कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांच्या गटाशी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या काळातील असाधारण परिस्थितीशी असामान्य धैर्याने लढा देणाऱ्या वैद्यकीय समुदायाचे आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी आभार मानत, 'आज सारा देश त्यांचा ऋणी आहे' अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. चाचण्या असोत, औषधपुरवठा असो की कमीत कमी वेळात पायाभूत सुविधांची उभारणी असो- सर्वच गोष्टी अतिशय वेगाने केल्या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्राणवायूची निर्मिती आणि पुरवठा यासंबंधीच्या अनेक आव्हानांवर मात करण्यात आली आहे. मनुष्यबळात वाढ करण्यासाठी देशाने उचललेली पावलेही महत्त्वाची ठरली असून- कोविड उपचारांमध्ये वैद्यकीच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेणे, ग्रामीण भागात आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेणे अशा उपायांमुळे आरोग्यव्यवस्थेला जास्तीचा आधार मिळाला आहे.
लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ आघाडीवरील कोरोनायोद्ध्यांपासून करण्याच्या रणनीतीचा, दुसऱ्या लाटेदरम्यान मोठा फायदा झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. देशाच्या आरोग्य क्षेत्रातील जवळपास 90% व्यावसायिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. बहुतांश डॉक्टरांच्या सुरक्षिततेची खबरदारी लसीमुळे घेतली जात आहे.
डॉक्टरांनी त्यांच्या दैनंदिन परिश्रमांमध्ये ऑक्सिजन ऑडिटचा अंतर्भाव करावा असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. बहुसंख्य रुग्णांवर गृह-विलगीकरणात उपचार सुरु असल्याचे अधोरेखित करून, एसओपी अर्थात प्रमाणित कार्यान्वयन प्रणालीच्या आधारेच अशा रुग्णांची घरात काळजी घेतली जाईल याची खबरदारी घेण्याची विनंती त्यांनी डॉक्टरांना केली. गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी दूरवैद्यक सेवेने मोठे योगदान दिले असून आता ग्रामीण भागांतही या सेवेचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. पथके तयार करून खेड्यांमध्ये दूरवैद्यक सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांची त्यांनी प्रशंसा केली. अशाच पद्धतीने पथके स्थापन करून, एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना व एमबीबीएस इंटर्न्सना प्रशिक्षण देऊन, देशाच्या सर्व तालुके आणि जिल्ह्यांत दूरवैद्यक सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांतील डॉक्टरांना केले.
पंतप्रधानांनी म्युकोरमायकोसिसच्या आव्हानाविषयीही चर्चा केली आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी डॉक्टरांना आणखी परिश्रम घ्यावे लागतील असेही ते म्हणाले. शारीरिक आरोग्याच्या काळजीबरोबरच मानसिक आरोग्याची काळजीही घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. "या विषाणूशी दीर्घकाळ सातत्याने लढत राहणे वैद्यकीय समुदायासाठी खचितच मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असले पाहिजे, परंतु या लढ्यात नागरिकांच्या त्यांच्यावरील विश्वासाचे बळ त्यांच्या पाठीशी आहे" असेही ते म्हणाले.
रुग्णसंख्येत नुकतीच वाढ झाल्याच्या कठीण काळात पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाबद्दल डॉक्टरांनी यावेळी त्यांचे आभार मानले. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्याबद्दलही त्यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले. पहिल्या लाटेनंतरच्या सज्जतेविषयी आणि दुसऱ्या लाटेच्या वेळच्या अनुभवांविषयी डॉक्टरांच्या गटाने पंतप्रधानांना माहिती दिली. डॉक्टरांनी आपले अनुभव कथन केले, तसेच ते वापरत असलेल्या चांगल्या कार्यपद्धती आणि अभिनव संकल्पनाही सांगितल्या. कोविडशी लढतानाच कोविडेतर रुग्णांची काळजी घेण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी तसेच औषधांच्या अयोग्य वापराबद्दल त्यांना जागरूक करण्यासाठी डॉक्टर मंडळींकडून होत असलेल्या कार्याचे अनुभवही त्यांनी मांडले.
या बैठकीत, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), आरोग्य सचिव, औषधनिर्माण सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील, मंत्रालयातील व केंद्र सरकारच्या विविध विभागांतील अन्य अधिकारी उपस्थित होते.