दादा वासवानी यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. २७ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघात आयोजित जागतिक धर्म परिषदेत दादा वासवानींची पहिल्यांदा भेट झाली होती, असे पंतप्रधानांनी सांगितले. पुण्यात २०१३ साली दादांशी झालेल्या भेटीच्या आठवणींनाही पंतप्रधानांनी उजाळा दिला.
मानवतेसाठी दादा वासवानींनी केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. ‘योग्य निवड करा’ याविषयी दादा वासवानी यांच्या विचारांचे कौतुक करतानांच नागरिकांनी भ्रष्टाचार, जातीयवाद, व्यसनाधिनता, गुन्हेगारी अशा कुप्रथांसंदर्भात योग्य निवड केल्यास या समस्यांवर मात करता येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर भारताने स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निश्चय केला पाहिजे, असे ते म्हणाले. साधु वासवानी मिशननेही या प्रयत्नात शक्य ती साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दादा वासवानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते जागतिक स्तरावरील एक मोठे नेते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी राबविलेल्या जन धन योजना,मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अशा अनेक योजनांचा सकारात्मक दृश्य परिणाम दिसतो आहे, असे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षात भारतात मोठे बदल झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. राष्ट्र उभारणीसाठी केवळ राजकारणच नाही तर योग्य वेळी योग्य शिक्षणही मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशा भारताची उभारणी करण्याप्रती आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर पुढीलप्रमाणे :
श्रद्धेय दादा जे पी वासवानी यांना त्यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त माझ्या अनेक शुभेच्छा.
वाढदिवस दादा वासवानी यांचा आहे, मात्र त्यांचा आशिर्वाद प्राप्त करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे.
दादा वासवानी यांच्या आयुष्यातील १०० वे वर्षे सुरू होत असल्यानिमित्ताने आयोजित या समारंभात मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो.
दादा वासवानी यांचे लाखो भक्त त्यांच्या निर्मळ आणि निश्चल हास्याशी चीर-परिचित आहेत.
२७ वर्षांपूर्वीच मी त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि सहजपणाचा अनुभव घेतला आहे.
त्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघात जागतिक धर्म परिषदेचे आयोजन केले जात होते आणि मलाही तेथे जाण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मी दादा वासवानी यांच्याशी राष्ट्र निर्माण तसेच सामाजिक कर्तव्ये याबाबत तासनतास चर्चा केली होती.
२०१३ साली आम्ही दोघांनी पुण्यात एकत्रितपणे साधु वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचे लोकार्पण केले होते.
गेल्या वर्षी जेव्हा दादा वासवानी दिल्लीला आले, तेव्हा मला पुन्हा एकदा त्यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हासुद्धा शिक्षण, आरोग्य अशा महत्वपूर्ण विषयांवर आम्ही बराच वेळ चर्चा केली. आजही मला व्यक्तीश: तुमची भेट घ्यायला आवडले असते, मात्र जबाबदाऱ्यांमुळे मला ते शक्य झाले नाही.
सहकाऱ्यांनो,
दादा वासवानी यांचे व्यक्तिमत्व आधुनिक भारताच्या संत परंपरेला पुढे नेणारे आहे.
मी जेव्हा-जेव्हा त्यांना भेटतो त्या प्रत्येक वेळी त्यांच्या व्यक्तिमत्वातील संतोष, विनम्रपणा आणि प्रेमाच्या वास्तविक शक्तीची अनुभूती मिळते.
आपले सर्व काही इतरांवर उधळून देण्याची वृत्ती, हाच त्यांच्या आयुष्याचा मूलाधार आहे.
दादा वासवानी यांचे एक वचन मला आठवते आहे,
तुम्हाला जितके भले करता येईल, तितके करा!
तुम्हाला जितक्या लोकांचे भले करता येईल, तितके करा!
तुम्हाला जितक्या प्रकारे भले करता येईल, तितके करा!
आणि
तुम्हाला जितक्या वेळा भले करता येईल, तितके करा!
दादा वासवानी यांचे हे वचन संपूर्ण मानवतेच्या सबलीकरणाचा मार्ग खुला करणारे आहे.
आपल्या समाजात कित्येक दीन-दु:खी, गरीब, दलीत, शोषित, वंचित आहेत. आपली परिस्थिती बदलण्यासाठी ते संघर्ष करीत आहेत, परिश्रम करीत आहेत.
