रामकृष्ण मठाचे महासचिव स्वामी सुविरानंदा जी महाराज, स्वामी दिव्यानंद जी महाराज, इथे उपस्थित पूज्य संतगण, अतिथिगण, माझ्या युवक मित्रांनो,
तुम्हा सर्वाना स्वामी विवेकानंद जयंतीच्या या पवित्र प्रसंगी , राष्ट्रीय युवा दिनी खूप -खूप शुभेच्छा. देशबांधवांसाठी बेल्लूर मठाच्या या पवित्र भूमीला भेट देणे हे कुठल्याही तीर्थयात्रेशिवाय कमी नाही, मात्र माझ्यासाठी नेहमीच घरी आल्यासारखे आहे. अध्यक्ष स्वामी यांचा, इथल्या सर्व व्यवस्थापकांचा मनापासून आभारी आहे, त्यांनी मला काल रात्री इथे राहण्याची परवानगी दिली आणि सरकारचा देखील मी आभारी आहे कारण सरकार प्रोटोकॉल, सुरक्षा इथून तिथे जाऊ देत नाहीत. मात्र माझ्या विनंतीचा व्यवस्थापनाने देखील मान ठेवला आणि मला या पवित्र भूमीवर रात्री वास्तव्य करण्याचे सौभाग्य लाभले. इथल्या भूमीत, इथल्या हवेत स्वामी राम कृष्ण परमहंस, माता शारदा देवी, स्वामी ब्रह्मानंद, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक गुरूंचे सानिध्य प्रत्येकाला जाणवत आहे.जेव्हा जेव्हा मी बेल्लूर मठाला भेट देतो तेव्हा भूतकाळाची ती पाने उघडली जातात, ज्यामुळे आज मी इथे आहे. आणि 130 कोटी भारतीयांच्या सेवेत थोडेफार कर्तव्य पार पाडत आहे.
गेल्या वेळी जेव्हा मी इथे आलो होतो, तेव्हा गुरुजी, स्वामी आत्मास्थानंद जी यांचे आशीर्वाद घेऊन गेलो होतो. आणि मी म्हणू शकतो की त्यांनी मला बोट धरून लोकसेवा हीच ईश्वरसेवा हा मार्ग दाखवला. आज ते शारीरिक दृष्ट्या आपल्यात उपस्थित नाहीत. परंतु त्यांचे कार्य, त्यांनी दाखवलेला मार्ग, रामकृष्ण मिशन म्हणून नेहमी आपला मार्ग सुकर करत राहील.
इथे अनेक तरुण ब्रह्मचारी बसले आहेत आणि मला त्यांच्या बरोबर काही क्षण घालवण्याची संधी मिळाली. तुमच्या मनाची जी अवस्था होती ती एकदा माझी देखील होती. आपल्यापैकी अनेकजण इथे आपणहून येतात, याचे कारण विवेकानंदांचे विचार, त्यांची वाणी, विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व, आपल्याला इथे घेऊन येतात याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. मात्र, …. मात्र, …. या भूमीवर आल्यानंतर माता शारदा देवी यांचे ममत्व आपल्याला स्थायिक होण्यासाठी एका आईचे प्रेम देतो. जेवढे ब्रह्मचारी लोक आहेत, सर्वांना हीच अनुभूती येते, जी कधीकाळी मला यायची.
मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे असणे केवळ एका व्यक्तीचे असणे नाही, तर ते एका जीवनधारेचे, जीवनशैलीचे नामरूप आहे. त्यांनी गरीबांची सेवा आणि देशभक्तीलाच आपल्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट देखील मानलं , जगले देखील आणि जगण्यासाठी आजही कोट्यवधी लोकांना मार्ग देखील दाखवला.
