आपण सर्वजण एकापेक्षा एक पर्यायांच्या, समाधानांच्या शोधासाठी काम करीत आहात. देशासमोर आज जी आव्हाने आहेत, प्रश्न आहेत, त्यांच्यावर उत्तर तर नक्कीच शोधली जात आहेत ; डाटा, डिजिटाझेशन आणि हाय-टेक फ्यूचर यांच्याविषयी भारताच्या आकांक्षानाही बळकटी मिळत आहे.
मित्रांनो, आपल्याला नेहमीच गर्व असतो, की गेल्या शतकामध्ये आपण या दुनियेला एकापेक्षा एक महान संशोधक दिले. अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञ, तंत्रज्ञानामध्ये कार्यरत असलेल्या संस्था, नेते दिले आहेत. परंतु आता हे 21 वे शतक आहे आणि अतिवेगाने बदलत असलेल्या या दुनियेमध्ये, भारताला आपली तशीच प्रभावी भूमिका साकारायची आहे. ज्यावेगाने आपण स्वतःमध्ये परिवर्तन, बदल घडवून आणतो, तसाच बदल भारतालाही घडवून आणायचा आहे.
या विचाराबरोबरच आता देशामध्ये नवसंकल्पनेसाठी, संशोधनासाठी, आरेखन-रचनांसाठी, विकासासाठी, व्यवसायासाठी अत्यावश्यक असलेली ‘इको-सिस्टिम’ वेगाने तयार करण्यात येत आहे. आता आपल्याकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर खूप जास्त भर दिला जात आहे. 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाला बरोबर घेवून, 21 व्या शतकाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शैक्षणिक प्रणालीही तितकीच गरजेची आहे.
प्रधानमंत्री ई-विद्या कार्यक्रम असेल नाहीतर अटल इनोव्हेशन मिशन, देशामध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती-स्वभाव आता वाढीस लागला आहे. अनेक क्षेत्रांसाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा केलेला विस्तार असो, अथवा क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रतिभा शोधून त्यांना आधुनिक सुविधा आणि आर्थिक मदत देणे असो, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेल्या योजना असो, अथवा भारतामध्ये जागतिक दर्जाच्या 20 संस्थां निर्माण करण्याचे मिशन असो, ऑनलाइन शिक्षणासाठी साधन सामुग्रीची निर्मिती असो अथवा हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉनसारखे अभियान, या सर्वांच्या मागे प्रयत्न असा आहे की, भारत शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाधिक आधुनिक बनला पाहिजे. मॉडर्न बनला पाहिजे. इथल्या प्रतिभावंताना अनेक संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
मित्रांनो, या मालिकेमध्येच काही दिवसांपूर्वी देशाचे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. हे धोरण बनवताना 21 व्या शतकातल्या नवयुवकांचा विचार करण्याची पद्धत, त्यांच्या गरजा, त्यांच्या आशा-अपेक्षा आणि आकांक्षा यांना ध्यानात ठेवून व्यापक प्रयत्न करण्यात आले आहेत. पाच वर्षे देशभरामध्ये याविषयामध्ये येणा-या प्रत्येक बिंदूची, मुद्यांची अतिशय व्यापक चर्चा करून आणि प्रत्येक स्तरावर सल्ला मसलत करण्यात आली आणि मगच हे धोरण तयार करण्यात आले.
हे धोरण म्हणजे ख-या अर्थाने संपूर्ण भारताला, भारताच्या स्वप्नांना, भारताच्या भावी पिढीच्या आशा, आकांक्षांना आपल्या कवेत घेवून नवीन भारताची शैक्षणिक नीती निर्माण केली आहे. यामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या आणि प्रत्येक राज्यांमधल्या विद्वानांचे विचार समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणूनच ते आता एका धोरणाचा दस्तऐवज राहिलेला नाही तर 130 कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंबही आहे.