साधु वासवानी मिशन, या सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांचे जगणे सोपे व्हावे, यासाठी कित्येक वर्षे प्रयत्नशील आहे. मी हृदयापासून त्यांचे अभिनंदन करतो.
सहकाऱ्यांनो,
आपण सर्व आज या उत्सवाचा शुभारंभ करत आहात, हे पाहून मला अतिशय आनंद होतो आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या विषयी आपण चर्चा केली होती, विशेषत: त्याच विषयी आज मी बोलू इच्छितो. Make The Right Choice अर्थात “योग्य निवड करा”, हा विषय आजच्या संदर्भात अगदी प्रासंगिक असा आहे.
आयुष्यात योग्य आणि अयोग्य पर्यायांबाबत दादा वासवानी यांनी सुंदर विचार मांडले आहेत. मला आज त्यांचा पुनरूच्चार करावासा वाटतो.
दादा वासवानी म्हणतात –
योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी आपण आधी आपली चेतना शांत केली पाहिजे.
आपण आपल्या भावना शांत केल्या पाहिजेत.
सगळीकडे ईश्वराचे अस्तित्व आहे, हे मान्य करून मोकळ्या मनाने विचार केला तरच आपण योग्य पर्यायाची निवड करू शकतो. आयुष्यातील प्रत्येक अनुभव आपल्याला काही शिकवण देतो. ती शिकवण आपण कशा प्रकारे स्वीकारावी, हे आपल्यावर अवलंबून आहे. आजच्या पिढीतील तरूणांनी दादा वासवानी यांच्या या विचारांपासून प्रेरणा घेतली पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते.
आज समाजात दिसून येणाऱ्या अनेक अनिष्ट बाबींमागेही हेच कारण आहे की योग्य काय आणि अयोग्य काय, हे माहिती असतानाही काही लोक अयोग्य पर्यायाची निवड करतात.
भ्रष्टाचार असो, जातीयवाद असो, गुन्हा असो, व्यसने असोत, या सर्व समस्यांशी दोन हात करता येतात. मात्र त्यासाठी आपल्याला आयुष्यात योग्य वेळी योग्य पर्याय निवडण्याची वृत्ती बाणवावी लागेल.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने योग्य पर्यायाची निवड करणे आणि त्याच बळावर आगेकूच करणे, हाच सशक्त समाजाचा सुदृढ पाया आहे. सहकाऱ्यांनो,
याच वर्षी चंपारण्य सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत, हा एक सुरेख योगायोग आहे. चंपारण्य सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी संपूर्ण देशाला सत्याग्रहाच्या शक्तीचा परिचय दिला आणि त्याचबरोबर सामाजिक कुप्रथांविरूद्ध लढा देण्यासाठी लोकसहभागाचा एक नवा मंत्र प्रस्थापित केला. चंपारण्य सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्षं सरकार, स्वच्छाग्रह म्हणून साजरे करत आहे. दादा वासवानींचा आशिर्वाद या स्वच्छाग्रहाला अधिक बळ देईल. महात्मा गांधीजींचे अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते सहाय्य करेल.
देशात स्वच्छ भारत अभियानाने एका लोक-चळवळीला प्रारंभ केला आहे. २ ऑक्टोबर २०१४ साली जेव्हा या अभियानाला सुरूवात झाली, तेव्हा देशात ग्रामीण भागात स्वच्छतेचे प्रमाण ३९ टक्के इतकेच होते, आज हे प्रमाण वाढून ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एका अतिशय चांगल्या आरोग्यपूर्ण परंपरेला सुरूवात झाली आहे. गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्येही स्वत:ला उघड्यावरील शौचमुक्त घोषित करून घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. आतापर्यंत देशभरातील २ लाख १७ हजार गावांनी स्वत:ला उघड्यावरील शौचमुक्त म्हणून घोषित केले आहे.
हिमाचल प्रदेश, हरीयाणा, उत्तराखंड, सिक्कीम आणि केरळ, अशा देशातील पाच राज्यांचा यात समावेश आहे.
आपण सर्व शिक्षणाच्या क्षेत्रात, महिला कल्याण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहात. स्वच्छाग्रहातील आपल्या अधिकाधिक योगदानामुळे नागरिकांचे प्रबोधन होईल आणि त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होईल.
मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक समाजसेवी संस्थेला एक आवाहनही करू इच्छितो.
सहकाऱ्यांनो,
वीटा, दगड जोडून शौचालय बांधता येईल, कामगारांना हाताशी धरून साफसफाई करून घेता येईल, रेल्वे स्थानके, बस स्थानके स्वच्छ करता येतील, मात्र ती सातत्याने स्वच्छ ठेवण्यासाठी आपणा सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
स्वच्छता ही एक व्यवस्था नाही, तर ती एक वृत्ती आहे. हा आपला सर्वांचा स्वभाव झाला पाहिजे, हे गरजेचे आहेत.
आपण सर्वच स्वच्छता ही वृत्ती मानून, चिकाटीने प्रयत्नशील राहिलो तर ही वृत्ती आपोआप समाजाची सहज प्रकृती होईल.
अशाच प्रकारे पर्यावरण रक्षणाप्रतीही नागरिकांना सातत्याने जागरूक करण्याची आवश्यकता आहे.
पर्यावरणातील बदल हे आजघडीला संपूर्ण जगासमोर एक मोठे आव्हान आहे.
अधिकाधीक वृक्षारोपणाचे कार्यक्रम, टाकाऊ वस्तुंपासून उर्जानिर्मितीशी संबंधित कार्यक्रम, सौर उर्जेच्या वापरासाठी लोकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम तसेच जल संरक्षणासाठी लोकांना प्रेरित करणारे कार्यक्रम आमच्या निसर्गाला आणि पर्यावरणाला अधिक सक्षम करतील.
सहकाऱ्यांनो,
दादा वासवानी आणि त्यांच्या संस्थेशी माझे इतके स्नेहपूर्ण संबंध आहेत की मी हक्काने आपल्या संस्थेला एक आर्जव करू इच्छितो.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला २०२२ साली ७५ वर्षे पूर्ण होतील. दादा वासवानी स्वत: स्वातंत्र्ययुद्धाचे साक्षीदार आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्या वीर सुपुत्रांची स्वप्ने अजून अपूर्ण अहेत.
२०२२ पर्यंत ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आज, २०१७ या वर्षी देश एक संकल्प करत आहे.
हा संकल्प आहे, नव्या भारताचा.
दादा वासवानी यांचा आशिर्वाद, साधु वासवानी मिशनची इच्छाशक्ती, हा संकल्प सिद्धीला नेण्यात सहायक ठरेल. म्हणूनच संस्थेनेही २०२२ पर्यंतचे ध्येय निश्चित करावे, अशी आग्रहाची विनंती मी करतो. हे ध्येय संख्येत जोखता यावे.
उदाहरणार्थ – स्वच्छतेच्या आग्रहासाठी आपण दर वर्षी १० हजार किंवा २० हजार लोकांशी संपर्क साधाल, सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी ५ हजार लोकांपर्यंत पोहोचाल, असा संकल्प आपल्या संस्थेने करावा.
जेव्हा देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक संस्था आपापले ध्येय निश्चित करेल आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करेल, तेव्हा ते ध्येयही साध्य होईल आणि नव भारताचे स्वप्नंही साकार होईल.
दादा वासवानी यांचा जीवनपट लक्षात घेत, आपण सर्व ज्या प्रकारे त्यांच्यावर प्रेम करतो आणि ते ज्या प्रकारे आपल्या सर्वांवर प्रेम करतात ते लक्षात घेऊन ही शताब्दी कशी साजरी करायची, हे आपण ठरवायला हवे. मला असे सुचवावेसे वाटते की हे शताब्दी वर्षं एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणारे असावे, ज्यात प्रत्येक व्यक्तीने समजासाठी काही करावे, समाजासाठी जगावे आणि तेच दादा वासवानी यांच्या तपस्येचे मूर्त रूप असेल.
दादा वासवानी यांच्या शिकवणीतून आपल्याला हे ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रेरणा मिळेल.
त्यांचा आशिर्वाद आपल्याला कायम लाभत राहो, याच शुभकामनांसह मी माझे बोलणे थांबवितो. पुन्हा एकदा, आपणा सर्वांना माझ्या अनेक शुभेच्छा.
धन्यवाद !!!”