तुम्ही सर्व, देशातील प्रत्येक युवक आणि मी विश्वासाने सांगत आहोत. देशातील प्रत्येक युवक, भले तो विवेकानंदांना ओळखत असेल किंवा नसेल, कळत -नकळत तो देखील त्या संकल्पाचा भाग आहे. काळ बदलला आहे, दशक बदलले , शतक बदलले मात्र स्वामीजींचा तो संकल्प सिध्दीपर्यत पोहचवण्याची जबाबदारी आपल्यावर देखील आहे, भावी पिढींवर देखील आहे. हे काम काही असे नाही कि एकदा केले आणि झाले. हे अविरत करण्याचे काम आहे, निरंतर करण्याचे काम आहे, युगायुगापर्यंत करण्याचे काम आहे.
अनेकदा आपण असा विचार करतो कि माझ्या एकट्याच्याने केल्यामुळे काय होणार आहे. माझे म्हणणे कुणी ऐकूनही घेत नाही. मला जे वाटते, मी जो विचार करतो, त्याकडे कुणी लक्षच देत नाही. आणि या स्थितीतून तरुण मनाला बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. आणि मी तर सरळ सोपा मंत्र सांगतो. जो मी कधी गुरुजनांकडून शिकलो आहे. आपण कधी एकटे नसतो. कधीच एकटे नसतो. आपल्याबरोबर आणखी एक जण असतो, जो आपल्याला दिसत नाही, तो ईश्वराचे रूप असतो. आपण कधीच एकटे नसतो. आपला तारणहार प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबरच असतो.
स्वामीजींची ती गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी, जेव्हा ते म्हणायचे कि , ” जर मला शंभर ऊर्जावान युवक मिळाले तर मी भारताला बदलून टाकेन “. स्वामीजी कधी असे नाही म्हणाले, कि मला शंभर लोक भेटले तर मी हा बनेन … असे नाही म्हणाले… ते म्हणाले कि भारत बदलेल. म्हणजेच परिवर्तनासाठी आपली ऊर्जा, काहीतरी करून दाखवायचा उत्साह हाच विश्वास कायम राखणे आवश्यक आहे.
स्वामीजी तर गुलामगिरीच्या त्या कालखंडात 100 अशा युवा मित्रांचा शोध घेत होते. मात्र 21 व्या शतकाला भारताचे शतक बनवण्यासाठी , नव्या भारताच्या निर्माणासाठी तर कोट्यवधी उर्जावान युवक आज भारताच्या कानाकोपऱ्यात उभे आहेत. जगातील सर्वात मोठा युवकवर्ग भारताकडे आहे.
मित्रांनो, 21 व्या शतकातील भारताच्या या देशातील युवकांकडून केवळ भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या अपेक्षा आहेत. तुम्ही सर्व जाणता की देशाने 21व्या शतकासाठी , नव्या भारताच्या निर्मितीसाठी मोठे संकल्प करत पावले उचलली आहेत. हे संकल्प केवळ सरकारचे नाहीत, हे संकल्प 130 कोटी भारतीयांचे आहेत, देशातील युवकांचे आहेत.
गेल्या 5 वर्षातील अनुभवावरून दिसते कि देशातील युवक ज्या मोहिमेशी जोडले जातात, ती नक्कीच यशस्वी होते. भारत स्वच्छ होऊ शकतो कि नाही, याबाबत 5 वर्षांपूर्वी पर्यंत एक निराशेची भावना होती, मात्र देशातील युवकांनी नेतृत्व हाती घेतले आणि परिवर्तन समोर दिसत आहे.
4-5 वर्षांपूर्वी पर्यंत अनेकांना हे देखील अशक्य वाटत होते कि भारतात डिजिटल व्यवहारांचा प्रसार इतका वाढू शकतो? मात्र आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भक्कमपणे उभा आहे.
भ्रष्टाचाराविरोधात काही वर्षांपूर्वी देशातील युवक कसे रस्त्यावर उतरले होते , हे देखील आपण पाहिले आहे. तेव्हा वाटत होते देशात व्यवस्था बदलणे कठीण आहे. मात्र युवकांनी हा बदल देखील करून दाखवला.
