ओखी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लक्षद्विप, तामिळनाडू आणि केरळला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांशी, मच्छिमारांशी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कवरत्ती आणि कन्याकुमारी येथे ते नागरिकांशी बोलले. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या तिरुवनंतपुरम जवळच्या पंथुरा गावालाही पंतप्रधानांनी भेट दिली. चक्रीवादळामुळे झालेल्या त्रासाबद्दल, येत असलेल्या अडचणींबाबत लोकांनी त्यांना माहिती दिली. त्यांना सर्वत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. या संकटकाळी केंद्र सरकार नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीच्या आणि मदतकार्याचा विस्तृत आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी कवरत्ती, कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम येथे वेगवेगळया बैठका घेतल्या. या बैठकांना केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती आणि लक्षद्विपचे प्रशासक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना केंद्र सरकार पॅकेजच्या माध्यमातून मदत करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्विपच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तात्काळ 325 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य पाठवेल.
पंतप्रधानांनी आज जाहीर केलेले वित्तीय सहाय्य ओखी चक्रवादळाचा फटका बसल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूसाठी देण्यात आलेल्या 280 कोटी रुपये तर केरळला देण्यात आलेल्या 76 कोटी रुपयांव्यतिरिक्त आहे.
ओखी चक्रीवादळामुळे पूर्णत: पडझड झालेल्या सुमारे 1,400 घरांची पुनर्बांधणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला नवे घर बांधण्यासाठी सहाय्य म्हणून दिड लाख रुपये मिळणार आहेत.
ओखी चक्रीवादळाचा फटका असलेल्या नागरिकांच्या विम्याच्या दाव्याची रक्कम झटपट देण्याचा सल्ला विमा कंपन्यांना देण्यात आला आहे.
चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदाराला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधींतर्गत दोन लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
तत्पूर्वी आढावा बैठकांमध्ये पंतप्रधानांना ओखी चक्रीवादळाच्या प्रभावाची माहिती देण्यात आली. गेल्या 125 वर्षात अशा प्रकारचे हे तिसरे मोठे वादळ आहे. 30 नोव्हेंबर 2017 ला चक्रीवादळ आले. मदत आणि बचावकार्य त्याच दिवशी सुरु करण्यात आले. आतापर्यंत 845 मच्छिमारांना वाचवण्यात आले.
किनाऱ्यापासून 700 नॉटिकल मैल अंतरापलिकडे शोध घेतला गेल्याची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.