स्वामी चिदानंद सरस्वतीजी,
शंकराचार्य दिव्यानंद तीर्थजी महाराज,
स्वामी असंगानंद सरस्वतीजी,
साध्वी भगवती सरस्वतीजी,
आचार्य आणि मित्रहो,
वार्षिक आंतरराष्ट्रीय योग महोत्सवात, व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे, आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे.
सुरवातीलाच मला, आपल्या शास्त्रज्ञांनी, नुकत्याच केलेल्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल तुम्हाला सांगायचे आहे.
गेल्या महिन्यात आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांनी आगळा विक्रम केला.
एकाच प्रक्षेपक यानातून त्यांनी 104 उपग्रह अवकाशात सोडले.
यापैकी 101 उपग्रह, अमेरिका, इस्रायल, स्विझर्लंड, नेदरलँड, कझाकस्तान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचे होते.
आपल्या संरक्षण शास्त्रज्ञांनीही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
आपल्या शहरांना, क्षेपणास्त्र हल्ल्यापासून संरक्षण देणाऱ्या, जास्त उंचीवरील, बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची त्यांनी 11 फेब्रुवारीला यशस्वी चाचणी केली.
शत्रूच्या, कमी उंचीवरच्या क्षेपणास्त्राला छेद देणाऱ्या, क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करून त्यांनी शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला.
सध्या केवळ चार राष्ट्रांकडे अशी क्षमता आहे.
आपल्या अंतराळ आणि संरक्षण शास्त्रज्ञांच्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
आपल्या अंतराळ आणि संरक्षण वैज्ञानिकांच्या कामगिरीने, देशाची मान संपूर्ण जगात अभिमानाने उंचावली आहे.
बंधू-भगिनींनो,
विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याचबरोबरीने आत्म्याचा सखोल शोध घेण्यावर आपणा भारतीयांचा विश्वास आहे. विज्ञान आणि योगाभ्यास अशा दोन्ही आघाडयांवरच्या संशोधनावर आपला विश्वास आहे.
आंतरराष्ट्रीय योग महोत्सवासाठी, ऋषिकेशपेक्षा उत्तम जागा कदाचित असणारही नाही.
पवित्र गंगा नदीच्या काठावर ऋषिकेश इथे, जगाच्या वेगवेगळ्या भागातून, विभिन्न आणि मोठ्या प्रमाणावर, जमलेला हा मेळा पाहून जर्मनीमधले महान विद्वान मॅक्स मुलर यांचे विचार मी सांगू इच्छितो, ते म्हणतात,
“मला जर विचारणा झाली की, कोणत्या गगनाखाली मानवी मन, संपूर्ण विकसित झाले आहे, आयुष्यातल्या सर्वात कठीण समस्यांवर सखोल चिंतन करून, त्यावर तोडगा काढला आहे, तर मी भारताकडे निर्देश करेन ”
मॅक्स मुलर पासून ते ऋषिकेश मध्ये आत्ता उपस्थित असलेल्या आपल्यापैकी अनेक, जे, आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत, असे सर्व, ज्यावेळी त्यांना, “स्व” चा खरा शोध साद घालू लागतो, त्यावेळी भारत हेच मुक्कामाचे स्थान असते.
आणि अनेकदा हा शोध त्यांना योगापर्यंत घेऊन येतो.
योग ही जनतेला जीवनाशी जोडणारी आणि मानवजातीला निसर्गाशी पुन्हा जोडणारी नियमावली आहे.
योगसाधनेमुळे स्व पणाची आपली संकुचित जाणीव विस्तारून, त्यामध्ये आपले कुटुंब, समाज आणि मानवजातीचा समावेश होतो.
म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, "विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू."
योगसाधनेमुळे, तादात्म्याची भावना निर्माण होते- मन, शरीर आणि विचाराची एकतानता साधली जाते. आपले कुटुंब, आपण राहतो तो समाज, आपले सहकारी, पशु-पक्षी, वृक्ष, आपण या सुंदर ग्रहावर ज्यांच्यासमवेत राहतो त्या सर्वांबरोबर एकतानता साधणे ....म्हणजे योगसाधना.
या प्रवासात आपल्याला उत्तम आरोग्य, मनशांती आणि आयुष्यात भरभराटही लाभते.
योगामुळे आचार-विचार, बुद्धी आणि निष्ठा यामध्ये चांगला बदल घडून उत्तम व्यक्ती घडवली जाते. योग म्हणजे केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम असा विचार करणे अयोग्य ठरेल.
