पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत सेवाश्रम संघाच्या शतकपूर्ती कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. कार्यक्रमाचे आयोजन शिलॉंग येथे करण्यात आले आहे.
याप्रसंगी पंतप्रधानांचे स्वागत करताना भारत सेवाश्रम संघाचे महासचिव स्वामी बिस्वत्मानंद महाराजांनी भारताच्या तेजस्वी आध्यात्मिक आणि सेवा परंपरेची महती सांगितली.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातमध्ये भारत सेवाश्रम संघासोबत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी यावेळी भारता सेवाश्रम संघाला शुभेच्छा देताना सांगितले की, “सेवा आणि श्रमाचे चारित्र्य एकत्र करा”.
ते म्हणाले की. ईशान्येमध्ये संघटनेचे कार्य आणि आपत्ती काळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
धर्मग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, पंतप्रधानांनी गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेचे महत्व सांगितले.
ते म्हणाले की, भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक स्वामी प्रणबानंद यांनी शतकांपूर्वी सामाजिक न्याया संदर्भात बोलले होते आणि यासाठीच त्यांनी संघाची स्थापना केली.
ते म्हणाले की, मागील काही कालावधीपासून समज निर्माण झाला होता की, अध्यात्म आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भारत सेवाश्रम संघ त्यांच्या कार्यातून हा गैरसमज दूर करू शकते.
पंतप्रधानांनी सांगितले, स्वामी प्रणबानंद यांनी ‘भक्ती’, ‘शक्ती’ आणि ‘जनशक्तीच्या’ माध्यमातून सामाजिक विकास साध्य केला होता.
पंतप्रधानांनी भारत सेवाश्रम संघाला “स्वछाग्रहा”साठी देशात विशेषतः ईशान्य भारतात काम करण्याची विनंती केली. ईशान्येकडील राज्यांमध्ये कनेक्टीविटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ईशान्येला आग्नेय भारताचे प्रवेशद्वार म्हणून विकसित व्हायला मदत होईल.
स्वामी अम्बरीशानंद महाराज ज्यांनी पंतप्रधानांसोबत गुजरातमध्ये काम केले होते, आणि ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
पंतप्रधानांचे भाषण खालीलप्रमाणे:
दिल्ली आणि शिलॉंग मध्ये अंदाजे २ हजार किलोमीटरचे अंतर आहे,परंतु तंत्रज्ञानाने हे अंतर एकदम कमी केले आहे. गेल्या वर्षी मी मे महिन्या मध्येच शिलॉंगला गेलो होतो.
आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जेव्हा तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे.
भारत सेवाश्रमचे अध्यक्ष स्वर्गीय स्वामी अक्षयानंद महाराज यांच्यासोबत मला गुजरात मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
व्यासपीठावर उपस्थित स्वामी अम्बरीशानंद महाराज तर गुजरात युनिटचे अध्यक्ष होते. स्वामी गणेशानंद यांच्या अनुभवांमधून मला बरेच काही शिकण्याची संधी मिळाली आहे. आचार्य श्रीमत स्वामी प्रणबानंद महाराज यांनी स्थापन केलेल्या या भारत सेवाश्रम संघाला यावर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. भारत निर्मितीसाठी सेवा आणि श्रम दोन्ही एकत्र घेऊन प्रवास करणाऱ्या संघाच्या सर्व सदस्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.
एखाद्या संस्थेला १०० वर्ष पूर्ण होणे ही कोणत्याही संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. विशेषतः उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये भारत सेवाश्रम संघाचे जनकल्याणकारी कार्य खूपच प्रशंसनीय आहे.
पूर असो दुष्काळ असो नाहीतर भूकंप असो भारत सेवाश्रम संघाचे सदस्य संपूर्ण तन्मयतेने पीडितांना मदत करताना दिसून येतात.
संकटसमयी जेव्हा मनुष्याला सर्वात जास्ती मदत हवी असते तेव्हा स्वामी प्रणबानंद यांचे शिष्य सर्वकाही विसरून केवळ मानव सेवेमध्ये लीन होतात.
पीडितांना मदत करणे ह्याला तर आपल्या शास्त्रांमध्ये तीर्थयात्रे समान महत्व देण्यात आले आहे.
