मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. हर्ष वर्धन, डॉ. महेश शर्मा, श्री. मनोज सिन्हा, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे सचिव, आणि देशविदेशातील इतर मान्यवर,
महिला आणि सद्गृहस्थ,
सव्वाशे कोटी भारतीयांच्यावतीने आपल्या सर्वांचे मी नवी दिल्लीमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो.
या विशेष कार्यक्रमासाठी परदेशांमधून आलेल्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की, त्यांनी आपल्या या दौ-यामध्ये दिल्लीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तुंना भेटी देण्यासाठी थोडा वेळ जरूर राखून ठेवावा.
‘विश्व पर्यावरण दिन, 2018’ साजरा करण्याचे यजमानपद मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
आज हा महत्वाचा दिवस साजरा करतांना आमच्या विश्व बंधुत्वाच्या प्राचीन परंपरेचे, संकल्पनाचे स्मरण होत आहे.
ही महान संकल्पना आमच्याकडे एका शब्दात मांडली आहे. ‘वसुधैवकुटुंबकम’ अर्थात संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे. अशा आशयाचा संस्कृतमध्ये वाक्प्रचार आहे.
महात्मा गांधी यांनी पर्यावरण, निसर्ग यांच्याविषयी अतिशय समर्पक, स्पष्ट आणि विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे विचार आपल्या शब्दात मांडले आहेत. ‘‘ही पृथ्वी प्रत्येकाचे समाधान होवू शकेल, अशा प्रकारे सर्वांच्या गरजांची पूर्तता करते, परंतु प्रत्येकाचा लोभ, हव्यास यांची पूर्तता करू शकणार नाही.’’
पर्यावरणाचे महत्व आपल्या पूर्वजांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे निसर्गाचा समतोल कायम ठेवून, निसर्गाशी संवाद साधून आपण जगले पाहिजे, यावर भर देण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली.
विशेष म्हणजे निसर्गाचे महत्व सांगणारे, त्याच्याशी निगडीत असणारे सण, उत्सवही आपल्याकडे आहेत. आपल्याकडे परंपरेनुसार निसर्ग जतनाचे महत्व अधोरेखित करणारे सण समारंभ साजरे केले जातात. सणांमध्ये निसर्गाचे प्रतिबिंब दिसणारे प्राचीन साहित्यही आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज जगामध्ये अतिशय वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. आमच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अर्थात, शाश्वत आणि हरित पद्धतीने विकास घडवून आणण्यासाठीही भारत कटिबद्ध आहे.
अशा या हरित विकासाच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही 40 दशलक्ष कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी दिली आहे.
यामुळे ग्रामीण महिलांची धुरांपासून मुक्तता झाली आहे.
त्याचबरोबर स्वयंपाकासाठी जळणफाट्यावर त्यांना जे अवलंबून रहावे लागत होते, तो प्रश्न आता संपुष्टात आला आहे.
अगदी याचप्रमाणे ऊर्जा बचतीचा मंत्र आम्ही जपला आहे. यासाठी संपूर्ण भारतामध्ये आम्ही तीनशे दशलक्ष एलईडी बल्ब आता बसवण्यात आले आहेत. या एलईडी बल्ब्समुळे वातावरणामध्ये होत असलेल्या अतिरिक्त कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आता कमालीचे कमी झाले आहे.
नवीकरणीय ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी मोठी यंत्रणा जोमाने कार्यरत आहे. 2022 पर्यंत 175 गीगा वॅटस् ऊर्जेची निर्मिती सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून करण्याचे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे.
संपूर्ण जगामध्ये सौरऊर्जा निर्मिती करीत असलेल्या देशामध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे. इतकेच नाही तर, नवीकरणीय ऊर्जानिर्मितीमध्ये भारत जगामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
भारतामधल्या प्रत्येक घराला विद्युत पुरवठा करण्याचे लक्ष्य आमच्या सरकारने निश्चित केले आहे.प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचल्यानंतर पर्यावरणावरील अवलंबिता आपोआपच कमी होणार आहे.
परंपरागत इंधनावरील अवलंबिता कशा प्रकारे कमी होवू शकेल, याचा विचार करून आम्ही उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहोत. भारतातील शहरांमध्ये होणारा इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याची योजना आम्ही तयार केली आहे.
आमचा हा ‘युवा देश’ आहे. भारतामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखण्यात आल्या आहेत. उत्पादनाचे जागतिक केंद्र भारत व्हावे, या दिशेने वाटचाल सुरू आहे.
‘मेक इन इंडिया’ अभियान आम्ही सुरू केले असून यामध्ये उत्पादन करतांना, ते निर्दोष असावे यासाठी बिनचूकपणाकडे लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर कोणतेही उत्पादन करताना पर्यावरणाची कसल्याही प्रकारे हानी होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली जात आहे.