शारीरिक व्यायाम यापलीकडे योग व्यापून राहिला आहे.
आधुनिक जीवनातल्या, ताणतणावापासून मुक्तीच्या शोधात, समाधानाच्या शोधात, अनेकदा, तंबाखू, मद्य आणि अगदी अंमली द्रव्यांकडेही माणूस ओढला जातो.
योग आपल्याला चिरंतन, सुलभ आणि आरोग्यदायी पर्याय देतो .योग साधना केल्याने तणावापासून मुक्ती तसेच जीवनशैलीमुळे उदभवणाऱ्या, तन - मनाच्या अनेक जुनाट समस्या कमी होण्यासाठी मदत झाल्याची भरपूर उदाहरणे आहेत.
दहशतवाद आणि हवामान बदल या दोन आव्हानांचा सध्याच्या जगाला धोका आहे.
या समस्यांच्या स्थायी आणि शाश्वत निराकरणासाठी, संपूर्ण जग, भारताकडे आणि योगाभ्यासाकडे पाहत आहे.
जागतिक शांततेविषयी बोलतांना, राष्ट्रांमध्ये शांततेचे वातावरण असले पाहिजे. समाजात शांतता असेल तरच हे शक्य होईल. कुटुंबात शांतता नांदत असेल तरच समाजात शांतता अबाधित राहील.
शांत, समाधानी व्यक्तीच शांत आणि स्थिर कुटुंब निर्माण करू शकतात. व्यक्ती, कुटूंब, समाज, राष्ट्र आणि पर्यायाने संपूर्ण जगात शांतता आणि सलोखा निर्माण करण्याचा, योग हा मार्ग आहे.
योगाच्या माध्यमातून आपण नव्या युगाची निर्मिती करू शकतो - एकता आणि सलोख्याचे युग. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्याविषयी आपण जेव्हा बोलतो, तेव्हा उपभोगवादी किंवा भोगाच्या जीवनशैलीकडून आपण योगाकडे वळले पाहिजे.
शिस्तबद्ध आणि विकासाकडे वाटचाल करणाऱ्या जीवनासाठी योग हा भक्कम स्तंभ ठरत आहे.
व्यक्तिगत लाभावर भर दिला जात आहे अशा काळात, एखाद्या बाबीतून काय प्राप्त होईल अशा काळात योग आपल्याला स्फूर्तिदायी, वेगळा दृष्टिकोन देतो.
एखाद्या गोष्टीतून काय मिळेल याविषयी नव्हे तर कशाचा त्याग करता येईल, कशापासून सुटका मिळवता येईल याविषयी योग सांगतो.
म्हणूनच प्राप्तीऐवजी, योग आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो.
स्वामी चिदानंद सरस्वतीजी, यांनी परमार्थ निकेतनच्या कार्यातून, ही विचारधारा कशी अंगिकारता येते हे दर्शवले आहे.
संपूर्ण जगभरात योग प्रसारासाठी परमार्थ निकेतन करत असलेल्या कार्याची मी प्रशंसा करतो. हिंदुत्वाविषयीच्या विश्वकोशाच्या 11 खंडांच्या संकलनासाठी स्वामीजींचा सक्रिय सहभाग प्रशंसनीय आहे. त्यांच्या कार्याची सघनता थक्क करणारी आहे.
स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शतकाच्या तिमाहीपेक्षाही कमी काळात या कार्याची पूर्तता केली.
हिंदुत्वाविषयीच्या सर्व पैलूंचा केवळ 11 खंडात त्यांनी समर्थपणे समावेश केला आहे.
आध्यत्मिक जिज्ञासू, योगी आणि अगदी जनसामान्यांसाठीही हा विश्वकोश बाळगणे उपयुक्त ठरणार आहे.
हिंदुत्वाविषयीच्या विश्वकोशासारखे कार्य, विविध भाषांमध्ये उपलब्ध झाल्यास, देशातल्या इतर परंपरा आणि संस्कृती विषयी समज आणि जाणीव वाढीला लागेल.
यामुळे, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढून, परिणामी, द्वेषमूलक भावना, गैरसमज, कमी होऊन, समाजात सहकार्य, शांतता आणि सलोखा वृद्धिंगत होईल.
परमार्थ निकेतनने, देशात स्वच्छतेसाठीच्या व्यापक मोहिमेत, स्वच्छ भारत अभियानात, सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल, त्यांची प्रशंसा करण्याची संधी मी घेऊ इच्छितो.