मित्रांनो, युवा जोश, युवा ऊर्जा हा 21 व्या शतकातील या दशकात भारताला बदलण्याचा आधार आहे. एक प्रकारे, 2020, हा जानेवारी महिना, नवीन वर्षाच्या शुभेच्छांनी सुरु होतो. मात्र आपण हे देखील लक्षात ठेवायला हवे कि हे केवळ नवीन वर्ष नाही तर नवीन दशक देखील आहे. आणि म्हणूनच आपण आपली स्वप्ने या दशकांतील स्वप्नांशी जोडून सिद्धी प्राप्त करण्याच्या दिशेने आणि अधिक उर्जेसह, अधिक उत्साहासह आणि समर्पणाने सहभागी व्हायला हवे.
नवीन भारताचा संकल्प, तुमच्याकडूनच पूर्ण केला जाणार आहे. हे युवा विचारच आहेत जे म्हणतात कि समस्यांना टाळू नका, जर तुम्ही युवक आहात , तर समस्या टाळण्याबाबत कधी विचार करूच शकत नाही. युवक आहात, त्यामुळे समस्यांशी झुंजा , समस्या सोडवा, आव्हानालाच आव्हान द्या. याच विचारासह केंद्र सरकार देखील देशासमोरच्या कित्येक दशके जुन्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मित्रांनो, गेले काही दिवस देशात आणि युवकांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची चर्चा सुरु आहे. हा कायदा काय आहे, हा कायदा आणणे आवश्यक का होते? विविध प्रकारच्या लोकांकडून युवकांच्या मनात असे अनेक प्रश्न भरविण्यात आले आहेत. अनेक युवक जागरूक आहेत, मात्र काही असेही आहेत जे अजूनही या भ्रमाचे शिकार झाले आहेत, अफवांचे बळी ठरले आहेत. अशा प्रत्येक युवकाला समजावणे ही देखील आपली जबाबदारी आहे आणि त्याचे समाधान करणे ही देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
आणि म्हणूनच आज राष्ट्रीय युवा दिनी मी पुन्हा एकदा देशातील युवकांना, पश्चिम बंगालच्या युवकांना, ईशान्येकडील युवकांना आज या पवित्र भूमीवरून आणि युवकांमध्ये उपस्थित राहत काही नक्कीच सांगू इच्छितो.
मित्रांनो, असे नाही कि देशाचे नागरिकत्व देण्यासाठी भारत सरकारने रातोरात कुठला नवीन कायदा बनवला. आपल्याला सर्वाना माहित असायला हवे कि दुसऱ्या देशातून कुठल्याही धर्माची कुठलीही व्यक्ती, ज्याचा भारतावर विश्वास आहे, जो भारताची राज्य घटना मानतो, तो भारताचे नागरिकत्व घेऊ शकतो. यात कुठलीही दुविधा नाही, मी पुन्हा सांगतो, नागरिकत्व कायदा नागरिकत्व हिरावून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. आणि या कायद्यात केवळ एक सुधारणा आहे. .ही दुरुस्ती, ही सुधारणा काय आहे? आम्ही बदल हा केला आहे कि भारताचे नागरिकत्व घेण्याची सवलत आणखी वाढवली आहे. ही सवलत कुणासाठी वाढवली आहे? त्या लोकांसाठी , ज्यांच्यावर फाळणी झाल्यानंतर बनलेल्या पाकिस्तानात, त्यांच्या धार्मिक आस्थेमुळे अत्याचार झाले, छळ झाला, जगणे कठीण झाले, माता, भगिनी, मुलींना असुरक्षित वाटू लागले. आयुष्य जगणे हाच एक प्रश्न बनला. आयुष्याला अनेक संकटांनी ग्रासले.
मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर , पूज्य महात्मा गांधी पासून तत्कालीन अनेक दिग्गज नेत्यांचे हेच म्हणणे होते कि भारताने अशा लोकांना नागरिकत्व द्यायला हवे, ज्यांच्यावर त्यांच्या धर्मामुळे पाकिस्तानात अत्याचार केले जात आहेत.
आता मी तुम्हाला विचारतो, मला सांगा कि अशा शरणार्थींना आपण मरण्यासाठी परत पाठवायला हवे का? आपली जबाबदारी आहे कि नाही, त्यांना बरोबरीने आपले नागरिक बनवायला हवे कि नको. जर तो कायद्यानुसार, बंधनानुसार रहात असेल, सुख-शांतीत आयुष्य व्यतीत करेल तेव्हा आपल्याला आनंद होईल कि नाही होणार … हे काम पवित्र आहे कि नाही … आपण करायला हवे कि नको. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणे चांगले आहे कि वाईट आहे ? जर मोदीजी हे करत असतील तर तुमची साथ आहे ना, तुमची साथ आहे ना … हात उंचावून सांगा तुमची साथ आहे ना ?
आमच्या सरकारने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान सुपुत्रांच्या इच्छेचेच केवळ पालन केले आहे. जे महात्मा गांधी सांगून गेले ते काम आम्ही केले आहे
… आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यात आम्ही नागरिकत्व देतच आहोत, कुणाचेही … कुणाचेही … नागरिकत्व हिरावून घेत नाही.
याशिवाय, आजही कुठल्याही धर्माची व्यक्ती , ईश्वराला मानत असेल किंवा नसेल … जी व्यक्ती भारताचे संविधान मानते, ती निहित प्रक्रियेनुसार भारताचे नागरिकत्व घेऊ शकते. हे तुम्हाला व्यवस्थित समजले कि नाही . समजले ना … जे छोटे-छोटे विद्यार्थी आहेत त्यांनाही कळले ना .. जे तुम्हाला समजत आहे ना ते राजकारण खेळणारे समजून घ्यायलाच तयार नाही. ते देखील समजूतदार आहेत, मात्र त्यांना समजून घ्यायचे नाही. तुम्ही समजूतदार देखील आहात आणि देशाचे भले व्हावे असे वाटणारे युवा तरुण देखील आहात.
आणि हो, ईशान्येकडील राज्यांच्या बाबतीत,बोलायचे तर ईशान्य प्रदेश आमचा अभिमान आहे. ईशान्येकडील राज्यांची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली लोकसंख्या, तिथले रीती रिवाज , तिथले राहणीमान, खाणेपिणे त्यावर या कायद्यात ज्या सुधारणा केल्या आहेत त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे.
मित्रांनो, एवढ्या स्पष्टीकरणानंतरही काही लोक आपल्या राजकीय कारणांसाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बाबतीत सातत्याने दिशाभूल करत आहेत, गैरसमज पसरवत आहेत. मला आनंद आहे कि आजचे तरुण अशा लोकांचे गैरसमज दूर करत आहेत.
आणि, पाकिस्तानात ज्याप्रकारे अन्य धर्माच्या लोकांवर अत्याचार होत आहेत, त्याबाबत देखील जगभरात आवाज उठवत आहेत. आणि ही गोष्ट देखील स्पष्ट आहे कि नागरिकत्व कायद्यात आम्ही ही दुरुस्ती केली नसती तर हा वाद निर्माण झाला नसता आणि जगालाही समजले नसते कि पाकिस्तानात अल्पसंख्यकांवर कसे अत्याचार होत आहेत. मानवाधिकारांचे कसे उल्लंघन होत आहे. माता भगिनींच्या आयुष्याची वाताहत केली जात आहे. हा आमच्या पुढाकाराचा परिणाम आहे आता पाकिस्तानला उत्तर द्यावे लागेल कि 70 वर्षे तुम्ही तिथल्या अल्पसंख्यकांवर अत्याचार का केले?
