पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोक कल्याण मार्ग येथे देशभरातील प्रमुख शीख विचारवंतांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
शेतकरी कल्याण, युवा सशक्तीकरण, अंमली पदार्थ मुक्त समाज, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कौशल्य, रोजगार, तंत्रज्ञान आणि पंजाबचा सर्वांगीण विकास अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी शिष्टमंडळासोबत मनमोकळा संवाद साधला.
शिष्टमंडळाला भेटून आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, विचारवंत हे समाजाचे मत बनवणारे असतात. शिष्टमंडळातील सदस्यांना लोकांबरोबर सहभागी होऊन त्यांना शिक्षित करण्याचे आणि नागरिकांना योग्यरित्या माहिती देण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन करून, त्यांनी एकतेच्या भावनेचे महत्व अधोरेखित केले . ते म्हणाले की ही एकतेची भावना आपल्या देशाच्या व्यापक आणि सुंदर विविधतेमधील मध्यवर्ती स्तंभ आहे.
पंतप्रधानांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मातृभाषेत उच्च शिक्षण प्रत्यक्षात साकार व्हावे यासाठी भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिष्टमंडळाने निमंत्रणाबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि सांगितले की, देशाचे पंतप्रधान त्यांच्याशी अशा अनौपचारिक वातावरणात सहभागी होतील याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. शीख समुदायाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी सातत्याने केलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी प्रशंसा केली.