आज वर्ष 2017चा शेवटचा दिवस आहे आणि माझे सद्भाग्य आहे की मला आजच्या दिवशी श्री नारायण गुरु आणि मंचावर उपस्थित महनीय संतांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.
श्री नारायण गुरु यांच्या आशीर्वादाने 2018 वर्षांचा पहिला प्रकाशकिरण, संपूर्ण जगासाठी शांती-सद्भावना आणि उन्नतीची नवी पहाट घेऊन येणारा ठरेल, अशी माझी अपेक्षा आणि इच्छा आहे.
शिवगिरी मठात येणे हा माझ्यासाठी नेहमीच एक सुखद आध्यात्मिक अनुभव ठरला आहे. आणि या शिवगिरी यात्रेचा शुभारंभ कारण्याची संधी मला देऊन आपण माझे ते सुख अधिकच वाढवले आहे. यासाठी मी श्री नारायण धर्म ट्रस्ट आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्या देशाचे आणि समाजाचे एक वैशिष्ट्य आहे , ते म्हणजे आपल्या अंतर्गत उणीवा आणि अपप्रवृत्तींना बाजूला करत स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आतल्या आत निरंतर सुरु असते. या प्राक्रियेला गती देण्यासाठी, वेळोवेळी संत ऋषी-मुनी , महनीय व्यक्ती कार्य करत असतात. समाजातल्या अनिष्ट प्रथा-प्रवुत्तींना नष्ट करण्यासाठी हे पुण्यात्मे आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात. परमपूज्य स्वामी नारायण गुरुजी यांच्यासारख्या पुण्यात्म्याने देखील, जातीभेद, उच्च नीच भेद , संप्रदायवाद या सगळ्याविरोधात समाजाला जागृत केले, एकत्र केले. आज शिक्षण क्षेत्रातल्या यशाबद्दलची चर्चा असेल किंवा मग सामाजिक अनिष्ट प्रथांपासून मुक्ती, अस्पृश्यतेविषयी समाजात निर्माण झालेला राग, या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण आज बघतो आहोत, त्या अशा सहजासहजी झालेल्या नाहीत. आपण कल्पना करू शकतो की श्री नारायण गुरूंना त्या काळात या अनिष्ट प्रथा घालवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले असतील. किती अडचणींचा सामना करावा लागला असेल.
मित्रांनो,
श्री नारायण गुरुजींनी एक मंत्र दिला होता.
“Freedom through Education,
Strength through Organisation
Economic Independence through Industries.”
म्हणजेच,
शिक्षणातून मुक्ती
संघटनेतून शक्ती
आणि,
उद्योगातून आर्थिक स्वावलंबन !
समाजात सुधारणा येण्यासाठी, दलित-पीडित -शोषित आणि वंचितांना सशक्त करण्यासाठी त्यांनी हा मार्ग सुचवला होता. जेव्हा गरीब-दलित आणि वंचितांकडे शिक्षणाची शक्ती असेल, तेव्हाच ते पुढे जातील, सशक्त बनतील, असा त्यांना विश्वास होता. जेव्हा समाज शिक्षित होईल, तेव्हाच त्यांचा आत्मविश्वास वाढेल., तेव्हाच ते आत्मपरीक्षण देखील करू शकतील अशी त्यांना खात्री होती. म्हणूनच त्यांनी केवळ केरळमध्ये नाही तर, आजूबाजूच्या अनेक राज्यांमध्ये सेक्शन आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था स्थापन केल्या. आज देश-विदेशात, श्री नारायण गुरु यांच्या दूरदृष्टीला, त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या अनेक संस्था देश विदेशात कार्यरत आहेत.
श्री नारायण गुरूंनी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जोडण्याचे काम केले. चमत्कार आणि फसवा फसवी अशा गोष्टीपासून अलिप्त राहत त्यांनी मंदिरात खरेपणा, प्रामाणिकपणा, स्वच्छता अशा गोष्टीचा आग्रह धरला. त्यांनी मंदिरात अस्वच्छता वाढविणाऱ्या सर्व पूजा पध्दतींमध्ये सुधारणा केली. पूजा पद्धतीत जे अवडंबर माजवलं जात होतं, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला केल्या. नारायण गुरु यांनी नवी व्यवस्था सुरु करण्याचा मार्ग दाखवला. मंदिरात पूजा करण्याचा सर्वाना अधिकार आहे, हे ही त्यांनी समाजात प्रस्थापित केले.. शिवगिरीची ही यात्रा, खरे तर, त्यांच्याच सुधारणांचा आणि व्यापक दूरदृष्टीचा परिपाक आहे.
त्यांनी म्हटले होते-
“तुमच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यात पूर्ण उपयोग करा. तरच देशातले लोक प्रगती करू शकतील, समृद्ध होऊ शकतील. याचा शिवगिरी यात्रेचा प्रमुख उद्देश आहे.”