भारताने 2005 ते 2030 या कालावधीमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण एकूण उत्सर्जनाच्या 33 ते 35 टक्के कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याप्रमाणे आम्ही योग्य ती पावले उचलली असून, आम्ही हे लक्ष्य गाठू शकणार आहे.
’कोपनहेगन प्रतिज्ञा’ भारत कसोशीने पाळत आहे. ‘यूएनईपी’च्या अहवालानुसार भारत यासाठी योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. 2005 च्या तुलनेत आता भारत 2020 पर्यंत कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात 20 ते 25 टक्के घट करू शकणार आहे.
आम्हाला जैववैविध्येतेचा वारसा लाभला आहे. ही जैवसंपदा जतन करणे आणि तिच्या संवर्धनासाठी आम्ही राष्ट्रीय जैववैविध्य धोरण निश्चित केले आहे. संपूर्ण जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताकडे केवळ 2.4 टक्के भूमी आहे. भारतामध्ये आढळत असलेल्या विविध जैव प्रजातींचे प्रमाण 7.8 टक्के इतके विक्रमी आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारतामध्ये 18 टक्के लोक वास्तव्य करतात. गेल्या दोन वर्षामध्ये भारताच्या वनप्रदेशाचा भूभाग एक टक्क्याने वाढला आहे.
वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्येही भारताने खूप चांगली कामगिरी बजावली आहे. वाघ, सिंह, हत्ती, गेंडे यांची लक्षणीय संख्यावृद्धी झाली आहे. इतर विविध प्रकारे वन्यजीव संवर्धन करण्यात येत आहे.
भारतासमोरील वेगवेगळ्या आव्हानांपैकी एक महत्वाचे आव्हान म्हणजे पाणी समस्या. पेयजल पूर्ती करताना पेययोग्य पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आम्ही या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी योग्य तो प्रयत्न करीत आहोत. नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी ‘नमामी गंगे’ असा मोठा आणि महत्वपूर्ण प्रकल्प आम्ही सुरू केला आहे. या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने केले जात असून त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. आमच्याकडे गंगा नदीला असलेले महत्व लक्षात घेवून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे इथल्या शेतकरी वर्गाला कृषी उत्पादनासाठी पाण्याचा सातत्यपूर्ण पुरवठा करण्याची गरज असते. शेतकरी वर्गाची ही महत्वपूर्ण आवश्यकता भागवण्यासाठी आम्ही ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ सुरू केली आहे. कोणाचीही शेती पाण्याअभावी केली गेली नाही, असे होवू नये यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘मोअर क्रॉप, पर ड्रॉप’ हे ब्रीदवाक्य आम्ही शेतकरी वर्गासाठी मानतो.
शेतकरी वर्गाने कृषी कचरा साठवून, त्यामधून खतनिर्मिती करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषीकचरा जाळून टाकण्याऐवजी त्याचाच उपयोग शेतामध्ये खत म्हणून करता येतो, त्याचे अनेक लाभ आहेत. ही माहिती देशभरातल्या शेतकरी बांधवांना देण्यात येत आहे.
महिला आणि सद्गृहस्थ हो,
पर्यावरणाविषयी संपूर्ण जगामध्ये जी वस्तूस्थिती आहे, ती लक्षात आल्यानंतरही अनेक ठिकाणी उपाय योजना सुरू केलेल्या नाहीत. कारण त्या अतिशय गैरसोयीच्या वाटतात. परंतु भारताने असे केले नाही. भारताने सत्य स्वीकारून तातडीने त्यावर उपाय योजनांची कृती करण्यास प्रारंभ केला आहे.
फ्रान्सच्या बरोबर सहकार्य करून आंतरराष्ट्रीय ऊर्जा आघाडी स्थापन करण्याची कृती याचेच एक निर्देशक आहे. पॅरीस परिषदेनंतर पर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी आणि महत्वाची कृती कोणती याचा विचार केला तर उत्तरादाखल भारताने केलेल्या उपाय योजना आपल्या लक्षात येतील. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हेही एक महत्वपूर्ण पावूल ठरले आहे.
साधारणपणे तीन महिन्यांपूर्वीच नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय सोलर आघाडीची परिषद झाली. त्यावेळी जवळपास 45पेक्षा जास्त देशांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
कोणत्याही देशाला विकास साध्य करायचा असेल तर तो पर्यावरण स्नेही विकासकामे करूनच करता येणार आहे, असा आमचा अनुभव आहे. आपल्याला मिळालेल्या हरित संपदेची किंमत मोजून कोणत्याही प्रकारचा विकास करण्याची गरज नाही. असे आमचे तत्व, धोरण आहे.
