2018 च्या सेऊल शांतता पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य सुधारणे, जागतिक आर्थिक वृद्धीसाठी केलेले प्रयत्न भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वाढवून मानव विकास साधण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचारविरोधी तसेच सामाजिक एकात्मता वाढवण्यासाठी चालवलेल्या मोहिमांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत समितीने त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
हा पुरस्कार मोदी यांना घोषित करतांना भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मोदी यांनी दिलेले योगदान गरीब आणि श्रीमंत यांच्यातली आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणे, जी ‘मोदीनॉमिक्स’म्हणून ओळखली जातात, या कार्याची दखल समितीने घेतली आहे. त्याशिवाय भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना आणि विमुद्रीकरणासारखे निर्णय घेऊन स्वच्छ कारभारासाठी मोदी घेत असलेल्या प्रयत्नांचे निवड समितीने कौतुक केले आहे. जागतिक पातळीवर यशस्वी परदेश धोरण आखून प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी पंतप्रधान करत असलेले प्रयत्न जे ‘मोदीडॉक्ट्रीन’ आणि ‘ॲक्ट इस्ट पॉलिसी’ या नावाने संबोधले जातात त्याबद्दलही समितीने मोदी यांना श्रेय दिले आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे 14 वे व्यक्ती आहेत.
या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया सरकारचे आभार मानले असून हा पुरस्कार स्वीकारला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची वेळ नंतर निश्चित केली जाईल.
पार्श्वभूमी
कोरियाची राजधानी सेऊल येथे 24व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याच्या निमित्ताने 1990 पासून सेऊल शांतता पुरस्कार दिला जातो. या क्रीडा स्पर्धेसाठी जगभरातले 160 देश एकत्र आले होते. या देशांच्या प्रतिनिधींनी निर्माण केलेल्या सौहार्द आणि मित्रत्वाच्या वातावरणामुळे जागतिक शांतता आणि सौहार्दतेला चालना मिळाली होती. या घटनेची आठवण म्हणून शांततेच्या क्षेत्रात विशेष काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. जागतिक आणि प्रादेशिक शांततेसाठी कोरियन जनतेची कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. मानवजातीत सौहार्द प्रस्थापित करणे जागतिक पातळीवर विविध देशांदरम्यान नव्याने चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आणि एकूणच जागतिक शांततेला बळकटी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा द्वैवार्षिक पुरस्कार मान्यवर व्यक्तींना प्रदान केला जातो. याआधी संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यासह डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स सारख्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटनांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदा या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नामांकने आली होती. या सर्व नामांकनांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे.