भागात रुग्णांना खात्रीशीररित्या चांगले उपचार उपलब्ध होत आहेत.
आयुष्मान भारत योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे आरोग्य मंथन या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेतील सर्व महत्वाच्या भागधारकांना एकत्रित येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आरोग्य मंथनमागील मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षभरात या योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या आव्हानांविषयी चर्चा करणे आणि या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सुसंवाद साधणे हा ही या कार्यक्रमाचा उद्देश आहे.