सांगण्यात आले आहे की,
एकत: क्रतव: सर्वे सहस्त्र वरदक्षिणा अन्यतो रोग-भीतानाम् प्राणिनाम् प्राण रक्षणम्
म्हणजे - एकीकडे विधिपूर्वक दक्षिण देऊन केलेला यज्ञ आणि दुसरीकडे दुःखी आणि रोगी व्यक्तींची केलेली सेवा ही दोन्ही कार्य तितकीच पुण्यप्रद आहेत.
मित्रांनो,
आपल्या अध्यात्मिक यात्रेच्या परमोच्च बिंदूवर पोहोचल्यानंतर स्वामी प्रणबानंद यांनी सांगितले होते की, ही वेळ महमिलनाची, महाजागरणाची, महमुक्तीची आणि महासमान न्यायाची आहे. यांनतर त्यांनी भारत सेवाश्रम संघाची पायाभरणी केली.
१९१७ मध्ये स्थापना झाल्यानंतर ज्या सेवाभावनेने या संस्थेने कार्य केले त्याने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड देखील प्रभावित झाले होते.
लोकांच्या उत्थानासाठी महाराज सयाजीराव गायकवाडांनी केलेले अथक परिश्रम सर्वश्रुत आहेत. लोककल्याण कार्याची ते चालती बोलती संस्था होते. म्हणूनच श्रीमत स्वामी प्रणबानंद यांच्या सेवदूतांना जेव्हा त्यांनी तळागाळातल्या लोंकांमध्ये काम करताना पहिले तेव्हा त्यांची स्तुती केल्याशिवाय ते राहू शकले नाहीत.
जनसंघचे संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी तर स्वामी प्रणबानंद यांना आपले गुरु मानायचे. डॉ. मुखर्जी यांच्या विचारांमध्ये स्वामी प्रणबानंद यांच्या विचारांचे दर्शन घडते.
राष्ट्र निर्मितीच्या व्हिजनसह स्वामी प्रणबानंद यांनी आपल्या शिष्यांना अध्यात्म आणि सेवेशी जोडले ते अतुलनीय आहे.
१९२३ मध्ये बंगालमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता,
१९४६ मध्ये नोआखाली मध्ये जेव्हा दंगल झाली होती.
१९५० मध्ये जेव्हा जलपायगुडी मध्ये पूर आला होता,
१९५६ मध्ये जेव्हा कच्छ मध्ये भूकंप आला होता,
१९७७ मध्ये आंध्रप्रदेश मध्ये जेव्हा चक्रीवादळ आले होते,
१९८४ मध्ये भोपाळ मध्ये जेव्हा वायुगळती झाली होती तेव्हा भारत सेवाश्रम संघाच्या लोकांनी पीडितांमध्ये राहून त्यांची सेवा केली.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे हा सगळा तो काळ होता जेव्हा देशात आपत्ती निवारणासंदर्भात संबंधित संस्थांकडे पुरेसा अनुभव नवहता. नैसर्गिक संकट असो किंवा मानव निर्मित संकट प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करण्यामध्ये भारत सेवाश्रम संघाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मागील काही वर्षांमधील घटनांविषयी बोलायचे झाले तर २००१ मध्ये जेव्हा गुजरात मध्ये भूकंप आला, २००४ मध्ये त्सुनामी आली, २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये कालप्रलय आला, २०१५ मध्ये तामिळनाडू मध्ये पूर आला तेव्हा तिथे सर्वप्रथम पोहोचणाऱ्या लोकांमध्ये भारत सेवाश्रमचे लोकं होते.
बंधू आणि भगिनींनो,
स्वामी प्रणबानंद सांगायचे की, " आदर्शां विना जीवन हे मृत्यू समान आहे. आपल्या आयुष्यात उच्च आदर्श स्थापित करूनच कोणतीही व्यक्ती मानवतेची खऱ्या अर्थाने सेवा करू शकते."
तुमच्या संस्थेच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या या गोष्टीला अंगिकारले आहे. आज स्वामी प्रणबानंद जिथे कुठे असतील तिथून मानवतेसाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना बघून खूप आनंदी होत असतील. देशातच नाही तर परदेशातही नैसर्गिक आपत्ती आल्यावर भारत सेवाश्रम संघाचे सदस्य लोकांना मदत करण्यासाठी पोहोचतात. यासाठी तुम्हा सर्वांचे जितके अभिनंदन केले जाईल तितके कमीच आहे. आपल्या शास्त्रांमध्ये देखील सांगितले आहे की,
आत्मार्थम् जीव लोके अस्मिन् को न जीवति मानवः।
परम परोपकार आर्थम यो जीवति स जीवति॥
म्हणजे, या जगात असा कोणता माणूस आहे जो स्वतः साठी जगत नाही परंतु ज्याचे जीवन परोपकार कार्यात आहे त्याचे जीवन खरे जीवन. म्हणूनच परोपकाराची अनेक प्रयत्नांनी सुभोषित तुमच्या संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
मागील काही दशकांपासून देशामध्ये एक समज निर्माण झाला आहे की, अध्यात्म आणि सेवा या दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत.
काही लोकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला कि जे अध्यात्माच्या मार्गावर आहेत ते सेवेच्या मार्गापासून दूर आहेत.
तुम्ही या समजला केवळ खोटेच नाही ठरवले तर अध्यात्म आणि भारतीय मूल्यांवर आधारित सेवेला एकत्रित पुढे नेले.
आज देशभरात भारत सेवाश्रम संघाच्या १०० हुन अधिक शाखा आणि ५००हुन अधिक केंद्र आरोग्य सेवा, शिक्षण आणि युवकांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यामध्ये व्यस्त आहेत. भारत सेवाश्रम संघाने साधना आणि समाजसेवेच्या संयुक्त उपक्रमाला लोकसेवेचे एक मॉडेल म्हणून विकसित केले आहे.
जगातील अनेक देशांमध्ये हे मॉडेल यशस्वीरीत्या सुरु आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये देखील भारत सेवाश्रम संघाच्या कल्याणकारी कार्याची स्तुती झाली आहे.
स्वामी प्रणबानंद हे मागील शतकामध्ये देशाच्या आध्यात्मिक चेतनेचे रक्षण करणाऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाशी निगडित काही महान व्यक्तींमधील एक व्यक्ती होते.
स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंदो प्रमाणेच त्यांचे नाव मागील शतकातील महान संतांच्या पंक्तीमध्ये घेतले जाते. स्वामीजी सांगायचे- "मनुष्याने आपल्या एका हातात भक्ती आणि एका हातात शक्ती ठेवली पाहिजे. त्यांचे हे मत होते की, शक्तीशिवाय कोणतीही व्यक्ती आपले संरक्षण करू शकत नाही आणि भक्ती शिवाय तो स्वतःचाच भक्षक बनण्याची भीती असते".
त्यांनी त्यांच्या बालपणीच समाजाच्या विकासासाठी शक्ती आणि भक्तीला एकत्र घेऊन जनशक्तीला एकजूट करण्याचे काम, जनचेतनेला जागृत करण्याचे काम सुरु केले होते.
निर्वाण अवस्थेच्या खूप आधी जेव्हा ते स्वामी प्रणबानंद नव्हते केवळ “विनोद” होते; आपल्या गावातील प्रत्येक घरात जाऊन तांदूळ आणि भाजी गोळा करायचे आणि नंतर ते सगळे गरिबांच्या घरी वाटायचे. जेव्हा त्यांनी पहिले की, गावापर्यंत जायला रस्ता नाही तेव्हा त्यांनी सर्वांना एकत्रित करून गावा पर्यंत जाणारा रस्ता बांधला.
जाती पातीच्या, स्पृश्य अस्पृश्यतेच्या विषाने सर्व समाज विखुरला आहे, याची जाणीव त्यांना खूप आधीच झाली होती. यासाठीच सर्वांना समानतेचा मंत्र शिकवत गावातील प्रत्येक व्यक्तीला बरोबर घेवून देवाची पूजा करायचे.
१९व्या शतकाच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या सुरवातीला बंगालमध्ये ज्याप्रकराची राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्या कालखंडामध्ये स्वामी प्रणबानंद यांनी राष्ट्रीय चेतना जागृत करण्याचे प्रयत्न अधिक जोरदार केले होते.
बंगालमध्येच स्थापना झालेल्या अनुशिलन समितीच्या क्रांतीकाऱ्यांना ते उघड उघड पाठिंबा देत. इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये ते एकदा कारागृहात देखील गेले होते. आपल्या कार्यांनी त्यांनी हे सिद्ध केले की, साधना करण्यासाठी केवळ गुहांमध्येच राहणे गरजेचे नाही तर जनजागरण आणि जनचेतना जागृत करूनही साधना होऊ शकते; ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो.