मित्रांनो, जागरूक राहत , जागरूकता निर्माण करणे , इतरांना जागरूक करणे हे देखील आपले उत्तरदायित्व आहे. आणखी अनेक विषय आहेत ज्याबाबत समाजात जागृती, लोक चळवळ, लोकचेतना आवश्यक आहे. उदा . पाण्याचेच घ्या, … पाणी वाचवणे आज प्रत्येक नागरिकांची जबाबदारी बनत आहे. एकदा वापरण्याच्या प्लास्टिक विरोधातील अभियान असेल किंवा गरीबांसाठी सरकारच्या अनेक योजना, या सर्व बाबतीत जागरूकता वाढवण्यात तुमचे सहकार्य देशाची खूप मोठी मदत करेल.
मित्रांनो, आपली संस्कृती आणि आपल्या संविधानाच्या आपल्याकडून याच अपेक्षा आहेत कि नागरिक म्हणून आपली कर्तव्ये, आपल्या जबाबदाऱ्या आपण प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने पार पाडाव्यात. स्वातंत्र्याच्या 70 वर्षां दरम्यान आपण अधिकार… अधिकार… खूप ऐकले आहे. अधिकारांबाबत लोकांना जागरुकही केले आहे. आणि ते आवश्यक देखील होते.. मात्र आता केवळ अधिकारच नव्हे तर प्रत्त्येक भारतीयाचे कर्तव्य देखील तेवढेच महत्वपूर्ण असायला हवे. आणि याच मार्गावरून चालताना आपण भारताला जागतिक पटलावर आपल्या नैसर्गिक स्थानी पाहू शकू. हीच विवेकानंदांची प्रत्येक भारतीयाकडून अपेक्षा होती आणि हेच या संस्थेच्या मुळाशी देखील आहे.
स्वामी विवेकानंदजी यांची देखील हीच इच्छा होती, त्यांना भारतमातेला भव्य रूपात पाहायचे होते. आपण सर्वजणही त्यांची स्वप्ने साकार करण्याचा संकल्प करत आहोत. आज पुन्हा एकदा स्वामी विवेकानंद जी यांच्या पवित्र जयंतीनिमित्त बेल्लूर मठाच्या या पवित्र भूमीवर पूजनीय संतांच्या सान्निध्यात काही क्षण व्यतीत करण्याचे सौभाग्य मला लाभले. आज सकाळी-सकाळी खूप वेळ पूज्य स्वामी विवेकानंदजी ज्या खोलीत राहायचे, तिथे एक आध्यात्मिक चेतना आहे, स्पंदने आहेत, त्या वातावरणात आज पहाटेचा वेळ व्यतीत करणे माझ्या आयुष्यातील अमूल्य वेळ होता जो व्यतीत करण्याची संधी मला मिळाली. असे वाटत होते कि पूज्य स्वामी विवेकानंद जी आपल्याकडून आणखी काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत, नवी ऊर्जा देत आहेत. आपल्या संकल्पांमध्ये नवे सामर्थ्य भरत आहेत आणि याच भावनेसह, याच प्रेरणेसह, याच नव्या ऊर्जेसह , तुम्हा सर्व सहकाऱ्यांच्या उत्साहासह, या मातीच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा इथून तीच स्वप्ने साकार करण्यासाठी निघणार आहे, चालत राहीन, काही ना काही करत राहीन .. सर्व संतांचे आशीर्वाद कायम पाठीशी असू दे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. स्वामीजी नेहमी म्हणायचे, सगळे काही विसरून जा, माता भारतीलाच आपली देवी मानून तिची सेवा करा याच भावनेसह तुम्ही माझ्याबरोबर म्हणा… दोन्ही मुठी , हात उंचावून पूर्ण ताकदीनिशी म्हणा…
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप-खूप धन्यवाद !