वैयक्तिक स्वच्छतेवर, भारतीय परंपरेत मोठा भर देण्यात आला आहे. केवळ वैयक्तिक स्वच्छताच नव्हे तर घरे, काम करण्याच्या जागा, पूजास्थळे स्वच्छ ठेवण्यालाही भरपूर प्राधान्य पुरवण्यात आले आहे.
या ठिकाणी, चार भिंतीच्या आत कोणत्याही प्रकारचा कचरा, अस्वच्छता म्हणजे अशुद्धता.
अगदी आपल्या पुराण शास्त्रातही, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व आढळते.
मात्र, मोकळ्या जागांमधे, अस्वच्छता करण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसते.
पाश्चिमात्य आणि इतर विकसित देशामध्ये मात्र अशी प्रवृत्ती दिसत नाही. इथे, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यातल्या संबंधाची अधिक स्पष्टपणे जाणीव दिसते.
जल, वायू आणि जमीन यासारख्या सार्वजनिक मालमत्तांची स्वच्छता आणि त्याविषयीची जाणीव बाळगणे महत्वाचे आहे.
म्हणूनच उत्तम आरोग्य हा सामूहिक प्रयत्न आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे, सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता यांची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.
इतिहास काळापासून मंदिरे, आपल्या समाजात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
साधारणपणे, ही मंदिरे, विस्तीर्ण आवारात आणि निवासी भागापासून दूर बांधलेली असतात.
तथापि, काळाच्या ओघात, बाजारपेठा, घरांनी हा भाग वेढला जातो. त्यातूनच अस्वच्छ परिसराची मुख्य समस्या इथे भेडसावते.
या समस्येवर तोडगा म्हणून, स्वच्छ भारत अभियानात आता 'स्वच्छ आयकॉनिक प्लेसेस' याचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात आम्ही, कामाख्य मंदिर, जगन्नाथ पुरी, मीनाक्षी मंदिर, तिरुपती, सुवर्ण मंदिर आणि वैष्णोदेवी मंदिराचा समावेश केला असून ही मंदिरे आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.
म्हणूनच स्वच्छ भारतासाठीचे, स्वच्छ भारत अभियान आता देशाच्या श्रद्धा आणि अध्यात्माशी जोडले गेले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव सप्टेंबर 2014 ला मी मांडला तेव्हा योग विषयक जागतिक औत्सुक्यात मोठी वाढ आपण अनुभवली.
त्याला मिळालेल्या उस्फुर्त पाठिंब्याच्या वर्षावाची मी कल्पना केली नव्हती, हे मी मान्य करतो.
जगभरातल्या, देशांनी अभूतपूर्व संख्येने आपल्याला पाठिंबा दिला.
आणि आता प्रत्येक वर्षी, 21 जून या दिवशी संपूर्ण जग, योग दिनाच्या निमित्ताने एकत्र येते. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी इतक्या मोठया संख्येने राष्ट्रांनी एकत्र येणे म्हणजे योगाच्या, एकत्र आणण्याच्या तत्वाचा दाखलाच आहे.
नव्या युगाचा अग्रदूत बनण्याची क्षमता योगामध्ये आहे - शांतता, करुणा, बंधुत्व आणि मानवजातीच्या सर्वांगिण कल्याणाचे, प्रगतीचे युग.
महिला आणि पुरुष वर्ग,
शक्तीमान अशा हिमालयाचे आशीर्वाद, तुमच्यावर सदैव राहो.
हजारो वर्षांपासून आमच्या ऋषी-मुनींनी ध्यानधारणा केली अशा गंगा नदीच्या काठी, या योग महोत्सवात, परमानंद आणि संतृप्तीची अनुभूती आपल्याला लाभो.
अध्यात्मिक शहर असलेल्या ऋषिकेशमधला आपला मुक्काम आणि परमार्थ निकेतनच्या पवित्र वातावरणाचा आपण लाभ घ्यावा.
योगसाधनेचा प्रत्येकाला आणि सर्वाना लाभ व्हावा.
धन्यवाद. खूप खूप आभार.
There can be no better place than Rishikesh to host the @IntlYogaFest : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 2, 2017
There is ample evidence that practicing Yoga helps fight stress and life-style related issues: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 2, 2017
Through Yoga, we will create a new Yuga of togetherness & harmony: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 2, 2017
I appreciate the work being done by @ParmarthNiketan in bringing Yoga closer to people across the world: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 2, 2017
I wish that the @IntlYogaFest becomes a grand success: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 2, 2017