बंधू आणि भगिनींनो,
आजपासून १०० वर्षांपूर्वी देशाची जी मनस्थिती होती; गुलामगिरीच्या बेड्या तोडून मुक्त होऊ इच्छित होता, त्यावेळी देशाच्या वेगवेगळ्या भूभागांवर जनशक्तीला संघटीत करण्याचे प्रयत्न अविरत सुरु होते.
१९१७ ला महात्मा गांधीनी चंपारण्य सत्याग्रहाचे बीजारोपण केले होते. आपल्या सर्वांसाठी हा सुखद संयोग आहे की, चंपारण्य सत्याग्रहाचीही यावर्षी शतकपूर्ती आहे.
सत्याग्रह आंदोलनासोबतच महात्मा गांधींनी लोकांना स्वच्छतेप्रती जागरूक केले होते. तुम्हाला माहित असेलच गेल्या महिन्यात चंपारण्य सत्याग्रहाप्रमाणेच देशामध्ये स्वच्छाग्रह अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छाग्रह म्हणजे स्वच्छतेप्रती आग्रह. आज याप्रसंगी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही स्वच्छाग्रहाला देखील आपल्या साधनेचे अविभाज्य अंग बनवावे. याचे एक कारण देखील आहे.
तुम्ही पहिले असेल की, तीन चार दिवसांपूर्वीच यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणामधील शहरांची क्रमवारी जाहीर केली.
ईशान्येकडील राज्यांमधील १२ शहरांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले होते.परंतु तेथील परिस्थिती काही फार चांगली नाही. या क्रमवारीत फक्त गंगटोक शहर ५०व्या क्रमांकावर आहे. ४ शहरांची क्रमवारी १०० ते २०० क्रमांकांच्या मध्ये आहे आणि उर्वरित ७ शहर २०० ते ३०० च्या दरम्यान आहेत. शिलॉंग जिथे तुम्ही बसला आहात ते देखील २७६व्या क्रमांकावर आहे.
ही स्थिती आपल्यासाठी, राज्य सरकारांसाठी आणि भारत सेवाश्रम संघासारख्या संस्थासाठी आव्हान आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत संस्था आपले कार्य करत आहेत, परंतु त्यासोबतच प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव करून देणे आवश्यक आहे की, त्याने स्वतःला स्वच्छता मिशनचा एक शिपाई समजले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांनीच स्वच्छ भारत स्वच्छ ईशान्य भारताचे लक्ष्य पूर्ण होईल.
बंधू आणि भगिनींनो,
स्वामी प्रणबानंद जी महाराज सांगायचे -
"देशाची परिसस्थिती बदलण्यासाठी लाखो निस्वार्थ कर्मयोग्यांची आवश्यकता आहे. हेच निस्वार्थ कर्मयोगी देशाच्या प्रत्येक नागरिकाची विचारसरणी बदलतील आणि त्याच बदललेल्या विचारसरणीने एका नवीन राष्ट्राची निर्मिती होईल".
स्वामी प्रणयानंदजी सारख्या महान आत्म्यांच्या प्रेरणेमुळे देशात तुमच्यासारखे करोडो निस्वार्थ कर्मयोगी आहेत. आपल्याला केवळ एकत्रित येऊन आपली ऊर्जा स्वच्छाग्रहाचे आंदोलन यशस्वी बनवण्यासाठी खर्ची केली पाहिजे.
मला सांगण्यात आले होते की, जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरु झाले होते, तेव्हा तुम्ही लोकांनी ईशान्येकडील ५ रेल्वे स्थानकांची निवड केली होती. त्या स्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी घ्या, तिथे पंधरवड्याने स्वछता अभियान राबवले जाईल. आता तुम्हाला अधिक जोमाने प्रयत्न करायला हवे.
यावर्षी तुम्ही तुमच्या संस्थेचे शतक महोत्सव वर्ष साजरे करत आहात,मग तुम्ही हे महत्वपूर्ण वर्ष पूर्णतः स्वच्छतेवर केंद्रित करू शकाल?
तुमची संस्था ज्या विभागांमध्ये काम करते, तिथे पर्यावरण रक्षणासाठी संपूर्ण विभागाला प्लास्टिक मुक्त करण्याचे कार्य करेल? लोकांमध्ये जलसंरक्षण आणि जल व्यवस्थापना संदर्भात जनजागृती करू शकेल?
