जे पी मॉर्गन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. 2007 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेचे सदस्य भारतात भेटत आहेत.
आंतरराष्ट्रीय परिषदेत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड, अमेरिकेचे माजी मंत्री हेन्री किसींजर आणि कोंडोलिझा राईस, रॉबर्ट गेटस् यांच्यासह व्यापार आणि वित्त जगतातले मान्यवर जेमी डिमन (जे पी मॉर्गन), रतन टाटा (टाटा समूह) आणि जागतिक पातळीवरच्या नेस्ले, अलिबाबा, अल्फा, इबेरडोला, क्राफ्ट हेन्झ या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
या गटाचे स्वागत करताना पंतप्रधानांनी 2024 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स करण्यासाठीच आपला दृष्टीकोन विषद केला. जागतिक दर्जाची पायाभूत संरचना, माफक दरातल्या आरोग्यसेवेत सुधारणा, दर्जेदार शिक्षण यांनाही सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
धोरण आखतांना, जनसहभाग हा सरकारसाठी मार्गदर्शक घटक राहिला आहे. परराष्ट्र व्यवहार धोरणासंदर्भात भारत आपल्या धोरणात्मक भागीदारांसमवेत काम करतच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.