मित्रांनो,
आपणही आपल्या आजूबाजूला आजही अनेक मुलांना पाहत असणार, त्यांना वाटत असते की, त्यांचे अशा एका विषयाच्या आधारे मूल्यमापन केले जाते की, त्याला त्या विषयामध्ये अजिबात रसच नाही. आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी आणि एकूणच संपूर्ण शैक्षणिक वातावरणाचा दबाव त्याच्यावर असतो. दुस-या कुणीतरी निवडलेल्या मात्र त्याला रस नसलेल्या विषयांचा त्याला अभ्यास करावा लागतो. या विचारसरणीमुळे देशात, खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा असा वर्ग आहे की, त्यांनी शिक्षण तर घेतले आहे, मात्र त्याने जे शिक्षण घेतले आहे, त्यापैकी अधिकांश त्याच्या कामासाठी उपयोगी ठरत नाही. पदव्यांची रास लागलेली असतानाही आपल्या स्वतःमध्ये त्यांना काहीतरी न्यून राहिले आहे, कमी आहे, असे जाणवत असते. घेतलेल्या शिक्षणामुळे त्यांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, त्याचीच कमतरता जाणवू लागते. याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर पडतो.
नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे प्रथमच पूर्वीच्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.भारतातील शैक्षणिक व्यवस्थेत आता पध्दतशीरपणे सुधारणा करताना इंडेंट(मागणी) आणि कंटेंट(घटक) दोन्हीमध्ये बदल करण्याचा प्रयास आहे.
मित्रांनो,
21वे शतक हे ज्ञानाचे युग आहे. ह्यावेळी शिकणे, संशोधन करणे,आणि नवनिर्मिती वाढविणे यावर भर द्यायला हवा.नेमके हेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 करणार आहे. ह्या धोरणाद्वारे तुमची शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ तुम्हाला एक वेगळाच अनुभव देणार आहेत: सुफल आणि विपुल असा.जो तुमच्यातील नैसर्गिक उत्कट भावनांना मार्गदर्शक ठरेल.
मित्रांनो,
तुम्ही देशातील उत्तम आणि उज्वल मुलांपैकी आहात. ही हँकेथाँन हा पहिलाच प्रश्न नव्हे, जो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहात,अथवा शेवटचा देखील नाही. मला वाटते ,की तुम्ही आणि तुमच्यासारख्या तरुणांनी शिकणे, प्रश्न विचारणे आणि उत्तर शोधणे या तीन गोष्टी थांबवता कामा नयेत.
तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचे आकलन होते.तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा वेगळ्या पद्धतीने विचार करून तो सोडवायचा प्रयास करता .तुम्ही जेव्हा असे करता त्यावेळी तुमची प्रगती होते. तुमची प्रगती होते तेव्हा देशाची प्रगती होते .आपल्या ग्रहाची भरभराट होते.
मित्रांनो,
आपल्या शैक्षणिक धोरणात हे चैतन्य प्रतिबिंबित झाले आहे. आपण दप्तराचे ओझे,जे शाळेच्यापलीकडे जात नसते, ते झुगारून बदल करतआहोत.आपण शिक्षणाच्या वरदानाचा जीवनासाठी उपयोग करत आहोत. केवळ स्मरण करण्यापेक्षा निर्णायक विचारांची कास धरत आहोत. अनेक वर्षे ह्या व्यवस्थेच्या मर्यादेचे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होत होते. आता नाही!नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तरुण भारताच्या महत्वाकांक्षा प्रतिबिंबित करत आहे. त्याचा केंद्रबिंदू प्रक्रिया नसून मनुष्यकेंद्रीत आणि भविष्यकेंद्रित आहे.
