“आयएनएसव्ही तरिणी” या जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघालेल्या भारतीय नौदलातल्या सहा महिला अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सर्व भारतीय महिला खलाशी असलेल्या नौकेची ही पहिलीच पृथ्वी प्रदक्षिणा असेल. या महिन्याच्या उत्तरार्धात गोव्यातून त्या आपली मोहिम सुरु करणार असून मार्च 2018 मध्ये त्या गोव्यात परतणे अपेक्षित आहे. नाविका सागर परिक्रमा असे या मोहिमेचे नाव आहे. परिक्रमेत पाच टप्पे असून फ्रीमॅण्टल (ऑस्ट्रेलिया), लिटलेटॉन (न्यूझीलंड), पोर्ट स्टॅनले (फॉकलॅण्डस) आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या चार बंदरांवर थांबे आहेत.
“आयएनएसव्ही तरिणी” हें 55 फुटांचे जहाज असून ते स्वदेशी बनावटीचे आहे. भारतीय नौदलात याच वर्षाच्या सुरुवातीला ते दाखल झाले आहे.
पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत आपल्या आगामी मोहिमेबाबत खलाशांनी माहिती दिली. पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून प्रदक्षिणेतील त्यांच्या प्रगतीची माहिती ते वेळोवेळी घेत राहतील असे सांगितले. भारताच्या क्षमतांचे आणि ताकदीचे प्रदर्शन जगाला घडवा, असे त्यांनी सांगितले. मोहिम यशस्वी झाल्यावर आपले अनुभव लिहा, असेही पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. जहाजाचे कप्तान लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी आहेत.
खलाशांमध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जमवाल व पी स्वाती, लेफ्टनंट एस. विजया देवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता यांचा समावेश आहे.