पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूर येथे 750 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्याशिवाय, 1000 अंगणवाडी केंद्र आणि इतर विकास प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी लुवांगपोकपा इथले बहुक्रीडा संकुल, रानी गायदिनल्यु पार्क आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ केला. त्यानंतर लुवांगसंगबम इथल्या जाहीर सभेत त्यांनी भाषणही केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच, गेल्या वर्षभरात राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी, त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
आज ज्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले, ते प्रकल्प, युवकांच्या कौशल्य आणि गुणवत्तेला वाव देऊन त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारे आहेत. तसेच महिला सक्षमीकरण आणि दळवळणाच्या सोयी उपलब्ध करुन देणारे प्रकल्प आहेत असे त्यांनी सांगितले.
मणिपूर येथे सुरु होणारे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ईशान्य भारतातील युवक युवतींच्या क्रीडा कौशल्यांना संधी देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत मणिपूरच्या युवकांनी खेलो इंडिया उपक्रमात अधिकाअधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत मणिपूरच्या खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
“क्रीडा क्षेत्र”, महिला सक्षमीकरणाचे उत्तम साधन ठरु शकते याचा वस्तूपाठ मणिपूरने घालून दिला असे मोदी म्हणाले. मीराबाई चानू आणि सरितादेवी यांच्यासारख्या महिला खेळाडूंचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. याच संदर्भात त्यांनी 1,000 अंगणवाडी केंद्रांच्या शुभारंभाचीही माहिती दिली. सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय पोषणआहार योजनेचीही त्यांनी माहिती दिली.
ईशान्य भारतात दळवळणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या भारताच्या निर्मितीत ईशान्य भारत इंजिनाची भूमिका बजावू शकतो असे ते म्हणाले. देशाच्या समान विकासाच्या दृष्टीने पाहिल्यास, तुलनेने मागे असलेल्या ईशान्य भारताला समान पातळीवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. ईशान्य भारतात आपण स्वत: येत्या चार वर्षात 25 वेळा आलो असेही त्यांनी सांगितले.
ईशान्य भारतात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे असे सांगत सरकारने हाती घेतलेले रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. राज्य सरकारने सुरु केलेल्या नागरिक केंद्री उपक्रमांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
जनतेशी संवाद आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण अशा उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
एप्रिल 1944 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूर येथूनच स्वातंत्र्याची हाक दिली होती, याचे स्मरण करत आज त्याच मणिपूरने नव्या भारताच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.