मित्रांनो,
या धोरणातील रोमांचकारक बाब म्हणजे हा आंतरशाखीय विद्याभ्यासावर भर देतो हा आहे.ही संकल्पना लोकप्रियता मिळवित आहे,आणि ते योग्यच आहे.सर्वजण एकाच आकाराचे नसतात.एकाच विषयाने तुमची परीभाषा स्पष्ट होत नसते. नवे काही शोधण्याला मर्यादा नसते. मानवाच्या इतिहासात अनेक गणमान्य व्यक्तींनी हे दाखवून दिले आहे, की ते विविध विषयात श्रेष्ठ असतात. आर्यभट असो,लिओ नार्दो द विंची ,हेलन केलर,गुरूदेव टागोर, असे अनेक. आता आपण पारंपारिक कला,विज्ञान आणि वाणिज्य अशा शाखांमध्ये बदल केले आहेत. एखाद्याला जर आवड असेल तर तो गणित आणि संगीत एकत्र शिकू शकेल किंवा कोडींग आणि रसायनशास्त्र एकत्र.त्यामुळे समाजाला एखाद्या कडून काय शिकले गेले पाहिजे त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांला नेमके काय शिकायचे आहे ते सुनिश्चित होईल.आंतरशाखीय विद्याभ्यास तुमच्या हातात नियंत्रण ठेवायला देईल.या प्रक्रियेत ते तुम्हाला लवचिकता देईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या लवचिकतेला अतिशय महत्त्व दिले आहे. यामध्ये प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी तरतूद आहे. पदवीपूर्व शिक्षण हा तीन अथवा चार वर्षांचा अनुभव असेल.विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता श्रेणीच्या बँकेचा लाभ मिळेल,जेथे त्यांना शैक्षणिक श्रेणी संग्रहित करता येतील.त्या पदवीच्या शेवटी हस्तांतरित करता येतील आणि मोजता येतील. अशा प्रकारची लवचिकता आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत कधीच नव्हती.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने या गोष्टी विचारात घेतल्या, याचा मला अतिशय आनंद होत आहे.
मित्रांनो, प्राथमिक शिक्षणापासून सुरू होणारे शिक्षण सुगम्य करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण महत्वाचे आहे. उच्च शिक्षणामध्ये 2035 पर्यंत सकल नावनोंदणी गुणोत्तर 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. लिंग समावेशन, विशेष शिक्षण क्षेत्रे, मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाच्या पर्यायांची देखील मदत होईल.
मित्रानो, आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार , आपल्या देशाचे महान शिक्षणतज्ज्ञ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि शिक्षण असे असायला हवे जे सर्वांना सहज उपलब्ध असेल, सर्वांसाठी सुलभ असेल. हे शिक्षण धोरण त्यांच्या या विचाराप्रति समर्पित आहे. हे शिक्षण धोरण रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्यांवर भर देते. म्हणजे एक प्रकारे आपल्या मानसिकतेत, आपल्या दृष्टिकोनातच सुधारणा आणण्याचा प्रयत्न आहे.या धोरणाच्या केंद्रस्थानी एका अशा आत्मनिर्भर युवकाला घडवण्याचे उद्दिष्ट आहे जो हे ठरवू शकेल कि त्याला नोकरी करायची आहे, चाकरी करायची आहे कि उद्योजक बनायचे आहे.
मित्रानो, आपल्या देशात भाषा- हा नेहमीच एक संवेदनशील विषय राहिला आहे. यामागचे एक मोठे कारण हे आहे कि आपल्याकडे स्थानिक भाषेला वाऱ्यावर सोडण्यात आले, तिला समृद्ध होण्याची आणि पुढे जाण्याची खूप कमी संधी मिळाली. आता शिक्षण धोरणात जे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे भारतीय भाषा समृद्ध होतील, अधिक विकसित होतील. त्या भारताचे ज्ञान तर वाढवतीलच, भारताची एकता देखील दृढ करतील. आपल्या भारतीय भाषांमध्ये किती समृद्ध रचना आहेत, प्राचीन ज्ञानाचे भांडार आहे, अनुभव आहे, या सर्वांचा आता आणखी विस्तार होईल. यामुळे जगाला देखील भारताच्या समृद्ध भाषांची ओळख होईल. आणि आणखी एक मोठा फायदा असा होईल कि विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांच्याच भाषेत शिकायला मिळेल.
