पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत उद्योजकांशी संवाद साधला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणारे 41 उद्योजक यावेळी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने हाती घेतलेले विविध उपक्रम आणि धोरण सुधारणा यावर दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्तृत चर्चा झाली. आर्थिक वृद्धी आणि विकासात उद्योगांच्या योगदानावरही चर्चा झाली.
देशातील वातावरण व्यवसायपूरक होत असून या संदर्भातील सुधारणांचे उद्योग जगतातल्या अनेक प्रतिनिधींनी कौतुक केले. यामुळे भारताची विकासक्षमता खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल असे सांगून उद्योजकांनी पंतप्रधानांच्या नवभारताच्या संकल्पनेचे कौतुक केले.
स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांबरोबर अलीकडे केलेल्या चर्चेबाबतही पंतप्रधान बोलले. सकारात्मक मनोवृत्ती आणि “करु शकतो” हा विश्वास आता देशात दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे विशेषत: कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केले.
देशांतर्गत उत्पादन निर्मितीला चालना देण्यावर त्यांनी भर दिला. वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण साधने अशा क्षेत्रात उत्पादन वाढीला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी, गेल्या चार वर्षात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने योजलेल्या उपक्रमांची माहिती वित्त मंत्री पियुष गोयल यांनी दिली.