मला अतिशय आनंद आहे की गेल्या सलग 85 वर्षांपासून शिवगिरी यात्रेदरम्यान या क्षेत्रातले तज्ञ बोलावले जातात, त्यांचे अनुभव ऐकले जातात. आजही या कार्यक्रमात विविध क्षेत्रातले दिग्गज मान्यवर जमले आहेत. मी त्या सगळ्यांचे स्वागत करतो, आदर सत्कार करतो आणि आशा करतो कि तुमच्या विचारधनातून आम्हाला नवे काहीतरी शिकायला मिळेल.
बंधू-भगिनीनो, शिवगिरी यात्रा एकप्रकारे ज्ञानाचा असा कुंभ आहे, की ज्यात जो जो उडी मारेल तो भवसागर तरुन जाईल. सिद्ध व्यक्ती होईल.
कुंभमेळ्यातही आपल्या या विशाल देशाला सामावून घेण्याचा प्रयत्न होतो, ते आपल्या देशाचे लघुरूपच असतं. साधू- संत, महंत, ऋषी-मुनी एकत्र येतात आणि समाजातल्या सुख-दु:खांवर चर्चा करतात. काळानुसार त्यात अनेक बदल नक्कीच झाले आहेत, पण कुंभमेळ्याच्या स्वरूपात एक विशेष बाब पण प्रकर्षाने जाणवते. दर बारा वर्षानी साधू संत एकत्र येतात आणि मग तिथे समाजाची भविष्यातली दिशा काय असावी यावर विचारमंथन होऊन निर्णय घेतला जातो. देशाची दिशा काय असावी? समाजाच्या कार्यशैलीत कसे बदल करता येतील, यावर चर्चा होते.
हे एकप्रकारे सामाजिक संकल्पच असतात. यानंतर दर तीन वर्षानी वेगवगेळ्या ठिकाणी जसे कधी नाशिक, कधी उज्जैन तर कधी हरिद्वारमधल्या कुंभमेळ्यात त्यावर पुन्हा विश्लेषण होते, की आपण काय उद्दिष्ट ठरवलं होतं, आणि आपण कुठपर्यत पोहचलो. या सगळ्या गोष्टींचा रीतसर आढावा घेतला जातो.
मला अपेक्षा आहे की या यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी तुम्ही सगळे जेंव्हा वर्षाच्या शेवटी इथे भेटता तेंव्हा गेल्या वर्षी झालेल्या चर्चांचा परिणाम काय होता यावर तुम्ही नक्कीच विचारमंथन करत असाल. श्री नारायण गुरु यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण किमान काही पावलं तरी पुढे गेलो आहोत की नाही यावर चर्चा होत असेल.
मित्रांनो,
ही शिवगिरी यात्रा असेल, कुंभ किंवा महाकुंभ असेल, समाजाला योग्य दिशा दाखविणाऱ्या देशातल्या अंतर्गत दुष्प्रवृत्तींना दूर करणाऱ्या या परंपरा आजही अतिशय महत्वाच्या आहेत. देशाच्या विविध राज्यांमध्ये होणाऱ्या या यात्रा देशाला बांधून ठेवतात, एकसंध ठेवतात. अशा यात्रांमध्ये वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या विचारसरणींचे लोक एकत्र येतात, एकमेकांच्या परंपरा बघतात, समजून घेतात आणि एकात्मतेच्या भावनेने संघटीत होतात.
मित्रांनो, केरळच्याच या पवित्र भूमीवर आदि शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत सांगितला होता. अद्वैताचा साधा सरळ अर्थ आहे,जिथे द्वैत नाही ते अद्वैत. म्हणजेच जिथे मी आणि तुम्ही वेगळे नाही. जिथे आपलं आणि परकं काही नाही ही भावना जेंव्हा मनुष्याच्या मनात जन्माला येते तेंव्हा तो अद्वैत साकारतो आणि हा मार्ग नारायण गुरु यांनी दाखवला होता.
नारायण गुरु केवळ तो अद्वैताचा सिद्धांत स्वतः जगले नाही तर पूर्ण समाजाला मार्ग दाखवला की हा सिद्धांत प्रत्यक्ष आयुष्यात कसा आचरणात आणता येईल.
बंधू भगिनींनो, शिवगिरी यात्रा सुरु होण्याच्या दहा वर्ष आधी श्री नारायण गुरु यांच्या नेतृत्वाखाली अद्वैत आश्रमात धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या धर्माचे आणि पंथाचे लोक जगभरातून या धर्मसंसदेत सहभागी झाले होते. धर्म आणि पंथाच्या नावाखाली होणारे वादविवाद बाजूला ठेऊन सर्वांनी शांतता – सद्भावना आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करावी, असं आवाहन या धर्मसंसदेत करण्यात आलं होतं.
मला मिळालेल्या माहितीनुसार, या धर्मसंसदेच्या प्रवेशद्वारावर गुरुजींनी एक संदेश लिहिला होता –
“We meet here not to argue and win,
but to know and be known”
आपण इथे वादविवाद करून विजयी होण्यास जमलेलो नाही तर, एकमेकांना जाणून आणि समजून घेण्यासाठी एकत्र आलो आहोत.
