पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021 चे उद्घाटन झाले. या परिषदेची संकल्पना “आपल्या सामाईक भविष्याची पुनर्व्याख्या: सर्वांसाठी सुरक्षित वातावरण” अशी आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी टेरी संस्थेचे, ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. आपले वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी अशा जागतिक व्यासपीठांची नितांत गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येत्या काळात मानवतेच्या प्रगतीचा प्रवास कोणत्या दिशेने होतो, हे दोन महत्वाच्या गोष्टी ठरवतील. पहिली म्हणजे आपल्या सर्व लोकांचे आरोग्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या वसुंधरेचे आरोग्य. या दोन्ही गोष्टी परस्परांशी संबधित आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
आपण इथे आपल्या पृथ्वीच्या आरोग्याविषयी चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. आज आपल्यासमोर असलेल्या आव्हानांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र आज आपण ज्या संकटांचा सामना करत आहोत, त्यावर पारंपारिक मार्गांनी तोडगा शोधणे कठीण आहे. आज वेगळ्या पद्धतीने विचार करून आपल्या युवाशक्तीमध्ये गुंतवणूक करण्याची आणि शाश्वत विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी हवामान बदलाशी लढा देतांना, सर्वांसाठी समान न्याय असावा, यावर भर दिला. ‘हवामानविषयक न्याय’ ही संकल्पना विश्वस्तभावनेतून प्रेरित झाली आहे. अशी भावना, जिथे, विकासासोबत गरिबातल्या गरिबांसाठी करुणा आणि दयाभाव असतो. हवामानविषयक न्याय म्हणजे विकसनशील देशांनाही विकसित होण्यासाठी पुरेसा अवकाश उपलब्ध करुन देणे. जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी आणि कर्तव्ये समजून घेईल, त्यावेळी ‘हवामानविषयक न्याय’ ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येईल, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या हवामानविषयक कटिबद्धतेला कृतीचीही जोड आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आमच्या जनतेच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आम्ही आमची उद्दिष्टे वेळेआधीच पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. 2005 च्या पातळीवरुन उत्सर्जनाची तीव्रता जीडीपीच्या 33 ते 35 टक्क्यांवर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भूमीची खराब होत असलेली अधोगती थांबवण्यासाठी, आम्ही सातत्यपूर्ण प्रगती करत आहोत, असेही पंतप्रधान म्हणाले. भारतात अक्षय ऊर्जाही वेगाने विकसित होत आहे. देशात 2030 पर्यंत 450 गिगावॅट अक्षय उर्जानिर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेनेही आम्ही वाटचाल करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले.
सर्वांसाठी समान उपलब्धता असल्याशिवाय शाश्वत विकासाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याही दिशेने, भारताने उत्तम प्रगती केली आहे. मार्च 2019 मध्ये, भारताने जवळपास 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आणि हे उद्दिष्ट पूर्ण करतांना, आम्ही शाश्वत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी मॉडेल्सच्या माध्यमातून पूर्ण केले गेले. उजाला अभियानाअंतर्गत 367 दशलक्ष एलईडी बल्ब्स लोकांच्या आयुष्याचा भाग झाले आहेत. यामुळे दरवर्षी 38 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले आहे. जल जीवन अभियानाअंतर्गत, केवळ 18 महिन्यांत, 34 दशलक्ष घरांपर्यंत नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील 80 दशलक्ष घरांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस पोहचवण्यात आला आहे. भारताच्या एकूण उर्जा वापरात, नैसर्गिक गॅसचा वापर, 6 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
शाश्वततेविषयी जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते, त्यावेळी, केवळ हरित ऊर्जेवर भर दिला जातो, मात्र हरित ऊर्जा हे केवळ साधन आहे, आपले साध्य हरित उर्जा हे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आमच्या संस्कृतीत वनसंपदेविषयी प्रचंड आदर असून भारतातील हरितक्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकासाच्या आपल्या उद्दिष्टात, प्राण्यांच्या संरक्षणाकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. गेल्या पाच ते सात वर्षात, भारतात सिंह, वाघ, बिबटे आणि डॉल्फिन्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढते आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी सहभागी मान्यवरांचे लक्ष दोन विषयांकडे वेधले. एकजीनसीपणा आणि नवोन्मेष. हा शाश्वत विकास केवळ एकत्रित प्रयत्नांतूनच साधला जाऊ शकतो. जेव्हा प्रत्येक व्यक्ती राष्ट्रहिताचा, राष्ट्रकल्याणाचा विचार करेल, जेव्हा प्रत्येक देश जागतिक कल्याणाचा विचार करेल, त्याचवेळी शाश्वत विकास प्रत्यक्षात अस्तित्वात येईल. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याच्या माध्यमातून भारताने या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सर्वांनी आपली मने आणि राष्ट्रे यांची दारे मुक्त ठेवावीत असे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.
नवोन्मेषाविषयी बोलतांना ते म्हणाले की आज भारतात, अनेक स्टार्ट अप कंपन्या अक्षय उर्जा, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात काम करत आहेत. धोरणकर्ते म्हणून, आपण त्यांच्या या प्रयत्नांना पाठींबा द्यायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या युवकांची उर्जा आपल्याला उत्तम परिणाम देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधानांनी आपत्ती व्यवस्थापन क्षमतांचा विशेषत्वाने उल्लेख केला. यासाठी मनुष्यबळ विकास आणि तंत्रज्ञानावर भर द्यायला हवा असे ते म्हणाले. आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधा उभारण्यासाठीच्या सहकार्याबाबत आम्ही काम करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. शाश्वत विकासाचे धेय्य गाठण्यासाठी भारत जे शक्य असेल ते सर्व करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले.आमचा मानवकेन्द्री दृष्टीकोन, जागतिक कल्याणासाठी महत्वाची उर्जा ठरू शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
गयानचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे, मालदीवच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद, संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपसरचिटणीस अमिना जे मोहम्मद आणि भारताचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.