तुम्ही तुमची उद्दिष्टे, संस्थेची काही कार्ये वर्ष २०२२ शी जोडू शकता का? २०२२ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण करेल. यासाठी अजून ५ वर्ष बाकी आहेत. या कालावधीचा उपयोग प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संस्थेने आपल्या आजूबाजूला असलेल्या वाईट गोष्टींचा बिमोड करून पुढे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मित्रांनो,
तुम्हाला माहीतच असेल की, १९२४ मध्ये स्वामी प्रणबानंद यांनी देशभरातील अनेक तीर्थस्थानाचा जिर्णोधार केला होता.
तिर्थ शंकर या नावाने त्यांनी हा कार्यक्रम सुरु केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या तीर्थस्थानांमधील कमतरता शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला होता. आज आपल्या तीर्थस्थानांमधील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तिथली अस्वच्छता. भारत सेवाश्रम संघ स्वच्छतेच्या अभियानाला तिर्थ शंकर कार्यक्रमाशी जोडून पुन्हा एकदा नव्याने हा कार्यक्रम सुरु करणार का?
याचप्रकारे आपत्ती व्यवस्थापनातील तुमचे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येतील यावर देखील भारत सेवाश्रम संघाने विचार केला पाहिजे. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात पडतो. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी कमीत कमी नुकसान होईल याची खबरदारी घेण्यासाठी गेल्या वर्षी देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्यात आली होती. सरकार मोठ्या संख्येने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून देखील लोकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पद्धती सांगितल्या जात आहेत.
मित्रांनो,
ईशान्येकडील राज्यांमधील तुमचा सहभाग आणि संघटन शक्तीचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनासाठी होऊ शकतो. तुमची संस्था लोकांना आपत्तीच्या आधीची आणि नंतरच्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी तयार करू शकते.
याचप्रमाणे स्वामी प्रणबानंद यांनी ज्याप्रकारे देशभरात प्रवचन गट पाठवून आध्यात्म आमी सेवेचा संदेश देश-परदेशात पोहोचवला तसेच तुमची संस्था ईशान्येकडील राज्यांच्या कानाकोपऱ्यात जाऊन, आदिवासी भांगांमध्ये जाऊन प्रतिभावान खेळाडूंना शोधण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते. या भागांमध्ये तुमच्या अनेक शाळा आहेत, तुमच्या वसतिगृहांमध्ये शेकडो आदिवासी मुलं राहतात, म्हणूनच हे काम तुमच्यासाठी कठीण नाही.
तुम्ही तळागाळात लोकांमध्ये राहून काम करणारी लोकं आहात, तुमच्या पारखी नजरेतून प्रतिभावान खेळाडूंना प्रसिद्धी झोतात आणण्यासाठी मदत होऊ शकते.
स्वामी प्रणबानंद सांगायचे की, देशाची युवाशक्ती जर जागृत झाली नाही तर सर्व प्रयत्न वाया जातील.
ईशान्येकडील राज्यांमध्ये दडलेल्या युवाशक्तीला, प्रतिभावान खेळाडूंना मुख्याप्रवाहत आणण्याची आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. यामध्ये तुमच्या संस्थेची भूमिका महत्वपूर्ण ठरू शकते.
मला केवळ इतकेच सांगायचे आहे की तुमच्या या सेवा साधनेसाठी तुम्ही जे काही उदिष्ट निश्चित कराल ते मोजू शकता येईल, म्हणजेच ज्याला अंकांमध्ये मोजता येणे शक्य असेल.
स्वच्छतेसाठी तुम्ही ईशान्येकडील १० शहरांमध्ये काम कराल की, १००० गावांमध्ये काम कराल ते तुम्ही स्वतः ठरवा. आपत्ती व्यवस्थापनासाठी १०० शिबीर लावायची की, १००० हे तुम्ही स्वतः ठरवा; परंतु मला इतकेच सांगायचे आहे की, जे काही ठरवलं ते मोजता आले पाहिजे.
२०२२ पर्यंत सेवाश्रम संघाने हे सांगितले पाहिजे की. आम्ही फक्त अभियान नाही राबवले, तर ५० हजार लोकांना याच्याशी जोडले आहे.
जसे स्वामी प्रणबानंद सांगायचे-
“नेहमी एक रोजनिशी ठेवली पाहिजे”,
तसेच तुम्ही देखील संस्थेची एक रोजनिशी तयार करू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमचे लक्ष्य लिहू शकता आणि निश्चित कालावधी मध्ये ते लक्ष्य किती पूर्ण झाले हे देखील लिहावे.