एकमेकांशी संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न अतिशय महत्वाचा होता.
आज जेव्हा आपण जागतिक वातावरणाविषयी चर्चा करतो, तेंव्हा आपल्या लक्षात येतं की आज समोर आलेल्या या संकटाची सूचना आपल्याला आधीच आपल्या साधू संतांनी दिली होती. त्यांनी आपल्याला वेळेतच सावधान केले होते.
बंधू भगिनींनो, आपण जर 19 व्या आणि 20 व्या शतकातल्या पूर्ण कालखंडाकडे लक्षपूर्वक पहिले तर आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यलढ्यात त्यावेळच्या धर्मगुरुंनी आणि समाज सुधारकांनी किती मोठे योगदान दिले होते. विभिन्न जाती पातींमध्ये, वर्गामध्ये विखुरलेला समाज इंग्रजांचा सामना करू शकत नव्हता. आपल्या याच उणीवा दूर करण्यासाठी त्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये जातीभेदाविरोधात व्यापक आंदोलने झाली त्या सर्व आंदोलनांचा आणि सुधारणेच्या मोहिमांमागची भावना हीच होती की देशाला पुढे न्यायचे आहे. गुलामगिरीच्या साखळ्या तोडून टाकायच्या असतील तर आपल्या आत असलेल्या उणीवांपासून मुक्त व्हावे लागेल. या आंदोलनांचे नेतृत्व करणाऱ्यांनी देशातल्या सामान्य जनतेला बरोबरीची वागणूक दिली, मान सन्मान दिला. देशाची गरज समजून घेऊन, त्यांनी आपली अध्यात्मिक यात्रा राष्ट्रनिर्माणाशी जोडली. जेव्हा लोक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करू लागले, तेव्हा देश जागृत झाला, उठून उभा राहिला. भारताचे एकत्र आलेले नागरिक, इंग्रजांना पिटाळूनच शांत झाले.
मित्रांनो, आज देशापुढे पुनः एकदा तिच परिस्थिती उभी ठाकली आहे. देशाच्या नागरिकांना देशाच्या अंतर्गत उणीवांपासून मुक्त व्हायचे आहे. तुमच्या सारख्या हजारो संघटना, संस्था यात महत्वाची भूमिका पार पडू शकतात. केवळ जातिभेदच नाही तर, देशाचं नुकसान करणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा परंपरांपासून दूर जाण्यासाठी या प्रथांविरोधात जनतेला जागृत करण्यासाठी तुमचे योगदान आणखी वाढवण्याची गरज आहे.
15 ऑगस्ट 1947 साली आपण गुलामगिरीच्या श्रुंखलां नक्कीच तोडल्या मात्र त्या श्रुंखलांचे व्रण आजही आपल्या सामाजिक – आर्थिक व्यवस्थेवर आपल्याला जाणवतात. यातून मुक्तता हवी असेल तर तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
बंधू आणि भगिनींनो,
जोतिबा फुले, सावित्रीबाई, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सारख्या महान व्यक्तींनी स्त्रीच्या सन्मानासाठी, स्त्रीच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला. आज आपल्या देशानं महिलांच्या अधिकारासाठी एक मोठ्ठ पाउल उचललं आहे हे बघून त्यांना अतिशय आनंद झाला असता.
तिहेरी तलाकमुळे मुस्लीम भगिनी आणि मातांनी गेली अनेक वर्ष जो त्रास सहन केला तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. वर्षानुवर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर अखेर त्यांना आता तिहेरी तलाकच्या प्रथेपासून मुक्त होण्याचा मार्ग सापडला आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपल्या संतांनी आणि ऋषी-मुनींनी म्हटलंच आहे की,
“नर करनी करे तो नारायण हो जाए”।
कथा-कीर्तन नाहे, तासनतास पूजा – अर्चा करून नाही तर “करनी” म्हणजेच कर्म करूनच नराचा नारायण होऊ शकतो. हे कर्म म्हणजेच संकल्पापासून सिद्धी पर्यंतचा प्रवास आहे. हे कर्म म्हणजेच सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांचा न्यू इंडियाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास आहे.
2018 मध्ये हा प्रवास अधिक वेगानं होणार आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार, बेनामी संपत्ती, यांच्या विरोधात कठोर कारवाई करत, दहशतवाद आणि जातीभेदाविरोधात लढा तीव्र करत तसचं Reform, Perform और Transform च्या मंत्रानुसार प्रवास करतसर्वांच्या सोबतीने सर्वांचाच विकास करत 2018 साली आपण सगळे भारतीय एकत्र येऊन देशाला नव्या उंचीवर घेऊन जाऊ. हेच वचन आणि हाच संकल्प घेऊन मी माझे भाषण संपवतो.
तुम्हा सगळ्यांना पुनः एकदा तसचं नारायण गुरु यांच्या भक्तांना शिवगिरी यात्रेच्या आणि नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद.