भारत-आसियान भागिदारीला 25 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित आसियान-भारत स्मरणार्थ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सू की, व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन फुक आणि फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ ड्युटर्ट यांच्याबरोबर काल स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेतल्या.
2. आसियान-भारत स्मृती शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी या तीनही नेत्यांचे भारतात स्वागत केले.
3. स्टेट कौन्सलर आंग सान सू की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान परस्पर हिताच्या विविध मुद्यांवर आणि सप्टेंबर 2017 मध्ये पंतप्रधानांच्या म्यानमार दौऱ्यात घेतलेल्या प्रमुख निर्णयांच्या पाठपुराव्यासह द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.
4. पंतप्रधान फुक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत, भारत-प्रशांत क्षेत्रातील सागरी सहकार्य, संरक्षण, तेल आणि वायू, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांसह व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत राहून उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या वाढीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. माहिती आणि प्रसारण क्षेत्रातील सहकार्याबाबत आणि आसियान-भारत अंतराळ सहकार्याअंतर्गत व्हिएतनाममध्ये ट्रॅकिंग आणि डाटा रिसेप्शन स्टेशन आणि डाटा प्रोसेसिंग सुविधा स्थापन करण्याबाबत या दौऱ्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या दोन करारांमुळे भारत-व्हिएतनाम संबंधांना अधिक चालना मिळेल, यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाच्या वापराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, ज्याअंतर्गत एल ॲन्ड टी कंपनीला ऑफशोर पॅट्रोल व्हेसल्सच्या निर्मितीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे अन्य कर्ज लवकरच वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
5. राष्ट्रपती ड्यूटर्ट यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत, उभय नेत्यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये मनिला येथे झालेल्या बैठकीनंतर द्विपक्षीय संबंधातील प्रगती आणि जागतिक आणि प्रादेशिक परिस्थितीचा आढावा घेतला. उभय देशांमध्ये सहकार्याला विशेषत: पायाभूत विकास क्षेत्रातील सहकार्याला अधिक गती देण्याबाबत यावेळी एकमत झाले. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरण आणि फिलिपिन्सच्या बिल्ड-बिल्ड-बिल्ड कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही देशांच्या खासगी क्षेत्रांदरम्यान सहकार्यासाठी अनेक क्षेत्रे असल्याबाबत त्यांच्यात एकमत झाले. इन्वेस्ट इंडिया आणि बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंटस ऑफ द फिलिपिन्स यांच्यातील सामंजस्य कराराच्या आदान-प्रदान प्रसंगी दोन्ही नेते उपस्थित होते.
6. या तीनही बैठकांमध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या मान्यवरांनी भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी आसियान-भारत संबंधांचे महत्व अधोरेखित केले आसियान-भारत हे स्मृती शिखर परिषदेतील चर्चेसाठी उत्सुक आहेत.