मला वाटते यामुळे त्यांची प्रतिभा अधिक बहरण्याची मोठी संधी त्यांना मिळेल, ते सहजपणे, कुठल्याही दबावाशिवाय नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित होतील, शिक्षणाशी जोडले जातील. तसेही आज सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आधारे जगातील अव्वल 20 देशांची यादी पाहिली तर बहुतांश देश आपल्या गृह भाषा, मातृभाषेतच शिक्षण देतात. हे देश त्यांच्या देशातील युवकांचे विचार आणि समज त्यांच्याच भाषेत विकसित करतात आणि जगाबरोबर संवाद साधण्यासाठी अन्य भाषांवर देखील भर देतात. हेच धोरण आणि रणनीति 21व्या शतकातील भारतासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. भारताकडे तर भाषांचा अद्भुत खजिना आहे. जो शिकण्यासाठी एक जन्म देखील कमी पडेल आणि आज जग देखील त्यासाठी आसुसलेले आहे.
मित्रानो, नव्या शिक्षण धोरणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये स्थानिक बाबीवर जेवढा भर देण्यात आला आहे तेवढाच जागतिक स्तरावर एकत्रीकरणावर देखील भर देण्यात आला आहे. एकीकडे स्थानिक लोक कला आणि विद्या, शास्त्रीय कला आणि ज्ञान यांना स्वभाविकपणे स्थान देतील तर दुसरीकडे अव्वल जागतिक संस्थांना भारतात संकुल सुरु करण्याचे आमंत्रण देखील दिले आहे. यामुळे आपल्या युवकांना भारतातच जागतिक दर्जाचा अनुभव आणि संधी देखील मिळतील आणि जागतिक स्पर्धेसाठी तयारी देखील होऊ शकेल. यामुळे भारतात जागतिक दर्जाच्या संस्थेच्या निर्मितीत , भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवण्यात देखील मोठी मदत मिळेल. मित्रानो, देशाच्या युवा शक्ति वर माझा नेहमीच खूप विश्वास राहिला आहे. हा विश्वास का आहे हे देशाच्या युवकांनी वारंवार सिद्ध केले आहे. अलिकडेच कोरोनापासून बचावासाठी फेस शिल्ड/ मास्कची मागणी अचानक वाढली होती. ही मागणी 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानासह पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशातील युवक पुढे आले. पीपीई आणि अन्य वैद्यकीय उपकरणांसाठी ज्याप्रकारे देशाचे तरुण संशोधक, तरुण उद्योजक पुढे आले, त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. आरोग्य सेतु ऐप च्या रूपात तरुण संशोधकांनी कोविडच्या ट्रैकिंग साठी एक उत्तम साधन देशाला अतिशय कमी वेळेत तयार करून दिले आहे.
मित्रानो, तुम्ही सर्व तरुण मंडळी, आत्मनिर्भरतेसाठी भारताच्या महत्वाकांक्षेची ऊर्जा आहात . देशातील गरीबाला एक उत्तम आयुष्य देण्याच्या, जीवन सुलभतेचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यात तुम्हा सर्व युवकांची भूमिका खूप महत्वाची आहे. माझे नेहमीच हे मत राहिले आहे कि देशासमोर येणारे असे एकही आव्हान नाही ज्याला आपला युवक टक्कर देऊ शकणार नाही, त्यावर उपाय शोधू शकणार नाही. प्रत्येक गरजेच्या वेळी जेव्हाजेव्हा देशाने आपल्या तरुण संशोधकांकडे आशेने पाहिले आहे, तेव्हा त्यांनी निराश केलेले नाही.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात देशाला अनोखे संशोधन लाभले आहेत. मला विश्वास आहे कि या हॅकेथॉननंतर देखील तुम्ही सर्व तरुण मंडळी देशाच्या गरजा जाणून घेऊन, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवनवीन उपायांवर काम करत राहतील.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद।