पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे झालेल्या सहाय्यक सचिवांच्या (2017 प्रशासकीय अधिकारी तुकडी) समारोपाला उपस्थित होते.
यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर विविध विषयांवर सादरीकरण केले. या सादरीकरणात महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या परिवर्तनापासून पारदर्शकतेसाठी विविध उपाय आदी विषयांचा समावेश होता.
या अधिकाऱ्यांनी नवीन कल्पना, संकल्पना आणि दृष्टीकोन अंगीकारावा असे पंतप्रधानांनी सांगितले. अनेकविध स्रोतातून प्राप्त झालेल्या माहितीचे पृथ:करण आणि विश्लेषण करून ही माहिती आत्मसात करावी, असे पंतप्रधानांनी सांगितले. या अधिकाऱ्यांनी अविरत शिकत राहण्यासाठी झगडावे असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना नागरी अधिकाऱ्यांसाठी सेवा अभिमुखता कायम राखणे गरजेचे आहे कारण यामधूनच तटस्थता येते असे पंतप्रधानांनी सांगितले.
सार्वजनिक सहभागाच्या महत्वावर भर देताना या अधिकाऱ्यांनी सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
सहाय्यक सचिव म्हणून आलेले उत्तम अनुभव अंगी बाणवावे, असेही ते म्हणाले. या तरुण अधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘तुमचे यश हे देशासाठी महत्वपूर्ण आहे, तुमच्या यशातूनच अनेक लोकांचे आयुष्य बदलून जाईल’ असे पंतप्रधानांनी सांगितले.