स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) समारोपाचा कार्यक्रम कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाच्यावतीने आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेले भाषण.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, ‘‘ या महोत्सवातून स्वामीजींच्या भाषणाचा प्रभाव विशेषत्वाने जाणवत आहे. पश्चिमात्य देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याचे कार्य स्वामीजींच्या या प्रभावी भाषणाने केले आहे. भारतीय विचारसरणी आणि भारतीय तत्वज्ञानाला योग्य स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून केलं.’’
भारताकडे असलेल्या महान, वैभवशाली वैदिक तत्वज्ञानाचा परिचय स्वामी विवेकानंदांने संपूर्ण जगाला यावेळी करून दिला, असं सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘ शिकोगामध्ये त्यांनी जगाला वैदिक तत्वज्ञान म्हणजे काय हे सांगितलं. त्याचबरोबर आपल्यामध्ये किती अमर्याद क्षमता आहे, आपल्याकडे प्राचीन वैदिक ज्ञानाचे किती भांडार आहे, याचे स्मरण आपल्या देशबांधवांना करून दिले. आपली अभिमानास्पद संस्कृती, तिची पाळंमुळं यांची जाणीव करून आपल्यामध्ये विश्वासाचे, नवचैतन्याचे स्फुल्लिंग चेतवण्याचं कार्य स्वामीजींनी केले.’’
श्री. नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले,‘‘ स्वामी विवेकानंदांच्या दिव्य दृष्टीमुळेच आज भारत मोठ्या आत्मविश्वासाने विकासाच्या मार्गावरून वाटचाल करीत आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण: –
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) समारोपाचा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजत आहे. आज या कार्यक्रमामध्ये मित्रवर्ग, युवक आणि प्रौढ मिळून जवळपास चार हजारजण सहभागी झाले आहेत, अशी माहिती मला देण्यात आली आहे.
सव्वाशे वर्षांपूर्वी ज्यावेळी स्वामी विवेकानंदजी यांनी शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भाषण केले होते त्यावेळीही जवळपास चार हजार श्रोते उपस्थित होते, हा एक योेगायोग म्हणावा लागेल.
एखाद्या भाषणाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होतो, असे हे फारच दुर्मिळ उदाहरण आहे. असे यापूर्वी कधी झाले असेल, असे वाटत नाही, तसेच मला माहीतही नाही.
कदाचित असे झालेच नसणार.
या महोत्सवावरूनच स्वामीजींच्या भाषणाचा प्रभाव दिसून येतो. भारताकडे पश्चिमात्य देशांचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याचे कार्य स्वामीजींच्या या प्रभावी भाषणाने केले. भारतीय विचारसरणी आणि भारतीय तत्वज्ञानाला योग्य स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून केलं.
आज आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे औचित्य खूपच विशेष आहे, असं मला वाटतं.
रामकृष्ण मठ आणि मिशन यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. या ऐतिहासिक भाषणाचा 125 वे वर्ष साजरे करण्यासाठी सहभागी झालेले कार्यकर्ते, त्याचबरोबर तामिळनाडू सरकार, आज इथं जमलेले हजारो युवामित्र अभिनंदनास पात्र आहेत.
आज इथं आपल्याला स्वात्विक गुणांचे संत आणि त्यांच्याबरोबर कार्यरत असलेले उत्साही युवामंडळी यांच्यामध्ये निर्माण झालेला अद्भूत संयोग पहायला मिळाला. भारताची हीच खरी ताकद आहे.
हा कार्यक्रम स्थानापासून कदाचित मी फार दूर आहे, तरीही मला या प्रचंड ऊर्जेची जाणीव होत आहे.
आज भाषणासाठी मला वेळेची कोणतीही मर्यादा नाही, असं सांगण्यात आलं आहे. मठाच्या वतीने अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शाळा आणि महाविद्यालयीन मुलांपर्यंत स्वामीजींचा संदेश पोहोचवण्यासाठी या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. आपल्याकडच्या युवकांनी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली पाहिजे. त्याचबरोबर आज ज्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, त्यावर अशा चर्चांमधून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांमध्ये अशा प्रकारचा उत्साह असला तरच देशापुढील आव्हानांना एकत्रितपणे धैर्यानं सामोरं जाता येणार आहे. ‘‘एक भारत, श्रेष्ठ भारत’’ हा संदेश स्वामींजींच्या तत्वज्ञानातून आपल्याला मिळतो, त्याचा अंगिकार आपण केला पाहिजे.
मित्रांनो, स्वामी विवेकानंदजी यांनी आपल्या भाषणांतून भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि प्राचीन परंपरा यांच्यावर प्रकाश टाकून संपूर्ण जगाला भारताची महानता पटवून दिली.
स्वामीजींच्या शिकोगामधल्या भाषणाविषयी अनेक लोकांनी लिहिले आहे. आजच्या या कार्यक्रमात मान्यवरांनीही त्या भाषणाविषयी चर्चा करून मनोगते व्यक्त केली असतील. आज या घटकेला आपण पुन्हा एकदा काळाच्या मागे जावून स्वामीजींच्या त्या प्रभावी शब्दांचे स्मरण करण्याची गरज आहे.
मी आज स्वामीजींच्या शब्दातूनच त्यांच्या भाषणाच्या प्रभावाविषयी बोलणार आहे. चेन्नई येथे त्यांच्या भाषणाविषयी काहीजणांनी प्रश्न विचारले होते, त्याला उत्तर देताना, स्वामीजी म्हणाले होते, ‘‘भारताच्या दृष्टीने आणि भारतीय विचाराच्या दृष्टीने शिकागो परिषद अतिशय यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. यामुळे संपूर्ण जगामध्ये वेदांत जाणून घेण्याची जणू एक लाट आली आहे. हेच या परिषदेचे यश म्हणता येईल.’’
मित्रांनो,
स्वामीजी ज्या काळामध्ये होते, त्या काळाचा विचार केला तर, त्यांनी परदेशामध्ये जावून केलेल्या या महान कार्याचे मूल्यमापन करणे किती अवघड आहे, हे आपल्या लक्षात येईल.
आपला देश परकीयांच्या आक्रमणाखाली, सत्तेखाली पिचून गेला होता. समाजाला कैक वर्षे मागे लोटण्याचं कार्य परकीय सत्ताधारी करीत होते. अनेक कुप्रथांचे चलन त्या काळात होते. अशी गुंतागुंतीची सामाजिक वीण त्या काळात होती.
परकीय सत्ताधीश, त्यांचे न्यायाधीश, त्यांचे धर्मोपदेशक यांच्यामुळे देश जखडून गेला होता. आपले हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान, वैभवशाली संस्कृतिक वारसा यावर जळमटे चढली होती.
आपलेच लोक या महान परंपरा, वारशाकडे फारसे अभिमानाने त्यावेळी पहात नव्हते. ते आपल्या मुळांपासून तुटल्यासारखे, बाजूला गेल्यासारखे झाले होते. स्वामीजींनी समाजाची या तत्कालीन परिस्थितीचे आव्हान ओळखले, स्वीकारले आणि समाजमनामध्ये बदल घडवून आणण्याचे कार्य केले. लोकांच्या मनावर साचलेली जळमटे, विचारांवर जमा झालेली धूळ बाजूला केली. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचा विचार जनमानसामध्ये रूजवला.
शिकोगामध्ये त्यांनी जगाला वैदिक तत्वज्ञान म्हणजे काय हे सांगितलं. त्याचबरोबर आपल्यामध्ये किती अमर्याद क्षमता आहे, आपल्याकडे प्राचीन वैदिक ज्ञानाचे किती भांडार आहे, याचे स्मरण आपल्या देशबांधवांना करून दिले. आपली अभिमानास्पद संस्कृती, तिची पाळंमुळं यांची जाणीव करून आपल्यामध्ये विश्वासाचे, नवचैतन्याचे स्फुल्लिंग चेतवण्याचं कार्य स्वामीजींनी केले.
अध्यात्मवाद आणि तत्वज्ञान यांची नेमकी आणि खरी ओळख संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंद यांनी करून दिली. या विचारांची विश्वभरात लाट निर्माण करण्याचं काम केलं.
