पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दोन प्रकल्पांच्या पायाभरणीसाठी ई-कोनशीला ठेवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील यात सहभागी झाले होते.
भारत-बांग्लादेश मैत्री पाईपलाईन आणि ढाका-टोंगी-जॉयदेबपुर रेल्वे प्रकल्पांचा यात समावेश आहे. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी उभय देशांमधील सहकार्य हे जगासाठी एक उदाहरण असल्याचे सांगितले. उभय देश भौगोलिकदृष्ट्या शेजारी तर भावनिक दृष्ट्या कुटुंब असल्याचे ते म्हणाले. प्रस्तावित पाईपलाईनमुळे केवळ बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था मिळणार नाही तर दोन्ही देशांमधील संबंधही दृढ होतील असे ते म्हणाले. प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांमुळे बांग्लादेशात राष्ट्रीय आणि शहरी वाहतूक व्यवस्था बळकट होण्यास योगदान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण पुढीलप्रमाणे-
बांग्लादेशच्या पंतप्रधान, महामहिम शेख हसीना,
भारत आणि बांग्लादेशचे मंत्री,
आणि या थेट प्रसारणात सहभागी झालेले भारत आणि बांग्लादेशचे सहकारी,
नमस्कार!
काही दिवसांच्या अंतराने ही आपली दुसरी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे.
आपल्या सहज संपर्काचे कारण तंत्रज्ञान हे नसून यामागे भारत-बांग्लादेश संबंधांचा परस्पर वेग आणि निर्बिवाद प्रगती आहे.
भौगोलिकदृष्ट्या आपण शेजारी देश आहोत. मात्र, भावनात्मक दृष्ट्या आपण कुटुंब आहोत. एकमेकांच्या सुखदु:खात साथ देणे, एकमेकांच्या विकासात मदत करणे ही आपल्या कौटुंबिक मूल्यांची देणगी आहे.
गेल्या काही वर्षात आपल्या सहकार्याने जगाला दाखवून दिले आहे की, जर दोन शेजारी देशांनी ठरवले तर काय काय करता येऊ शकते.
दशकांपूर्वीचा सीमावाद असेल किंवा विकास सहकार्याचे प्रकल्प असतील, आपण सर्वच विषयांवर अभूतपूर्व प्रगती केली आहे.
या प्रगतीचे श्रेय मी तुमच्या कुशल नेतृत्वाला देतो आणि यासाठी मी तुमचे हार्दिक अभिनंदन देखील करतो.
आज ज्या भारत-बांग्लादेश मैत्री पाईपलाईनवर काम सुरु झाले आहे. त्यामुळे विकासासाठी परस्पर सहकार्याच्या महाकाव्यात एक नवीन अध्याय समाविष्ट होईल.
कुठल्याही देशाच्या विकासासाठी ऊर्जा एक पायाभूत आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे की ही पाईपलाईन बांग्लादेशाच्या महत्वाकांक्षी विकास उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आधार बनेल.
विशेषत: बांग्लादेशच्या उत्तरी भागात ही पाईपलाईन स्वस्त दरात ऊर्जा उपलब्ध करेल.
बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेबरोबर आपल्या संबंधांना ही पाईपलाईन ऊर्जादायी बनवेल.
या पाईपलाईनसाठी भारताने जरी अर्थसहाय्याने केले असले तरी आमच्यासाठी आनंदाची बाब ही आहे की, हे काम पूर्ण झाल्यावर ही पाईपलाईन बांग्लादेश सरकार आणि जनतेला समर्पित केली जाईल.
याच प्रकारे आज आम्ही ज्या रेल्वे प्रकल्पावर काम सुरु केले आहे, तो केवळ ढाकाच्या सामान्य जनतेला आणि रस्ते वाहतुकीला दिलासा देणार नाही तर मालवाहतुकही वाढवेल.
मला विश्वास आहे की, या रेल्वे प्रकल्पामुळे बांग्लादेशच्या राष्ट्रीय आणि शहरी वाहतुक सुधारण्याच्या मोहिमेत मदत मिळेल.
महामहिम, तुमचे स्वप्न आहे की आपल्यामध्ये 1965 च्या पूर्वीची संपर्क यंत्रणा पूर्ववत व्हावी. यातून आम्हाला प्रेरणा मिळते.
मला आनंद आहे की, ढाका-टोंगी-जॉयदेबपूर सारखे प्रकल्प आपल्या संपर्क व्यवस्थेला 21 व्या शतकाच्या गरजांनुसार आकार देत आहेत.
केवळ दहा दिवसात आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पाच प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. हा वेग, ही गती तुमच्या मजबूत आणि कुशल नेतृत्वाशिवाय शक्य नव्हती.
मला विश्वास आहे की, आगामी काळात भारत आणि बांग्लादेशच्या जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण याच भावनेने काम करत राहूया.
महामहिम, माझे भाषण संपवण्यापूर्वी मी तुमचे 28 सप्टेंबरला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन करु इच्छितो.
भारतात आम्ही सर्वजण तुमच्या दीर्घायुषी, आरोग्यदायी आणि यशासाठी प्रार्थना करतो आणि आशा करतो की बांग्लादेशच्या विकास यात्रेत आणि भारत-बांग्लादेश मैत्रीसाठी तुमचे मार्गदर्शन मिळत राहील.
धन्यवाद!