मित्रांनो,
जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून आपण आता नेमके आव्हान कोणते आहे, हे ओळखून त्याला अनुसरून यावर्षी कार्य केले पाहिजे.
प्लास्टिकमुळे मानवाला निर्माण होत असलेला धोका जाणून आपण अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. अनेक प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर होवू शकत नाही. आणि सर्वात वाईट आणि त्रासदायक गोष्ट म्हणजे बहुतांश प्लास्टिक हे जैव साखळीला धोका उत्पन्न करणारे आहे.
प्लास्टिक प्रदूषणामुळे आपली सागरी जैवसाखळी आधीच धोक्यात आली आहे. सागरी संशोधक, मच्छिमार यांनी वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे किती मोठे संकट निर्माण झाले आहे, हे आधीच स्पष्ट केले आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्रातील मासे जाळîात अडकण्याचे प्रमाण घटत आहे. सागरी तापमानात होत असलेल्या वृद्धीमुळे जलजीवांचे अनेक अधिवास नष्ट होत आहे.
अतिसूक्ष्म प्लास्टिकमुळे सागरी सीमांची मोठी समस्याही निर्माण झाली आहे. प्लास्टिकचे हे दुष्परिणाम लक्षात घेतल्यानंतर भारताने आता, ‘समुद्र स्वच्छता मोहिमे’मध्ये सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. सागर वाचविण्यासाठी भारताचाही सहभाग असणार आहे.
प्लास्टिक प्रदूषण आणि आपल्या अन्नसाखळीचा एक भाग बनला आहे. मीठ, बाटलीबंद पाणी आणि नळाचे पाणी यासाठीही अतिसूक्ष्म विघटनशील घटक असलेल्या प्लास्टिकचा वापर केला जातो. हे आपण विसरून चालणार नाही.
मित्रांनो,
विकसित जगातील अनेक भागांपेक्षा भारतामध्ये प्लास्टिकचा दरडोई वापर तुलनेने खूपच कमी आहे.
आमच्या देशाने ‘स्वच्छ भारत अभियान’ म्हणजेच स्वच्छता आणि शौचालय मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ‘‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापना’’वर विशेष भर दिला जात आहे.
काही अवधीपूर्वीच मी एका प्रदर्शनाला भेट दिली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हे प्रदर्शन भरवले आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाला कशा पद्धतीने यश आले आहे, त्याच्या काही यशोगाथा प्रदर्शनात दाखवल्या आहेत. या प्रदर्शनामध्ये संयुक्त राष्ट्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, उद्योग आणि अशासकीय संस्था यांनीही सहभाग नोंदवला आहे. प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी अशाच प्रकारे आदर्श कार्य केले जाईल, अशी आशा मी व्यक्त करतो.
बंधू आणि भगिनींनो,
पर्यावरणाचा होणारा -हास हा सर्वात गरीब आणि कमकुवत वर्गाला त्रासदायक ठरत असतो.
त्यामुळेच आपल्या राहणीमानामुळे समाजातल्या कोणत्याही घटकाला त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे.
या संपूर्ण जगाची शाश्वत प्रगती व्हावी, या उद्देशाने काही योजना आखण्यात आल्या आहेत. 2030पर्यंत त्यांची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी ‘लीव्ह नो वन बिहाइंड’ ही संकल्पना निश्चित केली आहे. अर्थात ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय आपल्या मातृत्वाची भूमिका बजावत असलेल्या निसर्गाचे संरक्षण, संवर्धन होवू शकणार नाही.
मित्रांनो,
पर्यावरण रक्षणाची ही भारतीय पद्धत आहे. आणि आज जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी भारताला मिळाली आहे, याचा मला आनंद होत आहे.
सारांश म्हणजे, या जागतिक पर्यावरण दिन 2018, च्या कार्यक्रमाचे यजमान राष्ट्र म्हणून आम्ही शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देतो.
चला तर, आपण सर्वजण मिळून प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाचे निवारण करू या. आणि प्लास्टिकमुक्त पृथ्वी बनवून, ती राहण्यासाठी अधिक चांगले स्थान बनवू या.
आज आपण जे काही चांगले करणार आहोत, त्याचा संयुक्त परिणाम आपल्याला भविष्यात अनुभवण्यास मिळणार आहेत. आपल्यापुढे असलेले पर्याय कदाचित खूप सुकर, सुलभ नसतीलही. परंतु समाजामध्ये जागृती निर्माण करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, आणि ख -या अर्थाने जागतिक सहकार्य करून आपण चांगले पर्याय निवडू शकतो, अशी मला खात्री आहे.
धन्यवाद.