मित्रांनो,
भारताने संपूर्ण आत्मविश्वासानं पुढं जावं, अशी दृष्टी स्वामी विवेकानंद यांची होती. आपण स्वतःवर शंभर टक्के विश्वास ठेवून कोणतंही कार्य केलं तर अशक्य वाटणारं कार्यही पूर्णत्वास जावू शकते. आपला स्वतःच्या कठोर परिश्रमावर विश्वास आहे ना? प्राचीन योग आणि आयुर्वेद यामुळे भारताची संपूर्ण जगामध्ये एक वेगळीच ओळख झाली आहे. योग आणि आयुर्वेदामुळे चांगले आरोग्य लाभते, हे सर्व विश्वाला माहीत झाले आहे. आता त्याच जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे.
आज जेव्हा भारताने एकाचवेळी शेकडो उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे, जेव्हा जग मंगळयान आणि गगनयानाची चर्चा करते, जेव्हा इतर देश आपल्या ‘भीम’सारख्या डिजिटल ॲपची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देशाच्या आत्मविश्वासात आणखी वाढ होते. गरीब आणि वंचितांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. याचा परिणाम आमच्या तरुणांच्या आणि आमच्या मुलींच्या आत्मविश्वासात दिसून येतो.
अलिकडे, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आमच्या खेळाडूंनी दाखवून दिले, तुम्ही कितीही गरीब असा, तुमच्या कुटुंबाची स्थिती कशीही असो, आत्मविश्वास आणि परिश्रमांनी तुम्ही तुमच्या देशाच्या अभिमानाचा विषय ठरता.
आज देशातील विक्रमी धान्योत्पादन आमच्या शेतकऱ्यांमधला हाच दृष्टीकोन दाखवून देतो. आमचे कामगार औद्योगिक उत्पादनाला गती देत आहेत. तरुण अभियंते, तुमच्यासारखे वैज्ञानिक, उद्योजक देशाला स्टार्टअप्सच्या नव्या क्रांतीकडे घेऊन जात आहेत.
मित्रांनो,
स्वामीजींना ठाम विश्वास होता, भारताचे भविष्य तरुणांवर अवलंबून आहे. वेदांच्या आधारे ते म्हणायचे, “It is the young, the strong and healthy, of a sharp intellect, that will reach the Lord.”
मला आनंद आहे की आजची युवापिढी अभियानाचा भाव बाळगून पुढे जात आहे. युवापिढीच्या आकांक्षा लक्षात घेऊन सरकार नवी कार्य संस्कृती आणि नवा दृष्टीकोन विकसित करत आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही, जरी साक्षरतेत वाढ झाली असली तरी आमच्या अनेक युवकांकडे रोजगारासाठीच्या कौशल्याचा अभाव आहे. दुर्दैवाने आमच्या शिक्षण व्यवस्थेने रोजगारावर पुरेसा भर दिलेला नाही.
युवा पिढीसाठी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखून सरकारने कौशल्य विकासासाठी मंत्रालय स्थापन केले आहे. याखेरीज आपली स्वप्ने स्वबळावर पूर्ण करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आमच्या सरकारने बँकांचे दरवाजे खुले केले आहेत.
मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 कोटींहून अधिक कर्जे देण्यात आली आहेत. देशातल्या नगरांमध्ये आणि गावांमध्ये स्वयंरोजगाराला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
स्टार्टअप इंडिया मोहिमेअंतर्गत नाविन्यपूर्ण संकल्पनासाठी प्रोत्साहनपर मंच सरकार पुरवत आहे.
परिणामस्वरुप केवळ गेल्या वर्षभरात 8000 स्टार्ट अप्सना मान्यता प्रमाणपत्र मिळाले आहे. 2016 मध्ये सुमारे 800 स्टार्टअप्सना प्रमाणपत्र मिळाले होते. म्हणजे वर्षभरात दसपट वाढ झाली आहे.
शाळांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन वातावरण निर्माण व्हावे यासाठी ‘अटल नवाचार अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत देशभरात पुढल्या पाच वर्षात 5000 अटल सुधार प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
नाविन्यपूर्ण संकल्पना, पुढे आणण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनसारखे उपक्रम आम्ही राबवत आहोत.
मित्रांनो,
स्वामी विवेकानंदांनी सामाजिक, आर्थिक समस्यांवर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, गरीबातल्या गरीब लोकांचे जीवनमान उंचावल्यास एका विशिष्ट पातळीला सर्व समान राहतील. आम्ही याच दिशेने गेल्या चार वर्षांपासून काम करत आहोत. गरीबांच्या उंबरठ्यापर्यंत आम्ही बँकांना पोहोचवले असून जनधन लेखाद्वारे आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे वित्तीय समावेशन सुरू केले आहे. अनेक योजना जसे की, गरीबातल्या गरीब लोकांची जीवनशैली उंचावण्यासाठी त्यांना गॅस आणि विद्युत जोडणी, आरोग्य आणि जीवन विमा योजना या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
या महिन्याच्या 25 तारखेला आम्ही देशभरातील आयुषमान भारत योजना सुरू करणार आहोत. या योजनेअंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय सेवा असाध्य रोगांच्या उपचारांसाठी विनामूल्य देण्यात येतील. मी तामिळनाडू सरकारचे आणि तेथील नागरिकांचे या योजनेशी संलग्नित झाल्याबद्दल अभिनंदन करतो.
आमचा उद्देश हा केवळ मुळासकट गरीबी निर्मूलन करणे हा नसून देशभरात सर्वत्र त्याची कारणे शोधणे हा आहे.
मी तुम्हाला आठवण करून देतो की, आजचा हा दिवस हा एका वेगळ्या प्रसंगाची स्मृती जागृत करणारा दिवस आहे. आज म्हणजे 9/11 ला संपूर्ण जगात प्रतिध्वनी उमटेल असा दहशतवादी हल्ला झाला होता. विविध देशांच्या समुदायाने या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगतो यावरचा उपाय हा केवळ स्वामीजींनी दाखवलेल्या सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती या मार्गाद्वारेच आहे.
स्वामीजी म्हणाले होते की मला अशा धर्माचा अभिमान आहे जिने जागतिक स्तरावर सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृतीची शिकवण दिली.
मित्रांनो,
आपण मुक्त कल्पकता असलेल्या देशातील आहोत. अनेक शतकांपासून आपल्या संस्कृतीद्वारे कल्पनांची देवाणघेवाण करण्यात येत आहे. तसेच चर्चा आणि निर्णय ही आपली परंपरा आहे. लोकशाही आणि वादविवाद या आपल्या देशांची अंतर्गत मूल्ये आहेत.
परंतु मित्रांनो, अजूनही आपल्या समुदायाची वाईट गोष्टींपासून सुटका झालेली नाही. भारतासारख्या मोठ्या देशात विविधतेत एकता असताना अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आहेत.
विवेकानंद नेहमी म्हणत की, सर्व प्रकारच्या वयोमानात वाईट गोष्टीरुपी राक्षस वास करतात. आपल्याला अशांपासून जागृत राहायला हवे, आणि त्यावर मात करायला हवी. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा भारतीय समुदाय विभागला जाईल, जेव्हा नागरिकांमध्ये अंतर्गत मतभेद किंवा असंतोष असेल त्यावेळी बाहेरील शत्रू त्याचा नक्कीच फायदा घेतील.
आणि या लढ्यादरम्यान आपल्या संतांनी, सामाजिक सुधारकांनी एकतेचा आणि एकात्मतेचा खरा मार्ग दाखविला आहे.
आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा नवीन भारत घडवायचा आहे. मी माझ्या भाषणाचा समारोप तुम्हा सर्वांचे आभार मानून करतोय. तुम्ही मला या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिलीत. मी अशा शाळा आणि विद्यापीठात जाणाऱ्या हजारो मित्रांचे अभिनंदन करतो की ज्यांनी स्वामीजींचे संदेश वाचलेत, आत्मसात केलेत तसेच स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसही जिंकली.
पुन्हा एकदा आभार…!