तुमचे हे प्रयत्न,
तुमची ही मेहनत,
देश निर्मितीसाठी,
नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.
मेहनतीला तर आपल्या इथे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते आणि आपल्या इथे प्रत्येक परिस्थितीत दान देण्याची प्रेरणा दिली जाते.
श्रद्धया देयम्, अ-श्रद्धया देयम्,
श्रिया देयम्, ह्रया देयम्, भिया देयम्, सम्विदा देयम्
म्हणजेच मनुष्याने श्रद्धेने दान दिले पाहिजे आणि जरी श्रद्धा नसेल तरीही दान दिले पाहिजे. धनात वृद्धी झाली तर दान केले पाहिजे आणि जर धन वाढत नसेल तर लोक लाजेस्तव दान केले पाहिजे. घाबरून दान केले पाहिजे किंवा प्रेमाने दान केले पाहिजे.सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, प्रत्येक परिस्थितीमध्ये मनुष्याने दान केले पाहिजे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील ईशान्येकडील राज्यांचा समतोल विकास झालेला नाही म्हणूनच मी ह्या भागाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्र सरकार मागील ३ वर्षांपासून आपल्याकडील उपकरणांनी, मनुष्य बळाच्या सहाय्याने ईशान्येकडील राज्यांचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.
संपूर्ण भागामध्ये कनेक्टीव्हिटी वाढवण्यावर देखील भर देण्यात येत आहे.
४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ईशान्येकडील राज्यांमध्ये रस्ते पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे.
ईशान्येकडील छोट्या विमानतळांचे देखील आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तुमच्या शिलाँग विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवण्याला देखील मंजुरी देण्यात आली आहे.
हे सर्व प्रयत्न ईशान्येला आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार बनायला मदत करेल.
अग्नेय आशियाचे हे सुंदर प्रवेशद्वार जर अस्वच्छ असेल, निरोगी नसेल, अशिक्षित असेल, संतुलित नसेल तर देश विकासाचे प्रवेशद्वार ओलांडू शकणार नाही. उपकरणे आणि मनुष्यबळाने संपन्न आपल्या देशात असे कोणतेही कारण नाही जे आपल्यला मागासलेले, गरीब राहण्यासाठी भाग पडेल.
“सबका साथ सबका विकास” या मंत्रासह आपल्याला सर्वांना सशक्त करत पुढे मार्गक्रमण करायचे आहे.
आपला समाज – समन्वय, सहयोग आणि सौहार्दने सशक्त असेल
आमचे युवक – चरित्र, चिंतन आणि चेतनेने सशक्त असतील
आपला देश – जनशक्ती, जनसमर्थन आणि जनभावनेने सशक्त असेल.
या परिवर्तनासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी, नवीन भारत उभारण्यासाठी सर्वांना, करोडो निस्वार्थ कर्मयोग्यांना, भारत सेवाश्रम संघ सारख्या अनेक संस्थांना एकत्र एवून काम केले पाहिजे. हेच आवाहन करून मी माझे म्हणणे थांबवतो.
पुन्हा एकदा भारत सेवाश्रम संघाच्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद!!!
I am in Delhi & the programme in Shillong...but we are connected due to technology. I recall my Meghalaya visit last year: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Centenary celebrations are unique moments...on moments like this we remember the good work of the Bharat Sevashram Sangha: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Swami Pranavananda connected his disciples to service and spirituality: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
During several natural disasters, BSS teams have served people with great dedication. Their good work is widely remembered: PM
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Sadly, some people tried to create a false perception that 'Adhyatma' is different from 'Seva.' BSS has proven them wrong: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Societal development through 'Bhakti', 'Shakti' and 'Jan Shakti' was achieved by Swami Pranavananda: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Swami Pranavananda never liked social divisions and inequalities: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
This year we also mark 100 years of the Champaran Satyagraha. Along with Satyagraha, Mahatma Gandhi emphasised on Swachhata: PM
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Let us work towards a Clean India and a Clean Northeast: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
Swami Pranavananda believed firmly in the power of the youth: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
In the last three years, the development of the Northeast has become a priority. Focus is on connectivity and infrastructure: PM
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017
We are also improving the electricity situation in the Northeast and trying to bring even more tourists to the Northeast: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2017