देशातील कोविड-19 महामारीची परिस्थिती, विशेषतः ओमायक्रॉनच्या लाटेसंदर्भातील स्थिती तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी, कोविड आजाराबाबतचे जागतिक पटलावरील चित्र आणि भारतातील कोविड-19 संसर्गाची एकूण परिस्थिती याबाबत तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीम सातत्याने सुरु ठेवण्यासाठीचे भारताचे प्रयत्न आणि नुकत्याच होऊन गेलेल्या कोविड बाधितांच्या संख्येतील तीव्र वाढीच्या दरम्यान रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांची संख्या कमी असणे, आजाराची तीव्रता तसेच मृत्यू दर कमी असणे यामध्ये उपयुक्त ठरलेली लसीची परिणामकारकता यावर या बैठकीत अधिक भर देण्यात आला. या आढाव्यातून असे दिसून आले की, केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सक्रीय आणि सहकार्यात्मक प्रयत्नांची कोरोना संसर्गाच्या प्रसाराचे परिणामकारक व्यवस्थापन करण्यात मोठी मदत झाली. भारताने महामारीला योग्य प्रकारे दिलेला प्रतिसाद आणि नागरिकांचे लसीकरण करण्यासाठीच्या प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या वैश्विक पातळीवरील संस्थांनी प्रशंसा केली आहे तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूल अँड इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटीटीव्ह्नेस यांच्या अहवालात देखील भारताच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे.
लसीकरण करणारे तसेच आरोग्य सुविधा कर्मचारी, केंद्र तसेच राज्य सरकार प्रशासनातील अधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. या बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी कोविड संबंधित आदर्श नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि लस घेण्याच्या विहित वेळी लसीकरण करून घेण्यासाठी यापुढच्या काळात देखील समाजाकडून पाठींबा आणि व्यक्तिगत सहभाग मिळण्याची तसेच कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करण्याची विनंती केली
केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि नीती आयोगाच्या सदस्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.